You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'ऑपरेशन सिंदूर' : राजनाथ सिंह यांनी 'संसदेची दिशाभूल केल्याचा' आरोप, संरक्षण मंत्रालयानं दिलं उत्तर
'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान मृत्यू झालेल्या 6 जवानांची नावे 'नॅशनल वॉर मेमोरियल'वर कोरल्यानंतर काँग्रेसने संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यावर माहिती लपवल्याचा आरोप केला आहे.
विरोधी पक्षांच्या आरोपांनंतर संरक्षण मंत्रालयाने एक निवेदन जारी करून म्हटले, "28 जुलै 2025 रोजी संसदेत संरक्षण मंत्र्यांनी दिलेल्या भाषणाचा विपर्यास करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे."
28 जुलै 2025 रोजी संसदेच्या अधिवेशनादरम्यान लोकसभेत 'ऑपरेशन सिंदूर'वरील चर्चेच्या वेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी विरोधी पक्षाला सांगितले होते, "तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील, तर विचारा की, या ऑपरेशनमध्ये आपल्या शूर जवानांना काही इजा झाली का, त्याचे उत्तर (ठामपणे) नाही असे आहे."
काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी इन्स्टाग्रामवरील एका पोस्टमध्ये, 'ऑपरेशन सिंदूर' संदर्भात राजनाथ सिंह यांनी संसदेत केलेल्या भाषणाची एक व्हीडिओ क्लिप शेअर केली आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात भारताने केलेल्या प्रत्युत्तरात्मक कारवाईबाबत संसदेची 'दिशाभूल' करण्यात आली, असंही त्यांनी म्हटलं.
22 एप्रिल 2025 रोजी पहलगाममध्ये झालेल्या कट्टरतावाद्यांच्या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मे 2025 मध्ये पाकिस्तानविरोधात 4 दिवसांपर्यंत लष्करी कारवाई करण्यात आली.
भारत सरकारने या लष्करी कारवाईला 'ऑपरेशन सिंदूर' असे नाव दिले होते. या कारवाईदरम्यान मृत्यू झालेल्या 6 भारतीय जवानांची नावे भारत सरकारने आता अधिकृतपणे जाहीर केली आहेत.
दरम्यान, पाकिस्तान लष्कराने गेल्या वर्षी एक निवेदन जारी करून म्हटले होते की, लष्करी संघर्षात त्यांच्या किमान 11 सैनिकांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 7 सैनिक लष्कराचे आणि 4 हवाई दलाचे होते.
भारताच्या 6 सैनिकांची नावे दिल्लीतील 'नॅशनल वॉर मेमोरियल'च्या भिंतीवर नोंदवण्यात आली आहेत.
या 6 सैनिकांपैकी 5 जण लष्कराचे, तर 1 भारतीय हवाई दलाचा जवान आहे.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, त्या तरुणांपैकी एक मूड मुरली नाईक अग्निवीर होता.
देशाच्या सेवेसाठी आपले प्राण गमावलेल्या सैनिकांना समर्पित असलेल्या ठिकाणी स्मारक भिंतीवर या सैनिकांची नावे 3D मध्ये कोरण्यात आली आहेत.
संरक्षण मंत्रालयाने काय म्हटले?
संरक्षण मंत्रालयाने एक निवेदन जारी करून म्हटले, "काही सोशल मीडिया पोस्ट्सद्वारे 28 जुलै 2025 रोजी संरक्षण मंत्र्यांनी संसदेत दिलेल्या भाषणाचा विपर्यास करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या पोस्ट्समध्ये भाषणाचा एक छोटासा भाग निवडून 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान एकही भारतीय सैनिकांचा मृत्यू झाला नाही, असे संरक्षण मंत्र्यांनी म्हटल्याचा खोटा दावा करण्यात आला आहे. हा दावा हेतुपुरस्सर दिशाभूल करणारा आणि पूर्णपणे वस्तुस्थितीच्या विरुद्ध आहे."
