ठाकरेंच्या शिवसेनेनं दिल्लीत बोलावली सर्व खासदारांची बैठक; जाणून घ्या आतापर्यंतच्या घडामोडी

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, उद्धव ठाकरे
Published
वाचन वेळ: 6 मिनिटे

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा पक्षफुटीचा सामना करावा लागू शकतो, अशा बातम्यांनी जोर धरला आहे.

शिवसेनेच्या 9 पैकी 6 ते 7 खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय.

एकीकडे अशा बातम्यांना उधाण आलं असतानाच, शिवसेना (UBT) पक्षाचे दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना एक पत्र लिहिलंय आणि हे पत्र 'खासदार फुटी'च्या बातम्यांना बळ देणारं ठरलंय.

तसंच, राज्यसभा खासदार आणि शिवसेना (UBT) पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांची एक्स (पूर्वीचंं ट्विटर) या सोशल प्लॅटफॉर्मवरील पोस्टही संभाव्या 'खासदार फुटी'ला बळ देणारी ठरतेय.

(या सर्व राजकीय घडामोडी महाराष्ट्रात आणि दिल्लीत घडत आहेत याचे सर्व अपडेट आपण आज दिवसभर या बातमीतून जाणून घेणार आहोत. ही बातमी सातत्याने अपडेट होत राहील.)

14 जूनला म्हणजे रविवारी उद्धव ठाकरे यांनी त्यांचं निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'वर पक्षाच्या खासदारांची बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीला पाच खासदार प्रत्यक्षरित्या उपस्थित न राहता, त्यांनी ऑनलाईन हजेरी लावली होती. तेव्हापासूनच खरंतर 'खासदार फुटी'च्या चर्चांना सुरुवात झाली.

यात यवतमाळचे खासदार संजय देशमुख, परभणीचे खासदार संजय जाधव, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर प्रत्यक्ष हजर नव्हते.

तर दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत, दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार अनिल देसाई, उत्तर-पूर्व मुंबईचे खासदार संजय दीना पाटील आणि नाशिकचे खासदार राजाभाऊ वाझे बैठकीला उपस्थित होते.

ठाकरेंच्या शिवसेनेनं बोलावली सर्व खासदारांची बैठक

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार आणि लोकसभेतील मुख्य प्रतोद अनिल देसाई यांनी पत्रक काढत, पक्षाच्या सर्व खासदारांची बैठक बोलावली आहे. ही बैठक उद्या, म्हणजे 18 जून रोजी सकाळी 11 वाजता संसद भवनातील पक्ष कार्यालयात होणार आहे.

या पत्राद्वारे सर्व खासदारांना उपस्थित राहणं अनिवार्य करण्यात आलं आहे.

शिवसेना

अनिल देसाईंनी पत्रकात म्हटलंय, "पक्षाच्या सर्व लोकसभा सदस्यांना कळवण्यात आले आहे की विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी संसदीय दलाची बैठक गुरुवार, 18 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजता नवी दिल्ली येथील संसद भवनातील 128-अ, संविधान सदन येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला सर्व सदस्यांनी अनिवार्यपणे उपस्थित राहावे."

या आवाहनाबरोबरच पक्षाच्या कामकाजासाठी ही बैठक अत्यंत महत्त्वाची असल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे.

'पचास खोके'

काल (16 जून) दुपारनंतर अचानक शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार फुटणार असल्याच्या बातम्यांनी वेग धरला. त्यानंतर उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या, किती खासदार फुटणार, कोण फुटणार, याच्या बातम्या माध्यमांवर झळकू लागल्या.

त्यानंतर रात्री 11 वाजण्याच्या सुमारास खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली, ज्यामुळे या बातम्यांना काहीसं बळच मिळालं.

संजय राऊत म्हणाले, "अपना सपना मनी..मनी! महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी आज रात्री प्रत्येकी 15 कोटींचा अ‍ॅडव्हान्स देण्यात येत असल्याची माहिती धक्कादायक आणि घृणास्पद आहे!"

संजय राऊत यांनी सोशल मीडियावरील पोस्ट

फोटो स्रोत, X/Sanjay Raut

फोटो कॅप्शन, संजय राऊत यांनी सोशल मीडियावरील पोस्ट

संजय राऊत यांच्या सोशल मीडिया पोस्टला तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी उत्तर देत म्हटलं, "फक्त 15 कोटी? इतक्या स्वस्तात का जात आहेत? आमच्या पक्षातल्या (फुटिरांना) 4 कोटी रुपये मिळाले आणि पुढच्या 36 महिन्यांच्या टर्ममध्ये प्रत्येक महिन्याला 1 कोटी मिळणार आहेत. हनी प्लस मनी"

तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या 28 पैकी 20 खासदारांनी नुकतीच बंडखोरी केली आहे, या संदर्भातून मोईत्रा यांनी हे ट्वीट केले आहे.

