प्रशांत किशोर यांच्या पत्नीकडे 101 कोटींची संपत्ती, स्वत: त्यांच्याकडे किती?

प्रशांत किशोर

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, सीटू तिवारी
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

बिहारमधील बांकीपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत जन सुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी विजय मिळवला आहे. एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या जागेवर प्रशांत किशोर यांनी 64 हजार 151 मते मिळवली.

त्यांनी भाजपचे नीरज कुमार यांचा 19 हजार 324 मतांनी पराभव केला. भाजप उमेदवाराला 44 हजार 827 मते मिळाली.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितिन नवीन राज्यसभेसाठी निवडून गेल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती.

बांकीपूर पोटनिवडणुकीतील विजयानंतर प्रशांत किशोर यांची संपत्ती आणि गुंतवणूक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, प्रशांत किशोर यांनी आपली एकूण संपत्ती 96.06 कोटी रुपये असल्याचे घोषित केले आहे. तर त्यांची पत्नी डॉ. जाह्नवी दास यांच्याकडे 101.93 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

भारतीय निवडणूक राजकारणात निवडणूक रणनीतीकार म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणारे प्रशांत किशोर यांनी 2 ऑक्टोबर 2024 रोजी जन सुराजला राजकीय पक्ष म्हणून लाँच केले होते.

सप्टेंबर 2025 मध्ये प्रशांत किशोर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते, "गेल्या 3 वर्षांत मी आणि माझ्याशी संबंधित संस्थांनी सल्लागार सेवांच्या माध्यमातून 241 कोटी रुपये घेतले आहेत. त्यापैकी 30.95 कोटी रुपये जीएसटी आणि 20 कोटी रुपये आयकर म्हणून भरले गेले आहेत. मी जन सुराजला 98.75 कोटी रुपयांची देणगी दिली आहे."

आता प्रथमच निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या प्रशांत किशोर यांचे प्रतिज्ञापत्र सर्वसामान्यांच्या उत्सुकतेचा विषय ठरले आहे. या प्रतिज्ञापत्रानुसार, प्रशांत किशोर यांची पत्नी जाह्नवी दास या त्यांच्यापेक्षा अधिक श्रीमंत आहेत.

जाह्नवी दास कोण आहेत?

49 वर्षीय प्रशांत किशोर यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांची पत्नी जाह्नवी दास यांच्याकडे त्यांच्यापेक्षा अधिक स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे. 2024 मध्ये आपला जन सुराज पक्ष सुरू करण्यापूर्वी पाटण्यातील बापू सभागृहात आयोजित महिला संवाद कार्यक्रमात प्रशांत किशोर यांची पत्नी जाह्नवी दास प्रथमच सार्वजनिकरीत्या दिसल्या होत्या.

त्यांचा परिचय करून देताना प्रशांत किशोर यांनी सांगितले होते की, त्या व्यवसायाने डॉक्टर आहेत. त्यांनी म्हटले होते, "त्या आसामच्या रहिवासी आहेत आणि हिंदी बोलू शकत नाहीत."

प्रतिज्ञापत्रानुसार, जाह्नवी दास या नवी दिल्लीतील अपोलो इंद्रप्रस्थ रुग्णालयात सीनियर अॅडव्हायझर, स्पेशल प्रोजेक्ट्स आहेत.

प्रशांत किशोर यांची पत्नी जाह्नवी दास
फोटो कॅप्शन, प्रशांत किशोर यांची पत्नी जाह्नवी दास

मुळचे रोहतास जिल्ह्यातील कोनार गावचे रहिवासी असलेल्या प्रशांत किशोर यांची जंगम मालमत्ता 22.19 कोटी रुपये आहे, तर जाह्नवी दास यांची जंगम मालमत्ता 89.51 कोटी रुपये आहे.

जंगम मालमत्तेमध्ये प्रशांत किशोर यांच्याकडे 65 हजार 570 रुपये रोख आहेत, तर जाह्नवी यांच्याकडे 1 लाख 95 हजार रुपये रोख आहेत. मुदत ठेवींबाबत बोलायचे झाल्यास प्रशांत किशोर यांच्याकडे 7.36 कोटी रुपये आणि जाह्नवी यांच्याकडे 67 लाख रुपयांच्या मुदत ठेवी आहेत.

स्थावर मालमत्तेच्या बाबतीत प्रशांत किशोर यांच्याकडे 73.87 कोटी रुपयांची मालमत्ता आहे, तर जाह्नवी दास यांच्याकडे 12.42 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. म्हणजेच प्रशांत किशोर हे सुमारे 96 कोटी रुपयांचे आणि जाह्नवी या सुमारे 102 कोटी रुपयांच्या संपत्तीच्या मालक आहेत.

