हेलिकॉप्टर थेट ज्वालामुखीत कोसळलं; तरीही त्यांनी उकळत्या लाव्हावर एक रात्र कशी काढली?
![[Photo caption - 6 जानेवारी 2023; किलाविया ज्वालामुखीच्या हालिमाउमाऊ खड्ड्यातून होणारा लाव्हाचा धगधगता उद्रेक.]](https://ichef.bbci.co.uk/ace/ws/640/cpsprodpb/f9ba/live/7a024b50-8d8a-11f1-a7ab-8b30adf0800a.jpg.webp)
फोटो स्रोत, Getty Images
- Author, असिया फॉक्स आणि ज्यून क्रिस्टी
- Published
- वाचन वेळ: 9 मिनिटे
हवेत झेप घेणारे विमान अचानक उकळत्या ज्वालामुखीच्या पोटात जाऊन कोसळणे हीच मुळी काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना. पण जरा विचार करा, त्या विमानात असलेल्या लोकांसाठी याहूनही भयंकर आणि अंगावर काटा आणणारे काही घडू शकते का?
होय, नक्कीच घडू शकते!
आपल्या पायांखाली धगधगता लाव्हा उकळत असताना, ती संपूर्ण काळरात्र त्याच ज्वालामुखीच्या खड्यात घालवणे हे त्या अपघातापेक्षाही कित्येक पटीने थरारक आणि भयानक आहे.
गोष्ट आहे नोव्हेंबर 1992 ची. 'टायटॅनिक' आणि 'टर्मिनेटर 2' सारख्या अभूतपूर्व सुपरहिट चित्रपटांच्या व्हिज्युअल इफेक्ट्स (VFX) टीममध्ये काम करणारे ख्रिस डट्टी एका नव्या हॉलीवूड चित्रपटाच्या शूटिंगसाठी अमेरिकेतील हवाई बेटांवरील 'बिग आयलंड'वर हेलिकॉप्टरने फिरत होते.
त्यांच्यासोबत पायलट ग्रेग हॉस्किंग आणि कॅमेरा असिस्टंट माईक बेन्सन हेदेखील हेलिकॉप्टरमध्ये होते.
वाफेच्या दाट धुक्याला भेदून ते पुढे उड्डाण करत असतानाच दुर्दैवाने त्यांचे हेलिकॉप्टर एका खडकावर जाऊन धडकले. दुसऱ्याच क्षणी इंजिन पूर्णपणे बंद पडले आणि नियंत्रण सुटलेले ते हेलिकॉप्टर थेट त्या धगधगत्या ज्वालामुखीच्या खड्यात जाऊन कोसळले.

फोटो स्रोत, Getty Images
आम्ही 'स्लिव्हर' सिनेमाच्या क्लायमॅक्सचे शूटिंग हेलिकॉप्टरमधून करत होतो. तो नजराणा खूपच अद्भुत होता. किलावेया ज्वालामुखीतून उकळता लाव्हा थेट समुद्राच्या पाण्यात जाऊन मिसळत होता आणि त्यामुळे पांढऱ्या धुराचे प्रचंड लोट आकाशात उठत होते.
त्या क्षणी मी स्वतःशीच विचार केला, "या अप्रतिम कामासाठी मला पैसे मिळतात यावर माझा विश्वासच बसत नाही. हे जगातील भारी काम आहे."
शनिवारची सकाळ होती ती. एक मोठे वादळ जवळ येत होते त्यामुळे बाहेर जाऊन शूटिंग उरकण्यासाठी आमच्या हातात केवळ 2-3 तास उरले होते.
सिनेमाच्या प्लॅननुसार मुख्य कलाकार ज्वालामुखीवरून उडत असताना ते सीन हळूहळू गायब होणार होते. कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालेले शॉट स्क्रीनवर तपासून पाहत असताना, "आपण यापेक्षाही सुंदर शूटिंग करू शकतो," असे माईकने सांगितले. आणि नेमक्या त्याच क्षणी परिस्थिती हाताबाहेर गेली.
