स्वतःच्या मुलांवर चाचणी करणाऱ्या डॉक्टरने का घेतलं नाही लशीचं पेटंट? पोलिओ लशीच्या शोधाची कहाणी

    • Author, ग्रेग मॅक्विट
    • Role, बीबीसी कल्चर
  • Published
  • वाचन वेळ: 8 मिनिटे

12 एप्रिल 1955 ला डॉ. जोनास साल्क यांनी एक महत्त्वाची घोषणा केली. ही अशी घोषणा होती ज्याबद्दल अनेक पिढ्या त्यांच्या ऋणी राहणार होत्या.

त्यांनी जाहीर केलं की, आपण शोधलेली लस पूर्णपणे सुरक्षित आणि प्रभावी आहे. या लशीमुळे असंख्य मुलांचे प्राण वाचले, त्यांच्या नशिबी येऊ घातलेलं अपंगत्व टळलं. एवढा महत्त्वाचा शोध लावूनही डॉ. साल्क यांनी त्यातून नफा कमावण्यास नकार दिला.

'मानवजातीच्या इतिहासांतील सर्वांत गौरवशाली बातम्यांपैकी एक,' अशा शब्दांत एका अमेरिकन पत्रकाराने साल्क यांच्या घोषणेचं वर्णन केलं.

डॉ.साल्क यांनी शोधलेली ही लस होती पोलिओची.

आज आपण पोलिओवर नियंत्रण मिळवलं आहे. आपल्या देशात लहान मुलांना पोलिओची लस देण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाते. ही लस प्रत्येक बालकाला मिळेल यांची काळजी घेतली जाते.

पण एक काळ असा होता की, जेव्हा पोलिओवर ना उपचार होते ना प्रतिबंधक उपाय.

डॉ. साल्क यांनी जेव्हा आपल्या लशीची घोषणा केली, तेव्हा त्यांना टेलिव्हिजनवरील मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला की, या लशीचं पेटंट कोणाकडे आहे? त्यावर त्यांनी उत्तर दिलं, "मी म्हणेन की, लोकांकडे. कारण याचं कोणतंही पेटंट नाही. सूर्याचं पेटंट घेता येईल का?"

पोलिओमायलिटिस किंवा पोलिओ ही त्याकाळी सार्वजनिक आरोग्यासाठी आणीबाणीचीच परिस्थिती होती. 1952 साली अमेरिकेत या आजाराची विक्रमी 57,628 प्रकरणं नोंदवली गेली होती. या आजारात श्वसन प्रणाली आणि पाठीच्या कण्याला लकवा मारत असे.

रुग्णांना श्वास घेण्यासाठी मोठ्या धातूच्या यंत्रांमध्ये ठेवावं लागत असे. या यंत्रांना 'आयर्न लंग्स' म्हटलं जात होतं. मुलांच्या पायांवर लावल्या जाणाऱ्या ऑर्थोपेडिक ब्रेसेसप्रमाणेच ही यंत्रंही पोलिओचं कायमचं प्रतीक बनली होती. लोकांना उन्हाळ्याची भीती वाटू लागली होती, कारण या काळातच पोलिओचे उद्रेक जास्त होत असत.

प्रत्येक पालकाला या आजाराची लक्षणं माहिती होती आणि त्याची प्रचंड भीती वाटत होती, असं ज्योडी झोग्रान यांनी म्हटलं. पीट्सबर्गमधल्या ज्या हॉस्पिटलमध्ये साल्क आणि त्यांच्या टीमने लस विकसित केली, तिथेच त्या वॉर्ड नर्स म्हणून काम करत होत्या.

त्यांनी बीबसीच्या 'विटनेस हिस्ट्री' या कार्यक्रमात बोलताना म्हटलं की, "एखादा लहान मुलगा अगदी कालपर्यंत फुटबॉल खेळत असायचा आणि दुसऱ्या दिवशी त्या 'आयर्न लंग्ज'मध्ये दिसायचा. आपल्याला काय झालंय हे त्याला कळायचं नाही, तो जोरजोरात आरडाओरडा करायचा. जर त्याच्या पायाला लकवा मारलेला नसेल, तर तो त्या रेस्पिरेटवर लाथा झाडायचा."

एक टक्क्यापेक्षाही कमी प्रकरणात लकवा मारत असला, तरी पोलिओ संसर्गांच्या लाटांमुळे मुलांना मोठ्या संख्येने 'आयर्न लंग्ज'मध्ये राहावं लागत होतं. मानेखालचा भाग जखडणाऱ्या त्या पिंजऱ्यात त्यांना अनेक दिवस, महिने किंवा अगदी वर्षानुवर्षं त्यांना या यंत्रात बंदिस्त राहावं लागायचं.