"हे लक्षात ठेवले पाहिजे की, संरक्षण मंत्री संसदेत भाषण देत असताना 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान भारतीय हवाई दलाच्या पायलटचा मृत्यू झाल्याचा खोटा प्रचार प्रसारमाध्यमे आणि समाजमाध्यमांच्या काही वर्गांमध्ये सातत्याने केला जात होता. हा दावा पूर्णपणे खोटा होता, परंतु ऑपरेशनचे यश कमी लेखण्याच्या आणि जनतेचे मनोधैर्य खच्ची करण्याच्या उद्देशाने तो सातत्याने पसरवला जात होता."
"संरक्षण मंत्र्यांचे हे वक्तव्य याच विशिष्ट आणि दिशाभूल करणाऱ्या प्रचाराला प्रत्युत्तर म्हणून केले गेले होते. त्यामुळे त्यांचे वक्तव्य त्याच संदर्भात समजून घेतले पाहिजे. तसेच संरक्षण मंत्र्यांचे संपूर्ण भाषण त्याच्या योग्य संदर्भात पाहणेही महत्त्वाचे आहे," असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं.
संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनात पुढे म्हटले, "हे भाषण भारतीय सशस्त्र दलांच्या शौर्याला आणि क्षमतेला दिलेली आदरांजली तसेच भारताला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना दिलेला एक स्पष्ट संदेश होता."
संरक्षण मंत्री आणि भारत सरकार, भारतीय सशस्त्र दलाच्या प्रत्येक सदस्याप्रती, विशेषतः राष्ट्राचे रक्षण करताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या त्या शूर सैनिकांप्रती आदर, कृतज्ञता आणि सन्मान व्यक्त करण्यास पूर्णपणे वचनबद्ध आहेत. त्यांचे बलिदान ही मातृभूमीची सर्वोच्च सेवा आहे आणि ते नेहमीच पूर्ण आदर, अभिमान आणि सन्मानाने स्मरणात राहतील.
या सर्वोच्च बलिदानाच्या सन्मानार्थ या शूर सैनिकांची नावे 'नॅशनल वॉर मेमोरियल'च्या भिंतींवर कोरली जातील याची खात्री सरकारने केली आहे. तसेच, त्यांच्या कुटुंबियांना आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांना शिक्षण, आरोग्य आणि इतर सुविधांमध्ये सर्व आवश्यक सवलती व सहाय्य देण्यासाठी सरकारने आवश्यक ती पावले उचलली आहेत, असंही सरकारनं नमूद केलं.
6 सैनिकांची नावे
'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान मृत्यू मृत्यू झालेल्या या सैनिकांची नावे 'नॅशनल वॉर मेमोरियल'च्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या 'सन्मान सूची'मध्ये देखील प्रसिद्ध करण्यात आली आहेत.
1. सुभेदार मेजर पवन कुमार (सैन्य पदक), मुख्यालय 10 इन्फंट्री ब्रिगेड, मृत्यू - 10 मे 2025
2. रायफलमन सुनील कुमार (वीर चक्र), 4 जम्मू आणि काश्मीर लाईट इन्फंट्री, मृत्यू - 10 मे 2025
3. लान्स नाईक दिनेश कुमार (शौर्य पदक), 5 फील्ड रेजिमेंट, मृत्यू - 7 मे 2025
4. ए. व्ही. मूड मुरलीनायक (सैन्य पदक - शौर्य), एव्हिएशन टेक्निशियन, 851 लाइट रेजिमेंट, मृत्यू - 9 मे 2025
5. हवालदार सुनील कुमार सिंग (शौर्य पदक), 237 फील्ड वर्कशॉप कंपनी, मृत्यू - 6 जून 2025
6. सार्जंट सुरेंद्र कुमार (वायुसेना पदक), 39 विंग, मृत्यू - 10 मे 2025
विरोधी पक्षाने संरक्षण मंत्र्यांवर काय प्रश्न उपस्थित केले?