![ख्रिस डटी यांची पत्नी, अभिनेत्री आणि गायिका जॉली फिशर आणि मुलगी कायलरसोबत ]](https://ichef.bbci.co.uk/ace/ws/640/cpsprodpb/96f3/live/8c9a9420-8d8a-11f1-a7ab-8b30adf0800a.jpg.webp)
फोटो स्रोत, Getty Images
आम्ही पुन्हा ज्वालामुखीच्या दिशेने गेलो तेव्हा त्यातून धुराचे लोट बाहेर येत होते. जसे जसे आम्ही पुढे सरकलो तसतसा तो धूर इतका दाट झाला की समोरचे काहीच दिसेनासे झाले. अचानक हेलिकॉप्टरचा मागचा भाग हादरू लागला.
"अरे देवा!" ग्रेग हॉस्किंग घाबरून ओरडले.
मी वर पाहिले तेव्हा एखाद्या ढगाच्या पोटात असल्यासारखे चहूकडे फक्त पांढरेच पांढरे दिसत होते. "आपण खाली कोसळणार आहोत!" ग्रेग पुन्हा जोरात किंचाळले.
"हेलिकॉप्टरचे पंखे एका उभ्या खडकावर आदळले आणि त्याचे तुकडे झाले. यामुळे हेलिकॉप्टरचा ताबा पूर्णपणे सुटला आणि ते सरळ खाली कोसळले."
त्या भीषण धक्क्याने ग्रेग आणि माईक दोघेही इतक्या जोरात उडून फेकले गेले की एका क्षणासाठी ते मला दिसेनासेच झाले.
हेलिकॉप्टर खाली आदळल्याच्या वेगाने ते दोघे पुन्हा बाहेरच्या बाजूला फेकले गेले. ग्रेगच्या डोक्याला जोरदार मार लागला होता आणि डोळ्यांजवळ खोल जखम होऊन रक्ताची धार वाहत होती.
आम्ही हेलिकॉप्टरमधून बाहेर उड्या मारल्या आणि चहूकडे पाहिले. पंख्याच्या पात्यांचा पत्ताच नव्हता आणि त्याचा मागचा भाग तुटून जमिनीवर पडला होता.
तिथे विषारी वायूचे प्रमाण खूप जास्त असल्याने श्वास घ्यायलाही प्रचंड त्रास होत होता. सल्फरच्या धुराने छातीत खोकल्याची उबळ येत होती आणि डोळ्यांची आग होत होती.
या धक्क्यातून सावरत मी आजूबाजूला पाहिले आणि त्यांना विचारले, "आपण काय ज्वालामुखीच्या आत अडकलोय?"
ग्रेग 'हो' म्हणाले.
'आमचा अपघात झालाय, हे कोणाला तरी माहीत असेल का?'
ते विवर म्हणजेच ज्वालामुखीच्या आतला मोठा खोल खड्डा एखाद्या फुटबॉल मैदानापेक्षाही कितीतरी पट मोठे आणि अथांग पसरला होता.
आम्ही ज्वालामुखीच्या अगदी वरच्या टोकापासून सुमारे 100 मीटर खोल खाली अडकलो होतो. आम्हाला बाहेर पडण्यासाठी कसाही करून रस्ता शोधावाच लागणार होता. आम्ही वर चढायला सुरुवात तर केली पण ते काम भयंकर कठीण होते.
उकळून थंड झालेले लाव्हाचे खडक स्पर्श करताच तुटून खाली पडत होते. ते एखाद्या सुरीच्या पात्यासारखे अत्यंत धारदार होते. त्या खडकांवरून पुढे सरकणे म्हणजे जणू फुटलेल्या काचांच्या तुकड्यांवरून रांगण्यासारखे होते.
