पुण्यात तयार होतायेत 'हीट आयलंड'; यामागची कारणं काय आणि हे किती धोकादायक?

    • Author, प्राची कुलकर्णी
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

पुण्यात लोहगाव परिसरात 11 मे रोजी 43.8 अंश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं, तर शिवाजीनगरमध्ये 41.6 अंश तापमान नोंदवलं गेलं.

हे गेल्या 10 वर्षांतील हे सर्वाधिक तापमान असल्याचं हवामान विभागाने स्पष्ट केलं.

यामागे सध्याच्या हवामानाची स्थिती कारणीभूत असली तरी त्याबरोबरच वेगाने वाढणारं शहरीकरण देखील तापमानवाढीला कारणीभूत ठरत असल्याचं दिसतंय. यात सिमेंट काँक्रिटमुळे उष्णतेची बेटं तयार होत असल्याचं संशोधन सांगतं.

या तापमान वाढीमागे नेमकं काय कारण आहे हे सांगताना हवामान विभागाचे निवृत्त अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर म्हणाले, "वातावरण बदल अचानक होतो असं नाही. म्हणजे झाडं कापली की लगेच तापमान वाढलं असं नाही. पण हळूहळू त्याचे परिणाम जाणवतात. आता एक अँटी-सायक्लॉन स्थिरावलं आहे. त्यामुळे तापमानवाढ दिसत आहे. मे महिन्याच्या शेवटपर्यंत ही स्थिती राहील. मात्र, त्याबरोबरच यात शहरीकरणाचाही वाटा आहे."

हवेचं तापमान आणि जमिनीवरचं तापमान यात फरक

दुपारी एकची वेळ. पुण्यातल्या एरंडवण्यातल्या सिमेंटच्या डीपी रस्त्यावर आम्ही उभे होतो. फोनमध्ये तपासल्यावर या परिसरातलं तापमान दिसत होतं साधारण 38 अंश सेल्सियस. जेव्हा इथलं थेट उन्हात असणाऱ्या सिमेंट रस्त्याचं तापमान मोजलं तेव्हा ते होतं 58 अंश सेल्सियस.

पुण्यातल्या भारतीय कला प्रसारणी सभेच्या आर्किटेक्चर कॉलेजच्या प्राध्यापक प्रज्ञा पत्की आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी पुण्यातल्या वेगवेगळ्या भागातल्या रस्त्यांवरचं तापमान आणि त्यातले बदल नोंदवणारा अभ्यास केला, तेव्हा रस्ते प्रचंड तापत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

थांबलेली वाहनं, रस्त्यावर नसणारी सावली याचाही परिणाम तापमान वाढण्यात होत असल्याचं दिसलं. इथं वेगवेगळ्या झाडांखाली मात्र तापमानात घट होत होती.

या अभ्यासातल्या निरीक्षणांबद्दल सांगताना प्रा. प्रज्ञा पत्की म्हणाल्या, "दुपारच्या वेळी काँक्रिटच्या रस्त्यांवर जिथे ऊन जास्त आहे आणि सावली पडत नाही, तिथे दुपारच्या वेळी तापमान खूप जास्त दिसून येतं. काँक्रिटच्या रस्त्याचं तापमान सरासरी 58 अंशांपर्यंत आपल्याला फरक जाणवतो. त्याच रस्त्याच्या कडेला एक झाड आहे तिथे तापमान मोजलं तर ते 35 अंशापर्यंत येतं. दुपारच्या वेळी हे तापमान सर्वाधिक दिसतं."

या वाढत्या तापमानाची झळ रस्त्यावरून या काळात प्रवास करणाऱ्यांना बसते. पण सिमेंटच्या रस्त्यावर फुटपाथवर दिवसभर विक्रीसाठी बसणाऱ्या लोकांच्या आरोग्यावर थेट परिणाम होत असल्याचं 'प्रयास आरोग्य गटाने' केलेल्या पाहणीत दिसून आलं.

यासाठी त्यांनी शहराच्या वेगवेगळ्या भागात असणाऱ्या पथारी व्यावसायिकांशी बोलून हा अभ्यास केला. त्याचबरोबर त्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी तापमानाची नोंद केली.

या अभ्यासातल्या निष्कर्षांबद्दल आणि तापमानाचा आरोग्यावर दृश्य परिणाम कसा दिसतो हे सांगताना प्रयास आरोग्य गटाच्या सिनियर रिसर्च असोसिएट डॉ. रितू परचुरे म्हणाल्या, "पथारी व्यावसायिक सिमेंटच्या फुटपाथवर किंवा टपऱ्यांमध्ये दिसतात. तिथल्या लोकांचे अनुभव खूप बोलके होते."

"यापैकी एका जणाने बोलताना सांगितलं की, आमच्यासाठी असं आहे की वरून सूर्य उन्ह ओकत आहे आणि खालून रास्ता तापलेला आहे, जो चटके देतो. दुसरा एक जण म्हणाला की, दिवसभर उन्ह असतं, त्यात आम्ही बसलेलो असतोच. पण संध्याकाळी उन्ह उतरतं तरी झळा कमी होत नाहीत."

"संध्याकाळी काँक्रिट आहे म्हटल्यावर ते उष्णता बाहेरच सोडणार आहे. त्या उष्णतेमध्ये अधिक जीवाची घालमेल होते. जीव घाबरा होणं किंवा धडधडणं हातपाय लटपट कापणं याचा त्रास होताना दिसत आहे. त्यांचा एकंदरीत अनुभव असा आहे की उष्णता वाढलेली आहे आणि त्याचा त्यांच्या शरीरावर परिणाम होत आहे."

