'370 रुपयांची बिर्याणी' आणि 'वसुली'ची भाषा; प्रणित मोरेच्या 'कॉमेडी'ने समजली आजारी समाजाची ट्रॅजेडी - ब्लॉग

370 रुपयांची बिर्याणी आणि 'वसूली'ची भाषा; प्रणित मोरेच्या 'कॉमेडी'ने समोर आली आजारी समाजाची ट्रॅजेडी

फोटो स्रोत, Pranit More Official/Facebook

    • Author, लक्ष्मी यादव
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 10 मिनिटे

"आम्ही दोघांनी 370 रुपयांची बिर्याणी खाल्ली. मग ती म्हणाली की, मला घरी सोडून ये. मी म्हणालो, भाई 370 रुपये गेले आहेत तर मी ते वसूल तर करणारच."

23 वर्षीय हिमांशु जांग्रा हा तरुण डेटिंगवर घेऊन गेलेल्या मैत्रिणीबाबत कॉमेडियन प्रणित मोरेच्या एका कार्यक्रमात बोलताना म्हणाला.

हिमांशु पुढे म्हणाला की, "मला तिला हॉटेलमध्ये न्यायचं होतं, पण तिने नकार दिला म्हणून मी तिला बागेत नेलं."

त्याच्या मते, मैत्रिणीला बिर्याणी खाऊ घातली आहे, तर मग त्या बदल्यात त्याला तिच्याकडून शरीरसुख मिळायला हवं.

हिमांशु जांग्राच्या या वक्तव्यानंतर त्याच्यावर सगळीकडून टीका झाली आणि डेटिंग, आधुनिक नातेसंबंध, संमती आणि विनोदाचा दर्जा यावर चर्चा सुरू झाली.

"प्रणित मोरेच्या शोमधील व्हायरल क्लिप पाहिली आणि मला त्या गोष्टीचा प्रचंड तिरस्कार वाटतोय. एक पुरुष अभिमानाने सांगतोय की, त्याने कशाप्रकारे डेटनंतर त्याच्या गर्लफेंडवर 'वसूली'साठी दबाव टाकला आणि तिथे उपस्थित असलेले, स्वत:ला पुरुष म्हणवणारे सर्वजण त्यावर हसत होते. ही 'डार्क कॉमेडी' नाही," असं अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर तिच्या पोस्टमध्ये म्हणते.

प्रणित मोरेचा कॉमेडी शो आणि वाद

हिमांशुच्या विधानावर प्रणित मोरेनं हसून दाद दिली आणि 'पिक गुरगाव काँटेट' असे शब्द वापरले. शिवाय, हिमांशुला त्यानं आपल्या शोमधील अर्धा तास दिला.

या अर्ध्या तासात हिंमाशु त्याच्या मैत्रिणीचा कसा कीस घेतला आणि तिच्या शरीरासोबत काय काय केले याचे वर्णन शोमध्ये केले. ते ऐकत असताना प्रणित त्याला 'ले ले, ले ले' असं म्हणत हसून बोलण्यासाठी प्रोत्साहन देत होता.

त्याच्या या शोची सुरुवातच मुळात हिमांशुच्या 'मला सबंधांसाठी मोठी मुलगी हवी होती' या वाक्यानं झाली होती. प्रणित आणि हिमांशुवर टीका झाल्यावर प्रणितने आपल्या चॅनेलवरून हा व्हीडिओ हटवला आणि माफी मागितली.

इतर अनेक कॉमेडी शोप्रमाणे प्रणित मोरेच्या कॉमेडी शोमध्ये कंबरेखालचे विनोद चालतात. याआधीही प्रणित बिग बॉसमध्ये असताना सलमान खानने त्याला फटकारले होते.

एका कॉमेडी शो दरम्यान एका मुलीच्या हातातील अंगठीला बघून प्रणित मोरे त्या मुलीला म्हणाला की, ती अंगठी सलमान खानच्या ब्रेसलेटसारखी वाटते आहे. ती मुलगी जेव्हा म्हणते की, मी त्याच्याकडूनच आणली आहे. त्यावर प्रणित मोरेने तिला 'तू फार्म हाऊसवर गेली होतीस का?' असं विचारलं.