मी साधारण अर्ध्या रस्त्यापर्यंत वर चढलो असेन पण त्यापुढे चढणे अशक्यच वाटत होते.
मी खाली असलेल्या माईक आणि ग्रेगला जोरात ओरडून सांगितले, "मला इथेच थांबावे लागेल. मी आता वर जाऊ शकत नाही हे भयंकर धोकादायक आहे."
अवघ्या एक मीटर रुंद असलेल्या खडकाच्या एका लहानशा टोकावर मी कसाबसा थांबलो.
"थोडा धीर धरा, आपल्याला आधी एक प्लॅन करावा लागेल," ग्रेग म्हणाले.
मी त्यांना विचारले, "आपला अपघात झाला आहे, हे कोणाला माहीत तरी असेल का? इतक्यात कोणाला याबद्दल कळाले असण्याची शक्यता आहे का?"
"अजिबात नाही, नक्कीच कोणाला माहीत नसेल," त्यांनी उत्तर दिले.
"थोडा वेळ आराम करूया, मग बाहेर पडण्याचा प्लॅन आखावा लागेल," ग्रेग म्हणाले.
ग्रेग यांनी परत हेलिकॉप्टरजवळ जाऊन रेडिओ दुरुस्त करून मदतीसाठी संपर्क साधायचे ठरवले.
रेडिओ सुरू करून त्यांनी तातडीच्या मदतीचा संदेश देत "मेडे! मेडे! मेडे!" (Mayday! Mayday! Mayday!) असे जोरात ओरडू लागले.
थोड्याच वेळात त्यांना खोकल्याची उबळ आली. "मला श्वास घेता येत नाही.. मला अजिबात श्वास घेता येत नाही…" असे म्हणत त्यांना उलट्या होऊ लागल्या आणि ते भयंकर खोकू लागले. त्यांची प्रकृती अत्यंत खालावली होती.
काही हेलिकॉप्टर्स ज्वालामुखीच्या वर घिरट्या घालू लागली होती. त्यातील एकाचा आवाज तर आमच्या अगदी जवळून ऐकू येत होता. पण ते हेलिकॉप्टर तिथून निघून गेले. आम्ही मारलेल्या हाकांवर ग्रेगकडून काहीच प्रतिसाद येत नव्हता. त्यांच्यासोबत काहीतरी वाईट घडले असावे असाच विचार आमच्या मनात आला.
100 मीटर खोल दरी
त्याक्षणी सुटकेची आशा जवळजवळ संपुष्टात आली होती. तो अनुभव म्हणजे जणू मरणाच्या दारातून परत येण्यासारखा होता.
पण माझ्या आणि माईकच्या मनात अजूनही आशेचा एक किरण जिवंत होता. कारण आम्ही कुठून निघालो होतो हे बचाव पथकाला चांगल्या प्रकारे ठाऊक होते.
काही वेळातच जमिनीवरून शोध मोहीम राबवणारे एक बचाव पथक ज्वालामुखीच्या वरच्या काठावर पोहोचले आणि वरून आमच्या दिशेने जोरात ओरडले, "आम्ही तुम्हाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत!"
आमच्या मनात आशेची एक लहानशी पालवी फुटली.
"आम्ही खाली तुमच्याकडे एक दोरी फेकायचा प्रयत्न करतोय," ते ओरडून म्हणाले.
वाऱ्याच्या वेगाने ती दोरी खाली तरंगत येत होती पण ती आमच्यापासून खूप दूर जाऊन पडली.
उजवीकडे 6 मीटर दूर फेका!" मी त्यांच्या दिशेने जोरात ओरडलो. ती दोरी कित्येकदा वर खेचून पुन्हा खाली सोडली गेली. प्रत्येक वेळेस ती आमच्या आणखी जवळ येत होती पण हाताला लागेल इतकी जवळ येत नव्हती.
