बस्तरचा अनोखा दसरा : 76 दिवस चालतो उत्सव, पण रावण दहनाची नाही परंपरा

Photo Caption- बस्तर दसऱ्याचं वेगळेपण म्हणजे यातल्या प्रत्येक समाजाची जबाबदारी परंपरेनुसार निश्चित केलेली आहे.
फोटो कॅप्शन, बस्तर दसऱ्याचं वेगळेपण म्हणजे यातल्या प्रत्येक समाजाची जबाबदारी परंपरेनुसार निश्चित केलेली आहे.
    • Author, आलोक पुतुल
    • Role, बीबीसी हिंदीसाठी
    • Reporting from, रायपूर
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

देशभरात एका बाजूला रावणाचे महाकाय पुतळे आगीच्या भक्ष्यस्थानी पडत असताना छत्तीसगडच्या बस्तरमध्ये मात्र लाकडाचा एक भव्य रथ जंगलातील वाटांवरून पुढे सरकत असतो. इथे ना रामलीलेचा थाट असतो, ना रावणवधाचा थरार, ना हातात धनुष्यबाण..!

बस्तरमधला दसरा रामाचा नसून, इथली कुलदैवत 'देवी दंतेश्वरी'च्या विजयाचा उत्सव असतो. विशेष म्हणजे बस्तरचा हा अनोखा दसरा महोत्सव तब्बल 76 दिवस चालतो.

या दसऱ्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे यातल्या प्रत्येक जाती-जमातीची कामं पिढ्यान्‌पिढ्या ठरलेली आहेत.

रथ तयार करणारी माणसं एका गावातून येतात, रथाचा दोर आणणारे दुसऱ्या गावचे असतात, तर रथ ओढणारे तिसऱ्याच गावातील.

इतकंच नाही तर हा संपूर्ण सोहळा कोणत्याही विघ्नाविना पार पडावा म्हणून खड्ड्यात बसून सलग 9 दिवस प्रार्थना करणारे 'जोगी' चौथ्या गावातले असतात.

रथासाठी लागणारे लाकूड एका गावातून येते, कारागीर दुसऱ्या गावचे असतात, रथ ओढण्यासाठी लागणारा दोरखंड तिसऱ्या भागातून आणला जातो आणि हा भव्य विजयरथ ओढण्याचा मान किलेपाल परगण्यातल्या माडिया आदिवासींचा असतो.

Photo caption- या उत्सवाचा महाकाय रथ तयार करण्याचे काम एकाच गावातले लोक करतात.]
फोटो कॅप्शन, या उत्सवाचा महाकाय रथ तयार करण्याचे काम एकाच गावातले लोक करतात.

या पूजेनंतर प्रत्यक्ष रथ उभारणीला सुरुवात होते. झारउमरगाव आणि बेडाउमरगावचे कसबी कारागीर तासणी, कुऱ्हाड आणि पारंपरिक हत्यारांच्या जोरावर अवघ्या 10 दिवसांत तब्बल 40 फूट उंच महाकाय रथ उभा करून दाखवतात.

इथे एकाही यंत्राचा वापर होत नाही. रथाच्या निरनिराळ्या भागांसाठी लाकूड आणायचं काम वेगवेगळ्या गावांमध्ये पिढ्यानपिढ्या वाटून दिलेलं आहे. तर रथ ओढण्यासाठी लागणारा भक्कम दोर झाडाच्या सालीपासून हाताने वळला जातो आणि तो आणण्याचा मान पोटानार परिसरातील गावकऱ्यांकडे असतो.

Skip podcast promotion and continue reading
BBC News मराठी आत्ताच फॉलो करा WhatsApp कर
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

पितृमोक्ष अमावस्येच्या संध्याकाळी बस्तर दसऱ्याचा सर्वात थरारक आणि विलोभनीय दृश्य पाहायला मिळते. भंगाराम चौकातल्या 'काछिनगुडी'मध्ये पनका जातीच्या एका लहान मुलीच्या अंगात काछिन देवीचा संचार होतो. त्यानंतर ती मुलगी चक्क तीक्ष्ण काट्यांच्या झोपाळ्यावर बसून दसरा महोत्सव सुरू करण्याची परवानगी देते.