फार्महाऊसवर जाण्याचा अर्थ सर्वाना माहिती आहे. त्यामुळे त्याला वाटणारा 'जोक' विनोद नव्हता, हे सर्वांनाच कळत होतं, मात्र त्यावेळी त्याच्या वक्तव्याचा गाजावाजा झाला नाही आणि त्याला काहीही शिक्षा झाली नाही.

कॉमेडी शो : कला, भाषण स्वातंत्र्य की बलात्कार संस्कृतीला प्रोत्साहन?

कला म्हणून चालणाऱ्या बहुतांश कॉमेडी शोजमध्ये वापरली जाणारी भाषा अत्यंत खालच्या दर्जाची, अश्लील, सेक्सिस्ट असते. त्यात 'कूल' दिसण्याच्या नादात कंबरेखालचे निरुपद्रवी (?) विनोद, स्त्रियांचे शरीर किंवा त्यांचे चारित्र्य, व्यक्तिमत्व यावर अर्वाच्च्य शब्दात शेरेबाजी केलेली असते.

370 रुपयांची बिर्याणी आणि 'वसूली'ची भाषा; प्रणित मोरेच्या 'कॉमेडी'ने समोर आली आजारी समाजाची ट्रॅजेडी

फोटो स्रोत, VIDEO GRAB/Pranit More Official/Facebook

मध्यंतरी रणवीर अलाहाबादिया या यूट्यूबर संदर्भात देखील एक अशाच पद्धतीचा वाद समोर आला होता. स्टँडअप कॉमेडियन समय रैना यांच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' या युट्यूब शोमध्ये रणवीर अलाहाबादिया परीक्षक (गेस्ट जज) म्हणून सहभागी झाला होता. त्या दरम्यान त्याने एका स्पर्धकाला त्याच्या आई-वडिलांच्या वैयक्तिक आणि लैंगिक आयुष्याविषयी अतिशय अश्लील व आक्षेपार्ह प्रश्न विचारले.

'जर आई वडील सेक्स करत असतील तर तू त्यात सामील होशील काय?' असा प्रश्न त्यानं सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर विचारला होता. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलं. अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी रणवीरने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, याचिका फेटाळताना, न्यायालयाने 'तुमच्या डोक्यात घाण भरली आहे, प्रसिद्धी म्हणजे काहीही बोलण्याचा परवाना नव्हे,' अशा कडक शब्दांत त्याची कानउघाडणी केली. या प्रकरणात रणवीरसह समय रैना आणि इतर पाच जणांवर गुन्हे दाखल झाले होते.

370 रुपयांची बिर्याणी आणि 'वसूली'ची भाषा; प्रणित मोरेच्या 'कॉमेडी'ने समोर आली आजारी समाजाची ट्रॅजेडी

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

हिमांशु प्रकरणात तो बोलत असताना प्रणित मोरे याने त्याला थांबवले तर नाहीच वरून त्याला तो आणखी बोलण्यासाठी प्रोत्साहन देत होता. हिमांशु बोलताना 'तिला किस केला नाहीस तर कर ना मग, म्हणजे सीन तयार होईल,' असं तो त्याला सांगत होता. शिवाय, कीस केला असं हिमांशुने सांगताच प्रणित त्याला 'बारा रुपये वसूल झाले,' असंही हसून म्हणाला.

मुद्द्दा केवळ प्रणित किंवा शोमधील इतर कुणीही हिमांशुला थांबवलं नाही हा नसून अतिशय संवेदनशील, खासगी क्षणांना सर्वांनी 'अश्लील जोक' बनवलं हाही आहे. अशावेळी 'स्त्रियाच कशा त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराला जबाबदार आहेत, त्या पुरुषांना आकृष्ट करणारे कपडे घालतात किंवा इशारे देतात, डेटवर येणाऱ्या मुली कशा शरीरसंबंधांसाठी 'उपलब्ध' (Available) असतात, अशा स्त्रियांवर बलात्कार किंवा इतर लैंगिक अत्याचार केला तर ते 'नॉर्मल' आहे , ही चर्चा होताना दिसते.

चर्चा करणाऱ्यांच्या दृष्टीनं लैंगिक अत्याचाराची जबाबदारी पुरुषावर कधीच असत नाही.

