मेस्सीच्या हातातला चिमुकला झाला आज त्याचाच प्रतिस्पर्धी, कोण आहे लामिन यमाल?

फोटो स्रोत, Getty Images
फुटबॉलमध्ये खेळाची मशाल एका पिढीतल्या खेळाडूकडून दुसऱ्या पिढीकडे सोपवण्याची चर्चा अनेकदा होते. त्या दोन पिढ्या एकमेकांसमोर मैदानात उभ्या राहण्याचा प्रसंग क्वचितच येतो.
स्पेनचा 19 वर्षांचा स्टार लामिन यमाल आणि अर्जेंटिनाचा महान खेळाडू लिओनेल मेस्सी यांच्याबाबत सध्या अशीच चर्चा सुरू आहे.
जवळपास दोन दशकांपूर्वी बार्सिलोनाच्या एका धर्मादाय कार्यक्रमात 20 वर्षांच्या मेस्सीने 6 महिन्यांच्या एका बाळाला हातात घेत फोटो काढला होता. त्या वेळी कुणालाही कल्पना नव्हती की, ते बाळ पुढे जगातील सर्वाधिक चर्चेतील फुटबॉलपटूंपैकी एक बनेल.
आज तोच लामिन यमाल स्पेनचा प्रमुख खेळाडू म्हणून उदयास आला आहे आणि मेस्सीला संभाव्य प्रतिस्पर्धी म्हणून सामोरं जाण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे.
लामिन यमालचे वडील मोरोक्कोचे, तर आई इक्वेटोरियल गिनीमधून स्पेनमधील स्थलांतरित. यमाल बार्सिलोनाजवळच्या रोकाफोंडा परिसरात वाढला.
तेथून बार्सिलोनाच्या 'ला मॅसिया' अकादमीपर्यंतचा आणि पुढे युरो 2024 मधील ऐतिहासिक गोल करण्यापर्यंतचा त्याचा प्रवास थक्क करणारा आहे.
विक्रमांच्या मालिकेतून पुढे आलेल्या या तरुणाकडे आज फुटबॉलच्या भविष्यातील सर्वांत मोठा चेहरा म्हणून पाहिलं जात आहे.
स्थलांतरित कुटुंबातून जागतिक फुटबॉलपर्यंत
लामिन यमालची कहाणी ही केवळ एका प्रतिभावान फुटबॉलपटूची नाही, तर स्थलांतरित कुटुंबाच्या संघर्ष आणि यशाचीही कहाणी आहे.
यमालचे वडील मोनिर नास्राउई यांचा जन्म मोरोक्कोमध्ये झाला, तर आई शीला एबाना या इक्वेटोरियल गिनीमधील आहेत. चांगल्या आयुष्याच्या शोधात त्यांचं कुटुंब स्पेनमध्ये स्थायिक झालं. बार्सिलोनाजवळील मातारो परिसरातील रोकाफोंडा या साध्या वस्तीत यमालचं बालपण गेलं.
युरो 2024 दरम्यान यमाल जगभरात चर्चेचा विषय बनला असताना त्याचे वडील अभिमानाने म्हणाले होते, "तो जन्माला आला तेव्हाच आम्हाला वाटलं होतं की हा मुलगा काहीतरी मोठं करणार आहे."

फोटो स्रोत, Joan Monfort/AP
यमालची कहाणी अधिक रंजक बनवणारी गोष्ट म्हणजे त्याचा आणि लिओनेल मेस्सीचा प्रसिद्ध फोटो.
2007 मध्ये युनिसेफच्या एका कार्यक्रमासाठी मेस्सी बार्सिलोनामध्ये आला होता. त्यावेळी अवघ्या काही महिन्यांच्या यमालला त्याच्या हातात देण्यात आलं होतं आणि त्यांचे फोटो काढण्यात आले होते. त्या छायाचित्रांना नंतर जगभर प्रसिद्धी मिळाली.
आज अनेक चाहत्यांना त्या फोटोमध्ये फुटबॉलच्या एका महान युगाकडून दुसऱ्या युगाकडे मशाल हस्तांतरित होत असल्याचं प्रतीक दिसतं.
'ला मॅसिया'मध्ये घडलेला हिरा
यमालच्या फुटबॉल कौशल्याची झलक लहानपणापासूनच दिसू लागली होती. त्याची गुणवत्ता लक्षात आल्यानंतर त्याला बार्सिलोनाच्या प्रसिद्ध 'ला मॅसिया' अकादमीत दाखल करण्यात आलं.
फुटबॉल जगतात 'ला मॅसिया' ही फक्त अकादमी नसून प्रतिभावान खेळाडूंना घडवणारी कार्यशाळा मानली जाते. याच ठिकाणी लिओनेल मेस्सी, झावी, आंद्रेस इनिएस्ता आणि अनेक महान खेळाडू तयार झाले.
यमाललाही इथं शिक्षण, राहणं, प्रशिक्षण आणि व्यावसायिक फुटबॉलसाठी आवश्यक असलेलं सर्व वातावरण मिळालं. प्रशिक्षकांचा विश्वास होता की, त्याच्याकडे वेगळ्या प्रकारची गुणवत्ता आहे. त्याची चेंडूवरील पकड, खेळाची समज आणि कठीण प्रसंगी शांत राहण्याची क्षमता त्याला इतरांपेक्षा वेगळं ठरवत होती.

फोटो स्रोत, Getty Images
कमी वयातच यमालने एकामागोमाग एक विक्रम मोडायला सुरुवात केली.
बार्सिलोनाच्या वरिष्ठ संघासाठी खेळणारा सर्वांत तरुण खेळाडू म्हणून त्याने नाव कमावलं. त्यानंतर स्पेनच्या राष्ट्रीय संघासाठी खेळताना आणि गोल करतानाही त्याने वयासंबंधीचे विक्रम मोडले.
युरो 2024 मध्ये फ्रान्सविरुद्धच्या उपांत्य फेरीतील गोलामुळे तो युरोपियन चॅम्पियनशिपमध्ये गोल करणारा सर्वांत तरुण फुटबॉलपटू ठरला. या गोलानंतर जगभरातील फुटबॉलतज्ज्ञांनी त्याची तुलना पुढच्या पिढीतील सर्वात मोठ्या प्रतिभांशी करायला सुरुवात केली.
304 चा आकडा
प्रसिद्धी, पैसा आणि जागतिक ओळख मिळाल्यानंतर अनेक खेळाडूंचं त्यांच्या मुळांशी असलेलं नातं कमकुवत होतं. मात्र यमालच्या बाबतीत तसं दिसत नाही.
गोल केल्यानंतर तो अनेकदा हाताच्या बोटांनी '304' हा आकडा दाखवताना दिसतो. हा आकडा त्याच्या बालपणाशी जोडलेला आहे. रोकाफोंडा परिसराच्या पोस्टल कोडमधील शेवटचे अंक 304 आहेत.
यमालसाठी हे केवळ एक सेलिब्रेशन नाही. तो जिथून आला, ज्या परिसराने त्याला घडवलं, त्या समुदायाला दिलेला सलाम आहे. त्याप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता आहे.
आता मेस्सीसमोर उभा राहणारा यमाल
काही वर्षांपूर्वी मेस्सीच्या हातात असलेलं बाळ आज जागतिक फुटबॉलमधील सर्वांत चर्चेतलं नाव बनलं आहे.
एकीकडे आठ वेळा बॅलन डी'ऑर जिंकणारा, आधुनिक फुटबॉलमधील महान खेळाडू मानला जाणारा लिओनेल मेस्सी आहे. दुसरीकडे अद्याप कारकिर्दीची सुरुवात असलेला पण अमर्याद क्षमता असलेला लामिन यमाल.

फोटो स्रोत, Getty Images
म्हणूनच हे दोन खेळाडू एकाच मैदानावर समोरासमोर येण्याची शक्यता निर्माण होताच फुटबॉल चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. एकेकाळी ज्याच्यासोबत फोटो काढला गेला, त्याच दिग्गजाविरुद्ध आता यमाल खेळणार आहे. हा सामना केवळ दोन संघांमधील स्पर्धा नसून फुटबॉलच्या दोन पिढ्यांच्या भेटीचं प्रतीक म्हणूनही पाहिला जात आहे.
यमालची कारकीर्द अजून सुरुवातीच्या टप्प्यात आहे. तो मेस्सीसारखी यशस्वी वाटचाल करेल की नाही, याचं उत्तर काळ देईल. मात्र एवढं निश्चित आहे की, रोकाफोंडाच्या रस्त्यांवरून निघालेला हा तरुण आज जागतिक फुटबॉलच्या केंद्रस्थानी पोहोचला आहे आणि पुढची अनेक वर्षं त्याच्याकडे जगाचं लक्ष लागलेलं असणार आहे.
(गॅरी रोज बीबीसी स्पोर्ट्स, म्युनिक यांच्या वृत्तांकनासह)
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
























