शेख हसीनांची भारतात पत्रकार परिषद, बांगलादेशात संतापाची लाट; माजी क्रिकेटर शाकिब यांच्या घरावर हल्ला

शेख हसीना

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शेख हसीना
Published
वाचन वेळ: 5 मिनिटे

माजी पंतप्रधान शेख हसीना यांना भारतात थेट माध्यमांशी संवाद साधण्याची परवानगी दिल्याबद्दल बांगलादेशनं तीव्र आक्षेप नोंदवला आहे.

"त्या कार्यक्रमाद्वारे शेख हसीना आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बांगलादेश आणि देशातील जनतेची थट्टा केली आहे.", असं बांगलादेश सरकारने म्हटलं आहे.

या व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत बांगलादेशचे माजी क्रिकेट कर्णधार शाकिब अल हसन दिसल्यानंतर बुधवारी रात्री त्यांच्या घरावर हल्ला झाल्याचा दावा केला जात आहे.

बांगलादेश अवामी लीगने एक्सवर निवेदन जारी करत म्हटलं, "बांगलादेशचे प्रसिद्ध क्रिकेट आयकॉन शाकिब अल हसन यांच्या निवासस्थानी पेट्रोल बॉम्बद्वारे भीषण हल्ला करण्यात आला. हा हल्ला त्या पत्रकार परिषदेच्या काही तासांनंतर झाला ज्यामध्ये हे जागतिक कीर्तीचे क्रिकेटपटू आदरणीय पक्षाध्यक्षा शेख हसीना यांच्यासोबत सहभागी झाले होते."

"पत्रकार परिषदेपूर्वी बीएनपी, इस्लामी जमात आणि एनसीपी यांनी सार्वजनिकरित्या राष्ट्रीय माध्यम संस्थांना इशारा दिला होता की जर त्यांनी पत्रकार परिषदेशी संबंधित वृत्त प्रकाशित केलं तर त्यांच्याविरोधात न्यायव्यवस्थेचा वापर करून खटले दाखल केले जातील," असं अवामी लीगच्या निवेदनात म्हटलं आहे.

अवामी लीगनं या हल्ल्याला कथित लोकशाही उभारणीच्या नावाखाली पक्ष कार्यकर्त्यांविरोधात सुरू असलेल्या कथित नरसंहार मोहिमेचं आणखी एक उदाहरण म्हटलं असून त्याला फॅसिझम ठरवलं आहे.

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांच्या प्रकरणात मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्या 5 ऑगस्ट 2024 रोजी सत्तेवरून हटवल्यानंतर भारतात आहेत.

मात्र, गेल्या दोन वर्षांत प्रथमच त्यांनी व्हर्च्युअल माध्यमातून थेट पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर दिलं.

5 ऑगस्टच्या निमित्तानं बांगलादेशमध्ये अनेक सरकारी कार्यक्रम आयोजित केले जात असताना त्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला.

बांगलादेशनं काय म्हटलं?

बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन जारी करत म्हटलं आहे, "या कार्यक्रमाचा बांगलादेश-भारत द्विपक्षीय संबंधांच्या पुनर्बांधणीवर होणाऱ्या परिणामाबद्दल सरकारने यापूर्वीच चिंता व्यक्त केली होती. तरीसुद्धा, ढाका अशा सार्वजनिक कार्यक्रमाला परवानगी दिल्याबद्दल आम्ही तीव्र खेद व्यक्त करतो."

बुधवारी (5 ऑगस्ट) संध्याकाळी शेख हसीना यांनी दिल्लीतील फॉरेन कॉरेस्पॉन्डंट्स क्लब ऑफ साउथ एशियानं आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला व्हर्च्युअल माध्यमातून संबोधित केलं.

त्यांनी पुन्हा एकदा जाहीर केलं की, त्या बांगलादेशात परततील. डिसेंबरपर्यंत परततील असं त्या म्हणाल्या, मात्र कोणतीही ठरावीक तारीख सांगितली नाही.

यानंतर काही वेळातच रात्री सुमारे 11 वाजता बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या फेसबुक पेजवर एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं.

बांगलादेशची तीव्र प्रतिक्रिया

फोटो स्रोत, @BDMOFA

बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने निवेदनात म्हटलंय, "भारतीय भूमीवर शेख हसीनांची पत्रकार परिषद त्या दिवशी झाली जेव्हा बांगलादेशची जनता जुलै क्रांतीचा दुसरा वर्धापनदिन साजरा करत होती. हा बांगलादेशच्या सार्वभौमत्वावर हल्ला आहे आणि जुलै क्रांतीतील शहीदांचा अपमान आहे."

निवेदनात पुढे म्हटलं आहे, "या देशातील जनतेने जुलै क्रांतीची भावना स्वीकारत दृढ निश्चय केला आहे की आमचं राष्ट्र पुन्हा कधीही फॅसिझमच्या त्या अंधाऱ्या दिवसांत परत जाणार नाही आणि बांगलादेश कधीही कोणाचं निष्ठावान किंवा संरक्षित राष्ट्र बनणार नाही. नरसंहारासाठी दोषी असलेल्या (शेख) हसीना आणि त्यांचा माफिया गट आता कधीही बांगलादेशच्या राजकारणात स्थान मिळवू शकणार नाही."

बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयानं पुढे म्हटलंय, "सार्वभौम समानता, परस्पर आदर, एकमेकांच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप न करणे आणि राष्ट्रीय सन्मान या तत्त्वांवर आधारित भारतासोबत रचनात्मक, परस्पर लाभदायक आणि भविष्याभिमुख संबंध राखण्याची बांगलादेशची इच्छा आहे."

बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान

या निवेदनात शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाबाबतही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

त्यात म्हटलं आहे, "दुर्दैवानं, बांगलादेश आणि भारत यांच्यात 2013 मध्ये झालेल्या प्रत्यार्पण करारानुसार दोषी गुन्हेगार (शेख) हसीना यांना परत पाठवण्यासाठी बांगलादेशकडून वारंवार करण्यात आलेल्या विनंत्यांवर भारत सरकारकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही."

"उलटपक्षी, कोणत्याही कारणास्तव त्यांना सार्वजनिकरित्या माध्यमांशी संवाद साधण्याची संधी देणं या देशातील जनतेच्या भावना दुखावणारं आहे आणि बांगलादेश व भारत यांच्यात मजबूत द्विपक्षीय संबंध निर्माण करण्यासाठी अत्यंत हानिकारक आहे."

भारताची भूमिका काय?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

याआधी मंगळवारी (4 ऑगस्ट) पत्रकारांनी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांना या पत्रकार परिषदेबाबत प्रतिक्रिया विचारली होती.

बुधवारी (5 ऑगस्ट) होणाऱ्या शेख हसीना यांच्या पत्रकार परिषदेबाबत भारताची भूमिका काय आहे, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. यावर बांगलादेशने यापूर्वीच चिंता व्यक्त केली होती.

त्यावर रणधीर जयस्वाल म्हणाले, "त्या कार्यक्रमाचं आयोजन एका खासगी संस्थेकडून केलं जात आहे. भारत सरकारचा त्याच्याशी कोणताही संबंध नाही. तिथं व्यक्त केलेल्या कोणत्याही मतं किंवा विधानांचं भारत सरकार समर्थन करत नाही आणि आमचा त्यांच्याशी कोणताही संबंध नाही."

याच्या एक दिवस आधी बांगलादेशच्या पंतप्रधानांचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार हुमायूं कबीर यांनी भारताचे नवनियुक्त उच्चायुक्त दिनेश त्रिवेदी यांच्याशीही या विषयावर चर्चा केली होती आणि भारताकडे सहकार्याची मागणी केली होती.

ते म्हणाले होते, "बांगलादेशला अपेक्षा आहे की भारत हे सुनिश्चित करण्यासाठी सहकार्य करेल की पदच्युत केलेल्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यासह बंदी घालण्यात आलेल्या अवामी लीगशी संबंधित कोणतीही व्यक्ती राजकीय विधानं करण्यासाठी किंवा बांगलादेशमध्ये अस्थैर्य निर्माण करणाऱ्या कोणत्याही कारवायांसाठी भारतीय भूमीचा वापर करणार नाही."

"मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांच्या प्रकरणात मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी दिल्लीतून कोणतंही राजकीय विधान करू नये आणि कोणतीही राजकीय हालचाल करू नये", असं त्यांचं म्हणणं होतं

बांगलादेशमध्ये हसीनांच्या बातम्यांवर बंदी

बीबीसी बांगलाच्या एका वृत्तानुसार, पत्रकार परिषदेबाबत अवामी लीगने घोषणा केल्यानंतर बांगलादेश सरकारने न्यायालयीन बंदीचा हवाला देत माध्यमांना त्यांच्या विधानांचं वार्तांकन न करण्याचा इशारा दिला होता.

बांगलादेश सरकारचे पंतप्रधानांचे माहिती आणि प्रसारण सल्लागार डॉ. जाहेद उर रहमान यांनी याची माहिती दिली होती.

बांगलादेशमध्ये हसीनांच्या बातम्यांवर बंदी

फोटो स्रोत, Getty Images

ढाक्यातील आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाचे मुख्य सरकारी वकील मोहम्मद अमीनुल इस्लाम यांनी सांगितलं होतं की न्यायाधिकरणाने शेख हसीना यांच्या 'द्वेषपूर्ण' विधानांच्या प्रसारावर बंदी घातली आहे आणि ही बंदी माध्यमांसह सोशल मीडियालाही लागू असेल.

अंतरिम सरकारच्या काळात शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षावर बंदी घालण्यात आली होती. निवडणूक आयोगाने पक्षाची नोंदणी निलंबित केली होती आणि यावर्षी झालेल्या संसदीय निवडणुकीत पक्षाला सहभागी होता आलं नव्हतं.

5 डिसेंबर 2024 रोजी आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने माध्यमं आणि सोशल मीडियावर शेख हसीना यांच्या 'द्वेषपूर्ण भाषणा'च्या प्रसारावर बंदी घातली होती.

डॉ. जाहेद उर रहमान यांनी मंगळवारी सचिवालयात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की बांगलादेश सरकार माध्यमांना शेख हसीना यांच्या विधानांशी संबंधित बातम्या प्रसारित न करण्याचा इशारा देत आहे.

ते म्हणाले, "त्या पुन्हा बोलतील. जर कुणी अशी बातमी दिली की त्या उद्या बोलतील, जर कुणी याची आगाऊ घोषणा केली किंवा ती प्रकाशित केली, तर ते निश्चितपणे न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन ठरेल. यासंदर्भात आम्ही कारवाई करू."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)