4-5 तास झोपूनही थकवा जाणवत नाही? तज्ज्ञांचा महत्त्वाचा इशारा

फोटो स्रोत, María Medem/ BBC
- Author, अमांडा रुग्गेरी
- Published
- वाचन वेळ: 7 मिनिटे
काही लोकांना कमी झोपही पुरेशी ठरते. मात्र, या 'कमी लोकांमध्ये' आपणही आहोत का, हे ओळखणं मात्र तेवढं सोपं नाही.
एमी प्यू बर्नार्ड सांगतात की, त्यांना झोप फारशी लागतच नाही. आजही त्या साधारणपणे रात्री 10 वाजता वाजता झोपायला जातात आणि पहाटे साडेचारच्या सुमारास उठतात. त्या म्हणतात, "मी पूर्णपणे जागी असते. मला अंथरुणात पडून राहणं शक्यच होत नाही."
कोलोरॅडो विद्यापीठात इम्युनॉलॉजीच्या प्राध्यापक असलेल्या बर्नार्ड यांना कधी कधी लगेच झोप लागतच नाही. अशावेळी त्यांची झोप केवळ 5 तासांची होते.
विशेष म्हणजे, एवढी कमी झोप घेऊनही दुसऱ्या दिवशी त्यांना सहसा उत्साही वाटत असततं. त्या कुत्र्याला फिरायला घेऊन जातात, जिममध्ये एक तास व्यायाम करतात आणि सकाळी 8 वाजण्यापूर्वीच दीड तास कामही उरकतात.
एवढी कमी झोप घेऊनही बर्नार्ड इतकी कामं कशी करू शकतात, याचं त्यांच्या मित्रांना आश्चर्य वाटतं. मात्र, त्यांच्या कुटुंबात हे अगदी सामान्य आहे. त्यांचे वडील आणि भाऊ यांनाही तितकीच कमी झोप पुरते.
अर्थात, आपल्यापैकी बहुतेकांना यापेक्षा जास्त झोपेची गरज असते.
अमेरिकेच्या नॅशनल स्लीप फाउंडेशनने उपलब्ध संशोधनाचा आढावा घेऊन केलेल्या ताज्या अभ्यासानुसार, 26 ते 64 वयोगटातील प्रौढ व्यक्तींना दर 24 तासांत साधारणपणे 7 ते 9 तास झोप आवश्यक असते.
काही लोकांना कमी तर काहींना जास्त झोपेची गरज का असते, हा प्रश्न शास्त्रज्ञांसाठी अनेक वर्षांपासून एक कोडे राहिला आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत झोपेच्या या फरकामागे जनुकीय घटकांची भूमिका असल्याचे अनेक संशोधनांतून समोर आलंय.
बर्नार्ड यांच्यासारख्या व्यक्तींमध्ये आढळणाऱ्या दुर्मिळ जनुकीय बदलांपासून ते शेकडो लोकांमध्ये आढळणाऱ्या अधिक सामान्य जनुकीय प्रकारांपर्यंत अनेक गोष्टी यामागे आहेत.
काही लोकांना इतकी कमी झोप घेऊनही त्रास का होत नाही, हे समजून घेण्याचा शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. भविष्यात या संशोधनाचा उपयोग पुरेशी झोप न मिळणाऱ्या लोकांना त्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी मदत करण्यासाठी होऊ शकतो.
सुरुवातीचे संकेत
2019 मध्ये बर्नार्ड यांना त्यांच्या कमी झोपेचे संभाव्य कारण समजलं.
कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या सॅन फ्रान्सिस्को येथील संशोधकांच्या एका पथकानं मानवी झोपेच्या कालावधीशी संबंधित एक जनुकीय बदल शोधून काढला होता.
हा जनुकीय बदल असलेल्या व्यक्ती साधारण वेळेत झोपायला जात असल्या, तरी त्या पहाटे लवकर उठत होत्या. त्यांची रात्रीची झोप साधारणपणे 4 ते 6.5 तासांची होती. संशोधकांना रक्ताचा नमुना पाठवल्यानंतर बर्नार्ड यांनाही आपण अशाच व्यक्तींपैकी एक असल्याचं समजलं.
