NEET: कथित पेपरफुटी प्रकरणी लातूरमधल्या कोचिंग क्लास संचालकांची चौकशी, आतापर्यंत काय काय घडलं?

नाशिक आरोपी

फोटो स्रोत, Pravin Thackeray

फोटो कॅप्शन, नाशिक येथील आरोपीचे संग्रहित छायाचित्र
    • Author, प्रवीण ठाकरे
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

NEET-UG 2026 परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) शुक्रवारी (15 मे) लातूरमधल्या एका प्रसिद्ध कोचिंग क्लासच्या संचालकांची चौकशी केली. याबाबत पीटीआय या वृत्तसंस्थेने वृत्त दिलं.

लातूरमधल्या एका क्लासच्या संचालकांची सीबीआयच्या पथकाने गुरुवारी (14 मे) रात्री आणि शुक्रवारी (15 मे) पहाटे चौकशी केली.

लातूरमध्ये असलेल्या सीबीआयच्या पथकात 28 सदस्यांचा समावेश आहे.

दरम्यान, या प्रकरणी गुरूवार (14 मे) संध्याकाळपर्यंत सीबीआयने सात जणांना अटक केली होती. तसेच देशभरातील 14 ठिकाणी छापे टाकले होते.

सीबीआयने या कारवाईबाबत प्रसिद्धिपत्रकात म्हटले होते की, "सीबीआयने याप्रकरणी मंगळवारी (12 मे) गुन्हा नोंदवला होता. हा गुन्हा शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाच्या तक्रारीवरून नोंदवण्यात आला आहे. ही तक्रार NEET-UG 2026 परीक्षेतील कथित पेपर फुटीच्या आरोपांशी संबंधित आहे."

या प्रकरणी बुधवारी (13 मे) एकूण 5 जणांना अटक करण्यात आली होती, तर आता गुरुवारी (14 मे रोजी) आणखी दोन जणांना अटक करण्यात आल्याची माहिती सीबीआयने प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे.

सीबीआयच्या विशेष पथकांनी मंगळवारपासून सातत्यपूर्ण कारवाया सुरू केल्या आहेत. त्याच मोहिमेअंतर्गत गेल्या 24 तासांत आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यातील एका व्यक्तीला पुण्यातून तर दुसऱ्या व्यक्तीला अहिल्यानगर येथून अटक केली.

इतर अनेक संशयितांची चौकशी सुरू असून पुढील कारवाई केली जात आहे. या प्रकरणाशी संबंधित सर्व माहिती सीबीआय तपासून पाहत आहे, असे त्यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

दरम्यान, CBI ने याआधी केलेल्या कारवाईबद्दल 13 मे रोजी प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली होती.

या पत्रकात म्हटलं होतं, "सीबीआयनं 12 मे 2026 ला या प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. NEET UG-2026 परिक्षा घेताना अनियमितता आणि कथितरीत्या पेपरफुटी प्रकरणात, भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाकडून जी लेखी तक्रार करण्यात आली, त्याच्या आधारे हा गुन्हा नोंदवण्यात आला होता.

"गुन्हेगारी कट, फसवणूक, गुन्हेगारी स्वरुपाचा विश्वासघात आणि भारतीय न्याय संहिता (बीएनएस), प्रीव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्ट आणि द पब्लिक एक्झामिनेशन्स (प्रीव्हेन्शन ऑफ अनफेअर मीन्स) ॲक्ट, 2024 अंतर्गत इतर संबंधित तरतुदींनुसार येणाऱ्या गुन्ह्यांसाठी हा एफआयआर नोंदवण्यात आला होता," असे सीबीआयने प्रसिद्धिपत्रकात म्हटले होते.

पुढे सीबीआयने म्हटले होते, "आतापर्यंत, या प्रकरणात सीबीआयनं 5 आरोपींना अटक केली आहे. त्यातील 3 जणांना जयपूरमधून तर एकाला गुरुग्राम आणि एकाला नाशिकमधून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात सध्या इतरही अनेक संशयितांची चौकशी सुरू आहे."

"सीबीआयनं देशातील अनेक ठिकाणी झडत्यादेखील घेतल्या आहेत. समोर येत असलेल्या नव्या धाग्यादोऱ्यांच्या आधारे, पुढील झडत्या आणि तपासकार्य सुरू आहे.

