Photos : 'जंतर-मंतर'वर हजारो समर्थकांची उपस्थिती, 10 फोटोंमधून पाहा तिथं काय-काय घडतंय

फोटो स्रोत, Hindustan Times via Getty Images
कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वातील जंतरमंतरवरील आंदोलनाचा आज महत्त्वाचा आणि निर्णायक दिवस आहे. आज सोमवारी (20 जुलै) संसद मोर्चा होणार आहे.
पोलिसांनी अद्याप या मोर्चासाठी परवानगी दिलेली नाही. मात्र पोलिसांशी चर्चा सुरू असल्याचा दावा कॉक्रोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरभ दास यांनी केला आहे.
कोणत्याही परिस्थितीत संसदेवर शांतते मोर्चा काढणारच असल्याचं सीजेपीनं म्हटलं आहे.
तत्पूर्वी, जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आल्याचं एएनआय वृत्तसंस्थेच्या दृश्यांमध्ये दिसून आलं आहे.

फोटो स्रोत, ANI Video Grab
जंतर-मंतर इथे CJP च्या निषेध मोर्चासाठी जमलेले आंदोलक आणि RPF जवान यांच्यात गोंधळ पहायला मिळाला. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी RPF जवान व पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनं दिली आहे.

फोटो स्रोत, AISA
ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन'च्या (AISA) नेहा, आमीन आणि मनीष या तीन सदस्यांनी सोमवारी दिल्लीतील जंतर-मंतर इथे सुरू असलेलं त्यांचं 23 दिवसांचं उपोषण मागे घेतलेलं आहे.
विविध सामाजिक कार्यकर्ते, नेते आणि लोकप्रतिनिधींच्या आवाहनानंतर, त्या संघटनेच्या विद्यार्थ्यांनी आपलं उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला.

संसद परिसरात तणावाचं वातावरण आहे. तत्पूर्वी, कालच (19 जुलै) दिल्ली पोलिसांनी निवेदन जारी करत इशारा दिला आहे.
निवेदनात म्हटले, "आम्ही स्पष्टपणे कळवू इच्छितो की, 20 जुलैला कॉक्रोच जनता पार्टीकडून संसदेवर काढण्यात येणाऱ्या कोणत्याही निषेध मोर्चासाठी कोणतीही परवानगी मागितली गेलेली नाही किंवा देण्यात आलेली नाही."

कॉक्रोच जनता पार्टीच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर 'सेंट्रल सेक्रेटरीएट' मेट्रो स्टेशन जनतेसाठी बंद ठेवण्यात आलं आहे.
दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (DMRC) ट्विट केले आहे की, "सुरक्षेच्या कारणास्तव, जनपथ, राजीव चौक, पटेल चौक, सेंट्रल सेक्रेटरीएट आणि सेवा तीर्थ ही मेट्रो स्टेशन्स पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत."

दुसऱ्या बाजूला, सोनम वांगचुक यांनी टिश्यू पेपरवर लिहिलेलं एक पत्र सकाळी सहा वाजता त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून प्रसिद्ध करण्यात आलं आहे.
त्यात त्यांनी तीन अटींवर उपोषण सोडण्याची तयारी दर्शवली आहे.

CJP चे संस्थापक अभिजित दिपके यांनी दावा केला आहे की, "दिल्ली पोलिसांनी जंतर-मंतरवर दगडांनी भरलेला एक ट्रक आधीच तैनात केला आहे."
दिपके यांनी 'X' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिलंय, "दिल्ली पोलिसांना लाज वाटली पाहिजे! जंतर-मंतरवर आधीच दगड भरलेला ट्रक आणि एक नादुरुस्त व्हॅन आणून ठेवण्यात आली आहे. लवकरच 'गोदी मीडिया' अशा बातम्या चालवेल की, शांततापूर्ण आंदोलन बदनाम करण्यासाठी आंदोलकांनीच त्या व्हॅनची तोडफोड केली."

फोटो स्रोत, Getty Images
सोनम वांगचुक म्हणतात की, "प्रिय मित्र आणि समर्थकांनो, तुमच्यापैकी अनेकांनी मला विचारलं आहे की मी माझं उपोषण कधी संपवणार आहे? समर्थकांना यापूर्वी सांगितल्याप्रमाणे, मी 20 जुलै रोजी माझे उपोषण संपवेन. जर,
शिक्षण व्यवस्थेतील अलीकडील अपयशांची (उदा. पेपरफुटी इत्यादी) जबाबदारी सरकारने स्वीकारली तर; किंवा...
मी आणि CJP चं नेतृत्व संसदेच्या दारापर्यंत पोहोचलो आणि तिथे सन्माननीय खासदार व विविध पक्षांच्या नेत्यांनी मला आणि सीजेपीच्या नेतृत्वाला आश्वासन दिलं की ते आता हा मुद्दा संसदेत मांडतील; किंवा...
जर माझी प्रकृती किंवा इतर कारणांमुळे हे शक्य झालं नाही, तर विविध पक्षांचे सन्माननीय खासदार आणि नेते या रुग्णालयात येऊन वरीलप्रमाणे आश्वासन देतील."

एका बाजूला, कॉक्रोच जनता पार्टीनं संसद मार्चमध्ये काय करावं आणि काय करू नये, याबाबतच्या गाईडलाईन्स प्रसिद्ध केल्या आहेत दुसऱ्या बाजूला, दिल्ली पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नसल्याचं निवेदन प्रसिद्ध केलं आहे.
या निवेदनात पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. काल निवेदन जाहीर करत पोलिसांनी म्हटलंय की, "नवी दिल्ली जिल्ह्यात बीएनएसएसच्या कलम 163 (पूर्वीचे सीआरपीसी कलम 144) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू आहेत. त्यानुसार जंतर-मंतर येथील निर्धारित निषेध स्थळावर पूर्वपरवानगी घेऊन केल्या जाणाऱ्या निदर्शनांशिवाय इतर ठिकाणी निषेध मोर्चे, मिरवणुका, आंदोलन आणि 5 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींचे एकत्र जमणे यावर बंदी आहे," असंही दिल्ली पोलिसांनी सांगितलं.

सध्या जंतर-मंतरवर समर्थकांची गर्दी आहे. काल रात्रीही बऱ्याच मोठ्या संख्येनं समर्थक जंतर-मंतरवर हजर होते.

फोटो स्रोत, Getty Images
काल अभिजीत दिपके यांनी म्हटलं होतं की, "आज माझ्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. हे काम किती कठीण आहे, याची मला आता जाणीव झाली आहे. सोनम सर आणि इथे उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्यांना मी सलाम करतो. उद्या होणाऱ्या पदयात्रेसाठी मी माझी ऊर्जा राखून ठेवत आहे."
यापूर्वी सोनम वांगचूक दिल्लीतील जंतरमंतर इथे उपोषण करत होते. परंतु, शनिवारी सकाळी पोलिसांनी त्यांना रुग्णालयात नेलं. त्यानंतर, त्यांच्या मागण्यांच्या समर्थनार्थ अभिजीत दिपके यांनी बेमुदत उपोषण सुरू केलं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)






















