इराणला अमेरिकची शस्त्रं त्यांच्याच विरोधात वापरता येतील? 'रिव्हर्स इंजिनिअरिंग' काय असतं?

इराणी शाळकरी मुली शाहेद-191 ड्रोनसमोर उभ्या आहेत. हा ड्रोन अमेरिकेच्या लॉकहीड मार्टिन आरक्यू-170 सेंटिनेल ड्रोनची कॉपी (नक्कल) असल्याचे सांगितलं जातं. हे छायाचित्र ऑक्टोबर 2023 चं आहे.

फोटो स्रोत, US NAVY/AFP via Getty Images

फोटो कॅप्शन, इराणी शाळकरी मुली शाहेद-191 ड्रोनसमोर उभ्या आहेत. हा ड्रोन अमेरिकेच्या लॉकहीड मार्टिन आरक्यू-170 सेंटिनेल ड्रोनची कॉपी (नक्कल) असल्याचे सांगितलं जातं. हे छायाचित्र ऑक्टोबर 2023 चं आहे.
    • Author, बीबीसी मॉनिटरिंग
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

इराणबरोबरच्या संघर्षात अमेरिका-इस्रायलने अनेक बॉम्ब आणि शस्त्रास्त्रांचा वापर केला. यातील अनेक बॉम्बचा स्फोट झाला नाही.

त्यामुळे इराणमध्ये आता या न फुटलेल्या बॉम्ब आणि शस्त्रास्त्रांचा अभ्यास करून त्यांची नक्कल (रिव्हर्स इंजिनिअरिंग) करता येईल का? याची चर्चा सुरू झाली आहे.

इराणमधील प्रसारमाध्यमं आणि विश्लेषक या संघर्षाच्या काळात मिळालेल्या या शस्त्रांकडे एक मोठी संधी म्हणून पाहत आहेत.

यामुळे देशाची लष्करी ताकद वाढू शकते, असं त्यांचं म्हणणं आहे.

इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्सने (आयआरजीसी) होर्मोझगान प्रांतात '15 पेक्षा जास्त जड अमेरिकन क्षेपणास्त्रं यशस्वीरित्या निष्क्रिय केले,' असं वृत्त इराणमधील सरकारी इंग्रजी वाहिनी प्रेस टीव्हीने 26 एप्रिल रोजी दिलं होतं.

ही शस्त्रं 'रिव्हर्स इंजिनिअरिंग'साठी (तंत्रज्ञान समजून घेऊन ते पुन्हा तयार करण्यासाठी) तंत्रज्ञान आणि संशोधन युनिटकडे देण्यात आली आहेत, असं या वृत्तात म्हटलं होतं.

या वृत्तानुसार, मिळालेल्या शस्त्रांमध्ये अमेरिकेचा प्रसिद्ध जीबीयू-57 बंकर-बस्टर बॉम्ब आणि झांजन परिसरात सापडलेले हजारो छोटे बॉम्ब (बॉम्बलेट्स) यांचाही समावेश आहे.

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात 40 दिवस चाललेल्या संघर्षानंतर 8 एप्रिल रोजी दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधीची घोषणा करण्यात आली होती.

त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही शस्त्रसंधी पुढे वाढवली होती.

अनपेक्षित भेट

इराणच्या कट्टरपंथी स्टुडंट न्यूज नेटवर्कने (एसएनएन) 1 मे रोजी याचं 'अनपेक्षित भेट' असं वर्णन केलं आहे.

संघर्षभूमी आता देशाच्या संरक्षण उद्योगासाठी एक संशोधन प्रयोगशाळा बनली आहे, असं त्यांचं म्हणणं आहे.

एसएनएनच्या मते, अमेरिका आणि इस्रायलने डागलेली शस्त्रं आणि बॉम्ब इराणसाठी एक रणनीतिक संधीमध्ये बदलू शकतात.

एसएनएन म्हणतं की, इराणमध्ये सोडलेल्या या शस्त्रांचा वापर करून आणखी चांगलं तंत्रज्ञान विकसित करता येऊ शकतं.