"या झडत्या घेताना आणि अटक करत असताना, गुन्ह्याशी संबंधित अनेक पुरावे आणि मोबाईल फोनसह इलेक्ट्रॉनिक उपकरणं जप्त करण्यात आली आहेत. तपास करताना सीबीआय, राजस्थानच्या स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप (एसओजी) बरोबर समन्वय साधून आहे. स्पेशल ऑपरेशन्स ग्रुपनंच या प्रकरणाची प्राथमिक चौकशी केली होती.

"सीबीआय या कथित पेपरफुटी प्रकरणाशी संबंधित सर्व धाग्यादोऱ्यांच्या पाठपुरावा सखोल तांत्रिक आणि फॉरेन्सिक विश्लेषणाद्वारे करतं आहे. तसंच या प्रकरणाचा सर्वसमावेशक, निष्पक्ष आणि व्यावसायिक किंवा निपुण स्वरुपाचा तपास करण्यासाठी सीबीआय कटिबद्ध आहे, असे सीबीआयने आपल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले.

काय होता आधीचा घटनाक्रम?

याप्रकरणी, पोलिसांनी 12 मे रोजी कारवाई करत सर्वात आधी नाशिकमधून एका 30 वर्षीय संशयिताला ताब्यात घेतले होते.

NEET परीक्षेचा पेपर नाशिकमधून टेलिग्राम ग्रुपवर फॉरवर्ड करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली होती.

दरम्यान, मंगळवारी (12 मे) सायंकाळी नाशिक पोलिसांनी आरोपीला CBI च्या ताब्यात दिलं होतं.

या संशयित आरोपीचं नाव शुभम खैरनार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पहिला प्रश्नपत्रिकेचा संच इथूनच एका टेलिग्राम ग्रुपवर पाठवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले होते.

दरम्यान, या प्रकरणात आपल्या मुलाचा या प्रकरणाशी संबंध नाही. तो निर्दोष सुटेल, असं त्याच्या वडिलांनी म्हटलं होतं.

नाशिक पोलिसांनी काय माहिती दिली होती?

नाशिक पोलिसांनी अशी माहिती दिली होती की "प्रश्नपत्रिका फुटल्यानंतर तिची पहिली कॉपी नाशिकमधून समोर आली होती. नाशिकमधून लीक झालेला हा प्रश्नपत्रिकेचा संच हरियाणात पोहोचला.

नाशिकचे पोलीस उपायुक्त, किरणकुमार चव्हाण.

फोटो स्रोत, UGC

फोटो कॅप्शन, नाशिकचे पोलीस उपायुक्त, किरणकुमार चव्हाण.

"तिथे या लीक झालेल्या पेपरचे 10 संच तयार करण्यात आले होते. त्यानंतर NEET ची प्रश्नपत्रिका हरियाणातून बिहार, आंध्र प्रदेश आणि जम्मू-काश्मीरपर्यंत सहज पोहोचली," असे पोलिसांनी सांगितले होते.

पेपर लीकनंतर नीट परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयामुळं विद्यार्थी संघटनांनी भोपाळमध्ये परीक्षांमधील अनियमितता प्रकरणी आंदोलन केलं.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, पेपर लीकनंतर नीट परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयामुळं विद्यार्थी संघटनांनी भोपाळमध्ये परीक्षांमधील अनियमितता प्रकरणी आंदोलन केलं.

नाशिक पोलिसांच्या माहितीनुसार, "देशभरातून एकूण 16 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यापैकी एक संशयिताला नाशिकमधून ताब्यात घेण्यात आलं.

"राजस्थान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही त्याला ताब्यात घेतलं. तो सीहोर येथील सत्यसाई युनिव्हर्सिटीत BAMS च्या अंतिम वर्षात शिक्षण घेत होता," असं पोलिसांनी सांगितले होते.

'देवदर्शनासाठी निघाला होता आरोपी'

पोलिसांनी सांगितलं होतं, "आमच्याकडे नाव होतं, पण पत्ता आणि इतर माहिती नव्हती. काही तांत्रिक माहिती मिळाल्यानंतर आम्ही आरोपीचा शोध सुरू केला.

"त्याने कपडे बदलले होते आणि मुंडण केलं होतं. तो देवदर्शनासाठी जात असताना त्याला ताब्यात घेण्यात आलं आणि त्याची चौकशी करण्यात आली."

त्याने पेहराव बदलला होता तरी त्याला ओळखून पोलिसांनी संशयिताला नाशिकमधून ताब्यात घेतले आणि नंतर सीबीआयकडे सोपवले, अशी माहिती नाशिक पोलिसांनी दिली होती.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)