दिशा सालियन प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम: 2020 पासून सीबीआयच्या एफआयआरपर्यंत नेमकं काय-काय घडलं?

फोटो स्रोत, UGC
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सीबीआयने एफआयआर नोंदवल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सहा वर्षांनंतर पुन्हा एकदा सार्वजनिक भूमिका मांडली आहे.
"मी दिशा सालियन यांना कधीही भेटलेलो नाही किंवा त्यांच्याशी माझी ओळखही नव्हती," असं म्हणत त्यांनी या प्रकरणाशी आपलं नाव जोडण्याचा प्रयत्न हा 'चारित्र्यहनन' आणि 'राजकीय हेतूने चालवलेलं खोटं अभियान' असल्याचा आरोप केला.
तसेच अधिकृत यंत्रणांनी कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
दुसरीकडे, मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने या प्रकरणात एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे.
दिशा सालियन यांचे वडील सतीश सालियन यांनी 2025 मध्ये दाखल केलेल्या याचिकेच्या आधारे या तपासाला नवं वळण मिळालं.
8 जून 2020 रोजी दिशा सालियन यांच्या मृत्यूची नोंद झाल्यापासून ते सप्टेंबर 2026 मध्ये सीबीआयने एफआयआर नोंदवेपर्यंत या प्रकरणात नेमकं काय-काय घडलं, त्याची ही संपूर्ण टाइमलाईन.
8 जून 2020 : दिशा सालियन यांचा मृत्यू
सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन यांचा 8 जून 2020 रोजी मुंबईतील मालाड परिसरातील एका इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला.
मुंबई पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद (ADR) केली आणि तपास सुरू केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 जून 2020 रोजी दिशाला लंडनमध्ये राहणाऱ्या तिच्या मैत्रिणीचा फोन आला. फोनवर बोलत ती आतमध्ये गेली.
दिशाच्या लंडनमधील मैत्रिणीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, दिशाने लॉकडाऊन अजूनही सुरू असून काम बाकी असल्याचं तिला सांगितलं होतं. ती थोडी चिंतेत वाटत होती. त्यानंतर तिचे मित्र आणि होणारा नवरा रोहन यांनी खोलीचा बंद असलेला दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला.
दिशा खोलीत नव्हती. खिडकीतून खाली पाहिलं तर दिशा पडलेली दिसून आली.
14 जून 2020 : सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूनंतर प्रकरण चर्चेत
दिशा सालियन यांच्या मृत्यूनंतर अवघ्या सहा दिवसांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांचा मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी मृतदेह आढळला.
या दोन घटनांचा परस्पर संबंध असल्याचे दावे सोशल मीडियावर आणि राजकीय पातळीवर होऊ लागले.
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर देशभरात त्याच्या चाहत्यांकडून चौकशीची मागणी झाली. सोबतच राजकीय नेत्यांनीही याप्रकरणाची दखल घेतली.

महाराष्ट्रात भाजपने तत्कालीन सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीवर आरोप केले आणि तपास केंद्रीय यंत्रणांकडे देण्यास सांगितले.
आरोप-प्रत्यारोपांच्या फेरीत भाजपकडून या प्रकरणात थेट मंत्र्यांचं नाव घेण्यात आलं होतं. नारायण राणेंनी या प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता.
दिशा सालियन यांच्या मृत्यूची माहिती सुशांत सिंह राजपूत यांना होती आणि त्यामुळेच त्यांचाही मृत्यू झाला, असा आरोप नारायण राणे यांनी केला होता.
पोलिसांनी मात्र या दोन्ही घटनांचा एकमेकांशी संबंध असल्याचा पुरावा आढळला नसल्याचं स्पष्ट केलं होतं.
2020 ते 2021: मुंबई पोलिसांचा तपास
मुंबई पोलिसांनी या प्रकरणात अनेक व्यक्तींचे जबाब नोंदवले आणि न्यायवैद्यक पुराव्यांची तपासणी केली.
तपासानंतर पोलिसांनी सांगितलं की, 'दिशा सालियन यांच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा पुरावा आढळला नाही. त्या गर्भवती असल्याचा दावा तपासात सिद्ध झाला नाही.
मृत्यूच्या वेळी पार्टी झाल्याचा किंवा राजकीय व्यक्तींचा संबंध असल्याचा पुरावा मिळाला नाही. सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूशी दिशा सालियन प्रकरणाचा संबंध आढळला नाही.'
पुरावे न सापडल्याने मुंबई पोलिसांनी या प्रकरणात कोणताही गुन्हा सिद्ध झालेला नसल्याचं सांगितलं आणि तपास पूर्ण झाल्याचं स्पष्ट केलं.
5 ऑगस्ट 2021 : सतीश सालियन यांचं पत्र
दिशा सालियन यांचे वडील सतीश सालियन यांनी 5 ऑगस्ट 2021 रोजी मुंबई पोलिसांना पत्र लिहिलं.
आपल्या पत्रात त्यांनी लिहिलेलं, "माझ्या मुलीवर बलात्कार झाला आणि तिचा खून झाल्याचं मीडिया दाखवत आहे. या बातम्या पूर्णत: चुकीच्या आणि फेक आहेत. यात काहीच तथ्य नाही. चुकीच्या बातम्या देऊन टीव्ही चॅनल्स माझ्या मुलीची आणि माझ्या कुटुंबाची बदनामी करत आहेत."
"दिशाचा राजकीय नेत्याशी संबंध आणि बॉलिवुडमधील मोठ्या ॲक्टरसोबत पार्टीच्या बातम्या पूर्णत: बनावट आहेत," असं तिच्या वडिलांनी स्पष्ट केलं होतं.
दिशाचा मृतदेह नग्न अवस्थेत सापडल्याचा आरोप करण्यात आला. याबाबत बोलताना पोलिसांनी, दिशाचा मृतदेह नग्न अवस्थेत सापडला नसल्याचं स्पष्ट केलं होतं.
त्याचसोबत पंचनामा करताना आई-वडील उपस्थित असल्याची माहिती दिली होती.

