जन्माआधीच बाळावर शस्त्रक्रिया; पोटाबाहेर वाढणारी आतडी डॉक्टरांनी आत कशी ठेवली?

शस्त्रक्रियेनंतर थिओचा गर्भ धारणेचा कालावधी पूर्ण झाला आणि त्याचा जन्म टेक्सासमध्ये झाला.

फोटो स्रोत, Maisie Savage

फोटो कॅप्शन, शस्त्रक्रियेनंतर थिओचा गर्भ धारणेचा कालावधी पूर्ण झाला आणि त्याचा जन्म टेक्सासमध्ये झाला.
    • Author, कॅमिला हॉरॉक्स
    • Role, आरोग्य प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

एका महिलेच्या गर्भाशयातच केलेल्या एका नवीन आणि ऐतिहासिक शस्त्रक्रियेद्वारे डॉक्टरांनी गर्भातील बाळाची जन्मजात समस्या यशस्वीरित्या दूर केली.

लंडनमध्ये राहणारी मेसी सॅवेजवर अमेरिकेत ही शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यावेळी ती 26 आठवड्यांची गर्भवती होती.

तिचं बाळ 'थिओ'ला गॅस्ट्रोस्किसिस नावाची जन्मजात समस्या होती. या समस्येमुळे बाळाची नाभी (बेंबी) पूर्णपणे विकसित होत नाही आणि आतडी पोटाच्या बाहेरच वाढू लागतात.

डॉक्टरांनी आईच्या गर्भाशयाचा काही भाग काळजीपूर्वक बाहेर काढला. त्यानंतर छोट्या छिद्रांमधून केली जाणारी शस्त्रक्रिया (की-होल सर्जरी) करून बाळाची बाहेर आलेली आतडी हळूहळू पुन्हा पोटात ठेवून दिली.

थिओ आता 5 महिन्यांचा आहे आणि आता त्याची व्यवस्थित वाढ होत आहे.

थिओची आई 29 वर्षीय मेसी आणि त्याचे वडील 36 वर्षीय जोश फ्रेंच हे दोघेही शिक्षक आहेत. ही ऐतिहासिक शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, असं त्यांनी सांगितलं.

मेसीने बीबीसी न्यूजला सांगितलं की, "तो (माझा मुलगा) म्हणजे एक छोटासा चमत्कारच आहे, नाही का?"

परिस्थिती खूप वेगळी असू शकली असती, याची जाणीव दोघांनाही आहे.

ही गंभीर जन्मजात समस्या ब्रिटनमध्ये दरवर्षी सुमारे 3 हजार बाळांपैकी एकाला होते. जगभरात गॅस्ट्रोस्किसिस या समस्येची तीव्रता वेगवेगळ्या भागांनुसार बदलते.

2025 मध्ये झालेल्या जागतिक अभ्यासानुसार, उच्च आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये गॅस्ट्रोस्किसिसचे सर्वाधिक रुग्ण दक्षिण अमेरिकेत आढळून आले आहेत.

तर दुसरीकडे, कमी उत्पन्न असलेल्या देशांमधील याबाबतची आकडेवारी खूपच कमी आहे.

अशा बाळांची प्रकृती स्थिर असली तरी त्यांना अनेक आठवडे अतिदक्षता विभागात (NICU/ICU) ठेवावे लागू शकते. या काळात त्यांना नळी किंवा शिरेद्वारे (आयव्ही) अन्न, औषधं आणि द्रवपदार्थ द्यावे लागतात आणि काही प्रकरणांमध्ये सुधारात्मक शस्त्रक्रियेचीही गरज भासू शकते.

बेबी थिओचं प्रकरण दुर्मीळ का होतं?

थिओसारख्या गंभीर आणि गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्ये परिस्थिती आणखी कठीण असते. अशा बाळांना 6 महिन्यांपर्यंत नवजात अतिदक्षता विभागात (एनआयसीयू) ठेवावे लागू शकतं.

