एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूचे प्रकरण; कलिंगडाच्या तपासणीत FDA च्या अहवालात काय समोर आलं?

मुंबईतील पायधुनी येथे राहणारे कुटुंब
फोटो कॅप्शन, मुंबईतील पायधुनी येथे राहणाऱ्या कुटुंबातील चारही जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
    • Author, दिपाली जगताप
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

मुंबईतील पायधुनी परिसरातील डोकाडिया कुटुंबाच्या चारही सदस्यांच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. याबाबतचा फाॅरेन्सिक अहवाल अद्याप समोर आलेला नाही.

मात्र, एफीएच्या अहवालात मात्र कलिंगडाच्या नमुन्यांमध्ये कोणतीही भेसळ आढळली नसल्याचं समोर आलं आहे.

दुसरीकडे, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (एफडीए) एका पथकाकडून गेल्या काही दिवसांत या संपूर्ण परिसराची पाहणी करण्यात आहे.

इथल्या स्थानिक फळ विक्रेते विशेषतः कलिंगड विक्रेत्यांशी बोलण्यासाठी एफडीएचं पथक तिथे पोहचलं होतं परंतु त्यांना एकही विक्रेता सध्या आढळला नसल्याची माहिती एफडीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बीबीसी मराठीशी बोलताना दिली.

इथल्या विक्रेत्यांशी बोलून, ते विक्री करत असलेल्या कलिंगडची तपासणी अन्न व औषध प्रशासनाला करायची होती परंतु विक्रेतेच नसल्याने पथकाच्या हाती अद्याप काहीही लागलं नाही.

यापूर्वी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे कलिंगडामधून विषबाधा झाल्याच्या एकाही प्रकरणाची नोंद आढळलेली नाही असंही विभागाचं म्हणणं आहे.

दुसरीकडे जेजे रुग्णालयातून या प्रकरणी कोणीही अधिकृत माहिती दिलेली नाही. एका वरिष्ठ डाॅक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्नाचे नमुन्यांच्या केमिकल टेस्टचा रिपोर्ट तसंच हिस्टोपॅथोलाॅजी रिपोर्ट अद्याप मिळालेला नाही.

FDA च्या अहवालात काय आढळलं?

पायधुनी येथील डोकाडिया कुटुंबातील चारही जणांच्या मृत्यूनंतर FDA कडून कलिंगडाच्या सालीचे नमुने तपासण्यासाठी दिले होते.

त्याबाबत घेतलेल्या नमुन्यांमध्ये कोणतीही भेसळ आढळली नाही, असं स्पष्ट झाल्याची माहिती एफडीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं बीबीसी मराठीशी बोलताना दिली.

दरम्यान, ही चाचणी कोणत्याही प्रकारच्या विषबाधेसंदर्भात किंवा toxicity तपासण्यासंदर्भात नव्हती असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे.

याबाबत फाॅरेन्सिक (न्यायवैद्यक) रिपोर्टमधूनच स्पष्ट माहिती मिळू शकेल असंही त्यांनी सांगितलं.

काय आहे प्रकरण?

मुंबईतील पायधुनीमध्ये राहणाऱ्या एकाच कुटुंबातील चारही जणांचा मृत्यू झाल्याची घटना 25 एप्रिलच्या रात्रीच्या जेवणानंतर घडली होती. कुटुंबातील सर्वांना जुलाब आणि उलटीचा त्रास झाल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला होता.

कुटुंबातील सर्वांनी रात्री जेवणानंतर उशिरा कलिंगड खाल्लं होतं. त्यामुळं त्यांना विषबाधा झाल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता स्थानिक डॉक्टरांनी वर्तवली होती.

अद्याप शवविच्छेदनाचा अहवाल समोर आलेला नाही. त्यामुळं मृत्यूच्या नेमक्या कारणाबाबत माहिती अस्पष्ट आहे. पोलीस याबाबत तपास करत असून अन्न आणि कलिंगडाचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्याचा एहवाल एफडीएनं दिला आहे. त्यात भेसळ आढळेली नाही.

या कुटुंबानं 25 एप्रिल रोजी रात्री साधारण दहा ते साडे दहा वाजता काही नातेवाईकांसह जेवण केलं होतं.

त्यानंतर नातेवाईक गेल्यानंतर रात्री उशिरा सुमारे दीड वाजता त्यांनी कलिंगड खाल्ल्याची माहिती असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

या प्रकरणात नेमकं काय घडलं? जाणून घेऊया.

नेमकं काय घडलं?

पायधुनी परिसरातील जुनी इमारत असलेल्या मोघल इमारतीत पहिल्या मजल्यावर हे कुटुंब राहत होतं.

अब्दुल्ला डोकाडिया(40 वर्षे), त्यांच्या पत्नी नसरीन डोकाडिया (35वर्षे) तसंच 16 आणि 13 वर्षे वयाच्या दोन लहान मुली असं हे कुटुंब होतं.

यापैकी तिघांचा जेजे रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आहे.

