You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची शक्यता, महाराष्ट्रावर काय परिणाम होईल?
महाराष्ट्रातल्या हवामानात गेल्या दोन दिवसांत तुम्हाला थोडा फरक पडलेला जाणवला असेल. उष्णता कमी झालेली नाहीये, पण आणि दुसरीकडे वादळी वारे आणि तुरळक ठिकाणी पाऊस पडताना दिसतो आहे. पुढच्या एक दोन दिवसांतही हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.
तसंच, भारताच्या दक्षिण भागांत ढग जमा होत असून एक कमी दाबाची प्रणाली तयार होते आहे. या प्रणालीचं चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागानं त्याविषयी काय म्हटलं आहे, राज्यावर याचा काय परिणाम होईल आणि कुठल्या जिल्ह्यांसाठी काय अलर्ट दिला आहे, जाणून घेऊयात.
10 मे रोजी उपग्रहानं टिपलेल्या दृश्यात भारताच्या आसपास, विशेषतः बंगालच्या उपसागराकडे बरेच ढग जमा होताना दिसत आहेत. पुढच्या 48 तासांत या परिसरात कमी दाबाचं क्षेत्र तयार होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे.
या कमी दाबाच्या प्रणालीचं चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता काही वेदर मॉडेल्सनी वर्तवली होती. पण हवामान विभागाच्या ताज्या माहितीनुसार या प्रणालीतून चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता मध्यम ते कमी एवढीच आहे.
मात्र ही प्रणाली काही काळ सक्रिय राहण्याची शक्यता आहे. त्यातून भारताच्या पूर्वच नाही तर पश्चिम किनाऱ्यावर कोकणातही 14 मे नंतर पाऊस पडण्याची शक्यता आहे, असं बीएफएस मॉडेलवरून दिसून येतं.
दरवर्षी मान्सूनपूर्वीच्या या काळात हिंदी महासागराच्या उत्तर भागात अशा कमी दाबाच्या प्रणाली आणि चक्रीवादळं तयार होतात, त्यातून मान्सूनलाही गती मिळते. त्यामुळेच या वादळांवर लक्ष ठेवणं गरजेचं असतं.
मान्सूनवर प्रभाव टाकणारी, या वाऱ्यांना चालना देणारी आणखी एक गोष्ट म्हणजे भारताच्या मुख्य भूमीचं तापमान, जे या काळात आणखी वाढत जातं.
सध्याची स्थिती पाहिली तर महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तापमान 38 ते 42 अंशा सेल्सियसच्या आसपास राहील. मात्र 13 ते 18 मे दरम्यान विशेषतः विदर्भात पारा आणखी वर चढण्याची आणि तापमान 45 ते 47 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
'सुपर एल निनो'ची शक्यता
यंदाचा उन्हाळा करपवणारा आहे आणि यानंतर सुपर एल्-निनो येण्याची शक्यता वर्तवली जातेय.
पॅसिफिक महासागरात दक्षिण अमेरिकेच्या आसपास पाण्याचे तापमान जेव्हा नेहमीपेक्षा वाढते आणि ते गरम पाणी या भागात जमा होते, तेव्हा त्या स्थितीला 'एल-निनो' असं संबोधलं जातं. ला निना ही त्याउलट स्थिती आहे.
या एल निनो आणि ला निना प्रवाहांचा जगभरातल्या हवामानावर आणि भारतातल्या मान्सूनवरही परिणाम होताना दिसतो.
एल निनोमुळे जगाचं तापमान वाढतं, काही भागांमध्ये Tropical Storms - उष्णकटिबंधामध्ये चक्रीवादळं येण्याचं प्रमाण वाढतं तर दुसरीकडे वातावरण कोरडं होतं.
या नेहमीच्या एल् निनोपेक्षाही सध्याची परिस्थिती अधिक प्रखर आहे. म्हणून याला काही अभ्यासकांनी म्हटलंय - Super El Niño किंवा Godzilla El Niño.
मे ते जुलै या काळामध्ये एल निनोची परिस्थिती निर्माण होण्याची 61% शक्यता असल्याचा आणि ही स्थिती 2026 च्या अंतापर्यंत राहील असा अंदाज अमेरिकेच्या हवामान विभागाने 9 एप्रिलला मांडला. शिवाय ही स्थिती Very Storng - अतिशय प्रखऱ असण्याची 25% शक्यता असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
या स्थितीचा परिणाम मान्सूनवर होण्याची शक्यता आहे. 2002 आणि 2009 ही देखील एल् निनो वर्षं होती आणि तेव्हा पावसावर विपरीत परिणाम झालेला होता. म्हणूनच आता संशोधक पॅसिफक महासागरातल्या परिस्थितीवर बारीक नजर ठेवून आहेत.
यंदा महाराष्ट्रात किती पाऊस पडेल?
यावर्षी महाराष्ट्रासह भारतात बहुतांश ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामानतज्ज्ञांनी वर्तवला आहे.
भारतीय हवामान विभागानं 13 एप्रिल रोजी 2026 रोजी यंदाच्या वर्षासाठीचा मान्सूनविषयीचा पहिला दीर्घकालीन अंदाज जारी केला आहे.
त्यानुसार जून ते सप्टेंबर या नैऋत्य मान्सूनच्या कालावधीत देशात दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत 92 टक्के (± 5%) पाऊस पडण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात जून 2026 ते सप्टेंबर 2026 या कालावधीत बहुतांश ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता जास्त आहे.
मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी यापेक्षाही कमी पाऊस पडू शकतो.
तर काही ठिकाणी सरासरीएवढा आणि गडचिरोलीसारख्या ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो, असंही हवामानविभागानं तयार जाहीर केलेल्या नकाशातून दिसून येतं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)