अशा बाळांना अनेक शस्त्रक्रिया कराव्या लागू शकतात. तसेच, 2 वर्षांपर्यंत शिरेद्वारे (आयव्ही) पोषण द्यावे लागू शकते. काही गंभीर प्रकरणांमध्ये आतड्यांचे प्रत्यारोपण करण्याचीही गरज भासू शकते.

सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा मिळाल्या तरीही अशा प्रत्येक 10 बाळांपैकी एकाचा मृत्यू होतो.

आपल्या न जन्मलेल्या बाळाला काही समस्या असेल, याची थिओच्या आई-वडिलांना अजिबात माहिती नव्हती.

जोश म्हणाले, "20 आठवड्यांच्या स्कॅनसाठी जाताना आम्ही फक्त आमच्या बाळाची छबी पाहण्यासाठी उत्सुक होतो. त्यावेळी आम्हाला हेही माहिती नव्हतं की आमचं बाळ मुलगा आहे."

जोश म्हणाले की, थिओला गॅस्ट्रोस्किसिस असल्याचे समजणं त्यांच्यासाठी मोठा धक्का आणि खूपच भीतीदायक अनुभव होता.

गर्भामध्येच जटिल गॅस्ट्रोस्किसिसची शस्त्रक्रिया झालेला थिओ हा पहिलाच ब्रिटिश बाळ आहे.

फोटो स्रोत, Texas Children’s Hospital

फोटो कॅप्शन, गर्भामध्येच जटिल गॅस्ट्रोस्किसिसची शस्त्रक्रिया झालेला थिओ हे पहिलाच ब्रिटिश बाळ आहे.

गर्भावस्थेच्या 24व्या आठवड्यात लंडनच्या ग्रेट ऑरमंड स्ट्रीट हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांनी मेसी आणि जोश यांना थिओच्या जन्मानंतरचे पहिले 6 महिने कसे असू शकतात, याची माहिती देत होते.

पण, जेव्हा गर्भातील बाळाला गॅस्ट्रोस्किसिसचा गंभीर प्रकार असल्याचे डॉक्टरांना समजलं. तेव्हा त्यांनी या दाम्पत्याला अमेरिकेतील ह्यूस्टन येथील टेक्सास चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये पाठवले.

तिथे गर्भातील बाळ आणि लहान मुलांवरील शस्त्रक्रिया करणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांची एक टीम यावर काम करत होती. या टीमचं नेतृत्व डॉ. मायकेल बेलफोर्ट करत होते.

ही टीम बाळाचा जन्म होण्यापूर्वीच गंभीर गॅस्ट्रोस्किसिसची समस्या दूर करण्यासाठी जगातील अशा प्रकारच्या पहिल्या वैद्यकीय (क्लिनिकल) चाचणीवर काम करत होती.

या चाचणीचे प्रमुख डॉ. बेलफोर्ट यांनी यापूर्वीही गर्भातील स्पायना बिफिडा या समस्येनं ग्रस्त बाळांवर अशाच प्रकारच्या शस्त्रक्रियेचं नेतृत्व केलं होतं.

मेसी सॅवेजच्या गर्भात असतानाच बेबी थिओवर शस्त्रक्रिया करण्यात आली.

फोटो स्रोत, Maisie Savage

फोटो कॅप्शन, मेसी सॅवेजच्या गर्भात असतानाच बेबी थिओवर शस्त्रक्रिया करण्यात आली.

मेसीला सांगण्यात आलं की, तिला त्वरीत टेक्सासला जावं लागेल. तसेच, गर्भावस्थेचा उर्वरित काळही त्यांना तिथेच राहावे लागणार होतं. मेसी म्हणाली, "हा आमच्यासाठी एक अत्यंत मोठा निर्णय होता."

बोटॉक्सचं इंजेक्शन आणि की-होल सर्जरी

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

या चाचणीसाठी त्यांना आधी बेल्जियममधील ल्यूवेन हॉस्पिटलमध्ये जावं लागलं. तिथे तज्ज्ञ डॉक्टरांनी मेसीच्या गर्भातून थिओच्या पोटाच्या भिंतीत बोटॉक्सचे इंजेक्शन दिले.