या दुर्मिळ आणि अनुवंशिक स्थितीला 'फॅमिलियल नॅचरल शॉर्ट स्लीप' (FNSS) असं म्हणतात. त्यानंतरच्या काही वर्षांत एफएनएसएसशी संबंधित इतर अनेक जनुकीय बदलही शोधण्यात आलेत.

फोटो स्रोत, Getty Images
या संशोधनाचं नेतृत्व करणारे आण्विक जीवशास्त्रज्ञ यिंग-हुई फू यांच्या मते, एफएनएसएस असलेल्या व्यक्ती इतकी कमी झोप घेऊनही सामान्यपणे कशा राहू शकतात, हे या संशोधनातील सर्वात मोठं कोडं आहे. याचे नेमके कारण शोधण्याचे काम अजूनही सुरू आहे.
एफएनएसएसशी संबंधित जनुकीय बदल केवळ झोपेचा कालावधी कमी करत नाहीत, तर कमी झोपेचे काही दुष्परिणाम टाळण्यासही मदत करू शकतात, असे सूचित करणारे काही महत्त्वाचे पुरावे समोर आले आहेत. यामध्ये स्मरणशक्तीवर होणाऱ्या परिणामांचाही समावेश आहे.
2019 मध्ये फू यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या एका प्रयोगात उंदरांमध्ये एफएनएसएसशी संबंधित जनुकीय बदल घडवून आणण्यात आला.
या जनुकीय बदलामुळे संबंधित उंदरांची झोप कमी झालीच, पण त्यांची स्मरणशक्तीही तुलनेनं चांगली राहिल्याचे संशोधकांना आढळले.
दुसऱ्या एका प्रयोगात अशाच प्रकारचे काही जनुकीय बदल असलेल्या उंदरांना अल्झायमरसारखा आजार होण्याची शक्यताही कमी असल्याचं दिसून आलं.
2014 मध्ये एका आंतरराष्ट्रीय संशोधन पथकाने मानवी जुळ्या भावंडांच्या एका जोडीचा अभ्यास केला. हे दोघेही एकाच गर्भातून जन्मलेले जुळे भाऊ होते. त्यापैकी एकामध्ये कमी झोपेशी संबंधित जनुकीय बदल होता, तर दुसऱ्यामध्ये तो नव्हता.
ज्या भावामध्ये हा जनुकीय बदल होता, त्याला दुसऱ्या भावाच्या तुलनेत नियमितपणे सुमारे 1 तास कमी झोप लागत असल्याचे संशोधकांना आढळले.
या दोन्ही भावांना सलग 38 तास जागं ठेवण्यात आलं. त्यानंतर केलेल्या चाचण्यांमध्ये जनुकीय बदल असलेल्या भावाकडून दुसऱ्या भावाच्या तुलनेत सुमारे 40% कमी चुका झाल्याचे दिसून आले.
दोघांच्या झोपेच्या पद्धतींमध्येही काही महत्त्वाचे फरक आढळले. जनुकीय बदल असलेल्या भावाची झोप कमी असूनही त्याला आपल्या भावाइतकीच जवळपास नॉन-आरईएम झोप मिळत होती. यामध्ये 'स्लो-वेव्ह' किंवा गाढ झोपेचा समावेश होतो. याचा अर्थ असा असू शकतो की, तो जितकी झोप घेत होता, त्यातून त्याला काही बाबतींत अधिक फायदा मिळत होता.
संशोधन अजूनही सुरू
मात्र, या विषयावरील संशोधन अजूनही सुरू असून ते अत्यंत महत्त्वाचे आहे, असे फू सांगतात.
गेल्या काही वर्षांत या जनुकीय बदलांविषयी मिळालेल्या माहितीचा उपयोग लोकांना मदत करण्यासाठी कसा करता येईल, याबाबतची उत्सुकता वाढली आहे.
औषधनिर्मिती क्षेत्रातही या संशोधनातून भविष्यात काही नवीन शक्यता निर्माण होण्याची आशा आहे. उदाहरणार्थ, कमी झोप घेणाऱ्या व्यक्तींच्या जनुकांबाबतच्या शोधातून भविष्यात झोपेच्या विकारांवर उपचार करणारी औषधे विकसित होऊ शकतात. तसेच लष्करी कर्मचाऱ्यांना कमी झोपेतही काम करता येण्यासाठी मदत होऊ शकते.
मात्र, यासाठी शास्त्रज्ञांना दोन गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे. या जनुकीय बदलांमुळे कमी झोप घेणाऱ्या व्यक्तींचे दुष्परिणामांपासून संरक्षण होते का आणि तसे होत असल्यास नेमके कसे होते?
ही माहिती नसताना औषध तयार केले, तर त्याचे अनपेक्षित दुष्परिणाम होऊ शकतात.
फू म्हणतात, "हे नेमके कसे काम करते, हे तुम्हाला समजून घ्यावे लागेल. तुम्ही कमी झोप घेऊ लागलात आणि त्यानंतर 10, 5 किंवा 20 वर्षांनी तुम्हाला अल्झायमर, पार्किन्सन्स किंवा कर्करोग झाला, असे व्हायला नको."

फोटो स्रोत, Getty Images
एफएनएसएसशी संबंधित जनुकीय बदल ही कमी झोपेच्या बाबतीतील काही अत्यंत महत्त्वाची आणि लक्षवेधी उदाहरणं आहेत. मात्र, झोपेचा कालावधी ठरवणाऱ्या अनेक जनुकीय घटकांपैकी ही केवळ काही उदाहरणं आहेत.
एकूणच, एखाद्या व्यक्तीला किती वेळ झोप लागते, यामध्ये 30 ते 65% वाटा अनुवांशिक घटकांचा असू शकतो, असा अंदाज आहे. याचा अर्थ, वेगवेगळ्या व्यक्तींच्या झोपेच्या कालावधीतील फरकापैकी 65% पर्यंत फरक जनुकांमुळे स्पष्ट होऊ शकतो.
आतापर्यंत मानवी जनुकसंचातील अनेक शेकडो घटक झोपेच्या कालावधीवर परिणाम करत असल्याचे आढळले आहे. नुकत्याच झालेल्या एका विश्लेषणात जवळपास 6,50,000 प्रौढ व्यक्तींच्या माहितीचा अभ्यास करण्यात आला. त्यात असे सुमारे 244 जनुकीय घटक आढळले. (हे संशोधन अद्याप प्रकाशित झालेले नाही आणि सध्या त्याचा प्राथमिक संशोधन अहवाल उपलब्ध आहे.)
या संशोधनाच्या प्रमुख लेखिका आणि लंडनमधील किंग्ज कॉलेजच्या जनुकशास्त्रज्ञ इसाबेल ऑस्टिन-झिमरमन सांगतात की, यांपैकी कोणत्याही एका सामान्य जनुकीय बदलाचा स्वतंत्रपणे विचार केला, तर झोपेच्या कालावधीत केवळ 1 मिनिटाचा फरक दिसतो.
मात्र, हे सर्व जनुकीय बदल एकत्रितपणे विचारात घेतले, तर त्यांचा परिणाम मोठा असू शकतो. ऑस्टिन-झिमरमन यांच्या मते, एखाद्या व्यक्तीच्या झोपेच्या कालावधीत इतर व्यक्तींच्या तुलनेत असलेल्या सुमारे 20 मिनिटांच्या फरकामागे जनुकीय घटक कारणीभूत असू शकतात.
मात्र, यांपैकी कोणते सामान्य जनुकीय बदल कमी झोपेचे दुष्परिणाम टाळण्यास मदत करतात, यावर अद्याप फारसं संशोधन झालेले नाही.