Caption- अमेरिकेचा एमक्यू-9 रिपर ड्रोन (फाइल फोटो)

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अमेरिकेचा एमक्यू-9 रिपर ड्रोन (फाइल फोटो)

इराण या आधुनिक शस्त्रांस्त्रांचे 'गुप्त तंत्रज्ञान' समजून घेण्यात गुंतलं आहे, हीच त्यांची खरी भीती आहे, असं त्यांनी पाश्चात्य देशांचा उल्लेख करून म्हटलं आहे.

निर्बंधांमुळे इराण अनेक वर्षांपासून रिव्हर्स इंजिनिअरिंगवर अवलंबून आहे, असं या वृत्तात म्हटलं आहे.

उदाहरणार्थ, इराणने अमेरिकन हॉक क्षेपणास्त्रांमध्ये बदल केले होते. त्याचबरोबर 2011 मध्ये अमेरिकन आरक्यू- 170 ड्रोन क्षेपणास्त्र जप्त करण्याची घटना देखील अशाच प्रकारची होती.

एसएनएनच्या म्हणण्यानुसार, त्या घटनेनंतर इराण 'नक्कल' (कॉपी) करण्यापासून पुढे जाऊन 'नवीन शोध' (इनोव्हेशन) करण्याच्या दिशेने गेला.

कट्टरपंथी वृत्तपत्र केहानचे संपादक होसेन शरीयतमदारी यांनी असं तंत्रज्ञान चीन आणि रशियासारख्या अमेरिकेच्या प्रतिस्पर्धी देशांसोबतही शेअर करता येऊ शकतं, असं सुचवलं.

'आमच्यासाठी चांगली, अमेरिकेसाठी वाईट बातमी'

या संघर्षादरम्यान टॉमहॉक आणि एजीएम-158 सारखी प्रगत क्षेपणास्त्रे तसेच एमक्यू-9 ड्रोन मोठ्या संख्येने अपयशी ठरले, असा त्यांनी दावा केला.

सरकारी माध्यमांमधील काही प्रतिनिधींनीही हीच गोष्ट सांगितली.

"या क्षेपणास्त्रांचं रिव्हर्स इंजिनिअरिंग करून भविष्यात त्यांचा वापर शत्रूंविरुद्ध करता येऊ शकतो," असं एका टीव्ही अँकरने सांगितलं.

सोशल मीडियावरही सरकार समर्थक युजर्सनी याला 'आमच्यासाठी चांगली आणि अमेरिकेसाठी वाईट बातमी' असं म्हटलं आहे.

काहींनी तर 'लवकरच मोठ्या प्रमाणात उत्पादन' होईल, असं भाकीतही वर्तवलं आहे.

Caption- Caption- टॉमहॉक क्षेपणास्त्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, टॉमहॉक क्षेपणास्त्र

तेहरान महानगरपालिकेचे अधिकारी एहसान खरामिद यांनी, 'ही फक्त बातमी नाही, तर ज्ञानाच्या नव्या संघर्षाची सुरुवात आहे' असं म्हटलं.

"पाश्चात्य माध्यमांच्या मते, या शस्त्रांमुळे अमेरिकन तंत्रज्ञानाचे 'लपलेले पैलू' समजू शकतात," असं त्यांनी सांगितलं.

मध्य पूर्वचे विश्लेषक एहसान तकद्दोसी म्हणाले की, यामुळे अमेरिकेला नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी 'कोट्यवधी डॉलर्स' खर्च करावे लागू शकतात आणि त्यामुळे तो लष्करी कारवायांमध्ये अधिक सावध होऊ शकतो.

त्यांनी उदाहरण देत सांगितलं की, 'हे असं आहे जसं चावी नसताना एखादं अवघड कुलूप कसं बनलंय ते समजून घेणं. खरा फायदा ते थेट वापरण्यात नाही, तर त्यामागचं तंत्रज्ञान समजून पुन्हा तयार करण्यात आहे.'

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)