या सगळ्या गदारोळात हिमांशुच्या मैत्रिणीची बागेत घडलेल्या शरीर व्यवहाराला संमती होती का, हिमांशुने त्यांच्यात घडलेले खासगी क्षण त्याने एका सार्वजनिक व्यासपीठावर सांगावे यासाठी तिचा होकार घेण्यात आला होतं का, हे महत्वाचे मुद्दे कुठेही आले नाहीत.

हा एपिसोड जेव्हा जगभर व्हायरल झाला, तो बघून त्या मुलीची शारीरिक आणि मानसिक अवस्था कशी झाली असेल, त्याबद्दल कुणालाही काळजी वाटली नाही की विचार करावा वाटलं नाही.

हाच विचार पुण्यातील स्वारगेट बलात्कार घटनेतील पीडितेला ट्रोल करतानाही केला गेला नाही. खरं तर या मुलींना जगभरातून घट्ट मिठ्या आणि खूप खूप बळ पाठवून द्यायला हवं आहे.

प्रेम की व्यवहार?

प्रेम ही माणसाच्या जीवनातील सुंदर भावना आहे, जी दोन जीवांनी 'तू म्हणजे मी आणि मी म्हणजे तू' एवढ्या उत्कटतेनं अनुभवायची असते.

मात्र, हिमांशुच्या मते, प्रेम हा व्यवहार आहे. 'याच्या बदल्यात ते' असा. शरीराच्या पलीकडे प्रेम जात नाही.

या प्रकरणाच्या निमित्ताने तरुण पिढीतील काही मंडळी नाते संबंधांकडे कशा नजरेनं पाहतात याची एक झलक पाहायला मिळाली.

विवेक विसरत चाललेला पुरुषवर्ग

हिमांशु प्रकरणाचा व्हिडीओ पाहिल्यास आपल्या लक्षात येईल की, तो आपल्या मैत्रिणीसोबत बागेत घालवलेले खासगी क्षण सांगत असताना, केवळ हिमांशु तिच्यावर लैंगिक अत्याचार करत नव्हता, तर प्रणित आणि त्या शोमधील सहभागी सगळे तरुण तिच्यावर, तिच्यासारख्या असंख्य मुलींवर कल्पनेत, आपल्या बॉडी लँग्वेजने बलात्कार करत होते.

टाळ्या वाजवून, चेकाळून हसत होते. हिमांशु एक एक प्रसंग रंगवून रंगवून सांगत होता आणि हा तरुणांचा असंवेदनशील, अविवेकी समूह लोटपोट हसून, त्याला मध्येच चेतावणारे प्रश्न विचारून साथ देत होता.

ऑल वॉज बॉईज टॉक. गंमतीत गुंडाळलेला लैंगिक अत्याचार. (बहुतांश पुरुषांच्या मित्रांच्या व्हाट्सअप ग्रुपवर असा चॅट दिसतो.).

हे सगळे कशासाठी टाळ्या वाजवत होते? एक अधम पुरुष एका स्त्रीचं चारित्र्य हनन करत होता, तिचा सन्मान पायदळी तुडवत होता, तिच्यावर केलेल्या लैंगिक अत्याचाराची बाब चवीने चघळत होता आणि ही गर्दी त्याला साथ देत होती.

यातील कोटी म्हणजे प्रणितने हिमांशुला पाच हजार बक्षिस दिलं आणि त्याचं कौतुकसुद्धा केलं. ही सगळी तरुण मंडळी स्त्री पुरुष नाते संबंधांबद्दल किती उथळ आणि घातक विचार करत आहेत, हे त्यांच्या गावीही नाही. स्त्रिया किंवा तृतीयपंथीयांवरील लैंगिक अत्याचारावर हसणं, त्याची मजा घेणं, स्त्रीद्वेष (Misogyny) करणं संतापजनक आहे.

370 रुपयांची बिर्याणी आणि 'वसूली'ची भाषा; प्रणित मोरेच्या 'कॉमेडी'ने समोर आली आजारी समाजाची ट्रॅजेडी

फोटो स्रोत, VIDEO GRAB/Pranit More Official/Facebook

सतत Fuc* आणि lava*e ची शिवराळ भाषा वापरणाऱ्या या तरुणांच्या आयुष्यातील स्त्रीयांबद्द्ल काळजी वाटण्यासारखी गोष्ट आहे. त्यांच्या मैत्रिणी, जोडीदार, आई बहिण यांच्याकडे ते कोणत्या नजरेतून पाहत असतील असा विचार कोणत्याही संवेदनशील माणसाच्या मनात आल्याशिवाय राहत नाही.