बस्तरचे खासदार आणि बस्तर दसरा समितीचे अध्यक्ष महेश कश्यप सांगतात, "या दसऱ्याचे मुख्य वैशिष्ट्यच हे आहे की, बस्तरमधील सर्व समाजांचे लोक यात सहभागी होतात. प्रत्येक समाजाची जबाबदारी निश्चित केलेली आहे. दरवर्षी हा जगप्रसिद्ध बस्तर दसरा पाहण्यासाठी भारतातूनच नव्हे तर परदेशांतूनही लोक मोठ्या संख्येने दाखल होतात. या दसऱ्यामध्ये आम्ही कोणाचाही पुतळा जाळत नाही."

देशाच्या इतर भागांमध्ये दसरा हा रावणाच्या दहनाने लक्षात ठेवला जातो. बस्तरमध्ये मात्र तो कदाचित त्या लोकांच्या हातांमुळे स्मरणात राहतो जे दरवर्षी हा रथ बनवतात, ओढतात आणि नंतर पुढच्या वर्षासाठी आपापल्या घरी परततात. इथे काहीही जाळून संपवले जात नाही. ही एक परंपरा आहे जी दरवर्षी निरोप घेते आणि पुन्हा नव्याने परत येते.

600 वर्षे जुनी परंपरा

अशी मान्यता आहे की, साधारण 600 वर्षांपूर्वी चालुक्य वंशाचे राजे पुरुषोत्तम देव जगन्नाथपुरीच्या यात्रेला निघाले होते. त्यांच्यासोबत मुरिया, भतरा, गोंड, धाकड, माहरा अशा अनेक समाजांचे प्रमुखही त्यांच्यासोबत गेले होते. राजा पुरुषोत्तम देवही स्वतः कोणत्याही वाहनाचा वापर न करता अनवाणी पायी चालले.

असं म्हटलं जातं की, पुरीच्या राजाने त्यांना 16 चाकांचा एक महाकाय रथ भेट दिला होता. बस्तरला परत आल्यावर राजाने त्या रथाची विभागणी केली. त्यातील 4 चाके त्यांनी भगवान जगन्नाथांना आणि 12 चाके दंतेश्वरी मातेला अर्पण केली. तेव्हापासून बस्तरच्या दसऱ्यात मातेचे छत्र रथावर विराजित केले जाते आणि मगच रथाची भव्य परिक्रमा सुरू होते.

हरेली अमावस्येच्या सकाळी जगदलपूरच्या दंतेश्वरी मंदिरासमोर जंगलातून आणलेला लाकडाचा भलामोठा ओंडका ठेवला जातो. या ओंडक्याला 'ठुरलू खोटला' म्हणतात. रथ घडवण्याच्या अवजारांची आणि या ओंडक्याची मनोभावे पूजा केली जाते. त्याला 'पाठ जात्रा' असं म्हटलं जातं. हाच बस्तर दसऱ्याचा पहिला टप्पा असतो.

देवीचं रूप झालेली ही चिमुरडी पुढे जाऊन बनू इच्छिते कलेक्टर

या काछिन देवीची परवानगी घेऊन हा उत्सव सुरू केला जातो त्या मिरगान, चंडार आणि तिकडा या आदिवासी समाजांच्या कुलदैवत मानल्या जातात.

गेल्या 5 वर्षांपासून काछिन देवीचं रूप साकारणारी 5वीत शिकणारी 10 वर्षांची चिमुरडी पीहू. तिला मोठे होऊन 'कलेक्टर' व्हायचे आहे.

पीहू सांगते, "मी जेव्हा काछिन देवी होते, तेव्हा मला वाटतच नाही की मी पीहू आहे. मी प्रत्यक्ष देवीच्या रूपातच लोकांना दर्शन देते. मला पाहण्यासाठी शेकडो लोक गर्दी करतात. इतकंच काय तर आजूबाजूच्या भागांतून इतर देवी-देवतांनाही माझ्या भेटीला आणलं जातं."

बस्तर दसऱ्यामध्ये रोज एक नवा पारंपरिक विधी पाहायला मिळतो. त्यात हजारो आदिवासी बांधव सहभागी होतात.

Photo caption- पितृमोक्ष अमावस्येच्या संध्याकाळी बस्तर दसऱ्याचे सर्वात थरारक आणि विलोभनीय दृश्य पाहायला मिळते.
फोटो कॅप्शन, पितृमोक्ष अमावस्येच्या संध्याकाळी बस्तर दसऱ्याचे सर्वात थरारक आणि विलोभनीय दृश्य पाहायला मिळते.

