You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
घारापुरीच्या उत्खननात सापडलेल्या ताम्रपटांमुळे उलगडलं 'हे' रहस्य
मुंबईच्या किनाऱ्यापासून 10 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या घारापुरी अथवा एलिफंटा बेटावर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) आणि डेक्कन कॉलेज यांनी जे नोव्हेंबर 2025 ते जून 2026 दरम्यान उत्खनन केलं, त्यातून नवनवीन पुरावे समोर येत आहेत.
त्यात आता प्रकाशात आलेला अजून एक पुरावा म्हणजे दोन ताम्रपट.
दोन विविध राजघराण्यांशी संबंध असलेले हे ताम्रपट म्हणजे वास्तविक दोन दानपत्रं आहेत आणि त्यांच्यावर असलेल्या उल्लेखांवरून घारापुरीच्या या द्वीपाशी कोणाकोणाचा काय आणि कसा संबंध होता याविषयी यापूर्वी न झालेले खुलासे होत आहेत.
या ताम्रपटांवर उल्लेख असलेल्या तारखांवरून हे तिसऱ्या शतकापासून ते पाचव्या शतकादरम्यान कोरण्यात आले आहेत.
त्यातला एक पश्चिम भारतात एकेकाळी पसरलेल्या त्रैकुटक राजघराण्याचा आहे, तर दुसरा गुजरातेत असलेल्या नवसारीच्या चालुक्यांच्या काळातला आहे.
एक ताम्रपट पूर्णपणे वाचण्यात पुरातत्वशास्त्रज्ञांना यश आलं आहे, मात्र दुसरा ताम्रपट, जो चालुक्यांशी संबंधित आहे, तो अद्याप वाचला जायचा आहे.
मात्र यामुळे घारापुरी, जे दुसऱ्या अथवा तिसऱ्या शतकापासून भरभराटीला आलेलं एक व्यापारी बंदर होतं आणि 7-8 शतकं कार्यरत होतं, हा जो पुरातत्व अभ्यासकांनी व्यक्त केलेला अंदाज होता, त्याला या ताम्रपटांमुळे बळ मिळालं आहे.
'दोन ताम्रपट एकत्र मिळणे ही दुर्मिळ घटना'
मुंबईच्या भवतालात आजपर्यंत ताम्रपट सापडण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी 150 वर्षांपूर्वी कान्हेरी इथे उत्खननात एक ताम्रपट मिळाला होता.
1864 मध्ये डॉ. भाऊ दाजी लाड यांनी डॉ. जेम्स बर्ड यांना कान्हेरी येथे सापडलेल्या ताम्रपटाचं वाचन केलं होतं.
त्यानंतर आता घारापुरीच्या उत्खननात हे नवे ताम्रपट सापडले आहेत.
या बेटाच्या मोराबंदर परिसरात विविध भागात जेव्हा शोध सुरू होता तेव्हा दोन मोठी मातीची भांडी मिळाली. त्यापैकी एक मातीनं भरलेलं भांड साफ करतांना त्यात हे दोन ताम्रपट मिळाल्याचं ASI च्या मुंबई विभागाचे अधिक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ डॉ अभिजीत आंबेकर सांगतात.
"या भांड्यामध्येच आम्हाला दोन ताम्रपट मिळाले. आतापर्यंत कोणत्याही उत्खननात एखादा ताम्रपट मिळणं हे पण मोठं समजलं जातं. पण इथं एकत्र दोन ताम्रपट मिळणं ही खूपच दुर्मिळ घटना आहे आणि तेही दोन वेगवेगळ्या राजघराण्यांचे. ही खूप मोठी गोष्ट आहे मुंबईकरता," डॉ आंबेकर हे ताम्रपट दाखवतांना सांगतात.
या उत्खननात आजवर अनेक महत्वाचे पुरावे सापडले. मातीची विविध आकारांची भांडी, टेराकोटा, दगडांचे वैविध्यपूर्ण रंगांचे मणी, उतारावर बांधल्या गेलेल्या प्रशस्त पायऱ्यांच्या विहिरींसारख्या इमारती आणि देशविदेशातील धातूंची नाणी इथं सापडली.
त्यामध्ये कार्दमक क्षत्रपांसारख्या भारतीय घराण्यांसोबतच इराणच्या ससेनियन राजघराण्याची परदेशी नाणीही सापडली आहेत. मात्र ताम्रपटांनी या इतिहासाला अधिक महत्त्व मिळवून दिलं.
त्रैकुटक राजघराण्याच्या 'इंद्रसेन' राजाचा ताम्रपट
या दोनपैकी एक ताम्रपट, ज्याचं वाचन पूर्ण झालं आहे, तो आहे पश्चिम भारतात एकेकाळी मोठ्या भूभागावर राज्य केलेल्या त्रैकुटक राजघराण्याचा.