बलात्कार केवळ शारीरिक असतो असं नाही, तर तो मानसिकसुद्धा असतो. स्वारगेट प्रकरण असो की खरात अथवा काही वर्षांपूर्वीच्या मुस्लीम महिलांच्या फोटोंचा लिलाव करणाऱ्या 'सुल्ली डील्सची' आठवण झाली.

या सगळ्यात स्त्रियांना ट्रोल करणारे, त्यांच्यावर अश्लाघ्य शेरेबाजी करणारे आणि स्त्रियांचे कसे लैंगिक शोषण करावे असं म्हणणारे, त्यांची बोली लावणारे सगळे पुरुष बलात्कारी आहेत. बलात्कार शारीरिक नसतोच मुळी.

या व्हिडीओमध्ये काही मुलीही दिसत आहेत ज्या अशा लैंगिक हिंसेला उत्तेजन देणाऱ्या चर्वणावर टाळ्या वाजवताना दिसत आहेत. त्यातील एक डॉक्टर मुलगी 'डॉक्टर कशा पद्धतीनं शरीरदान केलेल्या मृत माणसांच्या लैंगिक अवयवाच्या आकारावर चर्चा करतात' हे हसत हसत सर्वाना सांगत आहे. स्त्रियासुद्धा पितृसत्तेच्या वाहक असतात, माणूस असतात हे खरे असले तरी निदान स्त्री म्हणून एका समान समूहाच्या संवेदना समजू शकतात या गृहितकाला इथे छेद मिळतो.

कॉमेडी शोमधील लैंगिक छळाची जबाबदारी कोणाची?

"सक्ती आणि हक्क गाजवणं या गोष्टी लज्जास्पदपणे सर्वसामान्य आहेत, असं म्हणणं आहे. त्या प्रेक्षकांमध्ये बसून हसणारे पुरुष हे पुरुष नाहीत. ते समाजातील परजीवी आहेत. एक प्रेक्षक म्हणून आपल्याला जागं होण्याची गरज आहे. खरं मनोरंजन काय असतं, हे हुशारीने निवडण्याची गरज आहे. अशा विषारी लोकांना मंच देणं आणि त्यांना सोशल मीडिया स्टार्स बनवणं थांबवा. उघडपणे अशा लोकांवर टीका करा आणि त्यांच्यावर बंदी आणा,' अशी मागणी अपूर्वा नेमळेकर पुढे करताना दिसते.

कॉमेडी शो मधील लैंगिक छळाची जबाबदारी कोणाची?

फोटो स्रोत, Getty Images

एखाद्या मुलीसाठी काहीतरी केलं की काही मुलांना त्याचा परतावा इतर कोणत्या स्वरुपात नको असतो, तो फक्त शरीरसुखाच्या रुपात हवा असतो. 'मुलीला थोडीशी मदत केली किंवा मुलीशी थोडीशी मैत्री झाली की लगेच मुलं मुलींशी लैंगिक जवळीक साधण्याचा प्रयत्न करताना दिसतात, इन्बॉक्समध्ये येऊन सेक्सबद्दल विचारतात,' असा सार्वत्रिक अनुभव मैत्रीण सांगते.

"मला ऑफिसमध्ये कुठल्याही पुरुषाशी मैत्री करायची भीती वाटते. लगेच डेटिंग आणि सेक्ससाठी विचारतात," सरकारी खात्यात काम करणारी एक मैत्रीण सांगते.

शरीरसंबंधांसाठी स्त्रीच्या परवानगीची आवश्यकता असते हे पुरुषांच्या मनातही येत नाही. मात्र, स्त्रीला खाऊ पिऊ घातलं याचा अर्थ तिची शरीरसंबंधांना संमती आहे असं नव्हे हे मुलग्यांनी आपल्या मनावर बिंबवून घ्यावं.

'BiryaniIsNotConsent' या नावाने मुंबई पोलिसांनीही एक इंस्टाग्राम पोस्ट तयार केली आहे

एखाद्या स्त्रीसोबतचे खासगी क्षण इतरांसमोर तिच्या संमतीशिवाय सांगणे हा कायदेशीर लैंगिक छळ किंवा गुन्हा आहे, तो पुरुष नवरा असला तरीही. भारतीय दंड विधान (बीएनएस), आयटी अॅक्ट, सायबर कायदा, महिलांचे अश्लील प्रदर्शन (विरोध) कायदा अशा विविध कायद्यांतर्गत अशा पुरुषाविरुद्ध गुन्हा नोंद केला जाऊ शकतो.