या रुग्णांची काळजी घेणाऱ्या झोग्रान आणि इतर परिचारिकांना सांगण्यात आलं होतं की, संसर्गापासून वाचण्यासाठी त्यांच्याकडे एकमेव बचाव होता- काटेकोरपणे हात धुणे.

"आम्ही प्रत्येक वेळी रुग्णाला स्पर्श केल्यानंतर किंबहुना त्याहून अधिक वेळा हात धुवायचो. रात्री घरी जाताना माझे हात इतके दुखायचे आणि सोलवटलेले असायचे की सहन व्हायचं नाही," त्यांनी सांगितलं.

पोलिओचा सर्वाधिक संसर्ग लहान मुलांना होत असला, तरी मोठेही पूर्णपणे सुरक्षित नव्हते. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी रुझवेल्ट हे तेव्हा उदयोन्मुख राजकीय नेते होते. त्यांना 1921 साली वयाच्या 39 व्या वर्षी पोलिओचा संसर्ग झाला होता. त्यांचा कमरेखालचा भाग लुळा पडला होता.

सत्तेत आल्यानंतर त्यांनी पोलिओविरोधातला लढा ही स्वतःची वैयक्तिक मोहीम बनवली. मार्च 1938 मध्ये त्यांनी March of Dimes ही संस्था स्थापन केली, जी पोलिओसंदर्भातील जागृतीसाठी काम करेल. या संस्थेने निधी उभारण्याची पारंपरिक पद्धतच पूर्णपणे बदलून टाकली. काही मोजक्या लोकांकडून मोठ्या देणग्या घेण्याऐवजी त्यांनी लाखो सामान्य लोकांकडून छोट्या-छोट्या देणग्या मागितल्या आणि अशा प्रकारे शेकडो दशलक्ष डॉलर्स जमा केले.

लस शोधण्यासाठीची स्पर्धा

1940 च्या दशकाच्या अखेरपर्यंत वैज्ञानिकांनी हे सिद्ध केलं होतं की, पोलिओचे विषाणू आतड्यांमार्गे रक्तप्रवाहात प्रवेश करतात. याच काळात दोन संशोधक पोलिओची लस विकसित करण्याच्या शर्यतीत पुढे आले आणि दोघांनी पूर्णपणे वेगवेगळे मार्ग स्वीकारले.

पोलिओ- अन अमेरिकन स्टोरी या पुस्तकाचे लेखक डेव्हिड एम. ओशिन्स्की सांगतात की, सिनसिनाटी मेडिकल स्कूलमधील बालरोगतज्ज्ञ डॉ. अल्बर्ट सॅबिन यांनी पोलिओ विषाणूवर आधीच दोन दशकं संशोधन केलं होतं. त्यांचा विश्वास सावधपणे आणि हळूहळू पुढे जाण्यात होता.

2014 साली बीबीसीने बनवलेल्या माहितीपटात त्यांनी म्हटलं,"ते स्वतःला 'शास्त्रज्ञांचा शास्त्रज्ञ' समजत होते…अखंड प्रयोगशाळेत राहून, तिथून बाहेरही न पडता, टप्याटप्प्याने संशोधन करत पुढे जाणारे वैज्ञानिक."

दुसरीकडे, साल्क हे पीट्सबर्ग मेडिकल स्कूलमधील संशोधक होते. त्यांची कामाची पद्धत वेगवान होती. त्यांनी दुसऱ्या महायुद्धादरम्यान सैनिकांसाठी यशस्वीपणे फ्लूची लस तयार केली होती. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना रुझवेल्ट यांच्या March of Dimes संस्थेचं पाठबळ मिळालं होतं आणि या संस्थेला लवकरात लवकर प्रगती हवी होती.

फिलाडेल्फियातील व्हॅक्सिन एज्युकेशन सेंटरचे डॉ. पॉल ऑफिट यांनी बीबीसीला सांगितलं की, साल्क हे एखाद्या औषधनिर्मिती कंपनीप्रमाणे वेगाने आणि लक्ष केंद्रीत करून काम करत होते. ही शैली त्या काळातील वैज्ञानिकांच्या पारंपरिक कामकाजाच्या पद्धतीला आव्हान देणारी होती.

त्यांनी म्हटलं की, "साल्क आणि सॅबिन यांच्यात कोणती लस सर्वोत्तम ठरेल याबाबत मूलभूत मतभेद होते. साल्क यांच्या मते लस पूर्णपणे निष्क्रिय केलेल्या विषाणूपासून तयार केली पाहिजे, तर सॅबिन यांच्या मते ती कमकुवत केलेल्या विषाणूपासून बनवली पाहिजे."