शस्त्रक्रिया करणं सोपं व्हावं यासाठी पोटातील स्नायू सैल करणे हा त्यामागचा उद्देश होता.

यानंतर हे कुटुंब टेक्सासला गेले. नोव्हेंबर 2024 मध्ये, गर्भावस्थेच्या 26व्या आठवड्यात ही शस्त्रक्रिया करण्यात आली.

जोश म्हणाले की, शस्त्रक्रिया सुरू असताना वाट पाहणं त्यांच्यासाठी खूप वेदनादायी आणि कठीण होतं.

ते म्हणाले, "त्या दिवसाचा प्रत्येक क्षण मला खूप मोठा वाटत होता, जणू एक पूर्ण आठवडा निघून गेला आहे."

"आम्ही केवळ वाट पाहत होतो. शस्त्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर नेमकं काय सुरू आहे, हेही आम्हाला समजत नव्हतं."

शस्त्रक्रियेदरम्यान मेसीच्या गर्भाशयाचा काही भाग काळजीपूर्वक बाहेर काढण्यात आला, जेणेकरून गर्भाशय आणि बाळाची योग्य स्थिती करता येईल.

त्यानंतर आतील गर्भोदक (अम्नियोटिक द्रव/गर्भजल) बाहेर काढण्यात आले आणि त्याऐवजी कार्बन डायऑक्साइड वायू भरण्यात आला. त्यामुळे डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्यासाठी अधिक जागा मिळाली.

त्यानंतर की-होल सर्जरीच्या मदतीने थिओचे बाहेर आलेले अवयव हळूवारपणे त्याच्या पोटात परत ठेवण्यात आले. त्यानंतर पोटाला टाके घालून ते बंद करण्यात आले.

प्रसूतीपूर्व शस्त्रक्रियेचे चार टप्पे.

फोटो स्रोत, Texas Children’s Hospital

फोटो कॅप्शन, प्रसूतीपूर्व शस्त्रक्रियेचे चार टप्पे.

मेसीच्या पोटावर शस्त्रक्रियेची एक खूण राहिली, जी सिझेरियनच्या (सी-सेक्शन) खुणेपेक्षा जवळपास दुप्पट मोठी होती.

परंतु, मेसीची परिस्थिती इतर महिलांपेक्षा वेगळी होती. सिझेरियननंतर बाळाचा जन्म होतो, पण मेसीला शस्त्रक्रियेनंतरही पुढील 14 आठवडे बाळाला गर्भात सुरक्षितपणे वाढवायचं होतं.

मेसीने सांगितलं की, थिओ गर्भात असताना अनेकवेळा लाथ मारायचा. काही वेळा त्याची लाथ शस्त्रक्रियेच्या जखमेवर (सर्जिकल स्कार) लागायची, त्यामुळे तिला वेदना होत असत.

ती म्हणाली, "हा काळ खूप कठीण होता आणि त्यातून बाहेर पडणं सोपं नव्हतं. पण केलेल्या मेहनतीचं चांगलं फळ मिळालं."

ही शस्त्रक्रिया पूर्णपणे यशस्वी ठरली. थिओ गर्भात पूर्ण कालावधीपर्यंत सुरक्षित राहिला आणि फेब्रुवारीमध्ये टेक्सासमध्ये त्याचा नैसर्गिक प्रसूतीद्वारे जन्म झाला.

टेक्सास चिल्ड्रन्स हॉस्पिटलमधील प्रसूती आणि स्त्रीरोग विभागाचे प्रमुख डॉ. मायकेल बेलफोर्ट म्हणाले की, आतापर्यंत मिळालेल्या निकालांमुळे ते आणि त्यांची टीम खूप आनंदी आणि समाधानी आहे.

ते म्हणाले, "आई आणि बाळ दोघांचीही प्रकृती चांगली आहे. योग्य वेळी शस्त्रक्रिया झाली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, शस्त्रक्रियेदरम्यान किंवा त्यानंतर कोणतीही गंभीर गुंतागुंत निर्माण झाली नाही. ही खरोखरच एक मोठी आणि असाधारण अशी कामगिरी आहे."