370 रुपयांची बिर्याणी आणि 'वसूली'ची भाषा; प्रणित मोरेच्या 'कॉमेडी'ने समोर आली आजारी समाजाची ट्रॅजेडी

फोटो स्रोत, VIDEO GRAB/Pranit More Official/Facebook

स्त्रीवर केलेल्या लैंगिक अत्याचाराबाबत कुणी बोलत असेल आणि ऐकणारा शांतपणे ऐकत असेल, टाळ्या पिटत असेल किंवा अत्याचार झालेल्या मुलीला ट्रोल करत असेल तर ती व्यक्तीही तेवढीच गुन्हेगार आहे. "माझ्यावर लैंगिक अत्याचार झाला याचा त्रास झालाच, मात्र त्यानंतर मला सोशल मीडियावर ज्या पद्धतीनं ट्रोल केलं गेलं, माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले त्यानं मी अगदी खचून गेले. गुन्हा नोंद करून मी मोठी चूक केली असं वाटून गेलं," एका बलात्कार घटनेतील पिडीत मैत्रीण सांगत असताना तिला काय यातना झाल्या असतील याची फक्त कल्पनाच केली जाऊ शकते.

लोकांचे मनोरंजन करण्यासाठी, लाईक, कमेंटस मिळवण्यासाठी किंवा प्रसिद्धीच्या हव्यासापोटी कोणत्याही प्रकारचा कंटेंट तयार करणं किंवा एकुणात सोशल मिडीयाच्या बाबतीत नियमावली तयार करण्याची आवश्यकता आहे.

वाहिन्यांवर सेक्सिस्ट किंवा अत्यंत खालच्या दर्जाचा कंटेंट वापरला गेला तर त्यावर पोलिसांनी कुणीतरी तक्रार करेल अशी वाट न पाहता कायदेशीर कारवाई करायला हवी.

वास्तविक पाहता सायबर कायद्यानुसार अशा व्यक्तींवर कायदेशीर कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. असेही पाहण्यात आले आहे की बऱ्याचदा स्त्रिया सोशल मिडीयावर व्यक्त होत असतील तर त्यांच्यावर अश्लील पद्धतीनं ट्रोल केलं जातं आणि त्यावर कायदेशीर कारवाई होत नाही.

माफी मागितली, मग आता पुढं काय?

फोटो स्रोत, Getty Images

भारतासारख्या देशात लग्न व्यवस्थेत नवऱ्यानं किंवा घरातील पुरुषानं पैसे कमवून आणणं आणि त्याच्या बदल्यात बायकोनं त्याला लैंगिक सुख देणं ही देवाणघेवाण किंवा व्यवहार समाजमान्य आहे. त्यामुळे हिमांशुसारख्या तरुणाला बिर्याणीच्या बदल्यात लैंगिक पूर्ती हवी यात वावगं असं काहीही वाटत नाही.

काही उदाहरणांमध्ये लैंगिक सुखाच्या बदल्यात नवऱ्यानं बायकोला पैसेही दिलेले आहेत.

दुसरं म्हणजे नवऱ्यानं केलेली लैंगिक जबरदस्ती कायद्यानं 'बलात्कार' मानली जात नाही. 'नवरा बायकोवर कायद्यानं बलात्कार करू शकतो,' हे पितृसत्ताक वास्तव ही स्त्रीवरील लैंगिक अत्याचाराची पहिली पायरी आहे. 'लग्न कशासाठी करायचं मग? लग्न हे नवऱ्यानं बायकोसोबत संबंध करण्यासाठीचं लायसन आहे,' एक पुरुष जेव्हा म्हणतो, तेव्हा त्यानं मनातून कधीच त्या स्त्रीवर बलात्कार केलेला असतो.

