पॉडकास्टमध्ये गुन्ह्याबाबत माहिती सांगितली अन् 4 वर्षांपासून फरार मारेकरी सापडला, पोलिसांची नवी शक्कल

पीटर चॅडविक त्याची पत्नी कुई चू चॅडविक हिच्यासोबत; तिची त्याने हत्या केली होती.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पीटर चॅडविक त्याची पत्नी कुई चू चॅडविक हिच्यासोबत; तिची त्याने हत्या केली होती.
    • Author, शीला फ्लिन
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 8 मिनिटे

पीटर चॅडविक आपल्या पत्नीच्या हत्येतील आरोपी होता. जवळपास चार वर्षे फरार असलेल्या पीटरला कॅलिफोर्निया पोलिसांनी मोठ्या चतुराईनं पकडलं.

त्याच्या गुन्ह्याबद्दल एक पॉडकास्ट प्रसारित केल्यानंतर त्याला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे.

त्याला 10 महिने आणि 20 दिवसांनंतर मेक्सिकोमध्ये अटक करण्यात आली. असंच एक प्रकरण कॅरेन शेपर्स यांचं. त्या चार दशकांपासून बेपत्ता होत्या.

इलिनॉयमधील एका पोलीस विभागानं अनेक वर्षांपासून न सुटलेल्या या प्रकरणाबाबत एका पॉडकास्टचा पहिला भाग प्रसारित केला आणि काही आठवड्यांतच त्यांचा मृतदेह एका नदीत सापडला.

आता, कोलोरॅडोमधील तपास अधिकारी अशाच प्रकारे नवनवे धागेदोरे शोधून 10 वर्षे जुन्या असलेल्या हत्येचे गूढ उकलण्याची आशा करत आहेत.

ऑरोरा पोलीस विभागानं या उन्हाळ्यात 21 वर्षीय चेल्सी यासर हिच्या हत्येबाबत असंच एक पॉडकास्ट प्रसारित केलंय.

2016 मध्ये एका शॉपिंग सेंटरच्या पार्किंग लॉटमध्ये तिची भोसकून हत्या करण्यात आली होती.

तपासात मदत होण्यासाठी पॉडकास्टचा वापर

एकीकडे, वास्तविक गुन्ह्यांवर आधारित म्हणजेच 'रिअल-लाइफ क्राईम कंटेट'ची लोकप्रियता वाढत असताना, दुसऱ्या बाजूला अमेरिका आणि इतर देशांमधील पोलीस यंत्रणाही न सुटलेली प्रकरणं सोडवण्यासाठी तसेच इतर तपासांमध्ये मदतीसाठी पॉडकास्टचा आधार घेत आहेत.

"टीव्ही, पॉडकास्ट किंवा पुस्तकं यांसारख्या माध्यमांतून सादर होणारा 'ट्रू क्राईम' कंटेट अत्यंत लोकप्रिय आहे. आम्ही जाणीवपूर्वक या प्रेक्षकवर्गापर्यंत मोठ्या प्रमाणावर पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे," असं ऑरोरा पोलीस विभागाचे जनसंपर्क अधिकारी जो मोयलान सांगतात.

21 वर्षीय चेल्सी यासर हिच्या हत्येचे प्रकरण एका नवीन पोलीस पॉडकास्टचा विषय आहे.

फोटो स्रोत, Aurora Police Department

फोटो कॅप्शन, 21 वर्षीय चेल्सी यासर हिच्या हत्येचे प्रकरण एका नवीन पोलीस पॉडकास्टचा विषय आहे.

हा ट्रेंड अजूनही प्राथमिक आहे, शिवाय त्यात काही फायदे तसेच आव्हानंही आहेत, तरीही भविष्यात हा ट्रेंड अधिक विस्तारू शकेल, असं तज्ज्ञांना वाटतं.

"मला वाटतं की कालांतरानं प्रत्येकजण पॉडकास्ट हे साधन वापरायला सुरुवात करेल," असं न्यूयॉर्क पोलीस विभागाचे माजी गुप्तहेर आणि 'जॉन जे कॉलेज ऑफ क्रिमिनल जस्टिस'मधील सहाय्यक प्राध्यापक मायकल अल्काझार सांगतात.

त्यांच्या मते, 'ट्रू क्राईम' (गुन्ह्यांशी संबंधित सत्य घटनांवरील) पॉडकास्टमध्ये कधीकधी चुकीची माहिती प्रसारित होऊ शकते. परंतु, या पद्धतीमुळे पॉडकास्टमध्ये कोणती माहिती दिली जात आहे यावर पोलीस स्वतः नियंत्रण ठेवू शकतात आणि तपासासाठी नवीन धागेदोरे शोधू शकतात.

कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांचे पॉडकास्ट

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

ऑस्ट्रेलियातील 'युनिव्हर्सिटी ऑफ न्यू साउथ वेल्स'मधील गुन्हेशास्त्राच्या सहयोगी प्राध्यापिका ॲलिस मॅकगव्हर्न म्हणतात की, यापूर्वीही असे अनेक पॉडकास्ट होते ज्यात माजी गुप्तहेर विविध गुन्हेगारी प्रकरणं किंवा पोलीस प्रशासनाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करत असत. आता कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांनीही पॉडकास्ट निर्मितीच्या क्षेत्रात पाऊल टाकण्यास सुरुवात केली आहे.

मात्र, पोलीस विभागांनी तयार केलेले आणि 'कोल्ड केसेस'वर (अनेक वर्षांपासून न सुटलेल्या गुन्ह्यांवर) लक्ष केंद्रित करून त्यातील धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न करणारे पॉडकास्ट अजूनही दुर्मिळ आहेत. कॅलिफोर्निया, कोलोरॅडो आणि इलिनॉयमधील पोलीस विभागांनी मात्र असे प्रयत्न केले आहेत.

हे पोलीस पॉडकास्ट विविध एपिसोड्समध्ये सादर केले जातात. यात गुन्ह्याची घटना, पीडित व्यक्ती आणि तपास प्रक्रिया यांची कथा रंजक शैलीत आणि महत्त्वाच्या तपशीलांसह सांगितली जाते. अगदी 2014 मध्ये सुरू झालेल्या लोकप्रिय 'ट्रू क्राईम' पॉडकास्ट मालिकांप्रमाणेच ही पद्धत असते.

'ऑरोरा पोलीस' अशा प्रकारे हे पॉडकास्ट तयार करतात की, लोक ते केवळ आवडीने पाहत नाहीत, तर ज्यांच्याकडे त्या प्रकरणाबद्दल काही माहिती असते, ते त्यांना ती माहिती पुढे आणण्यासाठी प्रोत्साहितही करतात.

पॉडकास्टच्या निर्मात्यांनी चेल्सी यासरच्या हत्येची तुलना 'मोबी डिक' या प्रसिद्ध कादंबरीतील 'व्हाइट व्हेल'शी (एक अत्यंत दुर्मिळ आणि पकडण्यास कठीण असा मासा) केली. कारण, या प्रकरणानं तपासकर्त्यांसमोर दीर्घकाळापासून एक मोठं आव्हान उभं केलं होतं.

पार्किंग लॉटमध्ये एका मिनीव्हॅनमध्ये बसवल्यानंतर चेल्सी यासरवर अनेकदा वार करण्यात आले आणि व्हॅनमधून बाहेर पडताना ती खाली कोसळली.

'व्हाइट व्हेल' पॉडकास्टवर ऑरोरा पोलीस विभागाकडून त्यांच्याच अधिकाऱ्यांच्या मुलाखती

फोटो स्रोत, Aurora Police Department

फोटो कॅप्शन, 'व्हाइट व्हेल' पॉडकास्टवर ऑरोरा पोलीस विभागाकडून त्यांच्याच अधिकाऱ्यांच्या मुलाखती

सीसीटीव्हीच्या अस्पष्ट फुटेजमध्ये हल्ल्यादरम्यान ती मिनीव्हॅन हालचाल करताना दिसत होती. परंतु, त्यातील फुटेज कुणाचाही चेहरा ओळखण्याइतपत स्पष्ट नव्हते. यासरच्या नखांखाली सापडलेला डीएनएचा (DNA) नमुना सिस्टीममधील कोणत्याही नोंदीशी जुळला नाही.

जूनमध्ये जेव्हा 'ऑरोरा' पोलिसांनी हे पॉडकास्ट प्रसिद्ध केलं, तेव्हा तपासकर्ते 'फॉरेन्सिक जिनिऑलॉजी' या नवीन तंत्रांचा वापर करून डीएनएची तपासणी करत होते.

या पॉडकास्टमध्ये तपासाशी संबंधित ताज्या घडामोडींची सविस्तर माहिती देण्यात आली होती.

जो मोयलान म्हणतात की, या हत्येबाबत माहिती मिळवण्यासाठी विभागानं यापूर्वीही जनतेला आवाहन केले होतं. परंतु, पॉडकास्टच्या मदतीनं खूप मोठ्या जनसमुदायापर्यंत पोहोचणं शक्य होतं.