पती-पत्नींकडे किती सोने आहे?

प्रशांत किशोर यांच्याकडे 0.6 ग्रॅमची एमरलँड गोल्ड रिंग आहे. तर जाह्नवी यांच्याकडे 475 ग्रॅम सोने आणि 200 ग्रॅम चांदी आहे.

गोल्ड रिंगची बाजारातील किंमत 1.35 लाख रुपये आहे, तर जाह्नवी यांच्याकडे असलेल्या सोने-चांदीची किंमत 64.58 लाख रुपये आहे.

प्रशांत किशोर

फोटो स्रोत, Jan Suraaj

फोटो कॅप्शन, प्रशांत किशोर यांची जंगम मालमत्ता 22.19 कोटी रुपये आहे

स्थावर मालमत्तेमध्ये पती-पत्नी दोघांकडेही शेतीयोग्य जमीन नाही.

मात्र प्रशांत किशोर यांच्याकडे 3 एकर आणि सुमारे 8 गुंठे जमीन आहे. त्यावर पूर्वी तांदूळ गिरणी चालत होती, मात्र आता बंद पडली आहे. याशिवाय प्रशांत किशोर यांच्याकडे पाटणा, दिल्ली आणि गाझियाबाद येथे जमीन आणि अपार्टमेंट आहेत.

तसेच बक्सर, रोहतास आणि गाझियाबाद येथेही त्यांच्या आई इंदिरा पांडेय आणि आजोबा रघुवीर पांडेय यांच्या नावावर असलेली वडिलोपार्जित संपत्ती आहे.

जाह्नवी दास यांच्याकडेही आसाममधील दिसपूर आणि गुवाहाटी येथे अपार्टमेंट आहेत. त्यांचे नोएडा येथेही एक अपार्टमेंट आहे, मात्र त्याचा ताबा त्यांना अद्याप मिळालेला नाही.

प्रशांत किशोर यांच्यावर 5.77 कोटी रुपयांचे कर्ज

2024-25 या वर्षात जन सुराजला सेक्शन 80 जीजीसी अंतर्गत 10 कोटी रुपयांची देणगी दिल्यानंतर प्रशांत किशोर यांचे उत्पन्न 58.45 लाख रुपये होते.

आयकर कायदा 1961 च्या सेक्शन 80 जीजीसी अंतर्गत, एखादी व्यक्ती किंवा करदाता नोंदणीकृत राजकीय पक्षाला देणगी देत असल्यास तो आपल्या एकूण करपात्र उत्पन्नावर 100 टक्के वजावटीचा दावा करू शकतो.

2024-25 या वर्षात प्रशांत किशोर यांच्या वेदास व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने जन सुराजला 85 कोटी रुपये आणि जन सुराज फाउंडेशनला 50 लाख रुपये देणगी दिली होती. तसेच 2023-24 मध्ये जॉय ऑफ गिव्हिंग ग्लोबल फाउंडेशनला 2.75 कोटी रुपये देणगी दिली होती.

प्रशांत किशोर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रशांत किशोर यांच्याकडे असलेल्या गोल्ड रिंगची बाजारातील किंमत 1.35 लाख रुपये आहे

प्रशांत किशोर यांच्यावर 5 कोटी 77 लाख रुपयांचे कर्ज आहे, तर जाह्नवी यांच्यावर 55 लाख रुपयांचे कर्ज आहे.

2020-21 ते 2024-25 या कालावधीत प्रशांत किशोर यांनी आयकर म्हणून 4.45 कोटी रुपये भरले आहेत, तर पत्नी जाह्नवी दास यांनी याच कालावधीत 32.02 लाख रुपये आयकर भरला आहे. तसेच जीएसटी म्हणून प्रशांत किशोर यांनी 2021-22 ते 2025-26 दरम्यान 5.58 कोटी रुपये भरले आहेत.

प्रशांत किशोर यांच्याविरुद्ध 8 फौजदारी गुन्ह्यांची नोंद आहे. हे गुन्हे पाटणा, सहरसा, बेतिया आणि मुजफ्फरपूर येथे दाखल आहेत. यापैकी कोणत्याही प्रकरणात आरोप निश्चित झालेले नाहीत.

प्रशांत किशोर यांनी बक्सर येथून दहावीचे शिक्षण घेतले आणि पाटणा सायन्स कॉलेजमधून 12वी पूर्ण केली. त्यांनी 1996-1999 या काळात लखनौ विद्यापीठातून बीबीए केले. त्यानंतर 2001-2003 या कालावधीत त्यांनी हैदराबाद येथील कॉलेज ऑफ इंडियामधून हेल्थकेअर मॅनेजमेंटमध्ये मास्टर्स पदवी घेतली.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)