शिवाय, लैंगिक अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना मिळणारं समाज आणि व्यवस्थेचं अभय हाही अशा बेजबाबदार लैंगिक वर्तनाला बळ देणारं आहे. सत्ताधारींनी स्त्रीयांसंदर्भात केलेली विधाने, स्त्री लैंगिक शोषणाच्या केसमध्ये घेतलेले आणि न घेतलेले निर्णय, विविध कलांमधून स्त्री पुरुषांचे होणारे अवास्तव चित्रण इत्यादी गोष्टींचाही समाजाची स्त्रियांबद्दलची प्रतिमा तयार होण्यास मदत होते.

स्त्री शांत आहे, विरोध करत नाही म्हणजे तिची संमती आहे, स्त्रीसोबत काहीही केलं तरी चालतं हे गृहीत धरणं हेही चूकच आहे. स्त्रियांची समाजमनात उभी केलेली प्रतिमा आणि तिला स्त्री म्हणून रोज घर आणि इतर ठिकाणी मिळणारी वागणूक हे सर्व स्त्रियांच्या बाबतीत पुरुषांनी अश्लाघ्य वक्तव्ये करणे किंवा त्यांचे शोषण करणे याला बळकटी देणारे आहे. आणि हे स्त्री जीवनाच्या सर्वच मुद्द्यांच्या बाबतीत लागू होतं.

देशात दिवसाला 86 बलात्कार होतात तर महाराष्ट्रात जवळजवळ 24 (एनसीआरबी, 2021). स्त्रियांना रोज असुरक्षिततेचे अनेक अनुभव येतात.

माफी मागितली, मग आता पुढं काय?

हिमांशुने माफी मागितली. त्याला कामावरून काढून टाकलं, प्रणित मोरेला आपलं इंस्टाग्राम पेज डिलिट करून टाकावं लागलं.

सोशल मिडीयाचा अत्यंत प्रभावी वापर या प्रकरणात झाला.

लोक सोशल मीडियावर भरभरून व्यक्त झाले. काहींनी गंभीर व्हीडिओ बनवले तर काहींनी व्यंगातून टीका केली. यामुळे काही प्रमाणात कॉमेडी शो मध्ये यापुढं कॉमेडीयन किंवा यूट्यूबर अशा गोष्टी टाळतीलही.

प्रणित मोरेने माफी मागितली. इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत तो म्हणाला," त्या प्रेक्षकाने केलेली वक्तव्य माझ्या वैयक्तिक विचारांचे प्रतिनिधित्व करत नाहीत. मागे वळून पाहताना मला जाणवतं की, त्या वक्तव्याला हसून पुढे जाण्याऐवजी मला त्याला त्याच क्षणी विरोध करायला हवा होता. ती माझ्याकडून गेलेली चुकीची प्रतिक्रिया होती."

मात्र, बस एवढंच झालं. हिमांशु किंवा प्रणित मोरेवर कारवाई झाली का? तर नाही. फक्त 'माफी' मागून प्रकरण मिटलं. समाज आणि शासन दोघांनीही स्त्रियांचे प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष लैंगिक शोषण सहन केलेच जाऊ नये.

माफी मागितली, मग आता पुढं काय?

फोटो स्रोत, Getty Images

'भारतीय कॉमेडीमध्ये पितृसत्ताक व्यवस्थेतील स्त्री-पुरुष भेद आडवा आला' असं त्रिया गुलाटी आपल्या 'द प्रिंट'मधील लेखात म्हणते.

'इंडियाज गॉट लेटंट'मधील अपूर्वा मुखीजा आठवते का? हो, तीच ती. रणवीर अलाहाबादियासोबत वादग्रस्त शोमध्ये तीही होती. त्यानंतर तिला बलात्काराच्या, ॲसिड अटॅकच्या धमक्यांना सामोरं जावं लागलं होतं. तिच्यावर अनेक एफआयआर झाले होते, तिच्या आईला सोशल मिडीयावरून प्रचंड त्रास दिला गेला होता.

अशी सामाजिक आणि कायदेशीर कायदेशीर कारवाई हिमांशु किंवा प्रणितवर का झाली नसावी? कारण बहुतांश सत्ता पुरुषांच्या हाती असलेल्या समाजात ते पुरुष म्हणून जन्माला आले आहेत. पुरुषांनी अश्लील विनोद केले तर नॉर्मल आहे, मात्र स्त्रियांनी केले तर त्या 'संस्कारहीन' आहेत असं समाजमन सांगतं.