अश्विन शुक्ल द्वितीयेपासून सप्तमीपर्यंत दररोज फुलांनी नटलेल्या महाकाय रथाची परिक्रमा निघते. झाडाच्या सालीपासून तयार केलेले जाडजूड दोर हातात धरून हजारो गावकरी हा रथ ओढतात. रथावर विराजमान झालेल्या दंतेश्वरी देवीला पोलिसांकडून सशस्त्र मानवंदना दिली जाते, तर महिला रथाची दृष्ट काढून त्यावर फुलांची उधळण करतात.

अष्टमीच्या मध्यरात्री 'निशा जात्रा'ची परंपरा पार पडते. दंतेश्वरी मंदिरातून निघालेली देवीची पालखी थेट निशा-जात्रा मंदिरात पोहोचते. हे मंदिर वर्षातून फक्त एकदाच उघडलं जातं.

इथे परंपरेनुसार बळी दिला जातो, तर देवीच्या नैवेद्याची आणि प्रसादाची संपूर्ण जबाबदारी पिढ्यानपिढ्या राजपुरोहित कुटुंबाकडेच असते.

दसऱ्याच्या म्हणजेच विजयादशमीच्या दिवशी 8 चाकांचा भव्य विजयरथ मार्गस्थ होतो. परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर रात्रीच्या अंधारात हा रथ चक्क चोरीला जातो आणि कुम्हडाकोटच्या घनदाट जंगलात लपवला जातो. या परंपरेला 'भीतर रैनी'चा विधी म्हटलं जातं.

कुम्हडाकोटच्या याच जंगलात ओडिशा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा अशा विविध राज्यांतून तब्बल 3 हजारांहून अधिक देवी-देवतांना एकत्र आणलं जातं.

दुसऱ्या दिवशी राजघराण्याचे प्रतिनिधी नवीन पिकाचा नैवेद्य दाखवून सर्व जनतेसोबत 'नवाखानी' हा सण साजरा करतात आणि मगच हा रथ पुन्हा परत आणला जातो.

Photo caption- अश्विन शुक्ल द्वितीया ते सप्तमीदरम्यान फुलांनी नटलेल्या रथाची रोज परिक्रमा निघते. झाडाच्या सालीच्या जाडजूड दोरखंडाने हजारो गावकरी हा रथ ओढतात.
फोटो कॅप्शन, अश्विन शुक्ल द्वितीया ते सप्तमीदरम्यान फुलांनी नटलेल्या रथाची रोज परिक्रमा निघते. झाडाच्या सालीच्या जाडजूड दोरखंडाने हजारो गावकरी हा रथ ओढतात.

या संपूर्ण दसरा महोत्सवाचा शेवट 'मुरिया दरबारा'ने होतो. जुन्या नोंदी सांगतात की, या अनोख्या दरबाराची सुरुवात 8 मार्च 1876 रोजी झाली होती.

राजेशाहीच्या काळात आदिवासींच्या पारंपरिक व्यवस्थेतील प्रमुख मांजी म्हणजे अनेक गावांचा आदिवासी गावप्रमुख, मुखिया (एका विशिष्ट गावाचा प्रत्यक्ष प्रमुख), चालकी (मुख्य साहाय्यक) आणि नाईक (वस्तीप्रमुख) आपल्या गाव-परिसरातील समस्या घेऊन थेट राजाच्या दरबारात हजेरी लावायचे.

हीच लोकपरंपरा आजही सुरू आहे. फरक इतकाच की, आता राजाच्या जागी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी लोकांच्या समोरासमोर बसतात.

या मुरिया दरबारानंतर बाहेरच्या भागांतून आलेल्या सर्व देवी-देवतांना मोठ्या आदराने निरोप दिला जातो. दंतेवाड्याहून आलेली मावली मातेची पालखी आणि दंतेश्वरी देवीचे छत्र सशस्त्र मानवंदनेच्या गजरात भव्य मिरवणुकीने माघारी फिरतात.

दसरा संपतो. रथ जागेवर परततो. देवी आपल्या गाभाऱ्यात परततात आणि दूरदूरच्या गावांतून आलेली माणसं परतीच्या प्रवासाला लागतात.

पण पुढच्या वर्षी पुन्हा जंगलातून लाकडाचा ओंडका येईल, कारागिरांचे हात पुन्हा हत्यारं चालवतील, झाडांच्या सालींपासून दोरखंड वळले जातील आणि हजारो हात पुन्हा एकदा तो महाकाय रथ ओढण्यासाठी एकवटतील.

पीहू कदाचित तोपर्यंत पुढच्या वर्गात गेलेली असेल. पण काछिन देवी होताना ती पुन्हा कदाचित तेच सांगेल की, त्या क्षणी ती पीहू उरलेली नसते.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)