ओमानजवळ जहाजावर हल्ला, 3 भारतीय कर्मचारी मृत्युमुखी; हल्ल्यानंतर केंद्रीय मंत्री काय म्हणाले?

फोटो स्रोत, Centcom
ओमानच्या किनाऱ्याजवळ बुधवारी (10 जून) एका व्यापारी जहाजावर हल्ला झाला. या जहाजावर 24 भारतीय कर्मचारी (क्रू मेंबर्स) होते, अशी माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.
या 24 भारतीयांपैकी आतापर्यंत 21 जणांना सुरक्षितरीत्या वाचवण्यात आले असून 3 भारतीय बेपत्ता आहेत, असं परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं होतं. मात्र या तिघांचा आता मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
केंद्रीय जहाज, जलवाहतूक आणि बंदर मंत्रालयाचे विभागाचे मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली आहे.
ते एक्स पोस्टमध्ये लिहितात, "पालाऊचा ध्वज असलेल्या MT Settebello जहाजावरील दुर्दैवी घटनेची माहिती समजल्यावर अत्यंत दुःख झाले. सुरुवातीला बेपत्ता असल्याचं सांगितलेल्या तीन भारतीय खलाशांचे मृतदेह सापडून त्यांची ओळख पटली असून ते मृत्युमुखी पडल्याचं स्पष्ट झालं आहे.
ही आपल्या सागरी कुटुंबासाठी अतिशय मोठी हानी आहे. या कठीण काळात मोदी सरकार शोकाकुल कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे आणि त्यांच्या नातेवाईकांना सर्वतोपरी मदत करण्यास कटिबद्ध आहे."
ते पुढं लिहितात, "वाचवण्यात आलेल्या खलाशांना तातडीने भारतात परत आणण्याबाबत आणि मृतांच्या पार्थिव देहांना त्यांच्या अंत्यविधीसाठी जलदगतीने भारतात आणण्याची व्यवस्था त्वरित करण्याचे निर्देश मी अधिकाऱ्यांना दिले आहेत."
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने काय सांगितले?
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी (10 जून) उशिरा रात्री निवेदन जारी करत या हल्ल्याचा निषेध केला.
परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले होते, "ओमानच्या किनाऱ्याजवळ व्यापारी जहाज 'सेट्टेबेलो'वर झालेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. जहाजावर असलेल्या 24 भारतीयांपैकी 21 जणांना वाचवण्यात आले असून 3 जण बेपत्ता आहेत." मात्र या तिघांचा मृत्यू झाल्याचं आज 11 जून रोजी स्पष्ट झालं आहे.
"ओमानमधील आमचा दूतावास परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि ओमानी अधिकाऱ्यांसोबत समन्वय साधून सुरू असलेल्या शोध आणि बचाव मोहिमेत सक्रियपणे सहकार्य करत आहे."
मंत्रालयाने पुढे म्हटले की, या प्रदेशात जहाजांवर होत असलेले सततचे हल्ले चिंताजनक असून ते सध्या सुरू असलेल्या संघर्षाचा थेट परिणाम आहेत.
निवेदनात म्हटले आहे, "आम्ही पुन्हा एकदा तणाव तात्काळ कमी करण्याचे आणि सुरू असलेल्या चर्चांना कूटनीतिक तोडग्यापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन करतो, जेणेकरून या भागात शांतता आणि स्थैर्य पुन्हा प्रस्थापित होऊ शकेल."
"व्यापारी जहाजे आणि नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करणे थांबवले पाहिजे. आंतरराष्ट्रीय कायद्याच्या आधारे या प्रदेशातील समुद्री मार्गांवर निर्बंधमुक्त वाहतूक आणि व्यापार लवकरात लवकर पुन्हा सुरू होणे आवश्यक आहे."

फोटो स्रोत, Raj K Raj/Hindustan Times via Getty Images
या निवेदनापूर्वी ओमानमधील भारतीय दूतावासानेही या घटनेची माहिती दिली होती, मात्र ती अत्यंत संक्षिप्त होती.
दूतावासाने म्हटले होते, "ओमानच्या किनाऱ्याजवळ एका जहाजाशी संबंधित घटनेची माहिती आम्हाला मिळाली आहे. आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. लवकरच अधिक माहिती दिली जाईल."
दोन दिवसांपूर्वीही झालेला एका जहाजावर हल्ला
याआधी सोमवारी, म्हणजे 8 जून रोजीही एका जहाजावर हल्ला झाला होता. त्या जहाजावर 24 भारतीय खलाशी होते. मात्र, नंतर सर्वांची सुरक्षित सुटका करण्यात आली. ओमानमधील भारतीय दूतावासाने याला दुजोरा दिला होता.
त्यावेळी फॉरवर्ड सीमन्स युनियन ऑफ इंडिया (एफएसयूआय) ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर या घटनेची माहिती दिली होती. एफएसयूआयने खलाशांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत मिळावी यासाठी आवाहन केले होते.

फोटो स्रोत, Maryorin Mendez / AFP via Getty Images
यानंतर ओमानमधील भारतीय दूतावासाने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले होते, "भारतीय खलाशी असलेल्या एका जहाजाशी संबंधित घटनेची माहिती दूतावासाला आहे. त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि बचावासाठी आम्ही ओमानच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत."
त्यानंतरच्या एका पोस्टमध्ये दूतावासाने आणखी माहिती देताना म्हटले, "एमटी मॅरिवेक्सवरील सर्व 24 भारतीय कर्मचाऱ्यांची सुटका करून त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी तातडीने कारवाई केल्याबद्दल आम्ही ओमानच्या अधिकाऱ्यांचे आभारी आहोत."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)



























