स्मृती मंधाना, श्रेयंका पाटील ते भारती फुलमाळी; भारत-पाकिस्तान सामन्याच्या पार्श्वभूमीवर जाणून घ्या, भारताचा संघ

Published
वाचन वेळ: 8 मिनिटे

आगामी ICC महिला टी-20 विश्वचषक 2026 स्पर्धा 12 जून ते 5 जुलै 2026 दरम्यान इंग्लंडमध्ये होणार आहे.

यंदा प्रथमच 12 संघ या स्पर्धेत सहभागी होत आहेत, त्यामुळे ही आतापर्यंतची सर्वात मोठी महिला टी-20 विश्वचषक स्पर्धा ठरणार आहे.

भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध 14 जून रोजी होणार असून त्याकडे विशेष लक्ष असेल.

या स्पर्धेतील अंतिम सामना ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळवला जाईल.

गतविजेता न्यूझीलंडचा संघ आपलं विजेतेपद राखण्याच्या प्रयत्नात असेल, तर भारत पहिल्या टी 20 विश्वविजेते पदासाठी मैदानात उतरणार आहे.

हरमनप्रीत कौर

हरमनप्रीत कौर भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार आहे. ती मधल्या फळीतील एक दमदार फलंदाज आहे. तसंच एक उपयुक्त ऑफ-स्पिनरदेखील आहे.

गेल्या एक दशकभराच्या कालावधीत महिलांच्या खेळातील जागतिक स्तरावरील एक प्रबळ संघ म्हणून भारताला उदयाला आणण्यात, नावारुपाला आणण्यात ती अग्रस्थानी राहिली आहे.

हरमनप्रीत कौरचा जन्म पंजाबमधील एका बेताची आर्थिक परिस्थिती असलेल्या शीख कुटुंबात झाला. तीन भावडांमध्ये हरमनप्रीत सर्वात मोठी आहे. सुरुवातीच्या काळात ती हॉकी स्टिकचा वापर करून त्यांच्या परिसरातील मैदानात मुलांबरोबर क्रिकेट खेळू लागली.

बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत हरमनप्रीत कौर म्हणाली होती की तिला अष्टपैलू खेळाडू व्हायचं होतं. कारण गल्ली क्रिकेटमध्ये अष्टपैलू खेळाडूंना सामने खेळण्याची अधिक संधी मिळते.

बॅटबरोबर असलेल्या तिच्या विशेष नात्याबद्दलही ती बोलली. हरमनप्रीत कौरनं बीबीसीला सांगितलं, "पूर्वी बॅटचा दर्जा तितकासा चांगला नसायचा. तरीदेखील मला त्या बॅट खूप आवडायच्या. त्या बॅटनं खेळणं, त्यांची काळजी घेणं, त्यांच्याशी बोलणं असं सर्वकाही. मी माझ्या बॅटशी सतत बोलत असते. मी जेव्हा मोकळ्या वेळात माझ्या खोलीत असते तेव्हा इतरही काही काम करताना मी माझी बॅट हातात घेतलेली असते."

हरमनप्रीतनं 2009 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. हळूहळू तिनं एकहाती सामना जिंकून देणारी मॅच-विनर खेळाडू म्हणून स्वत:ला प्रस्थापित केलं. सध्या ती सर्व फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व करते.

भारतानं 2025 च्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून विश्वचषक जिंकला. तो भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा क्षण होता. त्या विजयामध्ये हरमनप्रीत कौरनं प्रमुख भूमिका बजावली होती.

कर्णधार म्हणून हरमनप्रीत कौरनं भारताला अभूतपूर्व काळात प्रगती करताना नेतृत्व दिलं. तिनं जगातील सर्वात बलाढ्य संघाविरुद्ध सातत्यानं स्पर्धात्मक खेळ करताना भारतीय संघाला मदत केली आहे.

स्मृती मंधाना

महाराष्ट्राची डावखुरी सलामीवीर स्मृती मंधाना आता भारतीय महिला क्रिकेटमधील एक मोठी स्टार झाली आहे. भारतीय महिला संघाची उप-कर्णधार म्हणून ती संघातील सर्वात भरवशाच्या खेळाडूंपैकी एक आहे.

स्मृतीचा जन्म सांगली शहरात झाला आहे. क्रिकेट खेळण्याची प्रेरणा तिला तिचे वडील आणि भावाकडून मिळाली. हे दोघेही जिल्हा स्तरावर क्रिकेट खेळलेले आहेत.

स्मृतीनं 2013 मध्ये 'अंडर-19 झोनल स्पर्धे'त खेळताना द्विशतक झळकावलं. ए लिस्ट सामन्यात अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली.