फोटो स्रोत, Prajakta Pol
फेब्रुवारी 2022: प्रकरण पुन्हा राजकीय चर्चेत
भाजप नेते नारायण राणे आणि नितेश राणे यांनी दिशा सालियन यांच्या मृत्यूबाबत पुन्हा आरोप केल्यानंतर हे प्रकरण विधानसभेत गाजलं.
त्यावेळी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची विशेष तपास पथक (SIT) मार्फत चौकशी करण्याची घोषणा केली.
याच काळात दिशा सालियन यांच्या पालकांनी राजकीय आरोपांमुळे आपल्याला मानसिक त्रास होत असल्याचं सांगत अशा आरोपांना आळा घालण्याची मागणी केली होती.

फोटो स्रोत, FACEBOOK/NITESHRANE23
20 ऑक्टोबर 2023 : मुंबई उच्च न्यायालयात पहिली याचिका
वकील राशिद खान पठाण यांनी 20 ऑक्टोबर 2023 रोजी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूची नव्याने चौकशी करण्याची मागणी केली.
राशिद खान पठाण यांच्या याचिकेत 8 जून 2020 आणि 13-14 जून 2020 रोजी काही व्यक्तींचे मोबाईल लोकेशन, कॉल रेकॉर्ड्स आणि सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी करण्यात आली होती.
यामध्ये आदित्य ठाकरे, राहुल कनाल, सूरज पांचोली, सचिन वाझे, रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती आणि इतर काही व्यक्तींच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली होती.
सुशांत आणि दिशाच्या मृत्यूवर सवाल उठवणाऱ्या सर्व साक्षी पुराव्यांची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी याचिकेतून केली होती.
या याचिकेनंतर आदित्य ठाकरे यांनी उच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केली. या प्रकरणात कोणताही आदेश देण्यापूर्वी आपली बाजू ऐकून घ्यावी, अशी त्यांची मागणी होती.
20 मार्च 2025 : सतीश सालियन यांची उच्च न्यायालयात याचिका
दिशा सालियन यांच्या मृत्यूनंतर जवळपास पाच वर्षांनी त्यांचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात नवी याचिका दाखल केली.
2021 मध्ये माध्यमांमधील बलात्कार आणि हत्येच्या बातम्या खोट्या असल्याचं पत्र लिहिलेल्या सतीश सालियन यांनी या याचिकेत मात्र याउलट आरोप करत नव्या तपासाची मागणी केली.
या याचिकेत त्यांनी दावा केला की, 'दिशा सालियन यांनी आत्महत्या केली नसून त्यांची हत्या झाली आहे. सामूहिक बलात्कार, हत्या आणि पुरावे दडपल्याचे आरोप करण्यात आले. आदित्य ठाकरे आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल करून सीबीआय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.'
याचिकेत करण्यात आलेले आरोप त्या टप्प्यावर न्यायालयात सिद्ध झालेले नव्हते.
दरम्यान आमदार आदित्य ठाकरे यांनी माध्यमांना याबाबत प्रतिक्रिया दिलेली होती. ते म्हणाले होते, "गेली पाच वर्षं माझ्या बदनामीचा प्रयत्न केला जातो आहे. हे प्रकरण कोर्टात आहे त्यामुळे आम्ही कोर्टात बोलू."
2 सप्टेंबर 2026: मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले
2 सप्टेंबर 2026 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सीबीआयला गुन्हा नोंदवून तपास करण्याचे आदेश दिले.
हा आदेश सतीश सालियन यांच्या याचिकेवर सुनावणीदरम्यान देण्यात आला. न्यायालयाने याचिकेतील आरोपांवर कोणताही निष्कर्ष नोंदवला नाही, मात्र स्वतंत्र तपास करण्याचे निर्देश दिले.
