'मागून गोळी आली अन् कान चिरत गेली', नूतन टोप्पो यांचा दावा, पोलीस म्हणतात,'गोळीबार झालाच नाही'

जंतर-मंतरवर गोळीबार झाला नव्हता तर नूतन टोप्पो जखमी कशा झाल्या?

फोटो स्रोत, Md. Sartaj Alam/BBC

    • Author, मोहम्मद सरताज आलम
    • Role, बीबीसी हिंदीसाठी, रांचीहून
  • Published
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

"मला व्यवस्थित आठवतंय की एक गोळी माझ्या उजव्या कानाला चाटून निघून गेली. माझा कान अनेक ठिकाणी फाटला होता. मी हात लावला, तेव्हा फक्त रक्तच रक्त होतं."

हा दावा केलाय झारखंडमधील गुमला जिल्ह्यातील पुग्गू करमदीपा गावातील नूतन टोप्पो यांनी. त्या 20 जुलै रोजी नवी दिल्लीत कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी) आणि विद्यार्थी संघटनांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या हजारो तरुणांच्या जंतर-मंतर ते संसद 'चलो संसद' मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या.

नूतन टोप्पो यांचा हा दावा राम मनोहर लोहिया रुग्णालयाच्या डिस्चार्ज समरीमधूनही ठळक झाल्यासारखा दिसतो. त्यांना जखमी अवस्थेत याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

20 जुलैच्या डिस्चार्ज समरीमध्ये नमूद करण्यात आलं आहे की नूतन यांच्या "कानाला गनशॉट लागला आहे."

मात्र, दिल्ली पोलीस आणि केंद्र सरकारकडून या आंदोलनादरम्यान गोळीबार झालाच नसल्याचं सातत्याने सांगितलं जात आहे.

यावरून वादही निर्माण झाला आहे. मात्र, या आंदोलनादरम्यान पॅलेट गनमुळे जखमी झाल्याची काही इतर प्रकरणंही समोर आली आहेत.

नूतन टोप्पो आंदोलनात कशा पोहोचल्या?

32 वर्षीय नूतन टोप्पो गेली अनेक वर्षं गुरुग्राममध्ये राहून अर्धवेळ नोकरी करत स्पर्धा परीक्षांची तयारी करत होत्या.

विद्यार्थ्यांनी जंतर-मंतर येथे आंदोलन सुरू केल्यानंतर, देशभरातील तरुणांप्रमाणे नूतनही त्यामुळे प्रभावित झाल्या. आंदोलनात सहभागी होण्यासाठी त्यांनी आपल्या कुटुंबीयांची परवानगी मागितली.

त्या सांगतात, "घरच्यांनी मला मुलांसाठी इलेक्ट्रॉल घेऊन जाण्यास सांगितलं. त्यांना सहकार्य कर आणि त्यांच्यासोबत वेळ घालव, असं त्यांनी सांगितलं."

नूतन टोप्पो आंदोलनात कशा पोहोचल्या?

फोटो स्रोत, Md. Sartaj Alam/BBC

यानंतर नूतन 19 जुलै रोजी सुटी घेऊन जंतर-मंतर येथे पोहोचल्या. त्यांच्या मते, सर्व विद्यार्थी शांततेत आणि अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आंदोलन करत होते.

ज्यांच्या मुलांनी नीट पेपरफुटीमुळे आत्महत्या केली होती, अशा पालकांची तिथं भेट झाली असं त्या सांगतात.

नूतन म्हणतात, "त्यांना पाहून मला खूप वाईट वाटलं. आपल्या मुलांशिवाय हे लोक कसे राहत असतील, असा विचार मनात आला. तेव्हाच मी ठरवलं की 20 जुलैच्या 'चलो संसद' मोर्चाचा भाग व्हायचं."

'समोर बंदुका होत्या, मागून गोळी झाडली गेली

20 जुलैच्या सकाळी साडेनऊच्या सुमारास नूतन जंतर-मंतर येथे पोहोचल्या. त्या तेथील दृश्य आठवताना भावूक होतात.

त्यांच्या दाव्यानुसार, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले विद्यार्थी शांततेत आंदोलन करत होते. तर काही तरुण अनेक दिवसांपासून उपोषणावर होते.

तरुणांची गर्दी 'चलो संसद' मोर्चासाठी पुढे जाऊ पाहात होती. मात्र एका बाजूला बॅरिकेड्स आणि दुसऱ्या बाजूला सुरक्षा दलांची उपस्थिती असल्याने कुणालाही पुढे जाता येत नव्हतं.

'समोर बंदुका होत्या, मागून गोळी झाडली गेली

फोटो स्रोत, Getty Images

नूतन टोप्पो यांच्या मते, तेथे उपस्थित सुरक्षा दलांनी लोकांना पुढे जाण्यापासून रोखण्यासाठी मधूनमधून अश्रुधुराचे गोळे डागले.

त्या सांगतात, "अश्रुधुरामुळे संपूर्ण त्वचा जळत होती. डोळे, तोंड आणि चेहरा सगळं काही भाजल्यासारखं होत होतं. आम्हाला परत जावंसं वाटलं, पण आम्ही ठामपणे तिथेच उभे राहिलो."

नूतन यांचा दावा आहे की 20 जुलै रोजी दुपारी साडेतीन ते चारच्या दरम्यान लाठीमार सुरू झाला.

त्या म्हणतात, "पोलीस पूर्ण सुरक्षा कवच घालून आले होते. आमच्या (विद्यार्थ्यांच्या) हातात काय होतं? फक्त पुस्तकं, बॅनर आणि छोटे-मोठे पोस्टर्स."

त्यांच्या मते, लाठीमारामुळे गर्दी पांगत असे, पण थोड्याच वेळात जवळच्या दुसऱ्या ठिकाणी पुन्हा एकत्र जमायची.

'समोर बंदुका होत्या, मागून गोळी झाडली गेली

फोटो स्रोत, Getty Images

नूतन यांच्या मते, सुरक्षा दलांनी सातत्याने हुसकावून लावल्याने विद्यार्थी मोठ्या संख्येने कनॉट प्लेसच्या चौकात पोहोचले आणि सुरक्षा दलांनी त्यांना घेरलं.

नूतन सांगतात, "तेथे सर्व विद्यार्थ्यांच्या दिशेने सुरक्षा दलातील जवान बंदुका रोखून उभे होते. त्यांना पाहून आम्ही मागे पळायला लागलो. तेवढ्यात आमच्या मागून गोळी झाडण्यात आली. एक गोळी माझ्या कानाला चाटून गेली आणि पूर्ण कान चिरत पुढे निघून गेली."

नूतन यांच्या मते, ही घटना 20 जुलै रोजी सायंकाळी साधारण पाच ते साडेपाचच्या दरम्यान घडली.

त्या सांगतात, "घाबरून मी कानाला हात लावला तेव्हा तो पूर्ण रक्ताने माखलेला होता."

'त्यावेळीही गोळीबार सुरूच होता. मात्र त्यांच्या सहकाऱ्यांनी याची पर्वा न करता त्यांना संरक्षण दिलं, रुग्णवाहिका बोलावली आणि दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल केलं' असा नूतन यांचा दावा आहे.

झारखंडमध्ये बहिणीला मिळाली माहिती

नूतन जखमी झाल्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्वप्रथम त्यांच्या धाकट्या बहिणी नूपुर टोप्पो यांना फोन करून घटनेची माहिती दिली.

नूपुर टोप्पो त्या क्षणाची आठवण सांगताना म्हणतात की अचानक नूतन यांच्या क्रमांकावरून फोन आला आणि नूतन यांना दुखापत झाल्याचं सांगण्यात आलं.

मात्र नेमकी कशी दुखापत झाली हे त्यांना समजू शकलं नाही.

त्या सांगतात, "थोड्या वेळाने स्वतः नूतनचा फोन आला आणि तिने मला सांगितलं की तिला गोळी लागली आहे. मी पूर्णपणे घाबरले. इतक्या दूरून मी लगेच दिल्लीला कसं पोहोचू, हेच मला कळेना."

नूपुर यांनी ही माहिती तात्काळ त्यांच्या 68 वर्षीय आजारी वडिलांना दिली नाही. ही बातमी ऐकून ते घाबरतील, अशी त्यांना भीती होती.

झारखंडमध्ये बहिणीला मिळाली माहिती

फोटो स्रोत, Md. Sartaj Alam/BBC

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

त्या पुढे सांगतात की, त्यांनी धैर्य एकवटून नूतनसोबत असलेल्या सहकाऱ्यांना विनंती केली की त्यांनी नूतनला एकटं सोडू नये आणि रुग्णालयात तिची काळजी घ्यावी.

राम मनोहर लोहिया रुग्णालयात सायंकाळी पावणेसहा ते सहा वाजण्याच्या सुमारास दाखल केल्यानंतर नूतन यांच्या कानावर सुमारे दोन तास शस्त्रक्रिया करण्यात आली.

मात्र शस्त्रक्रिया झाल्यानंतर अवघ्या 15 मिनिटांत रुग्णालयाने त्यांना डिस्चार्ज दिला.

नूतन म्हणतात, "19 आणि 20 जुलैला आम्ही पूर्ण दिवस आंदोलनात होतो. आम्हाला थोडाही आराम मिळाला नव्हता. त्यात गनशॉटनं जखमी झाल्यानंतर मला सर्वाधिक विश्रांतीची गरज होती. पण मला रुग्णालयात ठेवण्यात आलं नाही. शस्त्रक्रियेनंतर केवळ 15 मिनिटांत मला डिस्चार्ज देण्यात आला."