'आयसीसी वीमेन्स क्रिकेटर ऑफ द ईयर' म्हणून स्मृतीला 2018 आणि 2021 मध्ये दोनदा सन्मानित करण्यात आलं आहे. तर 2019 मध्ये भारत सरकारनं तिला प्रतिष्ठित अर्जुन पुरस्कारानं सन्मानित केलं.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये एका कार्यक्रमात स्मृती म्हणाली होती, "जेव्हा तुम्ही भारतीय संघाची जर्सी घालून मैदानात उतरता तेव्हा देशासाठी खेळून जिंकण्याव्यतिरिक्त तुमच्या मनात इतर कोणतीही गोष्ट येत नाही."

स्मृतीनं आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमध्ये भरपूर धावा केल्या आहेत. तिनं आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये अनेक शतकं झळकावली आहेत. क्रिकेटच्या तिन्ही आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये शतकं झळकावणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू आहे.

तिनं 2024 मध्ये 1659 धावा केल्या होत्या. बेलिंडा क्लार्कचा एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करण्याचा 28 वर्षांपूर्वीचा विक्रम तिनं मोडला.

तिच्या यशामुळे भारतीय महिला क्रिकेटची लोकप्रियता वाढण्यास, त्याची दखल घेतली जाण्यास मदत झाली आहे. त्यामुळे या खेळाकडे नवीन प्रेक्षक आकर्षित झाला आहे.

क्रिकेटनं तुला आयुष्यात काय शिकवलं असं जेव्हा स्मृतीला विचारण्यात आलं, तेव्हा ती म्हणाली होती, "क्रिकेटनं मला शिकवलं की प्रत्येक डावाची सुरुवात शून्यापासूनच करावी लागते. चांगले दिवस येतात, वाईट दिवसही येतात. मात्र तुम्हाला सतत स्वत:मध्ये सुधारणा करावी लागते."

शेफाली वर्मा

शेफाली ही महिला क्रिकेटमधील सर्वात आक्रमक फलंदाजांपैकी एक आहे. किशोरवयातच तिनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. तिनं निर्भय शैली आणि आक्रमक फलंदाजीमुळे लवकरच स्वत:ची ओळख निर्माण केली.

तिनं 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये फारशा धावा केल्या नाहीत. तिला 2025 च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळालं नाही. मात्र तिची जागा घेणाऱ्या प्रतिका रावलला उपांत्य सामन्यापूर्वी दुखापत झाल्यामुळे तिला पुन्हा संधी मिळाली.

शेफालीनं या संधीचा फायदा घेत दमदार खेळी केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात तिनं 87 धावा केल्या आणि 2 गडी बाद केले. ती 'सामनावीर' ठरली.

जेमिमा रॉड्रिग्ज

जेमिमा रॉड्रिग्ज साधारण 11 वर्षांची असताना तिच्या वडिलांनी तिला विचारलं होतं, "तू क्रिकेट खेळणार की हॉकी?"

हा प्रश्न ऐकून जेमिमाच्या डोळ्यात अश्रू आले. ती दोन्हीही खेळ उत्तम खेळायची. मात्र तिनं क्रिकेटची निवड केली.

तिनं 2018 च्या सुरुवातीला वरिष्ठ संघात पदार्पण केलं. तिला सलामीवीर म्हणून अनुभव असूनही तिनं मधल्या फळीत फलंदाजी करताना आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये अधिक यश मिळवलं.

पुढील एकदिवसीय विश्वचषकासाठी तिची संघात निवड झाली होती. मात्र मध्येच तिला संघातून वगळण्यात आलं. मग स्पर्धेच्या उत्तरार्धात तिनं शानदार पुनरागमन केलं.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात तिनं 134 चेंडूंमध्ये नाबाद 127 धावा केल्या. या खेळीच्या जोरावर संघानं 339 धावांचं मोठं लक्ष्य गाठलं. त्यामुळे महिलांच्या आंतरराष्ट्रयी एकदिवसीय सामन्यांच्या इतिहासातील सर्वाधिक धावांचा यशस्वी पाठलाग करण्याची कामगिरी भारताला करता आली.

दीप्ती शर्मा

डावखुरी फलंदाज आणि उजव्या हाताची ऑफ-स्पिनर असलेल्या दीप्ती शर्मानं 2014 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. ती उत्तर प्रदेशची आहे.