ती पकडण्यासाठी मला हवेत उडी मारावी लागली असती, पण खाली सरळ 100 मीटर खोल पाताळ माझी वाट पाहत होते!
याच वेळी दाट ढग ज्वालामुखीच्या खड्यात शिरू लागतात आणि पाऊस सुरू होतो. पाऊस धुवांधार कोसळू लागतो. ती दोरीसुद्धा दिसेनाशी होते. त्यांनी ती पुन्हा खाली टाकलीच नाही.
अर्धा तास उलटतो, एक तास उलटतो. पण वरून काहीच उत्तर किंवा आवाज येत नव्हता.
तिथे नक्की काय चालले आहे हेच आम्हाला कळेनासे झाले होते.
![[ photo caption - ज्वालामुखी ]](https://ichef.bbci.co.uk/ace/ws/640/cpsprodpb/f163/live/9f332b10-8d8a-11f1-a7ab-8b30adf0800a.jpg.webp)
फोटो स्रोत, Getty Images
आजूबाजूला अंधार पडू लागला होता. आणखी एक तास उलटला आणि माझी धाकधूक वाढू लागली.
"अरे देवा, हे सगळं खरं नसावं. काहीतरी भयंकर चुकीचं घडतंय," मी स्वतःशीच पुटपुटलो.
त्या माणसांनी वरून खाली डोकावून पाहिले आणि पुन्हा आमच्याशी बोलले… "उद्या सकाळ होईपर्यंत आम्ही मदतकार्य थांबवत आहोत. घाबरू नका, सकाळी येऊन आम्ही तुम्हाला बाहेर काढू."
"काय? एका धगधगत्या ज्वालामुखीच्या पोटात आम्ही रात्रभर थांबायचे?"
या लोकांनी वरच्या बाजूला तंबू ठोकायला सुरुवात केली. दर तासाला आम्ही कसे आहोत याची पाहणी करू असे ते म्हणाले. ते शिट्टी वाजवतील आणि आम्ही जिवंत आहोत हे कळवण्यासाठी आम्हीसुद्धा प्रत्युत्तर म्हणून शिट्टी वाजवायची होती.
मी आणि माईक तिथेच बसून राहिलो. मी एक स्वेटर आणि बेसबॉल कॅप घातली होती. मी स्वेटर डोक्यावरून वर ओढून, टोपी लावून, त्याचे एका लहानशा तंबूसारखे आवरण तयार केले... हळूहळू श्वास सोडत शक्य तितका वेळ डोळे मिटून राहण्याचा प्रयत्न मी करत होतो.
मी ज्या खडकाच्या लहानशा कड्यावर बसलो होतो तो मोडून खाली कोसळू नये ही प्रार्थना करत वाट पाहण्याशिवाय आमच्याकडे दुसरा कोणताही मार्ग नव्हता.
पुढचे 12 तास आम्ही इथे कसे जिवंत काढणार होतो? तिथे शुद्ध हवा नव्हती आणि सल्फर डायऑक्साइड श्वासात गेल्यामुळे डोळ्यांची भयंकर आग होत होती.
"बस, आता सर्व संपले! माझे आयुष्य असेच संपणार आहे," या विचाराने मन पार खचून गेले.
माईकने मला धीर दिला. तो माझ्यासोबतच आहे असे सांगत, "आपण सतत एकमेकांशी बोलत राहूया आणि एकमेकांना धीर देऊया," असे म्हणून त्याने मला सावरले.
गर्द काळोखी रात्र झाली होती. मुसळधार पाऊस कोसळत होता आणि सोसाट्याचा वाराही सुटला होता. मी पूर्णपणे भिजून चिंब झालो होतो. कडाक्याच्या थंडीने मी पार गोठून जात होतो. माझे शरीर इतके थरथरत होते की त्यावर माझे काहीच नियंत्रण राहिले नव्हते.
