एल निनोची सुरुवात झाल्याची अधिकृत घोषणा, हवामानात तीव्र बदलाचा वैज्ञानिकांचा इशारा

फोटो स्रोत, Getty Images
जागतिक तापमानवाढीसाठी कारणीभूत असलेल्या पॅसिफिक महासागरातील एल निनोला सुरुवात झाल्याची अधिकृत घोषणा अमेरिकेच्या संशोधकांनी केली आहे. यामुळे हवामानात तीव्र बदल जाणवतील असा इशारा वैज्ञानिकांनी दिला असल्याचे वृत्त बीबीसी न्यूजने दिले आहे.
उष्णकटिबंधीय प्रशांत महासागरात एल निनोची परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही महिन्यात समुद्रपृष्ठ तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे असे अमेरिकेच्या National Oceanic and Atmospheric Administration (NOAA) या संस्थेने म्हटले आहे.
विविध मॉडेल्सच्या साहाय्याने करण्यात आलेल्या अंदाजांनुसार असे सांगण्यात आले आहे की हा एल निनो आणखी तीव्र होऊन 'सुपर एल निनो' ठरू शकतो. आणि आतापर्यंत नोंद झालेल्या एल निनोंमध्ये हा एल निनो सर्वांत तीव्र असण्याचा अंदाज वैज्ञानिकांनी व्यक्त केला आहे.
2027 हे आतापर्यंतचे सर्वाधिक उष्ण वर्ष असण्याचा अंदाज वैज्ञानिकांनी वर्तवला आहे. या तापमानवाढीला मानवीय कारणे जबाबदार आहेत आणि गेल्या अनेक वर्षांतील तापमानवाढीच्या पार्श्वभूमीवर 2027 मध्ये सर्वाधिक उष्ण वर्ष नोंदवले जाण्याचा अंदाज आहे. याचा परिणाम हवामानाच्या संतुलनावर होण्याची शक्यता आहे. परिणामी, 2027 या वर्षात अन्नपुरवठा आणि अर्थव्यवस्था प्रभावित होण्याची शक्यता आहे.
NOAA ची ही घोषणा अनपेक्षित नाही. कारण गेल्या वर्षाच्या अखेरीस एल निनोशी संबंधित थंड हवामान पद्धती म्हणजेच ला निना (La Nina) कमकुवत झाल्यानंतर हवामानतज्ज्ञांनी या उष्ण टप्प्याची अपेक्षा व्यक्त केली होती.
मध्य आणि उष्णकटिबंधीय पॅसिफिक महासागरातील समुद्रपृष्ठ तापमान आता सरासरीपेक्षा 0.5 अंश सेल्सियसने जास्त झाले आहे. अमेरिकन शास्त्रज्ञ एल निनोची व्याख्या करण्यासाठी याच मर्यादेचा वापर करतात.
"गेल्या महिन्यात एल निनोची परिस्थिती विकसित झाली. मध्य ते पूर्व विषुववृत्तीय पॅसिफिक महासागरात समुद्रपृष्ठ तापमान सरासरीपेक्षा जास्त असल्याचे दिसून आले आहे," असे संस्थेने म्हटले आहे.
NOAA ने विषुववृत्तीय पॅसिफिकवरील वाऱ्यांच्या दिशेतही बदल होऊ लागल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. यावरून वातावरण आता उबदार झालेल्या महासागराला प्रतिसाद देत असल्याचे दिसते. म्हणजेच केवळ समुद्राचे तापमान वाढत नसून त्याचा परिणाम वातावरणावरही होऊ लागला आहे.
महाराष्ट्रात मान्सूनची आगेकूच नाही
11 जून ला दुपारी हवामान विभागाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, मान्सून आज पुढे सरकलाय, पण त्यानं आज महाराष्ट्रात आगेकूच केली नव्हती.
नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी कर्नाटक, तेलंगाना आणि आंध्र प्रदेशात तसंच पश्चिम बंगाल आणि बिहारमध्येही आगेकूच केली पण महाराष्ट्रात अजूनही मान्सून हर्णे आणि सोलापूरच्या पुढे सरकला नाही असे हवामान विभागाने म्हटले होते.
पुढच्या दोन तीन दिवसांत मान्सून इथे आगेकूच करू शकतो, त्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला.
दरम्यान, मान्सून सध्या अगदी संथगतीनं वाटचाल करत असून मुंबईसह कोकणात पुढच्या आठवड्यातही पावसात चढउतार पाहायला मिळण्याची शक्यता आहे, असं ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी नमूद केलं.
सध्या महाराष्ट्रावर तुरळक ठिकाणी ढगांचं विरळ आवरण दिसून येतंय. पुढच्या 24 ते 48 तासांत कोकणात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. राज्यातील अंतर्गत भागात मात्र थंडरस्टॉर्म्स येतील, म्हणजेच वीजा, गडगडाटासह सोसाट्याचा वारा आणि काही ठिकाणी पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

फोटो स्रोत, Getty Images
मान्सूनचं आगमन लांबल्यानं उत्तर कोकणात तसंच विदर्भातही उष्णतेचा तडाखा जाणवतो आहे. पुढील काही तासांत ( 24-48 तासांत) विदर्भात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान 42 अंशांवर जाण्याची शक्यता आहे. नागपूर आणि गडचिरोली परिसरात पारा 45 अंशांवरही जाऊ शकतो. तर किनारी भागात, तापमान घटलं असलं तरी दमट हवेमुळे उष्णतेचा त्रास होऊ शकतो.
किनारी प्रदेशांत आणि विदर्भातील अनेक ठिकाणी रात्रीचं किमान तापमानही 30 अंश सेल्सियसवर जाण्याची शक्यता आहे.
11 जूनच्या रात्रीसाठी पालघर, मुंबई, ठाणे, रायगडमध्ये उष्ण आणि दमट हवामानासाठी तर नाशिक आणि पुण्याचा पठारी प्रदेश, अहिल्यानगर, अमरावती, वर्धा, चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेसाठी यलो अलर्ट आहे. तर सातारा, सांगली, कोल्हापूर, बीड, धाराशीव, लातूर, नांदेड, भंडारा, गोंदिया, गडचिरोली इथे वादळी पावसासाठी यलो अलर्ट आहे.

फोटो स्रोत, Getty Images
12 जून रोजीही पालघर, ठाणे, मुंबई, रायगडमध्ये उष्ण व दमट हवामानासठी तर नाशिक आणि पुण्याचा पठारी भाग, अहिल्यानगर आणि चंद्रपूरमध्ये तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेसाठी यलो अलर्ट दिला आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशीव, लातूर, बीड, परभणी, नांदेड या जिल्ह्यांत आणि विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये वादळी पावसासाठी यलो अलर्ट आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.



