दीप्ती 2016 मध्ये प्रकाशझोतात आली. त्यावेळेस तिनं श्रीलंकेविरुद्ध खेळताना 20 धावांमध्ये 6 गडी बाद केले होते. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट सामन्यात 5 गडी बाद करणारी ती सर्वात तरुण महिला क्रिकेटपटू ठरली.

दीप्ती जागतिक दर्जाची स्पिनर म्हणून ओळखली जाते. तिनं फलंदाजीत सुधारणा करण्यासाठीदेखील कठोर मेहनत घेतली आहे. त्यामुळे ती भारतीय संघातील एक महत्त्वाची अष्टपैलू खेळाडू बनली आहे.

रिचा घोष

महिला क्रिकेटमधील एक अत्यंत आक्रमक, धडाकेबाज फलंदाज आणि सामन्याच्या शेवटपर्यंत खेळणारी (फिनिशर) यष्टीरक्षक फलंदाज म्हणून रिचा घोषनं स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.

रिचा घोषचा 2020 च्या टी20 विश्वचषकात भारतीय महिला संघात समावेश झाल्यावर तिच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात झाली.

रिचाचा जन्म पश्चिम बंगालमधील सिलिगुडी इथं झाला आहे. रिचानं 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना घरच्या मैदानावर अर्धशतक झळकावल्यावर तिच्या कसोटी कारकिर्दीची दमदार सुरुवात झाली.

त्यानंतरच्या वर्षी तिनं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 86 धावा केल्या. मग 2025 च्या विश्वचषकात तिनं पुन्हा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दमदार कामगिरी केली. तिनं साखळी सामन्यात 94 धावा केल्या.

तर अंतिम सामन्यात 24 चेंडूंमध्ये 34 धावा करून भारताची धावसंख्या 298 वर पोहचवण्यात तिनं मोलाचा वाटा उचलला.

यास्तिका भाटिया

यास्तिका भाटिया ही भारतीय महिला क्रिकेट संघातील यष्टिरक्षक-फलंदाज आहे. ती डावखुरी फलंदाज आहे.

भारताच्या 2021-22 च्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दौऱ्यात तिनं तिन्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट फॉरमॅटमध्ये पदार्पण केलं. पदार्पणातच तिनं तिच्या कामगिरीनं लगेचच छाप पाडली.

तर 2022 मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत यास्तिकानं दोन अर्धशतकं झळकावली. त्याच वर्षी नंतर झालेल्या 2022 च्या राष्ट्रकूल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ती तानिया भाटियासाठी कन्कशन सबस्टिट्यूट म्हणजे तिच्या डोक्याला दुखापत झाल्यामुळे यास्तिका बदली खेळाडू म्हणून खेळली.

मात्र तिच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाल्यामुळे ती 2025 च्या आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषकात खेळू शकली नाही.

रेणुका सिंह

रेणुका सिंह ठाकूरच्या क्रिकेटची सुरुवात तिच्या गावातील गल्लीबोळात झाली. नंतर ती धर्मशाळा इथल्या हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या निवासी अकॅडमीमध्ये दाखल झाली.

ही अकॅडमी महिला क्रिकेटपटूंसाठीच्या भारतातील सुरुवातीच्या निवासी सुविधांपैकी एक आहे.

तिनं डिसेंबर 2023 मध्ये कसोटी सामन्यात पदार्पण केलं. त्यानंतर रेणुका भारतासाठी सर्व फॉरमॅटमध्ये खेळणारी खेळाडू बनली.

या कालावधीत ती भारताच्या गोलंदाजीच्या आक्रमणातील एक प्रमुख खेळाडू बनली आहे. तसंच ती 2025 चा आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या ऐतिहासिक भारतीय संघातदेखील होती.

अरुंधती रेड्डी

हैदराबादची अरुंधती एक जलदगती गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू आहे. ती उजव्या हातानं मध्यम-गती गोलंदाजी करते आणि उजव्या हातानं फलंदाजी करते.

ती महत्त्वाचे गडी बाद करण्यासाठी आणि संघासाठी उपयुक्त धावा करण्यासाठी ओळखली जाते.

अरुंधती रेड्डीनं 2018 मध्ये भारताकडून पदार्पण केलं होतं. ती 2018, 2020 आणि 2024च्या आयसीसी महिला टी20 विश्वचषक स्पर्धांमध्ये भारतीय संघातून खेळली आहे. इतक्या वर्षांमध्ये ती भारताच्या टी20 संघातील नियमित खेळाडू बनली आहे.

तर 2025 मध्ये पहिला आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा ती एक भाग होती. हे तिच्या कारकिर्दीतील सर्वात मोठ्या यशापैकी एक होतं.