लंडनमधील युनिव्हर्सिटी कॉलेजच्या क्लिनिकल संशोधक आणि स्त्रीरोगतज्ज्ञ चियारा पेट्रोसेलिनी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या अलीकडील संशोधनात मात्र याबाबत एक महत्त्वाचा पुरावा समोर आला आहे.
या संशोधन पथकाने बायपोलर डिसऑर्डर असलेल्या आणि प्रसूती झालेल्या 343 महिलांच्या जनुकांचा अभ्यास केला.
कमी झोपेशी संबंधित असल्याचा संशय असलेल्या जनुकीय बदलांच्या आधारे या महिलांना कमी झोप घेण्याची शक्यता किती आहे, याचे गुणांकन देण्यात आले.
ज्या महिलांना कमी झोप घेण्याची सर्वाधिक अनुवंशिक शक्यता होती, त्यांना सर्वात कमी शक्यता असलेल्या महिलांच्या तुलनेत प्रसूतीनंतर सायकोसिस होण्याचा धोका निम्मा असल्याचे आढळले. निद्रानाशाच्या बाबतीतही असाच कल दिसून आला.
अधिक संशोधनाची गरज असली, तरी या महिलांना आयुष्याच्या सुरुवातीच्या काळातच झोपेतील व्यत्यय सहन करण्याची अधिक सवय झाली असावी, असा संशोधकांचा अंदाज आहे. त्यामुळे प्रसूतीनंतरच्या काळात झोपेत होणाऱ्या व्यत्ययाचा त्यांच्या मानसिक स्थितीवर होणारा परिणाम कमी झाला असण्याची शक्यता आहे.
मात्र, कमी झोप घेण्याची आनुवंशिक प्रवृत्ती असणे नेहमीच फायदेशीर ठरते असे नाही.
खरे तर, ऑस्टिन-झिमरमन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यापेक्षा मोठ्या लोकसंख्येवर केलेल्या संशोधनात (यात केवळ बायपोलर डिसऑर्डर असलेल्या मातांचाच समावेश नव्हता) असे आढळले की, कमी झोपेशी संबंधित जनुकीय बदल असलेल्या लोकांमध्ये निद्रानाश आणि थकवा जाणवण्याचा धोका अधिक होता.
या जनुकीय बदलांचा संबंध विविध मानसिक आणि शारीरिक आरोग्य समस्यांशीही आढळला. यामध्ये एडीएचडी, नैराश्याची लक्षणे आणि टाइप 2 मधुमेह यांचा समावेश होता.
याचा अर्थ कमी झोप किंवा कमी झोपेची आनुवंशिक प्रवृत्ती यामुळेच हे आजार होतात, असा होत नाही. मात्र, कमी झोपेची आनुवंशिक प्रवृत्ती असणे या सर्व धोक्यांपासून संरक्षण देतेच असेही नाही.
कमी झोप घेऊनही आपण ठीक आहोत, हा गैरसमज
या विषयातील आणखी एक गुंतागुंत म्हणजे, कमी झोप घेऊनही आपण व्यवस्थित काम करू शकतो, असं वाटणाऱ्या व्यक्तींनाही स्वतःच्या क्षमतेचा अचूक अंदाज येत नाही.
उदाहरणार्थ, एका संशोधनात निरोगी प्रौढ व्यक्तींना दररोज रात्री केवळ 4 किंवा 6 तास अंथरुणावर राहण्याची परवानगी देण्यात आली. त्यानंतर त्यांच्या विविध बौद्धिक क्षमतांच्या चाचण्या घेण्यात आल्या. या चाचण्यांमधील त्यांची कामगिरी दिवसेंदिवस खालावत गेली.
मात्र, 2 आठवड्यांनंतरही या सहभागी व्यक्तींनी आपल्याला केवळ 'थोडीशी' झोप येत असल्याचे सांगितलं.
वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटीच्या स्लीप अँड परफॉर्मन्स रिसर्च सेंटरमधील झोपेचे संशोधक हान्स व्हॅन डोंगेन यांनी या संशोधनात सहलेखक म्हणून काम केलंय.
ते सांगतात, "तुमची कार्यक्षमता हळूहळू कमी होत जाते. मात्र, त्याच वेळी आपली कार्यक्षमता कमी होत असल्याची जाणीवही तुम्हाला कमी होऊ लागते."
काही लोकांना इतरांच्या तुलनेत कमी झोप पुरते, हे खरे आहे. व्हॅन डोंगेन यांनी केलेल्या आणखी एका संशोधनातही असे आढळलं की, काही लोक झोपेच्या अभावाचा इतरांच्या तुलनेत अधिक चांगल्या प्रकारे सामना करू शकतात.
मात्र, यावरून हे स्पष्ट होतं की, एखादी व्यक्ती किती तास झोपते किंवा दुसऱ्या दिवशी तिला कसं वाटतं, एवढ्याच गोष्टींवरून तिच्या झोपेची गरज समजून घेणं पुरेसं नाही. हा विषय त्यापेक्षा अधिक गुंतागुंतीचा आहे.
दीर्घकाळात ऑस्टिन-झिमरमन आणि फू यांच्यासारख्या संशोधकांचे जनुकांवरील निष्कर्ष कमी झोप घेऊनही खरोखर व्यवस्थित राहू शकणाऱ्या व्यक्ती ओळखण्यास मदत करू शकतात. त्याचबरोबर, कमी झोप घेऊनही आपल्याला काही त्रास होत नाही असे वाटत असले, तरी प्रत्यक्षात ज्यांना त्याचे दुष्परिणाम होण्याचा धोका अधिक आहे, अशा व्यक्तीही ओळखता येऊ शकतील.
भविष्यात या संशोधनातून अशी औषधं विकसित होण्याची आशा आहे, जी कमी झोप घेणाऱ्या व्यक्तींना झोपेच्या अभावाचा सामना करण्याची क्षमता वाढवण्यास मदत करू शकतील.
मात्र, तोपर्यंत या संशोधनातून लोकांना आपण ज्या पद्धतीने झोपतो, त्यामागची कारणं समजून घेण्यास मदत होऊ शकते.
बर्नार्ड सांगतात की, आपल्यामध्ये FNSS शी संबंधित जनुकीय बदल असल्याचं समजल्यानंतर त्यांच्यावरील एक प्रकारचा मानसिक ताण कमी झाला.
एक शास्त्रज्ञ म्हणून, व्यक्तींमध्ये नैसर्गिक फरक असतात आणि त्यात झोपेच्या पद्धतींचाही समावेश होतो, हे त्यांना आधीपासूनच माहीत होतं. त्यांना मिळणाऱ्या अतिरिक्त वेळेचाही त्या नेहमीच फायदा घेत आल्या आहेत. विशेषतः त्यांचे पती आणि मुले झोपलेली असताना त्या आपल्या कामाची सुरुवात करू शकत होत्या.
तरीही, आपण आराम करण्यात कमी पडतोय का किंवा अधिक झोप न लागण्यामागं आपल्यावर कामाचा खूप ताण आहे का, असा प्रश्न त्यांना पडत असे.
बर्नार्ड म्हणतात, "आता मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळालं आहे. जनुकीयदृष्ट्या माझी रचना अशीच आहे, हे मला समजलंय. त्यामुळे आता मला हे स्वीकारावं लागेल."
(अमांडा रुग्गेरी या विज्ञान, मानसशास्त्र आणि इतिहास विषयांवरील पत्रकार आहेत. त्यांनी 'हाऊ टू स्लीप बेटर' या वृत्तमालिकेचे लेखन केले आहे. त्यांचे आगामी पुस्तक 'द स्लीप मिथ' 2027 मध्ये प्रकाशित होणार आहे.)
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)























