मुंबईत पावसाचा कहर, रस्ते जलमय, जनजीवन विस्कळीत; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट

फोटो स्रोत, Getty Images
कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात 3 जुलैला मुसळधार पाऊस झाला. मुंबईसह उपनगरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागांत पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झाले.
आज 4 जुलैरोजी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी 'रेड अलर्ट' देण्यात आला आहे. तसेच नागरिकांनी अत्यावश्यक असेल तेव्हाच घराबाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दरम्यान, राज्यात 3 ते 7 जुलैदरम्यान पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार, तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
याशिवाय, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून विदर्भातही 3 ते 7 जुलैदरम्यान विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्र किनारपट्टी तसेच दक्षिण महाराष्ट्र-गोवा किनारपट्टीवर ताशी 40 ते 65 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने पुढील पाच दिवस मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा स्पष्ट इशारा हवामान विभागाने दिला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने राज्यात 4 ते 6 जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी 'रेड अलर्ट' देण्यात आला असून नागरिकांनी अत्यावश्यक असेल तेव्हाच घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागाने 4 जुलै रोजी सकाळी 9.30 च्या सुमारास जारी केलेल्या नाऊकास्टनुसार, आज दुपारी 1 वाजेपर्यंत महाराष्ट्रातील काही भागांत ताशी 15 मिमीपेक्षा अधिक तीव्रतेचा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पालघर, ठाणे, मुंबई उपनगर आणि रायगड जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला असून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), जालना आणि नांदेड जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आली आहे.
संबंधित जिल्ह्यांतील नागरिकांनी सतर्क राहावे, अनावश्यक प्रवास टाळावा, पाणी साचलेल्या ठिकाणी आणि कमी दृश्यमानतेच्या परिस्थितीत विशेष काळजी घ्यावी तसेच हवामान विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईत पावसाने जनजीवन विस्कळीत
यंदा मान्सून उशिरा दाखल झाल्यानंतर गेल्या आठवडाभरापासून मुंबईत सातत्याने पाऊस सुरू असून त्याचा दैनंदिन जनजीवनावर मोठा परिणाम होत आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, शनिवारी 4 जुलैरोजी मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो, तर काही भागांत अतिवृष्टीचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मुंबईसाठी पुढील दोन दिवस 'रेड अलर्ट' कायम ठेवण्यात आला असून अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

फोटो स्रोत, @RMC_Mumbai
कुलाबा वेधशाळेने पुढील 24 तासांकरिता वर्तविलेल्या अंदाजानुसार मुंबई शहर व उपनगर परिसरात संततधार पाऊस सुरू राहील. काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाच्या अंदाजासह अधूनमधुन ताशी 50 ते 60 किमी वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याचीही दाट शक्यता आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठीही 4 आणि 5 जुलै रोजी 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला असून काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
मुसळधार पावसामुळे स्थानिक वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असून सखल भागांत पाणी साचण्याचा धोका आहे.
रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस
रायगड जिल्ह्यात शनिवारी (4 जुलै) अनेक तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाची नोंद झाली. पोलादपूरमध्ये सर्वाधिक 222 मिमी पाऊस पडला असून तेथे अतिवृष्टीची नोंद झाली. याशिवाय म्हसळा (176 मिमी), महाड (162 मिमी), तळा (133 मिमी), सुधागड (116 मिमी) आणि मुरूड (113 मिमी) येथेही मुसळधार पाऊस झाला.
पेणमध्ये 100 मिमी, माणगावमध्ये 102 मिमी, माथेरान आणि खालापूरमध्ये प्रत्येकी 92 मिमी, उरणमध्ये 82 मिमी, रोहा 79 मिमी, पनवेल 78.2 मिमी, श्रीवर्धन 77 मिमी आणि कर्जतमध्ये 68 मिमी पावसाची नोंद झाली.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
दरम्यान, हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत पुण्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली. शिवाजीनगर येथे 30.5 मिमी, पाषाण येथे 31.4 मिमी, तर लोहेगाव येथे 29 मिमी पाऊस झाला.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, शनिवार-रविवारीही पुणे आणि परिसरात पावसाची हजेरी कायम राहण्याची शक्यता असून, अधूनमधून मध्यम ते जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
गेल्या 24 तासांत महाबळेश्वरमध्ये 266 मिमी पावसाची नोंद झाली असून, भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार हा पावसाचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या भागांपैकी एक ठरला आहे. शनिवार-रविवारीही महाबळेश्वरसाठी 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे.
अतिमुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी आणि पर्यटकांनी विशेष सतर्कता बाळगावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)


