श्रेयंका पाटील

श्रेयंका पाटील बंगळुरूची आहे. भारतीय महिला क्रिकेटमधील सर्वात रोमांचक, लक्षवेधी तरुण अष्टपैलू खेळाडूंपैकी एक म्हणून तिनं स्वत:ची ओळख झपाट्यानं निर्माण केली आहे.

तिनं 2023 च्या 'एसीसी वीमेन्स इमर्जिंग टीम्स कप'मध्ये दमदार कामगिरी केली होती. या स्पर्धेत ती सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज ठरली होती. तिनं भारतीय 'अ' संघाकडून खेळताना 9 गडी बाद केले होते. तसंच या स्पर्धेत तिला 'प्लेअर ऑफ द सीरिज'चा किताबही मिळाला.

भारती श्रीकृष्ण फुलमाळी

भारती महाराष्ट्रातील अमरावतीची आहे. ती मधल्या फळीतील उजव्या हाताची फलंदाज आहे. तिनं 2019 मध्ये गुवाहाटी इथं झालेल्या भारत विरुद्ध इंग्लड यांच्यातील सामन्यातून महिलांच्या आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेट सामन्यांतून (डब्ल्यूटी20 आय) पदार्पण केलं.

त्या काळात ती फक्त काही मोजकेच आंतरराष्ट्रीय सामने खेळली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यानं कामगिरी करत असतानाही ती राष्ट्रीय संघातून अनेक वर्षे बाहेरच होती.

तिनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर जवळपास 7 वर्षांनी आणि भारतीय संघापासून अनेक वर्षे दूर राहिल्यानंतर तिची अलीकडे निवड झाली आहे. या निवडीतून तिनं पुनरागमन केलं आहे.

श्री चरणी

श्री चरणी ही भारतीय महिला क्रिकेटमधील फिरकी गोलंदाजीतील सर्वात तरुण लक्षवेधी गोलंदाजांपैकी एक म्हणून उदयास आली आहे.

श्री चरणी आंध्र प्रदेशातील आहे. ती डावखुरी स्पिनर आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगानं उदयाला आल्यामुळे चरणीनं स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे.

श्री चरणीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यातून पदार्पण करत प्रभाव पाडला.

त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातून टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करताना 12 धावा देऊन 4 गडी बाद करत उल्लेखनीय कामगिरी केली होती. टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पदार्पणातच भारतीय महिला खेळाडूनं गोलंदाजीत केलेल्या सर्वोत्तम कामगिरींपैकी ही एक कामगिरी ठरली.

नंदनी श्याम सुंदर शर्मा

नंदनी श्याम सुंदर शर्मा ही उजव्या हातानं गोलंदाजी करणारी मध्यम वेगवान गोलंदाज आहे. ती चंदीगडची आहे. तिनं 2026 मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळताना टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पदार्पण केलं.

तिची 2026 च्या आयसीसी महिला टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड झाली आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातून टी20 पदार्पण करताना तिनं 3 गडी बाद करत प्रभावी कामगिरी केली. त्यातून जागतिक स्तरावरील तिची क्षमता तिनं अधोरेखित केली.

क्रांती गौड

क्रांती मूळची मध्य प्रदेशातील आहे. ती उजव्या हातानं गोलंदाजी करणारी जलदगती गोलंदाज आहे. भारतीय महिला क्रिकेटमध्ये ती अतिशय वेगानं नावारुपाला आली आहे. इंग्लंडच्या दौऱ्यात तिनं सामना जिंकून देणारी धडाकेबाज कामगिरी केली होती.

तिनं 52 धावांमध्ये 6 गडी बाद केले होते. वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी ती आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये 5 गडी बाद करणारी सर्वात तरुण भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली.

तसंच 2025 च्या आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषकामध्येही तिची दमदार कामगिरी कायम राहिली. या स्पर्धेत तिनं 9 गडी बाद करून भारताला विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

राधा यादव

राधा ही डाव्या हातानं गोलंदाजी करणारी उत्तम स्पिनर आहे. तसंच ती एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे. तिनं 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.

तिनं देशांर्गत क्रिकेटमध्ये केलेल्या दमदार कामगिरीमुळे तिला लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी भारतीय संघात स्थान मिळालं. जागतिक स्तरावर लवकरच तिनं तिची क्षमता सिद्ध केली. पदार्पण झाल्यानंतर काही काळातच राधाची 2018 च्या महिला टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड झाली.

टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 100 हून अधिक गडी बाद करणाऱ्या फक्त दोन भारतीय महिला क्रिकेटपटूंपैकी ती एक आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.