ते म्हणतात की, "जर तुम्ही घटनेच्या दिवशी बातम्या पाहिल्या नसतील किंवा वर्तमानपत्र वाचलं नसेल, तर तुम्हाला या प्रकरणाबद्दल कदाचित काहीच माहिती नसू शकेल. त्यामुळे आम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं होतं."

पुढे ते म्हणाले की, "जर संशयित अजूनही जिवंत असेल आणि मोकाट फिरत असेल, तर तो देशाच्या कोणत्याही भागात असू शकतो."

कॅरेन शेपर्स जवळपास 40 वर्षे बेपत्ता होत्या आणि त्यांचा मृतदेह 2025 मध्ये सापडला.

फोटो स्रोत, Elgin Police Department

फोटो कॅप्शन, कॅरेन शेपर्स जवळपास 40 वर्षे बेपत्ता होत्या आणि त्यांचा मृतदेह 2025 मध्ये सापडला.

ऑरोरा पोलीस विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्याच्या अखेरीस तो पॉडकास्ट 7184 वेळा डाऊनलोड करण्यात आला होता. याचा परिणाम म्हणून पोलिसांना तपासासाठी काही नवीन धागेदोरे मिळाले. त्यापैकी एका माहितीमुळे पुढील तपासाला चालना मिळाली.

बहुतांश पोलीस विभागांकडे पॉडकास्ट तयार करण्यासाठी आवश्यक कर्मचारी, निधी, वेळ, उपकरणं किंवा तांत्रिक कौशल्य नसतं.

निवृत्त गुप्तहेर मायकल अल्काझार यांच्या मते, कायदेशीर गुंतागुंत, खटले आणि दिवाणी दायित्वाच्या (civil liability) भीतीमुळे काही पोलीस विभाग असे पॉडकास्ट तयार करण्यास कचरतात.

उदाहरणार्थ, कॅलिफोर्नियातील न्यूपोर्ट बीच पोलीस विभागानं फरार संशयित आरोपी पीटर चॅडविक याच्याबद्दल तयार केलेला पॉडकास्टही वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.

त्याच्याविषयीच्या पॉडकास्टच्या पहिल्या भागात, लक्षाधीश असलेल्या चॅडविकचं वर्णन 'ऑक्टोबर 2012 मध्ये कॅलिफोर्नियातील न्यूपोर्ट बीच या शांत किनारी शहरात आपल्या पत्नीची हत्या करणारा माणूस' असं करण्यात आलं होतं.

'सीरियल' हा बाल्टिमोरमधील हे मिन ली हिच्या हत्येवर आधारित एक लोकप्रिय 'ट्रू क्राईम' पॉडकास्ट होता.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 'सीरियल' हा बाल्टिमोरमधील हे मिन ली हिच्या हत्येवर आधारित एक लोकप्रिय 'ट्रू क्राईम' पॉडकास्ट होता.

'पॉडकास्टमुळे आरोपीवरील दबाव नक्कीच वाढला'

चॅडविकवर हत्येचा आरोप ठेवण्यात आला होता. परंतु, त्यानं हे आरोप फेटाळून लावले होते आणि आपण निर्दोष असल्याचा दावा केला होता. तसेच, त्याच्यावरील खटलाही अद्याप सुरू झाला नव्हता. तरीही, त्या पॉडकास्टमध्ये 'आरोपी' हा शब्द वापरण्यात आला नव्हता तसेच लक्षाधीश असलेल्या चॅडविकचा थेट 'हत्यारा' असा उल्लेख करण्यात आला.

टीकाकारांच्या मते, यामुळे 'गुन्हा सिद्ध होईपर्यंत निर्दोष मानलं जाणं' या कायदेशीर तत्त्वाचं उल्लंघन झालं होतं. पोलिसांचं काम तपास करणं हे आहे. एखाद्याला दोषी ठरवणं नव्हे, असं त्यांचं मत होतं.

हा पॉडकास्ट पोलीस विभागाच्या जनसंपर्क अधिकारी जेनिफर मॅनझेला यांनी तयार केला होता आणि त्याचं सूत्रसंचालनही त्यांनीच केलं होतं.

मात्र, त्यावेळी आपली बाजू मांडताना त्यांनी सांगितलं की, पोलीस अशा प्रकारची निवेदनं नियमितपणे जारी करत असतात.

मॅनझेला यांनी बीबीसी न्यूजला सांगितलं की, तपासावर कोणताही परिणाम न होऊ देता ही कथा रंजक पद्धतीने सादर करण्याचा त्यांचा प्रयत्न होता.

