मुंबईत गणेशोत्सव मंडपाजवळ करंट उतरला; 8 वर्षांच्या मुलीसह दोघांचा मृत्यू, 4 जण जखमी

मुंबई गणपती अपघात

फोटो स्रोत, PTI Video Grab

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

मुंबईतील लालबाग परिसरात एका गणेश मंडळाच्या मंडपाजवळ वीजेचा धक्का लागल्याने 2 जणांचा मृत्यू तर 6 जण जखमी झाल्याची घटना समोर आली आहे.

ही घटना रविवार (20 सप्टेंबर) पहाटे पावणेतीनच्या सुमारास घडली. घटनेनंतर परिसरातील वीजपुरवठा बंद करण्यात आला. विजेचा धक्का नेमका कशामुळे बसला, याचा तपास पोलीस आणि संबंधित यंत्रणांकडून करण्यात येत आहे.

मृतांमध्ये रागिणी घनश्याम यादव (8) आणि सुजाता (33) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत.

जखमींमध्ये किरण अकबर नाईक (19), तन्वी नरेश हांडे (19), साहिल संदीप तारे (19), रुही सिंह (12) यांचा समावेश आहे. जखमींवर मासिना आणि ग्लोबल रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

नेमकं काय घडलं?

बीएमसीकडून या घटनेबाबत अधिकृत निवेदन जारी करून सविस्तर माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, ही घटना काळाचौकीतील दत्ताराम लाड मार्गावरील काळाचौकी विभाग सार्वजनिक उत्सव मंडळाजवळ घडली.

लालबाग परिसरात सुरू असलेल्या गणपती उत्सवामुळे भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. दरम्यान, महागणपती उत्सव मंडळाच्या प्रवेशद्वाराजवळ उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या पाणीवाटप केंद्राजवळ वीजप्रवाह उतरून 6 जणांना वीजेचा धक्का बसला.

मुंबई अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून वीजपुरवठा बंद केला आणि खबरदारीचा उपाय म्हणून परिसरही बंद केला.

दरम्यान, विजेचा धक्का बसलेल्या 6 जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी रागिणी आणि सुजाता यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.

काळाचौकी पोलिसांनी पुढील तपासणीसाठी मीटर इन्स्पेक्टरलाही घटनास्थळी बोलावले. या घटनेचा पुढील तपास स्थानिक पोलिसांकडून सुरू आहे.

प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

या घटनेत मृत्यू झालेल्या 8 वर्षीय रागिणीच्या नातेवाईक किस्मती यादव यांनी वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना यासाठी आयोजक दोषी असल्याचं म्हटलं.

त्या म्हणाल्या, "आम्ही रात्री 2 च्या सुमारास तिथे पोहोचलो आणि रांगेत उभे राहिलो. पहाटे 2:40 दरम्यान ही घटना घडली."

"यावेळी खूप गर्दी होती त्यामुळे आम्ही घरी परत जावे का, याबाबत विचार करत होतो. आम्ही गर्दीच्या बाजूने पुढे जाण्याचा प्रयत्न करत होतो, तेव्हा मंडपाजवळ काही दुकाने दिसली. त्यामुळे दर्शनाला न जाता गर्दी कमी होईपर्यंत तिथे दुकानाजवळ काही वेळ थांबावं असं ठरवलं," अशी माहिती त्यांनी दिली.

"मंडपाजवळ जिथे दर्शनासाठी रांग लागली होती, तिथेच एक लाईट लावलेला होता. त्यांनी सुरक्षेची योग्य काळजी घ्यायला हवी होती. माझ्या स्वतःच्या 2 मुलांनाही विजेचा धक्का बसला. ही संपूर्ण आयोजकांची चूक आहे, आता काही मागणी करून, गेलेला जीव परत येणार आहे का?" असा प्रश्न त्यांनी विचारला.

असं असलं तरी, गणेशोत्सव आयोजकांची अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही. ती आल्यानंतर येथे अपडेट करण्यात येईल.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)