महुआ मोईत्रा यांच्या या उत्तराला संजय राऊत यांनी आज (17 जून) सकाळी रिप्लाय दिला. त्यात ते म्हणतात, "अपना सपना मनी मनी! नाही नाही, महुआ जी, प्रत्येक खासदाराची किमान आधारभूत किंमत 50 कोटी रुपये (पचास खोके) ठरलीय. 15 कोटी फक्त अ‍ॅडव्हान्स आहेत. मोकळेपणाने सांगायचं तर, ही किंमत 50 हजारांच्या किंमतीची नाहीय. त्यांची किंमत वाढलीय, कारण शिवसेना आणि तृणमूल काँग्रेस ब्रँड लेबल आहेत."

अरविंद सावंतांचं लोकसभा अध्यक्षांना पत्र

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने लोकसभा अध्यक्षांकडे अधिकृत निवेदन दिले आहे. यात पक्षाने मागणी केली आहे की, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हाच संसदेतील एकमेव अधिकृत राजकीय पक्ष म्हणून कायम मान्यता मिळावी.

कोणत्याही वेगळ्या गटाला, फुटीर गटाला किंवा स्वतंत्र गट म्हणून ओळख, दर्जा, सुविधा किंवा विशेषाधिकार देऊ नयेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

अशा कोणत्याही मागणीवर निर्णय घेण्यापूर्वी उद्धव ठाकरे गटाला आपली बाजू मांडण्याची संधी द्यावी, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

पक्षाने संविधानातील दहाव्या अनुसूचीतील (Anti-Defection Law) तरतुदींचा वापर करण्याचा अधिकार राखून ठेवला असल्याचेही स्पष्ट केले आहे.

हे पत्र शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संसदीय पक्षाचे नेते आणि खासदार अरविंद सावंत यांनी पाठवले आहे.

उबाठा गटानं काय म्हटलंय या निवेदनात?

फोटो स्रोत, @AGSawant

तत्पुर्वी, काल (16 जून) सकाळी अरविंद सावंत यांनी "ऑपरेशन करायला टायगरला दात तर हवे. देशापुढील अनेक समस्यांबद्दल बोलणे सोडून गोदी मीडिया फक्त दात नसलेल्या तथाकथित वाघ म्हणवून घेणाऱ्यांबद्दल चर्चा करत आहे. लोकशाहीवर होणारा हल्ला हा अधिक गंभीर विषय आहे" अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना दिली होती.

सुषमा अंधारे काय म्हणाल्या?

उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ही बंडखोरी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गात अडथळा आणण्यासाठी घडवली जातेय असं म्हटलं आहे.

त्या म्हणाल्या, "देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीला जायची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीत पोहोचू नये म्हणून फडणवीसांच्याच पक्षातले दिल्लीतले नेते हे लांबसडक दिल्ली टू नऱ्हे स्पीडब्रेकर टाकण्याच्या तयारीत आहेत. त्यात फडणवीस तुम्ही कसे वाचाल?

"ठाकरेंच्या नेतृत्वाचा प्रश्न नाही. टीएमसी, आप फुटले आहेत. हे सगळ्या पक्षांच्या बाबतीत होतंय, कारण डीलिमिटेशनच्या विधेयकानंतर भाजपा सुडानं पेटली आहे. ते कुठल्याही थराला जायला तयार आहेत. तिथं देवेंद्रजी तुमच्या महत्त्वाकांक्षेचं काय ? आमचं सोडा. आम्ही सत्तेशिवाय राहायचं आधीच ठरवलं. आम्ही संघर्षाची वाट निवडून नव्या नाव चिन्हासह वीस खासदार निवडून आणले. जातीवंत शेतकऱ्यानं पेरत जायचं असतं. ज्यांच्याकडे ती कला नाही ते चोरत जातील. तुम्ही विचार करा आता तुमचं काय होणार आहे?"

शिवसेना उबाठा फुटणार? फुटीर खासदारांना 15 कोटी मिळण्याची चर्चा

फोटो स्रोत, Getty Images

शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के काय म्हणाले?

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के म्हणाले, "उबाठाचे खासदार उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज आहेत. फक्त खासदारच का, त्यांच्या आमदारांनाही, नगरसेवकांनाही राग आहे. प्रत्येक कार्यकर्ता नाराज आहे. सगळेच त्यांना सोडून जात आहेत. याचं कारण त्यांनी आमच्याकडे विचारण्याऐवजी स्वतः शोधायला हवं होतं. त्यांनी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांना सोडलं. त्यांनी काँग्रेससोबत हातमिळवणी केली.