वैद्यकीय तंत्रज्ञान आणि शस्त्रक्रियांसाठी नवीन क्षेत्र

ही चाचणी यशस्वी ठरली, तर ग्रेट ऑरमंड स्ट्रीट हॉस्पिटलमधील बालरोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ आणि युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधील स्टेम सेल आणि रिजनरेटिव्ह मेडिसिन विभागाचे प्रमुख प्रा. पाओलो डी कोप्पी ही उपचारपद्धती ब्रिटनमध्येही सुरू करू शकतात.

"लवकरच हा उपचार अधिकाधिक रुग्णांना उपलब्ध करून देता येईल, अशी आम्हाला आशा आहे," असं ते म्हणाले.

डॉ. बेलफोर्टही या भागीदारीबद्दल उत्साही आहेत. त्यांचं म्हणणं आहे की, टेक्सास चिल्ड्रन्स हॉस्पिटल आणि ग्रेट ऑरमंड स्ट्रीट हॉस्पिटलची टीम एकत्र आल्यास अतिशय सक्षम आणि प्रभावी गट तयार होईल.

या शस्त्रक्रियेचे परिणाम पाहून आश्चर्य वाटले, असं डॉ. बेलफोर्ट यांनी म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Texas Children’s Hospital

फोटो कॅप्शन, या शस्त्रक्रियेचे परिणाम पाहून आश्चर्य वाटले, असं डॉ. बेलफोर्ट यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, डॉ. बेलफोर्ट आता पुढील शक्यतांवरही लक्ष ठेवून आहेत.

ते म्हणाले, "गर्भाशयातील जागा आता नव्या वैद्यकीय तंत्रज्ञान आणि शस्त्रक्रियांसाठी एक नवीन क्षेत्र बनले आहे."

ते पुढे म्हणाले, "स्पायना बिफिडा आणि गॅस्ट्रोस्किसिस ही त्याची फक्त दोन उदाहरणे आहेत. भविष्यात गर्भात असतानाच हृदयविकारांवरील काही शस्त्रक्रिया करता येतील, असा मला वाटतं. तसेच, फुफ्फुसांवरील काही शस्त्रक्रियाही गर्भातच करता येऊ शकतील."

मेसी, जोश आणि थिओ आता घरी परतले असून ते पुन्हा आपलं सामान्य आयुष्य जगत आहेत.
फोटो कॅप्शन, मेसी, जोश आणि थिओ आता घरी परतले असून ते पुन्हा आपलं सामान्य आयुष्य जगत आहेत.

लंडनमधील घरी परतल्यानंतर मेसी म्हणाली की, थिओची प्रकृती आता खूप चांगली आहे.

"डॉक्टरांच्या उपचारांमुळेच त्याच्या आयुष्याची कठीण सुरुवात पूर्णपणे बदलली. आता तो खूप चांगली प्रगती करत आहे आणि अगदी इतर मुलांसारखंच सामान्य आयुष्य जगत आहे."

जोश म्हणाले, "आम्ही दोघेही स्वतःला खूप नशीबवान समजतो. डॉक्टर आणि संपूर्ण टीममुळे आमच्या कुटुंबाचं आयुष्यच बदललं. ग्रेट ऑरमंड स्ट्रीट हॉस्पिटलच्या टीमपासून ते डॉ. बेलफोर्ट आणि त्यांच्या सहकाऱ्यांपर्यंत सर्वांनी आमचं खूप आपुलकीने आणि मनापासून स्वागत केलं."

"आम्ही तिथे असताना आम्हाला मिळालेली काळजी आणि उपचार अतिशय अप्रतिम होते. आमच्या आयुष्यातील अत्यंत कठीण काळ त्यांनी खूप सुसह्य करून दिला. आज आमचा हा छोटासा मुलगा आमच्यासोबत आहे आणि यापेक्षा मोठा आनंद आमच्यासाठी दुसरा असूच शकत नाही."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन