You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
एक चुकीचे वळण आणि ट्रेकरची जंगलात वाट चुकली; फक्त पाणी पिऊन जंगलात चार दिवस कसे काढले?
- Author, इमरान कुरेशी
- Role, बीबीसी हिंदीसाठी
- वाचन वेळ: 6 मिनिटे
कर्नाटकच्या कोडागुमध्ये ताडियांडामोल ट्रेकिंग दरम्यान रस्ता विसरल्यामुळे चार दिवस बेपत्ता झालेली आयटी प्रोफेशनल सरन्या जीएस आता त्यांच्या पुढच्या ट्रेकला जावं की नाही असा विचार करत आहे.
पुढच्या महिन्यात अरुणाचलच्या तवांगमध्ये ट्रेकिंगला जाण्याचा त्यांचा प्लॅन होता. पण आता तिथे जाण्याबाबत त्यांना धास्ती वाटतेय. केवळ घरच्यांच्या परवानगीचाच प्रश्न नाहीये तर अलीकडेच घडलेल्या घटनेचा ही त्यांच्या मनावरही खोल परिणाम झाला आहे.
केरळच्या कोझिकोड येथील रहिवासी असलेल्या 36 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर सरन्या यांनी बीबीसी न्यूज हिंदीशी बोलताना सांगितले, "आता अडचण अशी आहे की, लोक तुम्हाला ओळखायला लागतात. यामुळे खूप दडपण येतं आणि सतत चर्चेत राहणं कसं हाताळायचं हेच मला कळत नाही."
कूर्गमधील मडिकेरी येथे सरन्या यांना आलेल्या 2.5 तासांच्या ट्रेकच्या अनुभवानंतर वन विभाग सतर्क झाला आहे.
ट्रेकिंगचे मार्ग व्यवस्थित आखण्यासाठी आणि सुरक्षेचे नियम कडक करण्यासाठी पुढील चार दिवस ट्रेकिंग बंद ठेवण्यात आले आहे.
मडिकेरी विभागाचे वन अधिकारी (डिप्टी कन्झर्व्हेटर ऑफ फॉरेस्ट्स) अभिषेक व्ही. यांनी 'बीबीसी न्यूज हिंदी'ला सांगितले, "अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी आम्ही मार्गावर स्पष्ट खुणा (ट्रेल मार्किंग) आणि सुरक्षेचे नवे नियम लागू करत आहोत. तसेच आम्ही एक नवीन यंत्रणा तयार करत आहोत ज्यामध्ये स्थानिक आदिवासी समुदायाचे लोक ट्रेकिंग ग्रुप्ससोबत मार्गदर्शक म्हणून जातील."
नेमकं काय घडलं होतं?
सरन्या यांनी 2 एप्रिलसाठी 'अरण्यविहार' वेबसाइटवर ऑनलाईन नोंदणी केली होती.
वन अधिकारी अभिषेक सांगतात, "त्या चेक पोस्टवर एकट्याच पोहोचल्या होत्या. त्यामुळे आम्ही 10 जणांचा एक गट तयार केला. ज्यामध्ये आमचे काही वन कर्मचारी देखील होते आणि त्यानंतर त्यांना पुढे जाण्याची परवानगी दिली. ट्रेक सकाळी साधारण 8.30 वाजता सुरू झाला."
ते म्हणाले, "हा अतिशय छोटा आणि सोपा ट्रेक आहे. दुपारी 12.30 पर्यंत सगळेजण परत आले होते. पण सरन्या काही दिसल्या नाहीत."
अभिषेक पुढे सांगतात, "आम्ही जेव्हा सरन्या ज्या होमस्टेमध्ये थांबल्या होत्या तिथल्या मालकाला फोन केला. तेव्हा त्या रस्ता भटकल्याचं आम्हाला समजलं."
ही माहिती मिळताच वन अधिकाऱ्यांनी आपले पथक रवाना केले. या शोधमोहिमेत कर्नाटक पोलिसांच्या नक्षलविरोधी पथकाचाही (ANF) समावेश करण्यात आला होता. अभिषेक यांनी माहिती दिली की, त्या बचाव पथकामध्ये साधारण 70-80 लोक सहभागी होते.
सरन्या ट्रेकवर जाण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. गेल्या 7-8 वर्षांपासून त्यांनी कुद्रेमुख, चिकमंगळूर, कर्नाटकचे ब्रह्मगिरी हिल्स आणि महाराष्ट्रातील नाशिकमधील हरिहर किल्ला अशा विविध ठिकाणी ट्रेकिंग केले आहे.
सरन्या सांगतात, "2 तासांत आपण शिखरावर पोहोचू असे आम्हाला सांगण्यात आले होते. त्यामुळे सकाळी 10.45 वाजता आम्ही खाली उतरायला सुरुवात केली. माझ्या पुढे दोन लोक होते आणि मागेही काही जण होते. मी त्यांची वाट पाहण्यासाठी थांबले ते एका खडकावर बसले होते."
अभिषेक यांनी सांगितले, "आम्ही जेव्हा नंतर त्यांच्याशी बोललो तेव्हा समजले की त्या काहीतरी पाहण्यासाठी थोड्या आत गेल्या होत्या. त्या परत आल्या तेव्हा इतर लोक पुढे निघून गेले होते."
सरन्या म्हणाल्या की, जेव्हा त्यांनी मागे वळून पाहिले जिथे ते लोक खडकावर बसले होते तेव्हा तिथे कोणीच नव्हते. मी गूगल मॅप्सचा वापर केला ज्याने मला डाव्या बाजूला जाऊन सरळ चालण्यास सांगितले. पण मला तिथे कोणीच दिसले नाही. मी रस्ता चुकले होते."
सात तास सलग चालत राहिल्या
सरन्या यांनी सांगितले, "मी सतत चालत राहिले. संध्याकाळी 6.45 वाजेपर्यंत. हो, सकाळी 10.45 पासून संध्याकाळी 6.45 पर्यंत मी चालतच होते. या संपूर्ण काळात मी होमस्टेच्या मालकाला फोन करण्याचा प्रयत्न करत होते. पण कोणत्याही नंबरवर संपर्क होऊ शकला नाही. दुपारी साधारण 2.45 च्या सुमारास माझ्या फोनची बॅटरी संपली आणि फोन बंद झाला." त्यांनी शेवटचा कॉल होमस्टेच्या मालकाला केला होता जे त्यांना घेण्यासाठी चेक पोस्टवर वाट पाहत होते.
सरन्या यांच्या म्हणण्यानुसार, "मी होमस्टे मालकाला फोन करून सांगितले की मी रस्ता चुकली आहे. आणि त्यांनी चेक पोस्टला याची माहिती द्यावी. पण मला वाटत नाही की त्यांना माझे म्हणणे नीट समजले. मी घरच्यांना निरोप देण्यासाठी मित्राला मेसेज टाईप केला होता पण तो पाठवण्याआधीच फोन बंद पडला."
संध्याकाळी 6.45 वाजता त्यांना एक छोटा नाला आणि खडकाळ भाग दिसला. त्या म्हणाल्या, "अंधारात चालणे सुरक्षित नाही. याची मला जाणीव झाली. त्यामुळे त्या खडकांवर थांबण्याशिवाय माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता." तोपर्यंत सरन्या यांनी सकाळी सोबत आणलेले एक केळे खाल्ले होते आणि त्यांच्याकडील 500 मिलीलीटर पाण्याची बाटलीही संपली होती.
त्या सांगतात, मी डगमगले नव्हते. पण एकदा उतारावरून घसरून दगडावर पडले तेव्हा थोडी घाबरले. पण त्याच क्षणी त्यांना परिस्थितीचं भान आलं.
त्या म्हणतात, "मी मनाशी पक्कं केलं की आता घाबरून चालणार नाही. तशी मी स्वभावाने खूप शांत नाहीये."
त्या जागी पोहोचल्यावर त्या 50 मिनिटे झोपल्या.
"रात्री 7.50 ला जाग आल्यावर मी सावध झाले. आजूबाजूला बारीक लक्ष होतं. जंगलातून विचित्र आवाज येत होते पण तिथे हत्तींची विष्ठा किंवा रानमांजरांच्या पंजांच्या खुणा नव्हत्या."
त्यांना एकाच गोष्टीचं वाईट वाटत होतं की पुन्हा शिखराकडे गेल्या नाहीत जेणेकरून तिथून संपूर्ण परिसराचा अंदाज घेता आला असता आणि त्या कोणाच्या तरी नजरेस पडू शकल्या असत्या.
शुक्रवारी सकाळी त्यांनी पुन्हा शिखराकडे जाण्याचा प्रयत्न केला. पण स्नायूंमध्ये पेटके येत होते. मी वर चढू शकले नाही. त्यामुळे मी तिथेच थांबण्याचा आणि शक्य तितके पाणी पिण्याचा निर्णय घेतला. मी रोज नाल्यातून 3 लिटर पाणी प्यायले. मला वजन कमी करण्यासाठी उपवास करण्याची सवय असल्याने भूक लागली तरी त्रास झाला नाही.