"शिवसेनेची विचारधारा हिंदुत्वाची आहे आणि ते कधीही काँग्रेससोबत जाणार नाहीत. म्हणूनच जर एकनाथ शिंदे हिंदुत्वाच्या विचारांवर काम करत असतील, 24 तास काम करत असतील, प्रत्येक कार्यकर्त्यासाठी काम करत असतील आणि लोक आमच्यात येत असतील, तर त्यात आमची चूक काय आहे?"

'ऑपरेशन टायगर'

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

गेल्या काही दिवसांपासून 'ऑपरेशन टायगर' ही टर्म माध्यमांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील नऊ खासदारांपैकी सात खासदार पक्षांतर करत असल्याची ही चर्चा आहे. खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत लवकरच प्रवेश करतील असा दावा केला जात आहे.

यालाच 'ऑपरेशन टायगर' असं म्हणत खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. आणि या चर्चेला त्यांनी त्यांच्या 'स्टाईल'ने उत्तर देत फेटाळून लावलं.

पण पुढच्या 48 तासांनंतरच खासदार संजय राऊत यांच्या भाषेतही बदल दिसला.

16 जून रोजी दिल्ली दौऱ्यावर असलेल्या संजय राऊत यांना पुन्हा यावर प्रश्न विचारण्यात आला आणि ते म्हणाले, "शिवसेनेत हे यापूर्वीही झालं आहे. तरीही पक्ष उभा आहे. आमच्या पक्षाला संघर्षाचा मोठा अनुभव आहे. साठ वर्षांत असे अनेक घाव आम्ही पाहिले आहेत. आमचा पक्ष केवळ खासदार आणि आमदारांचा पक्ष नाही. हा पक्ष कॅडर बेस पक्ष आहे. आमदार खासदार येत असतात आणि जातात. आमचा पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष आहे."

सात खासदार जाऊ शकतात का? यावर ते म्हणाले की, "आमच्यासमोर अशी कोणतीही माहिती किंवा घडामोड समोर आलेली नाही. आमचेही दिवस येतील."

यापूर्वी संजय राऊत यांनी खासदार कुठेही जात नसल्याचं सांगत दिल्ली येथेच माध्यमांशी बोलताना आपल्या खासदारांनी बैठकीत अगदी शपथा घेतल्याचंही सांगितलं. ते म्हणाले, "अशी कोणतीही माहिती आमच्याकडे नाही. उद्धव ठाकरे यांनी बोलवलेल्या बैठकीत सर्व खासदार सहभागी झाले होते. काही जण ऑनलाईन हजर होते. यापैकी काही खासदारांनी सर्व खासदारांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. कोणी देवाची शपथ घेतली, कोणी साईबाबांची शपथ घेतली, कोणी आपल्या मुलाची शपथ घेतली आणि शेवटपर्यंत पक्षासोबत असल्याचं सांगितलं."

बैठकीला ऑनलाईन हजेरी लावलेल्या काही खासदारांशी संपर्क साधण्याचा बीबीसी मराठीने अनेक वेळा प्रयत्न केला पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यांची प्रतिक्रिया आल्यावर अपडेट करण्यात येईल.

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची प्रतिक्रिया काय?

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील ज्येष्ठ नेते कृपाल तुमाने यांनी 'ऑपरेशन टायगर' अंतिम टप्प्यात असल्याचा दावा केला आहे. इतकंच नाही तर त्यांच्या दाव्यानुसार, 16 आमदार आणि 7 खासदारांना पक्षांतर करण्यासाठी अंतिम वाटाघाटी पूर्ण झाल्या असून, केवळ पक्षात सामील होण्याची तारीख बाकी आहे. उभाठाच्या 16 आमदारांचे ऑपरेशन टायगर हे पावसाळी अधिवेशनांनंतर होईल असेही कृपाल तुमाने म्हणालेत.

परंतु मंत्री उदय सामंत यांनी मात्र अशा कुठल्याचा बंडाचा दावा किंवा ठाकरेंच्या खासदारांची एकनाथ शिंदे यांच्यासोबतची भेट झाली नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

उदय सामंत म्हणाले की, "किती खासदार बैठकीला उपस्थित होते, नव्हते हे तुमच्या माध्यमातून आम्हाला कळतंय. शिवसेना पक्षाला खासदार फोडण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. यूबीटीच्या खासदारांच्या संदर्भात आमचा कोणाचीही संपर्क झालेला नाही. ऑपरेशन टायगरच्या संदर्भात जे काही वातावरण तयार केलं जातं आहे. यूबीटीच्या खासदारांची कोणतीही बैठक झालेली नाही. मी शिर्डीला असताना बाजूला खासदार वाकचौरे होते. मी भेटलेलो नाही. एकनाथ शिंदेही युबीटीच्या खासदारांना भेटलेले नाहीत."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)