पत्नी आणि मुलांवर केली होती लशीची चाचणी

March of Dimes कडून मिळालेल्या निधीमुळे साल्क यांना स्पष्ट आघाडी मिळाली. त्यामुळे त्यांना पीट्सबर्गमधील एका कार्यरत रुग्णालयाच्या मध्यभागी, पोलिओग्रस्त रुग्णांच्या सान्निध्यात, आपली प्रयोगशाळा उभारता आली. साल्क आणि त्यांच्या टीमने निष्क्रिय केलेल्या पोलिओ विषाणूपासून लस तयार केली होती.

हा एक पूर्णपणे वेगळा प्रयोग होता. तिसऱ्या मजल्यावर काम करणाऱ्या परिचारिका रुग्णांचे मलाचे नमुने तळघरातील प्रयोगशाळेत पाठवत असत. तिथे विषाणू केला जायचा. मात्र, साल्क आणि त्यांच्या टीमला अजून हे सिद्ध करायचं होतं की, ही लस पोलिओ विषाणूशी लढण्यासाठी आवश्यक प्रतिपिंडं निर्माण करू शकते.

1982 मध्ये बीबीसीशी बोलताना साल्क यांनी म्हटलं की, पोलिओ लसीचा विकास हा संयमाने आणि सातत्याने केलेल्या प्रयत्नांचा परिणाम होता.

त्यांनी म्हटलं की, "पोलिओविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण करणं शक्य असावं, असे निष्कर्ष पुढे येत होते. त्यानंतर अनेक संभाव्य मार्गांपैकी एक मार्ग निवडायचा होता. संशोधनादरम्यान अशा अनेक गोष्टी समोर आल्या ज्यांचा अंदाज आधी नव्हता आणि त्या संधींचा फायदा घ्यावा लागला. त्या अर्थाने या प्रवासात काही मोठी झेपही घ्यावी लागली."

त्यांना विचारण्यात आलं,"कधी अडथळ्यांचे किंवा आता पुढचा मार्ग बंद होईल असेही प्रसंग आले का?"

त्यावर साल्क यांनी म्हटलं, "माझ्यासाठी बंद मार्ग हे नेहमीच संधी होते. मी नेहमी अनपेक्षित गोष्टींना संकेत मानलं आणि लगेच पर्यायी मार्ग कोणते असू शकतात हे शोधण्याचा प्रयत्न केला."

त्यांच्या मते, "माझ्या दृष्टीने मोठं यश खूप लवकर मिळालं."

पूर्वीच्या अनेक दशकांच्या संशोधनामुळे त्याचा पाया आधीच तयार झाला होता. 1948 मध्ये साल्क यांनी काम सुरू केलं तेव्हा विषाणू पहिल्यांदाच टिश्यू कल्चरमध्ये वाढवण्यात यश आलं होतं, आवश्यक साधनं उपलब्ध होती आणि पोलिओ विषाणूचे तीन प्रमुख प्रकार ओळखले गेले होते.

त्यांनी म्हटलं, "1951 ते 1952 दरम्यान आम्ही मुलांना लस देण्यासाठी तयार होतो. 1953 मधे निष्कर्ष स्पष्ट झाले. त्यानंतर 1954 साली एक मोठी चाचणी झाली आणि मग 1955 साली ही लस सर्वसामान्यांना वापरासाठी उपलब्ध झाली."

साल्क यांनी स्वतःवर आणि आपल्या कुटुंबावर लसीची चाचणी घेतल्याच्या बातम्या खऱ्या होत्या का, हा प्रश्न विचारला.

त्यांनी म्हटलं की, "नक्कीच. जर तुम्हाला पुरेसा विश्वास आणि आत्मविश्वास असेल, तर ते अगदी नेहमीचं असतं."

1952 पर्यंत त्यांना लस सुरक्षित असल्याची इतकी खात्री पटली होती की, त्यांनी आपल्या पत्नीला, तिन्ही मुलांना आणि प्रयोगशाळेत काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ही लस दिली.

त्यांचा मुलगा पीटर यांनी 2020 मध्ये बीबीसीला सांगितलं, "एक दिवस वडील ऑफिसमधून सीरिंज आणि सुया घेऊन घरी आले. त्यांनी त्या आमच्या स्वयंपाकघरातील एका भांड्यात स्टोव्हवर उकळून निर्जंतुक केल्या. त्यात त्यांनी प्रयोगात्मक पोलिओ लस भरली आणि मग आम्हा मुलांना रांगेत उभं करून इंजेक्शन दिलं."

पण लस खरोखर प्रभावी ठरली का हे निश्चित करण्यासाठी अधिक मोठ्या चाचणीची गरज होती.