यानंतर सलग तीन दिवस नूतन यांना गुरुग्राममधील त्यांच्या खोलीतून रोज राम मनोहर लोहिया रुग्णालयात उपचार आणि ड्रेसिंगसाठी यावं लागत होतं.

केवळ येण्या-जाण्यावरच दररोज जवळपास 600 रुपये खर्च होत होते. अर्धवेळ नोकरी करून शिक्षणाचा खर्च भागवणाऱ्या विद्यार्थिनीसाठी हे अत्यंत वेदनादायी होतं.

सततची धावपळ, जंतर-मंतरवर पुरेसं पाणी आणि पुरेशी विश्रांती न मिळाल्यामुळे नूतन यांना गंभीर संसर्ग झाला.

त्यांना प्रचंड ताप आला. प्रकृती खालावत असल्याचं दिसताच सहकाऱ्यांच्या मदतीने त्या 25 जुलैच्या सायंकाळी रांचीला पोहोचल्या.

रांची काँग्रेसचे महानगराध्यक्ष कुमार राजा

फोटो स्रोत, Md. Sartaj Alam/BBC

फोटो कॅप्शन, रांची काँग्रेसचे महानगराध्यक्ष कुमार राजा.

रांचीला आल्यानंतर आंदोलनाशी संबंधित विद्यार्थ्यांनी रांची काँग्रेसचे महानगराध्यक्ष कुमार राजा यांच्याशी संपर्क साधला.

नूतन यांची प्रकृती पाहता कुमार राजा यांनी त्यांना तातडीने रांचीतील सिनर्जी ग्लोबल रुग्णालयात दाखल केलं आणि उपचाराचा संपूर्ण खर्च स्वतः उचलला.

कुमार राजा सांगतात की नूतन यांच्या कानाला 10 टाके पडले होते. संसर्ग खूप वाढला होता आणि त्यांना ऐकूही येणं बंद झालं होतं.

ते म्हणतात, "27 जुलैला आम्ही रुग्णालयात एमआरआय, सीटी स्कॅनसह अनेक चाचण्या केल्या. त्यांच्या कानाचा पडदा खराब झाला आहे. त्यामुळे 10 दिवसांनी श्रवण चाचणी (हियरिंग टेस्ट) केली जाणार आहे. त्यांच्यावर उत्तम उपचार व्हावेत आणि पूर्णपणे बऱ्या झाल्यानंतरच त्या आपल्या गावी परत जाव्यात, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत."

या रुग्णालयाने दिलेल्या डिस्चार्ज समरीमध्ये कानाच्या दुखापतीचं कारण पॅलेट गन असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

30 जुलैच्या सायंकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेल्या नूतन टोप्पो यांच्या कुटुंबात त्यांचे आजारी वृद्ध वडील आणि चार बहिणी आहेत. त्यांच्या मोठ्या बहिणीचं लग्न झालं असून त्या रांचीमध्ये राहतात.

नूतन पाचवीत असताना त्यांच्या आईचं रस्ते अपघातात निधन झालं. त्यानंतर त्यांचे वडील टेरेस टोप्पो यांनी अर्धसैनिक दलातील नोकरी सोडली.

त्यांची धाकटी बहीण खुशबू टोप्पो या सिकल सेलच्या रुग्ण आहेत. त्यांना गरजेनुसार दर काही महिन्यांनी रक्त द्यावं लागतं. तर नूपुर टोप्पो फुटबॉल प्रशिक्षक असून त्या आपल्या उत्पन्नातून कुटुंबाला आर्थिक मदत करतात.

अशा आंदोलनांमुळे तरुणांना फायदा होईल का?

या प्रश्नावर नूतन यांचं मत आहे की आजची जेन-झी पिढी पूर्वीप्रमाणे अन्याय गप्प बसून सहन करणारी नाही.

त्या म्हणतात, "आजचे तरुण मानतात की जे चुकीचं आहे ते बदललं पाहिजे. हा बदल घडवून आणण्याचा भाग बनण्यासाठी आणि देशातील तरुणांचं भविष्य बदलताना पाहण्यासाठीच मी जंतर-मंतरला गेले होते."

रांचीतील रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर नूतन यांनी काँग्रेसच्या पत्रकार परिषदेलाही हजेरी लावली.

त्या म्हणतात, "पत्रकार परिषदेत लोकांना जंतर-मंतरवरील प्रत्यक्ष परिस्थिती आणि माझा अनुभव ऐकायचा होता, जेणेकरून त्यांचा आवाज देशापर्यंत पोहोचू शकेल. मी कोणत्याही राजकीय पक्षाचं समर्थन करत नाही."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)