बृजभूषण शरण सिंह यांची महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणातून निर्दोष मुक्तता, बजरंग पुनियानं दिली अशी प्रतिक्रिया

फोटो स्रोत, Vipin Kumar/Hindustan Times via Getty Images
भारतीय जनता पक्षाचे नेते आणि भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांची महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणात दिल्ली न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे.
लाइव्ह लॉच्या माहितीनुसार, राऊज ॲव्हेन्यू न्यायालयानं हा निकाल दिला. बृजभूषण शरण सिंह यांच्यावर सहा महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा आरोप केला होता.
न्यायालयाच्या निर्णयानंतर बृजभूषण शरण सिंह म्हणाले , "न्यायालयाने म्हटलं, 'बृजभूषण सिंह आणि विनोद तोमर, तुम्हा दोघांचीही सन्मानपूर्वक निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे.' पहिल्याच दिवशी मी म्हटलं होतं की, माझ्या विरोधात कोणताही निर्णय आला किंवा कोणताही आरोप सिद्ध झाला, तर मी स्वतः जीव देईन."
"मला पूर्ण विश्वास होता की, मला न्याय मिळेल. मला कधीही वाईट वाटले नाही. ज्या ज्युनियर खेळाडूंच्या हक्कांचं उल्लंघन होत होतं, त्यांच्यासाठी आम्ही लढलो. मला आनंद आहे की, आम्ही ती लढाईसुद्धा जिंकलो आणि मला खात्री आहे की ते (ज्युनियर) खेळाडू भविष्यात कुस्तीमध्ये देशाचा झेंडा उंचावतील," असंही ते म्हणाले.
विनेश फोगाट यांच्या वकील रेबेका जॉन यांनी, हा निर्णय अत्यंत निराशाजनक असल्याचं म्हटलं आहे.
बृजभूषण शरण सिंह यांना पैलवान विनेश फोगटबद्दल विचारले असता ते म्हणाले की, "कोणाचंही नाव घेण्याची गरज नाही. प्रियांका पैलवानांसोबत जंतर मंतरला आल्या होत्या.
आम आदमी पार्टी खाण्या-पिण्याची सर्व व्यवस्था करत होती. डाव्या किंवा उजव्या गटात कोणी उरलं होतं का? मला फाशी देण्याची मागणी होत होती. आता त्यांनी आत्मपरीक्षण करायला हवं."
न्यायालयाच्या निर्णयानंतर पैलवान बजरंग पुनिया म्हणाले, "आजच्या निर्णयावरून हे स्पष्ट झालं आहे की, सर्व अधिकार त्यांच्या हातात आहेत, त्यांच्याकडे सर्व काही आहे. त्यांनी साक्षीदारांना नामोहरम केलं. आम्ही आता न्यायालयाचा सविस्तर आदेश मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. कोणत्या आधारावर त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे, हे आम्हाला समजत नाही."
बृजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोप करत, साक्षी मलिक, विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांच्यासह अनेक खेळाडूंनी दिल्लीतील जंतर मंतर येथे कित्येक आठवडे आंदोलन केले आणि त्यांच्या अटकेची मागणी केली.
विनेश फोगट यांच्या वकील, रेबेका जॉन म्हणाल्या, "हा निर्णय अत्यंत निराशाजनक आहे. या प्रकरणात तक्रार करणाऱ्या चारही महिलांनी न्यायालयात प्रामाणिकपणे साक्ष दिली. उलटतपासणी दरम्यानही त्यांच्या जबाबात बदल झाला नाही."