असे विनोद दोघांनीही करू नयेत. मुळात हे 'विनोद' नसून 'गुन्हा' आहे हे दोघांनीही समजून घ्यावं.

कारवाईच्या भीतीपोटी या गोष्टी टाळण्यापेक्षा सारासार विचार करून, या गोष्टींचं गांभीर्य ध्यानात घेऊन बदल व्हायला हवेत. आपल्या आयुष्यातील स्त्रीयांबाबतीत संवेदशील वागणं ही बाब सामान्य आणि बंधनकारक असायला हवी. कशालाच दर्जा नसणं किंवा अगदीच सुमार गोष्टींना ग्लॅमराईज करणं हा स्टँड-अप कॉमेडी आणि जगण्यातील 'ट्रेंड' लवकरच बंद व्हायला हवा. स्त्रीकडे केवळ शरीर म्हणून पाहणं आणि त्या शरीराला भोगण्याचा अमर्याद अधिकार मला आहे या भ्रमातून पुरुषांनी बाहेर पडायला हवं.

आपण कशा प्रकारचा पुरुष बनायचा आहे, हे पुरुषांनी ठरवायला हवं आणि तसं बनण्यासाठी मेहनत घ्यायला हवी.

पूर्वीच्या तुलनेत आता स्त्रिया शिक्षण घेऊन सक्षम आणि स्वत:च्या हक्कांबाबत सजग होत आहेत. त्यांना पुरुषसत्ताक व्यवस्थेतील शोषण समजू लागले आहे. त्यामुळं त्यांना टॉक्सिक पुरुषमैत्री, संकुचित विवाहसंस्था नकोशी वाटत आहे. डोळसपणे निवडलेले मित्र, जोडीदार किंवा विश्वासू नातेवाईक शोषणकर्ते निघाले तर स्त्री पुरुषात निर्माण होणारी दरी मिटवणे अत्यंत अवघड आहे.

स्त्रियांवरील लैंगिक अत्याचाराला 'जोक' म्हणणं हा अतिशय निर्दयी विनोद आहे. पितृसत्ताक समाज आजारी असल्याचा तो पुरावा आहे. हा आजारी समाज बरं करण्याचं आव्हान आपल्या सगळ्यांच्या समोर आहे, कारण ही आजारी पुरुष माणसं आपल्या आसपास आहेत. त्यात आपले मित्र, भाऊ, वडील आणि मुलगेसुद्धा आहेत.

स्त्री आणि पुरुषात निरोगी नातं निर्माण होण्यासाठी या पुरुष माणसांनी लवकर बरं होण्याची गरज आहे.

खरं तर जेंडर बजेटमध्ये पुरूषांची मानसिकता बदलण्यासाठी आर्थिक तरतूद असायला हवी. पुरुषांना 'पुरुष असेच वागणारअशी वागणूक न देता 'आणखी किती वर्षे पुरुष असेच वागणार' हा प्रश्न विचारून' पुरुषांनी माणूस बनायला हवं हा विचार पेरणं जास्त संयुक्तिक आहे. स्त्रीवादी लेखिका सिमोन द बोउआर म्हणते त्यानुसार 'पुरुष पितृसत्ताक घडवले जातात' तर त्यांना 'केवळ माणूस म्हणूनही घडवलं जाऊ शकतं'. यात समाज आणि शासनासोबतच पालकांची जबाबदारीसुद्धा मोलाची असणार आहे. आपली मुलं काय करतात, F ची (Fu*k) की आणखी कोणती भाषा वापरतात, कोणती विचारमूल्ये जपतात याकडं वेळ काढून लक्ष देण्याची गरज आहे.

राहता राहिला मुद्दा बिर्याणीचा तर स्त्रिया कमावत्या असून स्वतःची बिर्याणी त्या विकत घेऊन खाऊ शकतात आणि पुरुषांनाही खायला घालू शकतात. मुद्दा बिर्याणी कुणी कुणाला खाऊ घालावी हाही नाही. तर मुद्दा आहे बिर्याणीच्या मागे लपलेली पुरुषी सेक्सिस्ट मानसिकता बदलण्याचा आणि स्त्री आत्मसन्मानाचा आहे.

(लक्ष्मी यादव डिजिटल क्रिएटर आणि स्त्री-पुरुष समतेवर प्रशिक्षण देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. लेखातील मते लेखिकेची वैयक्तिक मते आहेत.)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)