You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'जलवीर' नावाच्या आणखी एका जहाजावर हल्ल्याबाबत समोर आली माहिती, जहाजावर होते 'एवढे' भारतीय खलाशी
आखाती भागात भारतीय खलाशी असलेल्या आणखी एका जहाजावर हल्ला झाला आहे. अमेरिकेनं गिनी-बिसाऊचा ध्वज असलेल्या 'जलवीर' जहाजावर हल्ला केल्याची पुष्टी केली आहे.
अमेरिकेच्या सेंट्रल कमांडच्या (सेंटकॉम) म्हणण्यानुसार, ते जहाज ओमानच्या आखातातून इराणी तेल वाहून नेण्याचा प्रयत्न करत होतं आणि त्यानं "नाकेबंदीचं उल्लंघन" केलं होतं.
यापूर्वी, भारताने दावा केला होता की अमेरिकेने ओमानच्या शिनास बंदराजवळ भारतीय खलाशांना घेऊन जाणाऱ्या तिसऱ्या जहाजावर हल्ला केला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, त्या जहाजावर वीस भारतीय होते.
बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव, मुकेश मंगल यांनी एका पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.
"11 जून रोजी, गिनी-बिसाऊ ध्वज असलेले 'एमटी जलवीर' हे जहाज ओमानमधील शिनास बंदराजवळ एका सुरक्षा घटनेत सापडले होते.
जहाजावर वीस भारतीय खलाशी होते आणि ते सर्व सुरक्षित असल्याचे वृत्त आहे. यात कोणीही जखमी किंवा मृत झाल्याचे वृत्त नाही," असं ते म्हणाले होते.
यापूर्वी ओमानच्या किनाऱ्याजवळ बुधवारी (10 जून) एका व्यापारी जहाजावर हल्ला झाला. या जहाजावर 24 भारतीय कर्मचारी (क्रू मेंबर्स) होते, अशी माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली होती.
इराणची मागणी
आखाती प्रदेशात भारतीय व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यावरून इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बाकाई यांनी अमेरिकेवर निशाणा साधला आहे.
"हे हल्ले अमेरिकेच्या सशस्त्र दरोडा आणि चाचेगिरीच्या धोरणाचा स्पष्ट पुरावा आहेत. आम्ही शहीद भारतीय खलाशांच्या कुटुंबीय आणि मित्रांप्रती शोकसंवेदना व्यक्त करतो आणि भारत सरकार व जनतेप्रती आमच्या तीव्र शोकसंवेदना व्यक्त करतो," असं बक्काई यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं.
"आंतरराष्ट्रीय समुदायाने अमेरिकेला त्यांच्या बेकायदेशीर वर्तनासाठी जबाबदार धरले पाहिजे, कारण त्यांचे वर्तन जागतिक शांतता आणि सुरक्षेला धोका निर्माण करते, तसेच सागरी वाहतुकीच्या स्वातंत्र्यालाही धोक्यात आणते," अशी मागणीही त्यांनी केली.
काँग्रेसने काय म्हटलं?
अमेरिकेच्या हल्ल्यात तीन भारतीय नौसैनिकांच्या मृत्यूवर काँग्रेसने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
"तीन भारतीय खलाशांच्या मृत्यूमुळे भारतीय काँग्रेसला तीव्र दुःख झाले आहे. आम्ही त्यांच्या कुटुंबीयांप्रती मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो आणि या कठीण काळात त्यांच्या पाठीशी उभा आहोत," असं काँग्रेसने एका निवेदनात म्हटलं आहे.
"पंतप्रधानांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच्या वैयक्तिक संबंधांना एक राजनैतिक यश म्हणून वारंवार मिरवलं आहे. जेव्हा तेच संबंध भारतीयांचे जीवन आणि हितसंबंधांचे रक्षण करण्यास अपयशी ठरतात, तेव्हा ते आपली जबाबदारी झटकू शकत नाहीत," असंही काँग्रेसनं म्हटलं आहे.
दरम्यान, हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर प्रदेशात अस्थिरता निर्माण केल्याचा आणि आंतरराष्ट्रीय सागरी वाहतुकीला धोका निर्माण केल्याचा आरोप केला आहे.
"ट्रम्प नियंत्रणाबाहेर गेले आहेत. त्यांच्यामुळे संपूर्ण जग त्रस्त आहे. मी जहाजावरील हल्ल्याचा निषेध करतो. तिथे किती जहाजे कार्यरत आहेत हे सेंटकॉमला माहीत नाही का? संपूर्ण परिसरात अशांतता आहे. ते आमच्या जहाजांवर हल्ला करत आहेत. कल्पना करा की आपले किती लोक मारले जात आहेत," असं ते म्हणाले.
बुधवारीही झाला होता हल्ला
ओमानच्या किनाऱ्याजवळ बुधवारीही (10 जून) एका व्यापारी जहाजावर हल्ला झाला. या जहाजावर 24 भारतीय कर्मचारी (क्रू मेंबर्स) होते, अशी माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली होती.