ऑगस्ट 2019 मध्ये अटक झाल्यानंतर, चॅडविकनं 'सेकंड-डिग्री मर्डर'चा गुन्हा कबूल केला आणि त्याला 15 वर्षांपासून ते जन्मठेपेपर्यंतची शिक्षा सुनावण्यात आली. ही शिक्षा तो अजूनही भोगत आहे.

मँझेला यांच्या मते, चॅडविकची अटक ही थेट पॉडकास्टद्वारे मिळालेल्या कोणत्याही स्पष्ट माहितीवर आधारित नव्हती.

डायव्हर्सनी कॅरेन शॅपर्सची कार फॉक्स नदीतून बाहेर काढली.

फोटो स्रोत, Elgin Police Department

फोटो कॅप्शन, डायव्हर्सनी कॅरेन शॅपर्सची कार फॉक्स नदीतून बाहेर काढली.

मात्र, तो फरारी असताना पॉडकास्टमुळे त्याच्यावरील दबाव नक्कीच वाढला. त्यामुळे त्याच्याकडून आणखी चुका होण्याची शक्यता निर्माण झाली.

त्यांच्या म्हणण्यानुसार, या पॉडकास्टमुळे या प्रकरणाबाबत जनजगृती झाली. त्याचा फायदा तपास अधिकाऱ्यांना वॉरंट आणि प्रत्यार्पणाची प्रक्रिया विक्रमी वेळेत पूर्ण करण्यासाठी झाला.

हे पॉडकास्ट आयट्यून्स चार्टवर 24 व्या क्रमांकापर्यंत पोहोचले होते.

पॉडकास्टच्या यशानंतर आणि चॅडविकच्या अटकेनंतर, मँझेला यांना इतर पोलीस विभाग आणि संस्थांकडून अशाच प्रकारचे पॉडकास्ट तयार करण्याबाबत विचारणा करणारे फोन येऊ लागले.

तरीही, पॉडकास्टची ही संकल्पना सर्वांनाच पटलेली होती, असं नव्हतं.

"सुरुवातीला मला यात फारसा रस नव्हता," असं इलिनॉयमधील एल्गिन पोलीस विभागाचे डिटेक्टिव्ह अँड्र्यू ह्युटन सांगतात. ते आता या पॉडकास्टचे सह-सूत्रधार देखील आहेत.

त्यांनी डिटेक्टिव्ह मॅथ्यू व्हर्टेरियन आणि एका स्थानिक रेडिओ स्टेशनच्या मदतीने एल्गिन पोलिसांच्या 'समबडी नोज समथिंग' या पॉडकास्टवर काम केलं.

अँड्र्यू ह्युटन आणि मॅथ्यू व्हर्टेरियन यांची 2024 मध्ये एल्गिन पोलिसांच्या नवीन 'कोल्ड केस युनिट'मध्ये (जुने प्रलंबित गुन्हे हाताळणाऱ्या विभागात) नियुक्ती करण्यात आली होती.

त्याच वेळी, पोलीस प्रमुखांनी त्यांना सांगितलं की, त्यांच्या नवीन जबाबदारीमध्ये पॉडकास्ट तयार करण्याचाही समावेश असेल.

पोलिसांच्या पत्रकार परिषदेदरम्यान एका फलकावर पीटर चॅडविकचे छायाचित्र प्रदर्शित करण्यात आले होते.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पोलिसांच्या पत्रकार परिषदेदरम्यान एका फलकावर पीटर चॅडविकचे छायाचित्र प्रदर्शित करण्यात आले होते.

ह्यूटन याबाबतची आठवण सांगताना म्हणतात, "आम्ही आधीच एक नवीन विभाग सुरू करत होतो. मग त्यात आणखी एक नवीन काम कशाला वाढवायचं?"

सुरुवातीला, ह्यूटन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी फारसा रस न दाखवता पॉडकास्टच्या भागांचं नियोजन करण्यास सुरुवात केली. पण या प्रक्रियेत त्यांना जाणवलं की, उलट यामुळे तपास अधिक पद्धतशीरपणे पुढे नेण्यास मदत होत आहे.

बेपत्ता झालेल्या 23 वर्षीय कॅरेन शेपर्स यांच्याबाबत काय घडलं असावं, याबद्दल त्यांनी अनेक तर्क मांडले आणि प्रत्येक तर्कावर पॉडकास्टचा एक स्वतंत्र भाग तयार केला.

या पॉडकास्टमुळे केवळ नवे धागेदोरेच मिळाले नाहीत, तर तपासकर्त्यांना इतर मार्गांनीही माहिती गोळा करण्याची संधी मिळाली.

