मिरा रोड चाकू हल्ला : धर्म विचारुन सुरक्षारक्षकावर हल्ल्याचा आरोप; CCTV मध्ये काय दिसलं?

- Author, अल्पेश करकरे
- Role, बीबीसी मराठीसाठी
- वाचन वेळ: 4 मिनिटे
मिरा रोड परिसरात एका व्यक्तीनं 2 सुरक्षा रक्षकांवर चाकू हल्ला केल्याची घटना घडली आहे. धर्म विचारून चाकू हल्ला केल्याचा आरोप या तरुणावर ठेवण्यात आला आहे.
आरोपीनं 27 एप्रिलच्या सकाळी एका इमारतीत सुरक्षा रक्षकांना धर्म विचारत चाकू हल्ला केल्याची तक्रार नया नगर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
पोलिसांनी या प्रकरणी कलम 109, 118(2), 196(1) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपासासाठी हे प्रकरण दहशतवादविरोधी पथकाकडं सोपवण्यात आलं आहे.
दरम्यान, या घटनास्थळाजवळच एका व्यक्तीचे दुकान आहे. त्या व्यक्तीने या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
पोलिसांनी 27 एप्रिलला सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेत आरोपीला अटक केली असल्याचं प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.
कोर्टात हजर केल्यानंतर आरोपीला 4 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण कट्टरतावादातून घडल्याचं सांगितलं आहे.
बीबीसीने आरोपीच्या वकिलाची आणि कुटुंबाची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असून, अद्याप ती मिळालेली नाही. प्रतिक्रिया मिळाल्यास ती अपडेट करण्यात येईल.
घटनास्थळाजवळ दुकान असलेल्या व्यक्तीने काय सांगितले?
घटनास्थळासमोर दुकान असलेले महमूद यांनी पीटीआयला सांगितले, "मी घरी होतो. सकाळी सुमारे 8 वाजता येथे आलो तेव्हा मोठा पोलीस बंदोबस्त होता. मी माझ्या कामगारांना विचारले काय झाले, तेव्हा त्यांनी सांगितले की एक माणूस जवळच्या इमारतीत राहत होता. सकाळी तो नमाज पठणासाठी गेला होता आणि त्यानंतर तो परत आला आणि इथे फिरत होता. तो फिरत असताना त्याचा वॉचमनशी वाद झाला.
"तो वाद पुढे मारामारीत बदलला असं माझ्या कामगाराने मला सांगितले. मी येथे असलेल्या सुरक्षा रक्षकाला विचारले तेव्हा त्यानेही तेच सांगितले की तो माणूस फिरत होता आणि त्यादरम्यान काही बोलणं झालं त्यातून त्यांचे भांडण झाले आणि मारामारी झाली. असं माझ्या कामगारांनी आणि सुरक्षा रक्षकांनी मला सांगितलंय. आता लोक याला हिंदू-मुस्लीम रंग देत आहेत," असं महमूद यांनी सांगितले.
नेमकं प्रकरण काय?
सुरक्षा रक्षकांनं दिलेल्या तक्रारीनुसार, "26 एप्रिलची मध्यरात्रीनंतरची ही घटना आहे. मिरा रोडमध्ये एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत हे सुरक्षा रक्षक ड्युटीवर असताना मध्यरात्रीनंतर 3 वाजता एक अनोळखी व्यक्ती तिथं आला."
यावेळी आरोपीनं सुरक्षा रक्षकाला धार्मिक स्थळ कुठं आहे असं विचारलं. सुरक्षारक्षकानं त्याला पत्ता सांगितला आणि तो व्यक्ती तिथून निघून गेला.
यानंतर सुरक्षारक्षक पहाटे 4 च्या सुमारास चहा पिण्यासाठी जवळच्या एका दुकानात गेला. तिथंही ती व्यक्ती सुरक्षारक्षकाला दिसला. सुरक्षारक्षक तिथून जात असताना तो व्यक्ती त्यांच्या जवळ आला आणि त्याने धर्म विचारत सुरक्षा रक्षकाचा हात पकडून त्याच्यावर चाकूनं वार केला.