फोटो स्रोत, Arun THAKUR / AFP) (Photo by ARUN THAKUR/AFP via Getty Images
एप्रिल 2023 मध्ये महिला कुस्तीपटूंनी बृजभूषण शरण सिंह आणि विनोद तोमर यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला. विनोद तोमर हे भारतीय कुस्ती महासंघाचे माजी सचिव होते.
एफआयआरमध्ये महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाच्या अनेक घटनांचा उल्लेख केला होता.
मे 2024 मध्ये, न्यायालयानं बृजभूषण शरण सिंह आणि विनोद तोमर यांच्यावर आरोप निश्चित केले होते. अहवालानुसार, बृजभूषण शरण सिंह यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 354 (विनयभंगाचा गुन्हा) आणि 354अ (लैंगिक छळ) अंतर्गत आरोप निश्चित करण्यात आले.
सहापैकी पाच महिला कुस्तीपटूंच्या तक्रारींच्या आधारे हे आरोप दाखल करण्यात आले होते. एका महिला कुस्तीपटूच्या तक्रारीच्या आधारे न्यायालयाने बृजभूषण सिंह यांना दोषमुक्त केलं.
याशिवाय, विनोद तोमर यांच्यावर 'गुन्हेगारी धमकी'चे कलमही लावण्यात आले होते. मात्र, बृजभूषण शरण सिंह यांनी आपल्यावरील आरोप नाकारले होते.
ऑगस्ट 2023 पासून त्यांना या प्रकरणात जामीन मंजूर झाला होता. तपास यंत्रणेनं त्यांना या प्रकरणात अटक केली नव्हती. त्यांच्या जामीन अर्जाला न्यायालयात विरोधही झाला नव्हता.
'पॉक्सो' प्रकरणातूनही झाली होती सुटका
यापूर्वी 2025 मध्ये मे महिन्यात बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधातील 'पॉक्सो' कायद्याअंतर्गत सुरु असलेला खटला बंद करण्यात आला होता. न्यायालयानं दिल्ली पोलिसांनी सादर केलेला खटला बंद करण्याचा अहवाल (केस क्लोजर रिपोर्ट) स्वीकारला होता.
एप्रिल 2023 मध्ये एका अल्पवयीन कुस्तीपटूच्या वडिलांनी पोलिसांकडे बृजभूषण शरण सिंह यांनी त्यांच्या मुलींवर लैंगिक अत्याचर केल्याचे आरोप केले होते.
वडिलांचा आरोप होता की, जेव्हा त्यांच्या मुलीने बृजभूषण शरण सिंह यांच्या लैंगिक शोषणापासून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा भारतीय कुस्ती महासंघाने त्यांच्या विरोधात भेदभाव सुरू केला.
यामुळे त्यांच्या कुस्तीच्या करिअरवरही वाईट परिणाम होऊ लागला.

फोटो स्रोत, David Ramos/Getty Images
पोलिसांनी या प्रकरणात पॉक्सो कायद्याच्या कलम 10 (गंभीर लैंगिक अत्याचार), भारतीय दंड संहिता कलम 354 (महिलेचा विनयभंग), 354 ए (लैंगिक छळ) आणि 354 डी (एखाद्याचा पाठलाग करणं) या अंतर्गत एफआयआर नोंदवला.
परंतु, बृजभूषण शरण सिंह यांनी हे आरोप फेटाळले होते.
वृत्तपत्रात आलेल्या वृत्तानुसार, एफआयआर दाखल झाल्यानंतर काही दिवसांनी अल्पवयीन कुस्तीपटूच्या वडिलांनी आपलं म्हणणं बदललं. वडिलांनी सांगितलं की, त्यांनी आणि त्यांच्या मुलीने बृजभूषण यांच्यावर 'काही चुकीचे आरोप' केले होते.

फोटो स्रोत, Getty Images
तपासानंतर दिल्ली पोलिसांनी आपल्या अहवालात हा खटला 'रद्द' किंवा 'निरस्त' केला जावा, असं म्हटलं होतं. हा अहवाल त्यांनी जून 2023 मध्ये न्यायालयात सादर केला होता.
वृत्तांनुसार, पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, त्यांनी इतर कुस्तीपटू आणि प्रशिक्षकांचीही चौकशी केली. त्यांना या प्रकरणात आरोपांशी संबंधित कोणतेही ठोस पुरावे मिळाले नाहीत.
त्यानंतर ऑगस्ट 2023 मध्ये न्यायालयानं कुस्तीपटू आणि त्यांच्या वडिलांचे जबाब नोंदवले. त्यानंतर वेगवेगळ्या कारणांनी हा खटला पुढे ढकलला गेला, कधी न्यायाधीश रजेवर होते, तर कधी तपास करणारे अधिकारी हजर नव्हते, तर कधी वकील संपावर होते.
त्यानंतर, वकिलांचा युक्तिवाद ऐकून आणि पुरावे पाहिल्यानंतर 26 मे रोजी न्यायाधीशांनी पोलिसांचा अहवाल स्वीकारून खटला बंद करण्याचा निर्णय दिला.
जेव्हा कुस्तीपटू रस्त्यावर उतरल्या होत्या...
जेव्हा विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांनी दिल्लीच्या जंतर-मंतरवर आंदोलन (जानेवारी 2023) केले, तेव्हा पहिल्यांदाच बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात लैंगिक छळाचे आरोप समोर आले होते.
महिला कुस्तीपटूंनी पोलिसांवर गंभीर आरोप केले. या आंदोलनाच्या काही महिन्यांनंतर, त्यांनी दिल्लीच्या कॅनॉट प्लेस पोलीस स्टेशनमध्ये बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला.

फोटो स्रोत, Boris Streubel/Getty Images for Laureus
परंतु, पोलिसांनी एफआयआर नोंदवून घेतला नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. यानंतर, विनेश फोगाटसह इतर अनेक महिला कुस्तीपटूंनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्याची मागणी केली होती.
यानंतर झालेल्या सुनावणीदरम्यान दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर नोंदवत असल्याचे सांगितले होते. आता महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणातही दिल्ली न्यायालयानं बृजभूषण यांची निर्दोष मुक्तता केली आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

