12 सप्टेंबर 2026: सीबीआयने सतीश सालियन यांचा जबाब नोंदवला
सतीश सालियन यांचे वकील निलेश ओझा यांच्या म्हणण्यानुसार, 12 सप्टेंबर 2026 रोजी सीबीआयने सतीश सालियन यांचा सुमारे चार तास जबाब नोंदवला.
ओझा यांनी सांगितलं की, हा जबाब उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नोंदवण्यात आला.
13 सप्टेंबर 2026: सीबीआयने एफआयआर नोंदवली
13 सप्टेंबर 2026 रोजी दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सीबीआयने एफआयआर नोंदवली. ही एफआयआर सतीश सालियन यांच्या तक्रारीच्या आधारे नोंदवण्यात आली असून सीबीआयने तपास सुरू केला आहे.
सतीश सालियन यांच्या तक्रारीत आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनो मोरिया, रिया चक्रवर्ती, रोहन रॉय, सचिन वाझे आणि इतर काही व्यक्तींची नावं नमूद करण्यात आली असून त्यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
एफआयआरमध्ये गुन्हेगारी कट, सामूहिक बलात्कार, हत्या, पुरावे नष्ट करणे आणि सरकारी नोंदींमध्ये फेरफार केल्याच्या आरोपांशी संबंधित कलमांचा उल्लेख आहे.
भारतीय दंड संहितेच्या कलम 120B (गुन्हेगारी कट), 376D (सामूहिक बलात्कार), 302 (हत्या), 201 (पुरावे नष्ट करणे), 217 आणि 218 (सरकारी नोंदींमध्ये फेरफार आणि कर्तव्यात कसूर) यांचा उल्लेख आहे. ही एफआयआर सतीश सालियन यांच्या तक्रारीच्या आधारे नोंदवण्यात आली असून, त्यातील आरोपांची चौकशी करण्यासाठी सीबीआयने तपास सुरू केला आहे.
14 सप्टेंबर 2026 : वकील निलेश ओझा यांचा दावा
एफआयआर नोंदवल्यानंतर सतीश सालियन यांचे वकील निलेश ओझा यांनी माध्यमांशी बोलताना दावा केला की, एफआयआरमध्ये सामूहिक बलात्कार, हत्या, गुन्हेगारी कट आणि पुरावे दडपल्यासंबंधी कलमे लावण्यात आली आहेत.
तसंच आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनो मोरिया आणि इतर काही व्यक्तींची नावं आरोपी म्हणून नमूद असल्याचाही दावा त्यांनी केला.
हे दावे निलेश ओझा यांनी केले असून सीबीआयने त्याबाबत स्वतंत्र पुष्टी केलेली नाही.
16 सप्टेंबर 2026: आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया
सीबीआयने एफआयआर दाखल केल्यानंतर 16 सप्टेंबर 2026 रोजी आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर सविस्तर निवेदन प्रसिद्ध केलं.

फोटो स्रोत, ANI
त्यात त्यांनी म्हटलं की, "मी दिशा सालियन यांना कधीही भेटलेलो नाही किंवा त्यांच्याशी माझी ओळखही नव्हती. गेल्या सहा वर्षांपासून कोणताही पुरावा नसताना राजकीय हेतूने आपलं नाव या प्रकरणाशी जोडण्याचा प्रयत्न होत आहे.
अधिकृत यंत्रणांनी कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय आणि मीडिया ट्रायलशिवाय निष्पक्ष चौकशी करावी."
आदित्य ठाकरेंनी म्हटलं की, "कुठलंही तथ्य आणि सत्य नसलेलं हे सततचं खोटं कॅम्पेन दुर्दैवी आहे. बोंबाबोंब करुन केल्या जाणाऱ्या टिव्ही चॅनल्सवरच्या खोट्या चर्चा आणि मीडिया ट्रायल्स सत्य बदलू शकत नाहीत."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

