फोटो स्रोत, Maharashtra Police
या प्रकारानंतर सुरक्षारक्षक तिथून पळून कामाच्या ठिकाणी आला आणि इतर सहकाऱ्यांना घडलेला प्रकार सांगितला. तेव्हा तोच हल्लेखोर तिथंही आला.
हल्लेखोराने इतर सुरक्षा रक्षकांनाही धार्मिक ओळख विचारली आणि धार्मिक प्रार्थना म्हणायला सांगितली. सुरक्षा रक्षकाला ही धार्मिक प्रार्थना म्हणता आली नाही, यानंतर त्यानं त्यांच्यावर हल्ला केला, असा आरोप आहे.
हा प्रकार सुरू असताना सर्वात आधी ज्याच्यावर हल्ला झाला होता तो सुरक्षारक्षक घाबरून तिथून पळून गेला. थोड्या वेळाने तो परत आला तेव्हा हल्लेखोर तिथं नव्हता. पण इतर सुरक्षारक्षकांवरही त्यानं हल्ला केला होता.
या प्रकाराची माहिती मिळताच परिसरातील काही लोक तिथं आले. त्यांनी जखमी सुरक्षारक्षकांना रुग्णालयात नेलं आणि नंतर नया नगर पोलीस ठाण्यात सुरक्षारक्षकांनी तक्रार दिली.
आरोपीला अटक
घटनेची माहिती मिळताच नया नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून पुढील तपास सुरू केला.
नया नगर पोलीस ठाण्यात सुरक्षारक्षक कुमार मिश्रा आणि सुब्रतो सेन यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी कलम 109, 118(2), 196(1) अन्वये गुन्हा दाखल केला.
परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी 31 वर्षीय आरोपीला अटक केली. त्यानंतर हा गुन्हा दहशतवादविरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आला आहे.
आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयानं त्याला 4 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आणि दहशतवादविरोधी पथक संयुक्तपणे या प्रकरणाचा तपास करत असल्याची माहिती मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयानं प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिली आहे.
तर दहशतवादविरोधी पथकानंही प्रसिद्धी पत्रकाद्वारे त्यांच्याकडे वर्ग करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास करत असल्याची माहिती दिली आहे.
हल्ला करणारा तरुण कोण?
हल्ल्याचा आरोप झालेला तरुण उच्चशिक्षित असल्याची माहिती आहे. तो 2019 पर्यंत कुटुंबासोबत अमेरिकेत होता.
त्यानंतर तो मुंबईत कुर्ला आणि सध्या मिरा रोड परिसरात राहत होता. तो क्लासमध्ये शिकवण्याचं काम करत होता. मिरा रोड येथील त्याचं घर सध्या पोलिसांनी सील केले आहे.
मुख्यमंत्री काय म्हणाले?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापुरात पत्रकार परिषदेत या घटनेवर प्रतिक्रिया दिली.
"हे प्रकरण सेल्फ रॅडिकलायझेशनचं (कट्टरतावाद) आहे. मोठ्या प्रमाणात पुस्तकं, साहित्य, इंटरनेट या माध्यमातून आरोपी अशा विचारांनी प्रभावित झालेला दिसतो. त्याने इतर धर्मियांना लक्ष्य करून हल्ला केला आहे. त्याला अटक करण्यात आली आहे," असं मुख्यमंत्री म्हणाले.

फोटो स्रोत, x.com/CMOMaharashtra
तसंच एटीएस आणि एनआयएच्या मदतीनं या रॅडिकलायझेशनच्या मागे कोण आहे? हे शोधण्यात येईल, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान, यासंदर्भात आरोपीच्या कुटुंबीयांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न बीबीसी मराठीने केला, पण अजून त्यांची प्रतिक्रिया मिळालेली नाही.
तरुण, त्याचे कुटुंबीय किंवा वकिलांची बाजू मिळाल्यास ती इथे नमूद केली जाईल.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)


