प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मृत्यू झालेल्या जवानांची नावे एका वर्षानंतर सार्वजनिक केल्याबद्दल केंद्र सरकार आणि संरक्षण मंत्र्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले, "फक्त दोनच शक्यता आहेत. एकतर संरक्षण मंत्र्यांना त्यांच्याच मंत्रालयाशी संबंधित तथ्यांची माहिती नव्हती. त्यामुळे त्यांच्या क्षमतेवर 'गंभीर प्रश्न' निर्माण होतात किंवा त्यांना सत्य माहीत असूनही त्यांनी 'संसदेची दिशाभूल करण्याचा' निर्णय घेतला."
"ज्या सरकारने स्वतःला तिरंग्यात गुंडाळले आहे आणि जे राष्ट्रवादाबद्दल बोलून कधीही थकत नाही, त्या सरकारने या वीरांना त्यांच्या योग्यतेचा आदर आणि स्मरण दिले नाही," असं पवन खेरा यांनी म्हटलं.
पवन खेरा पुढे म्हणाले, "या वीरांची नावे राष्ट्राच्या सामूहिक स्मृतीत कायमची कोरली जायला हवी होती. संपूर्ण देश त्यांच्या बलिदानाचे आदराने स्मरण करत आहे, असे त्यांच्या कुटुंबीयांना वाटायला हवे होते. पण याउलट, भाजपा सरकारने वर्षभर त्यांचे हौतात्म्य राष्ट्रापासून लपवून ठेवण्याचा निर्णय घेतला."
उत्तर प्रदेश काँग्रेसचे नेते दीपक सिंह पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले, "आपल्या सैनिकांनी प्राणांचे बलिदान दिले हे दुःखद आहे, पण त्याहूनही दुःखद गोष्ट ही आहे की, आपण एका लोकशाही देशात काम करतो आणि संसद हे सर्वोच्च स्थान आहे. संरक्षण मंत्री सभागृहात उभे राहिले आणि म्हणाले की, आपल्या एकाही सैनिकाचा मृत्यू झाला नाही."
"एकीकडे आपले सैनिक शौर्य दाखवतात, पराक्रमाने लढतात आणि आपल्या प्राणांचे बलिदान देतात, पण त्यांचे हौतात्म्य नाकारले जाते आणि संरक्षण मंत्री सभागृहात म्हणतात की, हौतात्म्य झालेलेच नाही. हे कुठेतरी बोचते. मला वाटते की सैनिकांनी नेहमीच आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे, पण त्यांचे हौतात्म्य कधीही नाकारले गेले नाही," असंही त्यांनी म्हटलं.
आम आदमी पार्टीने आपल्या एक्स हँडलवर पोस्ट करत म्हटले, "शहिदांच्या शवपेट्यांमध्ये घोटाळा करणारी भाजपा 'ऑपरेशन सिंदूर'मधील जवानांच्या हौतात्म्यावरून देशातील जनतेची दिशाभूल करत आहे. यानंतर देशातील जनतेला हेही कळून चुकले आहे की, भाजपा ना जवानांची आहे, ना प्रभू रामाची!"
आरजेडीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ. कांचन यादव यांनी संरक्षण मंत्र्यांनी संसदेत दिलेले वक्तव्य शेअर करत गंभीर आरोप केले.
त्याने एक्सवर पोस्ट करत म्हटल्या, "'ऑपरेशन सिंदूर'मध्ये या देशाचे 6 जवान शहीद झाले. पण भाजपाच्या मंत्र्यांनी आणि नेत्यांनी संसदेत टेबलांवर हात आपटून सांगितले की, कोणीही मारले गेले नाही. आता त्या 6 शहिदांची यादी जाहीर करण्यात आली आहे."
आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया पत्रकारांशी बोलताना म्हणाले, "ते देशाशी खोटे बोलतात. ते देशाच्या सुरक्षेबद्दल खोटे बोलतात. त्यांनी राष्ट्रीय हित गहाण ठेवले आहे. त्यांनी असे का केले हे मला माहीत नाही. जेव्हा आम्ही 'ऑपरेशन सिंदूर' पाहत होतो, तेव्हा भारतीय लष्कर पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर देत होते. मग अचानक, आपल्या देशातील कोणताही नेता याची घोषणा करण्यापूर्वीच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की त्यांनी भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध थांबवले आहे."
राजनाथ सिंह यांनी संसदेत काय म्हटलं होतं?
28 जुलै 2025 रोजी संसदेच्या अधिवेशनादरम्यान लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर झालेल्या चर्चेत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं होतं, "तुम्हाला प्रश्न विचारायचाच असेल, तर हा विचारा की या ऑपरेशनमध्ये आपल्या शूर जवानांचं काही नुकसान झालं का? त्याचं उत्तर आहे – नाही."
राजनाथ सिंह यांनी पुढे म्हटलं, "विरोधी पक्ष सतत विचारत होता की आपली किती विमाने पाडली गेली. मला वाटतं, हा प्रश्न राष्ट्रियत्वाच्या भावनेचं योग्यप्रकारे प्रतिनिधित्व करत नाही. त्यांनी एकदाही विचारलं नाही की आपल्या सैन्याने शत्रूची किती विमाने पाडली."
ते पुढे म्हणाले, "प्रश्न विचारायचाच असेल तर हा विचारा की भारताने दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले का? त्याचं उत्तर आहे – होय. ऑपरेशन सिंदूर यशस्वी ठरलं का? त्याचंही उत्तर आहे – होय."
यावर पवन खेरा यांनी वृत्तसंस्था पीटीआयशी बोलताना प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, "जुलै 2025 मधील आपल्या भाषणात राजनाथ सिंह यांनी जवानांचं कोणतंही नुकसान झालं नसल्याचं सांगितलं होतं. मग ते विधान खोटं होतं का?"
"एकतर तुम्हाला खरी माहिती नव्हती किंवा ती जाणीवपूर्वक लपवली गेली. या दोन्ही परिस्थितींमध्ये तुम्हाला आपल्या पदावर कायम राहण्याचा नैतिक अधिकार आहे का?" असा प्रश्न खेरा यांनी विचारला.
संरक्षण तज्ज्ञांनी काय म्हटलं?
संरक्षण विषयांचे अभ्यासक आणि सुशांत सिंह यांनी एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट करत म्हटले, "ऑपरेशन सिंदूरमध्ये शहीद झालेल्या भारतीय जवानांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. त्यामुळे गेल्या ऑगस्टमध्ये मोदी सरकार आणि केंद्र सरकारने जवानांच्या मृत्यूवर आणि त्यांच्या सर्वोच्च बलिदानाबाबत बाळगलेल्या मौनाचे धोकादायक परिणाम यावर मी लिहिलेला लेख पुन्हा शेअर करत आहे. तो आजही तितकाच महत्वाचा आणि समर्पक आहे."
21 ऑगस्ट 2025 रोजी टेलीग्राफमध्ये प्रकाशित झालेल्या लेखात सुशांत सिंह यांनी लिहिलं होतं, "यावर्षी स्वातंत्र्यदिनी नेहमीच्या तुलनेत विक्रमी संख्येने शौर्य पुरस्कार जाहीर करण्यात आले. मात्र, हे पुरस्कार ज्या शौर्यकृत्यांसाठी देण्यात आले, त्याची कोणतीही अधिकृत माहिती सार्वजनिक करण्यात आली नाही."
"पंतप्रधानांनी आपल्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात ऑपरेशन सिंदूरदरम्यान सर्वोच्च बलिदान देणाऱ्या जवानांचा साधा उल्लेखही केला नाही. मूळ मुद्द्याऐवजी केवळ देखाव्यावर लक्ष केंद्रित करणं धोकादायक आहे," असंही त्यांनी म्हटलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)