स्किन कॅन्सर पुन्हा बळावण्यापासून रोखणाऱ्या नव्या लसीला मोठे यश

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जो मॅकफॅडेन
- Role, आरोग्य प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
एका नव्या 'पर्सनलाईज्ड' लसीला विशिष्ट औषधाची जोड देऊन करण्यात आलेल्या वैद्यकीय चाचण्या यशस्वी ठरल्या आहेत. रुग्णांमध्ये जीवघेणा स्किन कॅन्सर पुन्हा उलटण्याचा धोका या नव्या फॉर्म्युल्यामुळे पूर्णपणे रोखण्यात डॉक्टरांना मोठं यश आलं आहे.
कॅन्सरच्या उपचारात हा एक मोठा बदल मानला जात आहे. ही लस 'मर्क' आणि 'मॉडर्ना' या दोन औषध कंपन्यांनी तयार केली आहे.
चाचणीदरम्यान ही लस 'हाय-रिस्क मेलानोमा' म्हणजेच त्वचेच्या कर्करोगाचा एक प्रकार असलेल्या रुग्णांना शस्त्रक्रियेनंतर देण्यात आली.
सुरुवातीच्या निष्कर्षांवरून असे दिसून येते की, या लसीमुळे रुग्णांचा कॅन्सरमुक्त राहण्याचा कालावधी वाढला. पण तरी हा परिणाम किती काळ टिकून राहतो हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
कॅन्सर तज्ज्ञांनी या निकालांना मोठे यश मानले असले तरी सावधगिरी बाळगण्याचा सल्लाही दिला आहे. कारण चाचणीचे संपूर्ण अंतिम निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत. आता स्वतंत्र तज्ज्ञ या निष्कर्षांची सखोल समीक्षा आणि तपासणी करतील. आता स्वतंत्र संशोधक या चाचण्यांच्या निष्कर्षांचे बारकाईने परीक्षण करतील.
चाचण्या संपल्या तरी नियामकांच्या मंजुरीनंतरच ही लस अधिकृत मानली जाईल. त्यानंतर ब्रिटनमधील आरोग्य व्यवस्थेत रुग्णांवर प्रत्यक्ष उपचारांसाठी वापरण्याआधी या लसीला पुन्हा एका पडताळणी प्रक्रियेतून जावे लागेल.
इन्टिस्मेरन' ही नवी लस 'कीट्रुडा' या इम्युनोथेरपी ड्रगसोबत एकत्रित स्वरूपात रुग्णांना देण्यात आली. कीट्रुडाचा वापर आधीपासूनच कर्करोगाच्या उपचारांमध्ये केला जातो.
केवळ कीट्रुडा औषध घेण्याच्या तुलनेत हे औषध आणि लस दोन्ही एकत्र दिल्याने रुग्णांचा कॅन्सरमुक्त राहण्याचा कालावधी लक्षणीयरीत्या वाढल्याचे कंपन्यांनी सांगितले आहे.
याव्यतिरिक्त लस घेतल्यानंतर हा आजार शरीराच्या इतर अवयवांमध्ये पसरण्याचा धोकाही कमी झाला.
'आशेचा किरण'
मर्क' आणि 'मॉडर्ना' या लसीला 'पर्सनलाइज्ड व्हॅक्सिन' म्हणत आहेत. याचा अर्थ ही लस प्रत्येक रुग्णाच्या ट्युमरची विशिष्ट रचना लक्षात घेऊन थेट त्यावर मारा करण्याचे काम करते.
ही नवी लस तयार करण्यासाठी शास्त्रज्ञांनी mRNA तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. यापूर्वी काही कोव्हिड-19 लसींच्या निर्मितीसाठी याच तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता.
या उपचार पद्धतीत सर्जरीद्वारे रुग्णाच्या ट्युमरचा छोटा तुकडा काढून त्याच्या डीएनएचे सिक्वेन्सिंग केले जाते. ज्यामुळे कॅन्सरच्या पेशींमधील नेमक्या म्यूटेशन्सवर अचूक मारा करणे शक्य होते.
म्हणजेच हे एका विशिष्ट रुग्णाच्या ट्युमरच्या रचनेनुसार खास तयार केलेले पर्सनलाइज्ड कॅन्सर-विरोधी इंजेक्शन आहे. हे इंजेक्शन रुग्णाच्या रोगप्रतिकार शक्तीला शरीरात शिल्लक राहिलेल्या कॅन्सरच्या पेशी शोधून काढून त्या पूर्णपणे नष्ट करण्याचा स्पष्ट संदेश देते.
फुफ्फुस, मूत्राशय तसेच किडनीच्या कॅन्सरवर मात करण्यासाठीही या दोन्ही औषध कंपन्यांकडून अशाच स्वरूपाच्या पर्सनलाइज्ड लसींच्या वैद्यकीय चाचण्या सुरू आहेत.
"हे संशोधन कॅन्सर उपचारांच्या इतिहासातील एक ऐतिहासिक वळण आहे," असा विश्वास मॉडर्नाचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टेफेन बँसेल यांनी व्यक्त केला. या मोठ्या घोषणेचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारावरही दिसला असून, मॉडर्ना आणि मर्क या दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार उसळी नोंदवली गेली.
वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी या घडामोडींना दिलासादायक मानले असले, तरी हा केवळ सुरुवातीचा टप्पा असून अंतिम निष्कर्षांची प्रतीक्षा करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले आहे.
"हे संशोधन कॅन्सरग्रस्तांसाठी आशेचा नवा किरण ठरत असले, तरी सध्या हाती आलेल्या प्राथमिक निष्कर्षांची तज्ज्ञांमार्फत काटेकोर तपासणी होणे आवश्यक आहे," असे मत कॅन्सर रिसर्च यूकेच्या प्रतिबंध आणि प्राथमिक निदान विभागाच्या प्रमुख डॉ. तालिसिया क्वालो यांनी मांडले.
त्यांनी पुढे स्पष्ट केले, "कॅन्सरविरुद्धच्या अशा महत्त्वपूर्ण संशोधनाला आर्थिक पाठबळ मिळत राहणे गरजेचे आहे. त्यामुळे अधिकाधिक रुग्णांना त्यांच्या शारीरिक रचनेनुसार खास तयार केलेले वैयक्तिक उपचार मिळू शकतील आणि त्यांना निरोगी, समाधानी तसेच प्रदीर्घ आयुष्य जगणे शक्य होईल."
ऑक्सफर्ड विद्यापीठातील कॅन्सरतज्ज्ञ आणि असोसिएट प्रोफेसर डॉ. लेनार्ड ली म्हणाले, "मेलेनोमाच्या (त्वचेचा कॅन्सर) रुग्णांसाठी ही नक्कीच दिलासादायक बातमी आहे. पण या संशोधनाचे महत्त्व केवळ इथपर्यंतच मर्यादित नसून खूप मोठे आहे. प्रत्येक रुग्णाच्या गरजेनुसार तयार केलेल्या 'पर्सनलाईज्ड कॅन्सर लस' प्रत्यक्षात काम करू शकतात हेच या अभ्यासाने सिद्ध केले आहे."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

