त्रैकुटकांनी इ.स. चौथ्या ते सहाव्या शतकांदरम्यान पश्चिम भारतातील काही भागांवर राज्य केले. त्यांचा विस्तार अपरांत (उत्तर कोकण), महाराष्ट्र, खानदेश आणि कधीकधी दक्षिण गुजरातपर्यंत विस्तारलेला होता.
पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये सहयोगी प्राध्यापक असणाऱ्या आणि या उत्खनन मोहिमेत सहभागी असणाऱ्या डॉ. अभिजीत दांडेकरांनी या ताम्रपटाचे वाचन केले आहे.
हे दोन्ही ताम्रपट हे संस्कृत भाषेत आणि ब्राम्ही लिपीमध्ये लिहिले गेले आहेत. अनेक शतकं ते मातीत गाडलेल्या स्थितीत असल्यानं त्यांना साफ करून ते वाचण्याच्या स्थितीत आणण्यासाठी जवळपास 3 महिन्यांचा कालावधी लागल्याचं दांडेकर सांगतात.
"या त्रैकुटकांचे याअगोदरचे ताम्रपट जे सापडले होते ते गुजरातेतलं सुरत ते कोकणातलं रत्नागिरी इथपर्यंत सापडले होते. त्यांची नाणीही बरीच सापडली आहेत. त्यांच्या नाण्यांवरून एका इंद्रदत्त नाव्याच्या राजाचा उल्लेख मिळाला होता. मात्र या घारापुरीत पहिल्यांदाच या राजाचा ताम्रपटावर उल्लेख मिळाला आहे," अभिजीत दांडेकर सांगतात.
"हा ताम्रपट हा इंद्रसेन अथवा इंद्रदत्त या राजाचं दानपत्र आहे. ताम्रपटात असं लिहिलं आहे की, इंद्रसेन आपल्या वडिलांच्या पुण्याची वृद्धी व्हावी म्हणून हे दान देतो आहे. त्याच्या वडिलांचा उल्लेख हा 'महाराज नण्ण्मल्लदास' असा आहे. त्यावरुन आपल्याला म्हणता येतं की, त्रैकुटकांच्या राज्याची स्थापना त्यांनी केली कारण त्यांचा उल्लेख 'महाराज' असा होतो आणि त्यांचा मुलगा, म्हणजे दुसरा राजा, इंद्रसेन हे दान करतो आहे," दांडेकर पुढे सांगतात.
हा ताम्रपट जर दानपत्र आहे तर काय दान केलं आहे?
"त्यांच्या राज्यांचे जे वेगवेगळे विभाग होते त्यात 'विषय' हा एक विभाग आहे. त्यातल्या एका 'अंबष्ठविषय'मध्ये 'केतकीग्राम' म्हणून एक गाव आहे. या गावात इंद्रसेनानं एक शंकरनारायणाचं मंदिर आणि त्याचा मंडप बांधला होता. तिथल्या पूजेसाठी त्यानं जागेचं दान दिलं आहे. त्या जागेच्या विविध दिशांना असलेल्या खुणा त्यानं सांगितल्या आहेत. कुठे कोणती झाडं आहेत इत्यादी. त्यातला एक महत्वाचा उल्लेख म्हणजे या जागेच्या वायव्येला समुद्र आहे. आता या उल्लेखांवरून आम्हाला केतकीग्राम नेमकं कुठं आहे ते शोधायला मदत होईल," दांडेकर विस्तारानं वर्णन करतात.
त्रैकुटकांच्या ताम्रपटांमध्ये 'अनिरुद्धपुरा' नावाच्या ठिकाणाचा उल्लेख येतो. हे शहर या राजवंशाशी निकट संबंधित मानले जाते. एलिफंटातून इंद्रसेन यांचा ताम्रपट सापडणे हा शोध या बेटाचा त्रैकुटकांच्या राजकीय राजधानीशी संबंध असल्याचे मांडणाऱ्या तर्कांना अधिक बळ देऊ शकतो, असंही अभ्यासकांना वाटतं.
"या ताम्रपटातही 'विजयानिरुद्धपूर' असा उल्लेख येतो. हे अनिरुद्धपूर ही त्रैकुटकांची राजधानी असावी का, असा संशोधकांचा कयास आहे. मात्र हे अनिरुद्धपूर नक्की कुठे आहे हे अद्यापर्यंत निश्चित सांगता आलेलं नाही. तरीही काही संशोधकांना वाटतं की, आजचं घारापुरी हे अनिरुद्धपूर असावं. पण त्याला आधार देणारा दुसरा कोणता पुरावा मात्र मिळत नाही," अभिजित दांडेकर नोंदवतात.
