भिवंडीत 4 मजली इमारत कोसळून 9 जणांचा मृत्यू, आतापर्यंत काय माहिती समोर आलीय?

भिवंडीत इमारत कोसळली
Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. यातच भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील बालाजी नगर-गंगारामवाडी येथील कोहिनूर अपार्टमेंट ही तळ अधिक 4 मजली अतिधोकादायक ठरवलेली इमारत गुरुवारी (30 जुलै) रात्री 11.30 वाजताच्या सुमारास कोसळली.

या घटनेत आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती भिवंडी महानगरपालिका आणि एनडीआरएफने दिली आहे.

या घटनेची माहिती मिळतात पालिका आपत्कालीन कक्ष, अग्निशामक दलाचे जवान , एनडीआरएफ आणि टीडीआरएफची टीम रात्री 11.45 वाजल्यापासून घटनास्थळी दाखल झाली असून शोध मोहीम सुरू आहे.

"ही इमारत धोकादायक घोषित करण्यात आली होती. नागरिकांना देखील बाहेर काढण्यात आले होते. मात्र काही लोक नजर चुकवून या इमारतीमध्ये पिलरचे काम करत होते. त्यातील काही मजूर आणि एका कुटुंबातील लोक या घटनेत अडकल्याचा अंदाज आहे. बचाव पथकांचे शोध कार्य सुरू आहे", अशी माहिती स्थानिक आमदार महेश चौगुले यांनी दिली.

भिवंडी इमारत अपघात

भिवंडी इमारत दुर्घटनेतील 7 व्यक्तींचे मृतदेह ढिगाऱ्याखालून काढण्यात आले आणि सकाळी 9:30 पर्यंत आय.जी.एम हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले आहेत.

घटनेतील मृतांची नावे पुढीलप्रमाणे

  • शमीम शेख, वय 32
  • रंजीत सिंग, वय 45
  • ओळख पटलेली नाही.
  • मिराज रसूल शेख, वय 34
  • संतोष कुमार पांडे, वय 42
  • शमीम अन्सारी, वय 30
  • ओळख पटलेली नाही.

8 आणि 9 वा मृतदेहदेखील ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आला असून त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.

राज्यात सर्वदूर मुसळधार

महाराष्ट्रातील नागरिकांसाठी पुढील 24 तास अत्यंत आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने आज 31 जुलैला राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

ओडिशावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या तीव्र क्षेत्रामुळे मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून ही प्रणाली पश्चिमेकडे विदर्भ आणि छत्तीसगडच्या दिशेने सरकत आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे.

पाऊस

फोटो स्रोत, Getty Images

हवामान विभागाने विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या 3 जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. 31 जुलैपर्यंत या भागांत अतिमुसळधार पाऊस, विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याशिवाय जळगाव जिल्ह्यासाठीही रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पावसाच्या पार्श्वभूमीवर पाणी साचणे, सखल भागांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण होणे, भूस्खलन होणे तसेच रस्ते आणि रेल्वे वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

अचानक पूर आणि भूस्खलनाचा धोका लक्षात घेता प्रशासनाने या भागांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

पुरात वाहून गेलेल्या युवकाचे पहाटे 4 वाजता रेस्क्यू

हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपूर-टाकळी मार्गावरील यशोदा नदीच्या पुलाजवळ पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या युवकाला एसडीआरएफ आणि डीडीआरएफच्या पथकाने शुक्रवारी (31 जुलै) पहाटे यशस्वीरित्या रेस्क्यू केले.

पुरात वाहून गेलेल्या युवकाचे पहाटे 4 वाजता रेस्क्यू
फोटो कॅप्शन, पुरात वाहून गेलेल्या युवकाचे पहाटे 4 वाजता रेस्क्यू

पडसगाव येथील अक्षय माटे असे या युवकाचे नाव आहे. गुरुवारी रात्री नाल्यावरील पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने तो पुरात वाहून गेला होता. मात्र, काही अंतरावर वाहून गेल्यानंतर त्याने एका झाडाची फांदी पकडून रात्रभर झाडावरच अडकून राहिला. अखेर पहाटे बचाव पथकाने घटनास्थळी पोहोचून त्याचे सुरक्षित रेस्क्यू केले.

अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस, 100 लोकांना सुरक्षितस्थळी हलवले

अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार माजवला आहे. मुसळधार पावसामुळे नदी नाल्याला पूर आला असून बेंबळा नदीकाठी घर असलेल्या सुमारे 100 लोकांना रात्री सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील दिघी कोल्हे गावातील परिस्थिती

फोटो स्रोत, Nitesh Raut

फोटो कॅप्शन, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील दिघी कोल्हे गावातील परिस्थिती

नांदगाव खंडेश्वरमधील धामक, धानोरा गुरव, मंगरूळ चव्हाळा, खेड पिंपरी, परसमंडळ, दिघी कोल्हे या गावासह अनेक गावात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सातारगाव परिसरात मेंढी नाल्याच्या पुरात एक दुचाकीस्वार वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

नांदेड जिल्ह्यात जोरदार पाऊस, ग्रामपंचायत सेवक पुराच्या पाण्यात गेला वाहून

नांदेड जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असून नदी नाल्यांना पूर आला आहे. कंचली गावातील 32 वर्षीय ग्रामपंचायत सेवक राजू रेड्डी दांडेलु हे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे. तब्बल 12 तास उलटूनही त्यांचा शोध लागलेला नसून पोलीस, महसूल प्रशासन आणि ग्रामस्थांकडून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू आहे.

पावसामुळे नदी नाल्यांना पूरस्थिती असून किनवट येथील 32 वर्षीय ग्रामपंचायत सेवक पुराच्या पाण्यात गेला वाहून गेल्याची माहिती आहे

फोटो स्रोत, Mustan Mirza

फोटो कॅप्शन, पावसामुळे नदी नाल्यांना पूरस्थिती असून किनवट येथील 32 वर्षीय ग्रामपंचायत सेवक पुराच्या पाण्यात गेला वाहून गेल्याची माहिती आहे

राजू रेड्डी दांडेलु हे कंचली येथून रेवा नाईक तांड्याकडे जाताना कंचली–आंदबोरी मार्गावरील पुलावरून वाहणाऱ्या पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने ते प्रवाहात वाहून गेले. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी शोधकार्य सुरू केले. त्यानंतर पोलीस व महसूल प्रशासनही घटनास्थळी दाखल झाले. मात्र, पाण्याचा प्रचंड वेग आणि सततचा पाऊस यामुळे शोधकार्यात मोठे अडचण येत आहेत. दरम्यान, पांगरपहाड, आंदबोरी, रेवा नाईक तांडा आणि अप्पारावपेठ या गावांचा संपर्कही तुटला असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)