या 24 भारतीयांपैकी आतापर्यंत 21 जणांना सुरक्षितरीत्या वाचवण्यात आले असून 3 भारतीय बेपत्ता आहेत, असं परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं होतं. मात्र या तिघांचा आता मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं.
केंद्रीय जहाज, जलवाहतूक आणि बंदर मंत्रालयाचे विभागाचे मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली होती.
ते एक्स पोस्टमध्ये लिहितात, "पालाऊचा ध्वज असलेल्या MT Settebello जहाजावरील दुर्दैवी घटनेची माहिती समजल्यावर अत्यंत दुःख झाले. सुरुवातीला बेपत्ता असल्याचं सांगितलेल्या तीन भारतीय खलाशांचे मृतदेह सापडून त्यांची ओळख पटली असून ते मृत्युमुखी पडल्याचं स्पष्ट झालं आहे.
ही आपल्या सागरी कुटुंबासाठी अतिशय मोठी हानी आहे. या कठीण काळात मोदी सरकार शोकाकुल कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे आणि त्यांच्या नातेवाईकांना सर्वतोपरी मदत करण्यास कटिबद्ध आहे."
ते पुढं लिहितात, "वाचवण्यात आलेल्या खलाशांना तातडीने भारतात परत आणण्याबाबत आणि मृतांच्या पार्थिव देहांना त्यांच्या अंत्यविधीसाठी जलदगतीने भारतात आणण्याची व्यवस्था त्वरित करण्याचे निर्देश मी अधिकाऱ्यांना दिले आहेत."
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने काय म्हटलं होतं ?
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी (10 जून) उशिरा रात्री निवेदन जारी करत हल्ल्याचा निषेध केला होता.
परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले होते, "ओमानच्या किनाऱ्याजवळ व्यापारी जहाज 'सेट्टेबेलो'वर झालेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. जहाजावर असलेल्या 24 भारतीयांपैकी 21 जणांना वाचवण्यात आले असून 3 जण बेपत्ता आहेत." मात्र या तिघांचा मृत्यू झाल्याचं आज 11 जून रोजी स्पष्ट झालं आहे.
"ओमानमधील आमचा दूतावास परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि ओमानी अधिकाऱ्यांसोबत समन्वय साधून सुरू असलेल्या शोध आणि बचाव मोहिमेत सक्रियपणे सहकार्य करत आहे."
मंत्रालयाने पुढे म्हटले की, या प्रदेशात जहाजांवर होत असलेले सततचे हल्ले चिंताजनक असून ते सध्या सुरू असलेल्या संघर्षाचा थेट परिणाम आहेत.
या निवेदनापूर्वी ओमानमधील भारतीय दूतावासानेही या घटनेची माहिती दिली होती, मात्र ती अत्यंत संक्षिप्त होती.
दूतावासाने म्हटले होते, "ओमानच्या किनाऱ्याजवळ एका जहाजाशी संबंधित घटनेची माहिती आम्हाला मिळाली आहे. आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. लवकरच अधिक माहिती दिली जाईल."
निवेदनात म्हटले आहे, "आम्ही पुन्हा एकदा तणाव तात्काळ कमी करण्याचे आणि सुरू असलेल्या चर्चांना कूटनीतिक तोडग्यापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन करतो, जेणेकरून या भागात शांतता आणि स्थैर्य पुन्हा प्रस्थापित होऊ शकेल."
"व्यापारी जहाजे आणि नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करणे थांबवले पाहिजे. आंतरराष्ट्रीय कायद्याच्या आधारे या प्रदेशातील समुद्री मार्गांवर निर्बंधमुक्त वाहतूक आणि व्यापार लवकरात लवकर पुन्हा सुरू होणे आवश्यक आहे."
8 जूनलाही झाला होता हल्ला
याआधी सोमवारी, म्हणजे 8 जून रोजीही एका जहाजावर हल्ला झाला होता. त्या जहाजावर 24 भारतीय खलाशी होते. मात्र, नंतर सर्वांची सुरक्षित सुटका करण्यात आली. ओमानमधील भारतीय दूतावासाने याला दुजोरा दिला होता.
त्यावेळी फॉरवर्ड सीमन्स युनियन ऑफ इंडिया (एफएसयूआय) ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर या घटनेची माहिती दिली होती. एफएसयूआयने खलाशांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत मिळावी यासाठी आवाहन केले होते.
यानंतर ओमानमधील भारतीय दूतावासाने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले होते, "भारतीय खलाशी असलेल्या एका जहाजाशी संबंधित घटनेची माहिती दूतावासाला आहे. त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि बचावासाठी आम्ही ओमानच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत."
त्यानंतरच्या एका पोस्टमध्ये दूतावासाने आणखी माहिती देताना म्हटले, "एमटी मॅरिवेक्सवरील सर्व 24 भारतीय कर्मचाऱ्यांची सुटका करून त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी तातडीने कारवाई केल्याबद्दल आम्ही ओमानच्या अधिकाऱ्यांचे आभारी आहोत."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)