सरन्या यांना आशा होती की, शोधमोहिमेसाठी ड्रोन उडताना दिसतील किंवा एखादे बचाव पथक त्यांचा आवाज ऐकेल पण आसपास मानवी वावराच्या कोणत्याही खुणा नव्हत्या. शुक्रवारीही त्या झोपू शकल्या नाहीत. शनिवारी पाऊस सुरू झाला तेव्हा त्या एका मोठ्या झाडाखाली थांबल्या होत्या मात्र पावसात त्या पूर्णपणे भिजल्या.
रविवारी देखील हवामान ढगाळ होते. दुपारी साधारण 12.15 वाजता त्यांनी पुन्हा शिखराच्या दिशेने चालण्याचा निर्णय घेतला. त्याच वेळी त्यांना नाल्याच्या दुसऱ्या बाजूने एक आवाज ऐकू आला. त्यांनी ओरडून त्याला प्रतिसाद दिला. त्यांना तिथेच झाडापाशी थांबायला सांगण्यात आले. नंतर त्यांना समजले की, ते लोक बचाव पथकाचा भाग होते आणि आसपासच्या गावातून आले होते. सरन्या यांनी सांगितले, "त्यांनी मला पाणी आणि बिस्किटे दिली."
जेव्हा त्या संध्याकाळी सुमारे 6.15 वाजता चेक पोस्टवर पोहोचल्या तेव्हा त्यांचे कुटुंबीय, शेजारी, मित्र आणि सहकारी त्यांना घेण्यासाठी तिथे हजर होते. त्यानंतर अधिकाऱ्यांनी त्यांचा जबाब नोंदवून घेतला.
वन अधिकाऱ्यांच्या मते, सरन्या बेपत्ता होण्यामागे कोणताही संशयास्पद प्रकार नव्हता. नाव न सांगण्याच्या अटीवर एक अधिकारी म्हणाला, "जंगलात रस्ता चुकणं आणि दुसऱ्याच ठिकाणी पोहोचणे हे कोणासोबतही घडू शकतं."
अशा घटनांकडे वन विभाग गांभीर्याने पाहतो. आणि अशा आणीबाणीच्या परिस्थितीत वन अधिकारी मोठ्या संख्येने शोध पथके पाठवतात. करण फेब्रुवारी 2022 मध्ये केरळच्या पलक्कडमध्ये कुरुम्बाची डोंगरात अशाच प्रकारे अडकलेल्या एका 23 वर्षांच्या मुलाला वाचवण्यात आले होते.
आर. बाबू आपल्या तीन मित्रांसह 1,000 मीटर उंच कुरुम्बाची टेकड्यांवर चढले होते. दरम्यान बाबू एका खडकाच्या फटीत पडले आणि त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्या अवस्थेत ते तब्बल 45 तास अन्न-पाण्याशिवाय तिथेच अडकून पडले होते.
पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने बचाव मोहीम राबवली. ज्यामध्ये NDRF च्या पथकाचाही समावेश होता. अखेर बंगळुरूच्या पॅराशूट रेजिमेंटल सेंटर आणि वेलिंग्टनच्या मद्रास रेजिमेंटल सेंटरच्या विशेष पथकाने दोरखंडांच्या मदतीने त्यांना त्या भेगेतून सुरक्षित बाहेर काढले.
सरन्या यांच्या पालकांची प्रतिक्रिया
सरन्या सांगतात, "माझे आई-वडील खूप आनंदी होते. मी त्यांना असं कोणतंही वचन दिलेलं नाही की मी आता पुन्हा ट्रेकिंगला जाणार नाही. माझे वडील फक्त एवढंच म्हणाले की, ते मला अडवू शकत नाहीत पण आम्ही जिथे कुठे असू तिथली माहिती त्यांना देत राहावी."
जेव्हा त्यांना विचारलं की, ग्रुपपासून संपर्क तुटल्यावर इतर ट्रेकर्सना त्या काय सल्ला देतील? तेव्हा त्या म्हणाल्या, "मी ट्रेकर्सना सल्ला देणारी तज्ज्ञ नाही. माझ्यासाठी हा फक्त एक छंद आहे. या अनुभवातून मी इतकंच शिकले आहे की, वाट चुकण्याआधी ज्या ठिकाणाहून तुम्ही सुरुवात केली होती त्याच ठिकाणी परत जाण्याचा प्रयत्न करावा."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)