एप्रिल 1954 मध्ये मानव इतिहासातील सर्वात मोठा वैद्यकीय प्रयोग सुरू झाला. अमेरिकेतील 50 हजार हून अधिक शिक्षकांच्या सहकार्याने जवळपास 20 लाख मुलांना लस देण्यात आली. लाखो लोक ज्या बातमीची आतुरतेने वाट पाहत होते, त्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी निष्कर्षांची पडताळणी आवश्यक होती. त्यासाठी एक वर्ष लागलं.

12 एप्रिल 1955 ला लशीच्या यशाबद्दल जाहीर करण्यात आलं. योगायोग म्हणजे त्या दिवशी राष्ट्राध्यक्ष रुझवेल्ट यांच्या निधनाला नेमकी दहा वर्षं पूर्ण झाली होती. देशभरातील चर्चच्या घंटा वाजल्या, कारखान्यांचे सायरन वाजले आणि लोक सुटकेच्या भावनेने रस्त्यावर रडू लागले.

साल्क यांच्या लसीनंतर अमेरिकेतील पोलिओ रुग्णसंख्या एका वर्षात 60 हजार वरून दोन हजारवर आली. पुढील दशकात अमेरिकेत पोलिओ जवळपास पूर्णपणे नष्ट झाला.

लशीमुळे एका गाण्याला मिळाली होती प्रेरणा

लसीच्या यशानंतर साल्क एका रात्रीत जागतिक स्तरावर प्रसिद्ध झाले. लोकांची उत्साही प्रतिक्रिया त्यांनी त्यांच्या स्वतःच्या क्षमतेचं मोजमाप म्हणून न पाहता 'भीतीपासून मुक्त झाल्याची भावना' म्हणून पाहिली.

त्यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं, "लोकांची प्रतिक्रिया वैज्ञानिक योगदानाच्या तुलनेत खूपच मोठी वाटत होती. ती त्यावेळी अनपेक्षित वाटली होती, मात्र आता मागे वळून पाहिल्यानंतर ती तशीच असणार हे जाणवलं."

आपल्या कामापासून लक्ष विचलित होऊ नये म्हणून त्यांनी या प्रचंड स्तुतीने हुरळून न जाण्याचा ठरवलं.

यानंतर त्यांनी कॅलिफोर्नियातल्या समुद्रकिनाऱ्यावरील एका ठिकाणी 'साल्क इन्स्टिट्यूट ही स्वतंत्र, ना-नफा तत्त्वावर चालणारी प्रयोगशाळा स्थापन केली. जगातील सर्वोत्तम वैज्ञानिकांना इथे काम करता यावं या हेतूनेही संस्था उभारण्यात आली होती.

त्यांनी म्हटलं, "माझ्या मते ती पुढची मोठी निर्मिती होती. ते सर्जनशीलतेचं मंदिर होतं...असं ठिकाण जिथे तुम्हाला एक आध्यात्मिक उंची गाठता येईल.

मात्र, अल्बर्ट सॅबिन यांच्या लसीचं काय झालं?

ही लस इंजेक्शनऐवजी तोंडावाटे दिली जात होती, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहिमांसाठी ती अधिक उपयुक्त ठरली. इतकंच नव्हे तर हॉलीवूडमधील एका प्रसिद्ध गाण्यालाही तिने प्रेरणा दिली.

60 च्या दशकाच्या सुरुवातीला जेफ्री शर्मन यांचे वडील रॉबर्ट आणि काका रिचर्ड हे डिस्नेच्या 'मेरी पॉपिन्स' चित्रपटासाठी संगीत तयार करत होते, पण त्यांना नवीन कल्पना सुचत नव्हत्या.

एका दुपारी जेफ्रीने वडिलांना सांगितलं की, त्यादिवशी शाळेत त्याला तोंडावाटे पोलिओ लस देण्यात आली.

"दुखलं का?" रॉबर्ट शर्मन यांनी विचारलं.

जेफ्री शर्मन यांनी फेसबुकवर लिहिलं, "मी त्यांना सांगितलं की, ती शुगर क्यूबवर ठेवली होती आणि फक्त गिळायची होती."

"ते माझ्याकडे काही क्षण पाहत राहिले. मग फोनकडे जात माझे काका डिक यांना फोन केला. ते दोघे ऑफिसमध्ये परत गेले आणि त्यांनी A Spoonful of Sugar (Helps the Medicine Go Down) हे गाणं लिहिलं."

सॅबिन यांनीही नंतर पोलिओ लस शोधली. पण साल्क आणि सॅबिन या दोघांनीही आपल्या शोधाचं पेटंट घेऊन आर्थिक फायदा मिळवण्याचा प्रयत्न केला नाही.

सॅबिन यांनी म्हटलं, "अनेकांनी मला लशीचं पेटंट घ्यायला सांगितलं, पण मला ते करायचं नव्हतं. ही जगातील सर्व मुलांसाठी माझ्याकडून दिलेली भेट आहे."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)