अमेरिकेतील सिएटलमध्ये गोळीबार, अनेक जण जखमी

अमेरिकेतील सिएटल शहरात गोळीबाराची घटना

फोटो स्रोत, Reuters

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

अमेरिकेतील सिएटल शहरात गोळीबाराची घटना घडली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

ही घटना सिएटलमधील प्रसिद्ध स्थळ असलेल्या स्पेस नीडलजवळच्या सिएटल सेंटरमध्ये घडली.

एक्स या सोशल मीडिया साईटवरील एका पोस्टमध्ये सिएटल पोलिसांनी म्हटले, "पोलीस एका गोळीबाराच्या घटनेचा तपास करत आहेत. या गोळीबारात अनेक जण जखमी झाले आहेत. सिएटल सेंटरमध्ये गोळीबार झाला आहे. अधिक माहिती लवकरच दिली जाईल. कृपया त्या परिसरात जाणे टाळा."

सिएटल सेंटर येथे 'द बाईट ऑफ सिएटल फूड फेस्टिव्हल' आयोजित करण्यात आला होता. या वार्षिक कार्यक्रमात खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आणि 'लाईव्ह म्युझिक' कार्यक्रमांचा समावेश असतो. या फेस्टिव्हलला लाखो लोक उपस्थित राहतात.

द सिएटल टाइम्सच्या वृत्तानुसार, प्रत्यक्षदर्शींनी रविवारी (26 जुलै) स्थानिक वेळेनुसार सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास (भारतीय वेळेनुसार 27 जुलैला सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास) अनेक गोळीबारांचे आवाज ऐकल्याचे सांगितले. एका उपस्थिताने त्या घटनेचं वर्णन "पूर्णपणे गोंधळाचे" असे केले.

किती लोक जखमी झाले आहेत किंवा संशयितांना अटक करण्यात आली आहे का, हे तत्काळ स्पष्ट झालेले नाही.

इतर प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, घटनास्थळावरून पळून जाण्यापूर्वी त्यांनी अनेक गोळीबाराचे आवाज ऐकले.

"सुरुवातीला मला वाटलं की ते फटाके आहेत आणि मग सगळे आमच्या बाजूने धावत जाऊ लागले," असे स्थानिक रहिवासी निक बेट यांनी किरो टीव्हीला सांगितले.

दुसऱ्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, ती बागेतून धावत गेली आणि लपण्यासाठी खाली वाकली.

आणखी एक प्रत्यक्षदर्शी लिन कोल्स म्हणाल्या, "सगळेच धावू लागले, म्हणून आम्हीही धावू लागलो. आम्ही गर्दीसोबत धावत राहायचं ठरवलं. आपण कुठे आहोत हे पाहण्यासाठी मी स्पेस नीडलकडे वर बघत होते. ते खरंच खूप भीतीदायक होतं."

(ही बातमी सतत अपडेट होत आहे)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)