त्यांनी आपल्या पॉडकास्टबद्दल सोशल मीडियावर येणाऱ्या कमेंट्स वाचण्यासही सुरुवात केली.

ह्यूटन सांगतात की लोक कमेंट्समध्ये लिहायचे, "माझी आई या व्यक्तीसोबत काम करायची," किंवा "मी याच भागात राहतो आणि मला ही घटना आठवते."

अखेरीस, पोलिसांनी तपासाच्या पारंपरिक पद्धतींचा वापर करून हे प्रकरण सोडवलं. त्यांच्या एका तर्कानुसार, शेपर्स यांची कार नदीत कोसळली असावी.

अँड्र्यू ह्युटन (उजवीकडून दुसरे) आणि मॅथ्यू व्हर्टेरियन (सर्वात उजवीकडे) त्यांच्या "समबडी नोज समथिंग" या पॉडकास्टसाठी एल्गिन पोलीस प्रमुख अ‍ॅना लॅली यांच्याशी गप्पा मारत आहेत.

फोटो स्रोत, Elgin Police Department

फोटो कॅप्शन, अँड्र्यू ह्युटन (उजवीकडून दुसरे) आणि मॅथ्यू व्हर्टेरियन (सर्वात उजवीकडे) त्यांच्या "समबडी नोज समथिंग" या पॉडकास्टसाठी एल्गिन पोलीस प्रमुख अ‍ॅना लॅली यांच्याशी गप्पा मारत आहेत.

त्यांना 1999 मधील स्थानिक वर्तमानपत्रातील एक बातमी सापडली. त्या बातमीत म्हटलं होतं की पोलिसांनी हेलिकॉप्टरच्या मदतीनं भंगार डेपो आणि फॉक्स नदीचाही शोध घेतला होता.

परंतु तपासादरम्यान, त्यांना नदीचा खरोखरच कसून शोध घेतल्याचा कोणताही पुरावा सापडला नाही. त्यांनी ही बाब आपल्या पॉडकास्टच्या श्रोत्यांपासून लपवूनही ठेवली नाही.

त्यानंतर पोलिसांनी एका शोध मोहिमेतील कंपनीची आणि आधुनिक सोनार तंत्रज्ञान असलेल्या पाणबुड्यांची मदत घेतली आणि मार्च 2025 मध्ये त्यांना कॅरेन शेपर्स व त्यांची कार नदीच्या तळाशी सापडली.

आता हे पॉडकास्ट तिसऱ्या सीझनमध्ये आहे. दुसऱ्या सिझनमध्ये त्यांनी स्वरूप बदललं होतं आणि खुनाच्या प्रकरणांवर लक्ष केंद्रित केलं होतं. परंतु, आता ते पुन्हा एकदा एका बेपत्ता व्यक्तीच्या प्रकरणाकडे वळले आहेत.

ह्यूटन कबूल करतात की, "हे अत्यंत कष्टाचं काम आहे आणि यासाठी खूप वेळ व मेहनत लागते."

इतर पोलीस विभागांना निधी आणि संसाधनांशी संबंधित आव्हानांचा सामना करावा लागत असला, तरी तज्ज्ञांचं असं मत आहे की भविष्यात तपासाचं साधन म्हणून पॉडकास्टचा वापर अधिकाधिक प्रमाणात होताना दिसेल.

अमेरिकन युनिव्हर्सिटीच्या 'न्याय, कायदा आणि गुन्हेगारीशास्त्र' विभागातील सहयोगी प्राध्यापिका जेनिस इवामा म्हणतात की, जर पोलीस विभागांकडे पुरेसे कर्मचारी असतील, तर नवीन कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी आणि विद्यमान कर्मचाऱ्यांना टिकवून ठेवण्यासाठीही पॉडकास्ट उपयुक्त ठरू शकतात.

त्यांच्या मते, पॉडकास्टच्या माध्यमातून लोकांना कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या शब्दांतून पोलिसांचं काम नेमकं कसं असतं, हे जाणून घेण्याची संधी मिळते.

न्यूयॉर्क पोलीस विभागाचे माजी गुप्तहेर मायकल अल्काझार यांचं असं मत आहे की, पोलीस अधिकाऱ्यांची नवीन पिढी पॉडकास्ट आणि सोशल मीडियाबाबत अधिक मोकळ्या विचारांची आहे. त्यामुळे हा कल आणखी वेगाने वाढेल.

"हे त्यांचंच जग आहे आणि या माध्यमाद्वारे संवाद साधणं त्यांना अधिक सोपं वाटतं," असंही ते म्हणतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)