तर लहान मुलीला घरातून जवळच्या रुग्णालयात नेण्यात येत असतानाच तिचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक डाॅ. झैद कुरेशी यांनी दिली आहे.

25 एप्रिल रोजी नातेवाईकांसह सगळ्यांनी रात्रीचं जेवण केलं होतं. नातेवाईक गेल्यानंतर सुमारे दीड वाजता या सगळ्यांनी कलिंगड खाल्ल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

यानंतर पहाटे कुटुंबातील सर्वांना उल्टी आणि जुलाब असा त्रास सुरू झाला. यावेळी इमारतीतील लोकांनी त्यांच्या मदतीसाठी प्रयत्न केले.

डाॅ. झैद कुरेशी
फोटो कॅप्शन, मी घटनास्थळी पोहचलो त्यावेळी खोलीत चारही जण अत्यावस्थेत होते, अशी माहिती डाॅ. कुरेशी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली.

याच इमारतीत चौथ्या मजल्यावर राहणारे डाॅ. झैद कुरेशी यांनी तत्काळ त्यांच्या प्रकृतीची तपासणी केली.

डाॅ.कुरेशी घटनास्थळी पोहचले त्यावेळी खोलीत चारही जण अत्यावस्थ होते, अशी माहिती डाॅ. कुरेशी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली.

"यावेळी चौघांपैकी सर्वात लहान मुलीला श्वास घ्यायला त्रास होत असल्याचं मला दिसलं. तिला तत्काळ सीपीआर दिला. परंतु परिस्थिती तशीच राहिल्यानं जवळच्या रुग्णालयात नेलं. त्यावेळी तिचा मृत्यू झाला.

तर इतर तिघांना स्थानिक रुग्णालयातून नंतर जेजे रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे काही तास त्यांच्यावर उपचार सुरू होते. नंतर त्यांचा मृत्यू झाला," अशी माहिती डाॅ कुरेशी यांनी दिली.

जेजे मार्ग पोलीस स्टेशन
फोटो कॅप्शन, जेजे मार्ग पोलीस स्टेशन

दरम्यान, शवविच्छेदन अहवाल अद्याप आलेला नाही. तो आल्यानंतरच विषबाधा झाली आहे का? आणि ती नेमकी कशातून झाली आहे? हे स्पष्ट होईल, असंही ते म्हणाले.

दरम्यान, एमआयएमचे स्थानिक नेते आणि माजी आमदार वारीस पठाण यांनी राज्य सरकार आणि पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाची दखल घेऊन चौकशी करावी असं सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

पोलिसांनी काय माहिती दिली?

या प्रकरणी जेजे पोलीस ठाण्यात अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलीस उपायुक्त प्रवीण मुंढे यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की," एका कुटुंबातील चारही जणांचा मृत्यू झालेला आहे. 25 एप्रिल रोजी रात्री इतर काही नातेवाईकांसह त्यांनी जेवण केलं होतं.

नातेवाईक निघून गेल्यानंतर रात्री एक ते दीड वाजताच्या सुमारास त्यांनी कलिंगड खाल्ल्याची माहिती मिळालेली आहे.

यानंतर पहाटेपासून त्यांना उल्टी आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला आहे. त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. तिथून जेजे रुग्णालयात हलवण्यात आलं. परंतु या चौघांचाही दुर्देवी मृत्यू झालेला आहे."

"पोस्ट माॅर्टम करण्यात आलेलं आहे. त्यांनी खाल्लेल्या पदार्थांचे नमुने पोलिसांनी जप्त केले आहेत. कलिंगडाचेही नमुने घेण्यात आले असून त्यांच्या शरीरातील नमुनेही घेतले आहेत. या प्रकरणी मृत्यूबाबत चौकशी सुरू आहे," असं पोलिसांनी सांगितलं होतं.

माजी आमदार वारीस पठाण काय म्हणाले?

MIM चे स्थानिक नेते आणि माजी आमदार वारीस पठाण यांनी राज्य सरकार आणि मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे मागणी केलीय की, या प्रकरणाची दखल घ्यावी.

एक्स (पूर्वीचं ट्विटर) वर पोस्ट शेअर करत वारीस पठाण यांनी म्हटलंय की, "मला अनेकांचे फोन आले की अशाप्रकारे कोणाचा मृत्यू कसा होऊ शकतो? काय कारण आहे? आम्ही सध्या पोस्टमार्टेम अहवालाची प्रतिक्षा करत आहोत. माझी राज्य सरकार आणि पोलीस आयुक्त यांनी या प्रकरणाची चौकशी करावी की नेमकं काय घडलं आहे. कोणत्या गोष्टीमुळे कुटुंबातील सर्वांचा एकाचवेळी मृत्यू झाला. कलिंगड खाल्ल्यामुळे झालं की दुसरं काही कारण आहे, याची चौकशी व्हायला हवी. याची माहिती सरकारने जाहीर करावी जेणेकरून इतर लोक काळजी घेऊ शकतील."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)