मला कोणत्याही अवस्थेत शांतपणे बसता येत नव्हते. जर मला डुलकी लागली किंवा मी झोपलो तर थेट त्या पाताळात कोसळेन या भीतीपोटी मी रात्रभर अजिबात झोपलो नाही.
मी मनातल्या मनात माझ्या घरच्यांशी बोललो आणि सर्वांचा निरोप घेतला. या भयंकर रात्रीतून वाचून मी जिवंत बाहेर पडेन असे मला अजिबात वाटत नव्हते.
धूर अन् वाफेच्या ढगात धगधगत्या लाव्हा रसाचे रंग लाल, केसरी आणि पिवळे असे बदलत चालले होते.
मला भास होत होता की काय माहीत नाही पण एक विचित्र आवाज ऐकू येत होता. एखाद्या प्राचीन काळातील 'टेरोडॅक्टिल' नावाच्या पक्ष्याने टाहो फोडावा तसा आवाज त्या ज्वालामुखीच्या पोटातून येत होता. पुन्हा पुन्हा तोच आवाज ऐकू येत होता आणि तो अत्यंत भयानक होता.
माझ्या आजूबाजूला खडकांचे मोठे तुकडे कोसळत होते.काय करावे हेच सुचत नव्हते. भीतीने मी दोन्ही हात गच्च मिटून घेतले होते... फक्त कसातरी जीव वाचवायचा, याच एका जिद्दीने मी ती संपूर्ण रात्र तिथेच थरथरत एका जागी खिळून बसून काढली.
![[ photo caption - ख्रिस डटी आपल्या कुटुंबासोबत ]](https://ichef.bbci.co.uk/ace/ws/640/cpsprodpb/9d80/live/bba93d70-8d8a-11f1-b2ab-0dd01740f9f6.jpg.webp)
फोटो स्रोत, Getty Images
सकाळ होताच बचाव पथक पुन्हा परत आले. पण पाऊस अधिकच मुसळधार होता आणि धुक्यामुळे समोरचे काहीच दिसेनासे झाले.
दुपारची वेळ झाली तरी आम्ही अजून तिथेच होतो. वर उडणाऱ्या हेलिकॉप्टर्सचे आवाज आणि खाली शोध घेणाऱ्या टीमच्या हाका कानावर पडत होत्या. पण कड्याच्या टोकाला एक मोठी चीर गेल्यामुळे वर चढल्यास मातीची दरड खाली कोसळेल या भीतीने ते पुढे येत नव्हते.
माझा गळा सुजला होता. मला लाळही गिळणे शक्य होत नव्हते. डोळे जळजळत होते... तरीसुद्धा मी उठून उभा राहिलो आणि वर जाण्यासाठी रस्ता शोधू लागलो.
"मला नीट रस्ता मिळाला तर मी स्वतःच वर निघून जाईन. मी दुसरी रात्र इथे राहूच शकत नाही," असे मी निघताना म्हणालो, तेव्हा "नको, वर जाऊ नकोस. ते लोक आपल्याला बाहेर काढतील," असे म्हणत त्यांनी मला शांत केले.
अचानक ढग दूर झाले आणि त्या उभ्या खडकावर सूर्याची किरणे पडली. मला बाहेर पडण्याचा एक मार्ग दिसला. मी वर चढू लागलो.. पण अगदी शिखरावर पोहोचल्यावर पकडण्यासाठी तिथे काहीच नव्हते. सांगायचे म्हणजे शेवटचे दीड मीटर फक्त सपाट बारीक खडे आणि वाळूच होती.
मी खाली पाहिले, वर पाहिले… "देवा! आता काय करू?" असे म्हणून मी चक्रावूनच गेलो.
मला काय करावे ते सुचेनासे झाले होते आणि पुन्हा खाली उतरणेही शक्य नव्हते.
मी अजून जिवंत आहे की मेलो आहे? हेच मला कळत नव्हते.