"या ताम्रपटात अनिरुद्धपूरमधून हे दानपत्र दिलं गेलं आहे असा उल्लेख आहे आणि तो ताम्रपट घारापुरी बेटावर सापडलेला आहे. त्यामुळे घारापुरी हे अनिरुद्धपूर असल्याची शक्यता आता वाढली आहे," असं मत ASI चे डॉ अभिजीत आंबेकर मांडतात.
एक प्रश्न अजून उरतो तो म्हणजे या ताम्रपटांचा काळ कोणता? काही तारीख त्यावर लिहिली आहे का?
यावर आंबेकर म्हणतात, "त्रैकुटकांच्या ताम्रपटांचं वैशिष्ट म्हणजे सापडलेल्या प्रत्येक ताम्रपटावर त्यांनी तारीख कोरलेली आहे. तशी इथेही त्यांनी ती शेवटी लिहिलेली आहे. त्यात '176 संवत' असा उल्लेख आहे आणि कार्तिक महिन्याच्या कृष्णपक्षाच्या पंचमीला हे दान दिलेलं आहे असं म्हटलं आहे."
"आता हा 'संवत' कोणता याबद्दल अजून खुलासा नाही. तो कार्दमकांचा आहे की कलचुरींचा याबाबत मतमतांतरं आहेत. त्या दोन्हींनीही वर्षं, तारीख बदलते. त्यामुळे इसवीसनपूर्व तिसऱ्या ते 5 व्या शतकांदरम्यानचे ते आहेत, असं सध्या म्हणता येईल," दांडेकर सांगतात.
नवसारीच्या चालुक्यांचा ताम्रपट
या उत्खननात जो दुसरा ताम्रपट मिळाला आहे, ज्याचं संपूर्ण वाचन अद्याप व्हायचं आहे, तो दुसऱ्या राजघराण्याशी संबंधित आहे. तो चालुक्यांशी संबंधित असल्याचं त्यावर असलेल्या मुद्रेवरून स्पष्ट समजतं आहे, असं पुरातत्व अभ्यासक सांगत आहेत.
डॉ दांडेकर ही राजमुद्रा आम्हाला दाखवतात. "या गोलाकार मुद्रेवर लिहिलं आहे 'श्रीजयाश्रय'. वर चंद्रकोर आहे आणि खालच्या बाजूला एक कमळ आहे. हा सातव्या शतकातला 'जयाश्रय मंगलरस' नावाचा राजा होता आणि सध्या गुजरातेत असलेल्या नवसारीतून तो राज्य करत होता. मूळच्या बदामीच्या असलेल्या चालुक्यांच्या पुढे काही शाखा झाल्या. त्यातली एक शाखा ही नवसारीची आहे," दांडेकर सांगतात.
या ताम्रपटाचं वाचन झाल्यानंतर घारापुरी बेट, इथल्या लेण्या यांच्याविषयी काही अधिक नवी माहिती समोर येईल, अशी अभ्यासकांची अपेक्षा आहे.
"असं यापूर्वी म्हटलं गेलं की, पुलकेशी द्वितीय हे जे बदामीचे चालुक्य होते त्यांनी नाविक युद्धात 'श्रीपुरी'वर विजय मिळवला, हा जो समज आजवरचा आहे तो कदाचित आता बदलावा लागेल. कारण आता इथे नवसारीच्या चालुक्यांचा संबंध या ताम्रपटामुळे दिसतो आहे," असं अभिजीत आंबेकर म्हणतात.
"ऐहोळेच्या प्रसिद्ध शिलालेखात पुलकेशी दुसरा याच्या 'पुरी' नावाच्या किनारी दुर्गाच्या विजयाचा उल्लेख आहे. काहींनी त्या 'पुरी'चा संबंध ओडिशाच्या 'पुरी'शी जोडला, तर नंतरच्या काळात काहींनी ती 'घारापुरी' असल्याचं म्हटलं. त्यामुळे युद्धात घारापुरी जिंकली असं म्हटलं गेलं. पण आता या ताम्रपटामुळे ते चालुक्य हे नवसारीचे होते हे समोर येतं आहे. ही नवी माहिती आहे," ASI च्या संशोधिका सिद्धी भातसरा सांंगतात.
घारापुरीच्या या नव्या ताम्रपटांमुळे जशी नवी माहिती समोर आली आहे तसेच नवे कुतुहलजन्य प्रश्नही तयार झाले आहेत.
सहाजिक आहे की हा अभ्यास पुढचा बराच काळ सुरू राहणार आहे आणि त्यातून दर कालांतराने काही नव्या गोष्टी प्रकाशात येणार आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)