या तापमानवाढीची नेमकी कारण काय?

गेल्या काही दिवसांपासून झालेली तापमानवाढ ही जशी वातावरणातल्या बदलांमुळे झाली आहे, तसंच यामागे वाढतं शहरीकरण आणि उभी राहणारी सिमेंट काँक्रिटची जंगलं हेही महत्त्वाचं कारण ठरत असल्याचं मत तज्ज्ञ नोंदवतात.

भारतीय हवामान विभागाने यासाठी पुणे शहरातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये निरीक्षण नोंदवत अभ्यास केला.

यासाठी त्यांनी पुणे शहरातल्या तीन वेगवेगळ्या भागातल्या तापमानाचा अभ्यास केला. 'वेट बल्ब ग्लोब टेम्परेचर' मोजून हा अभ्यास करण्यात आला. या प्रकारात हवेतली आर्द्रता, वारा आणि इतर बाबींचा विचार तापमान मोजताना केला जातो.

या अभ्यासासाठी त्यांनी एप्रिल आणि मे 2024 मध्ये पुण्यातील गोपाळकृष्ण गोखले रस्त्यावरच्या फर्ग्युसन कॉलेजचा परिसर, पुण्यातील कृषी महाविद्यालयाचा परिसर आणि आयसर या तीन ठिकाणांचा अभ्यास केला. यासाठी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 दरम्यान दर 5 मिनिटांनी तापमान मोजलं.

यात असं दिसलं की, सगळ्यात जास्त शहरीकरण आणि बांधकाम झालेल्या फर्ग्युसनच्या परिसरात तापमान सर्वाधिक होतं. त्यानंतर कृषी महाविद्यालय परिसरातलं तापमान होतं तर सर्वात कमी तापमान आयसरच्या परिसरात नोंदवलं गेलं.

या अभ्यासातील निरीक्षणं सांगतात की, जिथं सिमेंट काँक्रिटचा वापर झाला आहे तिथे तापमान जास्त असेल तर जिथे झाडं असलेला परिसर आहे तिथे तापमान कमी आढळतं.

या वाढत्या तापमानाचा आरोग्यावर परिणाम होतोच, शिवाय एकूण परिसरावरचा हीट स्ट्रेस देखील वाढतो. शहरातील अर्बन हीट आयलंड किंवा उष्णतेची बेटं निर्माण होण्याचं प्रमाण वाढलं आहे.

यातील संशोधक असणारे होसाळीकर म्हणाले, "अर्बन हीट आयलंड हे उन्हाळ्यातच निर्माण होतं असं नाही. ती हिवाळ्यात पण निर्माण होतात. आणि एकदा निर्माण झाली की ती तशीच राहतात. उन्हाळ्यात याची आपल्याला प्रकर्षाने जाणीव होते.

'अर्बन हीट आयलंड' म्हणजे काय?

सिमेंटचे रस्ते आणि आजूबाजूच्या सिमेंटच्या किंवा काचा लावलेल्या चकचकीत इमारती याने या तापमान वाढीला आणखी हातभार लागत आहे. सिमेंट रस्ता साधारण 95 टक्के उष्णता शोषून घेतो. तीच उष्णता नंतर उत्सर्जित केली जातेय. त्याचा परिणाम हवेचं आणि परिसरातलं तापमान वाढण्यावर होतो.

सिमेंट जेवढं तापतं, त्यापेक्षा कितीतरी जास्त वेळ त्याला थंड व्हायला लागत असल्यामुळे अगदी रात्रीही सिमेंट रस्त्याच्या परिसरात तापमान जास्त जाणवत असल्याचं संशोधन सांगतं.

ही उष्णतेची बेटं म्हणजे नेमकं काय हे सांगताना भारतीय हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एस. डी. सानप म्हणाले, "उष्णतेची बेटं म्हणजे असा भाग जिथं तापमान हे इतर विशेषत ग्रामीण भागापेक्षा जास्त असल्याचं आपल्याला दिसतं. सिमेंट काँक्रिटमुळे उष्णता शोषली जाते आणि त्यानंतर त्यातून ज्या उष्णतेचं उत्सर्जन होतं ती पुन्हा काँक्रिटचंच दुसरं स्ट्रक्चर शोषून घेतं. त्यामुळे ती उष्णता त्याच परिसरात फिरत राहते आणि तापमान वाढतं."

तर प्रज्ञा पत्की म्हणाल्या, "सिमेंट काँक्रिट दिवसा उष्णता शोषून घेतं. तिथलं सरफेस टेम्परेचर वाढलेलं आपल्याला दिसतं. रात्री हवेचं तापमान कमी होतं. पण तेव्हा हे काँक्रिट उष्णता उत्सर्जित करायला सुरुवात करतं. त्यामुळे सूर्य मावळला, रात्र झाली तरी उष्णता राहते तापमान जास्त दिसतं."

'फ्लोअर इज लाव्हा' हा लहान मुलांचा खेळ. पण कधी विचार केलाय का की खरंच फ्लोअर म्हणजे जमीन लाव्ह्यासारखी तापतेय. उष्णतेच्या लाटांची संख्या वाढत असतानाच होणारी ही तापमान वाढ चिंताजनक ठरतेय.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)