त्या उभ्या खडकाचा कडा धरून ठेवलेला असताना मला जाणवले की वर जाण्यासाठी मला ते खडे ताकदीने पकडून हात आत रोवावे लागतील. पण ते फुटलेल्या काचेच्या ढिगाऱ्यात हात घालण्यासारखे भयंकर होते.
मी माझा उजवा हात कोपरापर्यंत आत घातला. त्यानंतर डावा हातही आत रुतवला आणि 3 पर्यंत मोजले.
शारीरिकदृष्ट्या मी ते कसे करू शकलो हे माझे मलाच समजले नाही. पण मी गोल फिरून जमिनीवर उताणा पडल्याचे मला जाणवले. एक क्षण तसाच पडून राहून मी विचार केला "मी अजून जिवंत आहे की मेलो आहे?"
मला नीट श्वासही घेता येत नव्हता. डोळ्यांची भयंकर आग होत होती. पण अखेर मी त्यातून बाहेर पडलो होतो.
मी त्या ज्वालामुखीच्या टेकडीच्या मागच्या बाजूला धावत गेलो आणि ती दोरी पाहिली. माईकला वर खेचण्याइतकी ताकद माझ्या शरीरात उरली नव्हती म्हणून तो खालीच आहे हे दाखवण्यासाठी एक खूण म्हणून मी ती दोरी तिथेच ठेवून दिली.
मला बचाव पथकाचा कॅम्प सापडला. तिथे काही तंबू, पाण्याच्या बाटल्या आणि ऑक्सिजन सिलिंडर्स एवढ्याच गोष्टी होत्या पण तिथे एकही माणूस नव्हता.
मला कोणीतरी भेटेपर्यंत किंवा कोणी माझा शोध घेईपर्यंत मी चालत राहण्याचे ठरवले. त्यामुळे मी पुढे चालू लागलो. चालता चालता मला हवेत घिरट्या घालणारे एक हेलिकॉप्टर दिसले आणि त्यांची नजरही माझ्यावर पडली.
ते माझ्या दिशेने धावत आले. त्यांच्यापैकी एकाने माझ्या हाताला स्पर्श केला अन् त्याच क्षणी माझे पूर्ण शरीर गळून गेले आणि सुन्न झाले. जणू मी जेलीच्या एखाद्या पिशवीसारखा झालो होतो. मी थेट जमिनीवर कोसळलो. माझ्या शरीरातील अॅड्रेनालीनचे (उत्साह आणि ताण देणारे रसायन) प्रमाण एकाएकी खाली आले होते.
त्यांनी मला सुरक्षितपणे हेलिकॉप्टरमध्ये बसवले आणि तिथून बेस कॅम्पकडे घेऊन गेले. तिथे असलेल्या एकाने माझ्या पाठीवर मायेने थाप मारली. मग मात्र मला स्वतःला सावरता आले नाही आणि मी ढसाढसा रडू लागलो.
"तुम्ही आता सुरक्षित आहात. तुम्ही यातून जिवंत वाचला आहात."
हेलिकॉप्टरच्या दिशेने धावत आलेली ती पहिली व्यक्ती दुसरी कोणी नसून आमचा पायलट 'ग्रेग' होता.
"ग्रेग, तू जिवंत आहेस! तू आता या जगात राहिला नाहीस असाच आम्ही विचार केला होता."
ग्रेग कसाबसा तिथून बाहेर पडण्यात यशस्वी झाला होता. ज्वालामुखीच्या पायथ्याशी म्हणजेच तो जिथे लपला होता त्या जागेजवळ आलेल्या एका हेलिकॉप्टरमध्ये चढून त्याला स्वतःचा जीव वाचवता आला.
एक दिवसानंतर माईकलासुद्धा सुखरूप बाहेर काढण्यात आले. बचाव पथक पोहोचले तेव्हा तो खडकावर आपल्या पत्नीसाठी "आय लव्ह यू" असा संदेश कोरत होता.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

























