सीजेपीकडून कनॉट प्लेसमध्ये तिरंगा 'लहरा दो तिरंगा'ची हाक, दिल्ली पोलिसांनी घेतले 'हे' निर्णय

फोटो स्रोत, Getty Images
कॉक्रोच जनता पार्टीने आज (16 ऑक्टोबर रोजी) दिल्लीतील कनॉट प्लेस येथील सेंट्रल पार्कमध्ये 'लहरा दो तिरंगा' अभियानाअंतर्गत मोर्चाची घोषणा केली आहे.
सीजेपीच्या तिरंगा फडकवण्याच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नवी दिल्ली आणि आसपासच्या परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे.
तसेच सेंट्रल पार्क आणि त्याच्या आसपास मोठ्या संख्येने सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आले आहेत.
दरम्यान, नवी दिल्ली महानगरपालिका परिषदेने (एनडीएमसी) दिल्ली पोलिसांना पत्र लिहून प्रशासकीय कारणांमुळे 16 आणि 17 ऑक्टोबरला सेंट्रल पार्क बंद राहणार असल्याची माहिती दिली आहे. तसेच, पार्कमध्ये अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था करण्याची विनंतीही एनडीएमसीने पोलिसांना केली आहे.
दुसरीकडे अभिजीत दिपके यांनी आपण कोणत्याही परिस्थितीत 16 ऑक्टोबरला सेंट्रल पार्कमध्ये तिरंगा फडकवणार असल्याचे म्हटले. 15 ऑक्टोबरला घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली होती.

फोटो स्रोत, @abhijeet_dipke
भारताचा ध्वज फडकवणं हा काही गुन्हा आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यासाठी आपल्याला तुरुंगात जावं लागलं, तर त्याचीही तयारी असल्याचं अभिजीत दिपके यांनी म्हटलं.
महत्वाचं म्हणजे, दिल्ली पोलिसांनी दिल्लीतील जंतरमंतर या स्थळाला आंदोलनस्थळाच्या यादीतून वगळलं होतं. त्यानंतर, सीजेपीचे सहसंयोजक आशुतोष रांका आणि सौरव दास यांना 13 ऑक्टोबर रोजी जंतर-मंतरवर तिरंगा फडकवून आंदोलन केलं होतं. त्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करत त्यांना 5 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.
त्यानंतरच अभिजीत दिपकेंनी दिल्लीतील कनॉट प्लेस येथील सेंट्रल पार्कमध्ये नागरिकांना येऊन तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले होते.
अभिजीत दिपकेंनी पत्रकार परिषदेत काय म्हटलं?
15 ऑक्टोबरला झालेल्या पत्रकार परिषदेत अभिजीत दिपकेंनी दिल्ली पोलीस आपल्याला अटक करू शकतात, मात्र आपण त्याला घाबरणार नसल्याचं म्हटलं.
ते म्हणाले, "दिल्ली पोलीस आज रात्री किंवा उद्या सकाळी मला अटक करू शकतात. पण मला मोदीजींना सांगायचे आहे की, आम्ही अशा गोष्टींना घाबरणार नाही."
देशात तिरंगा फडकवण्यासाठी तुरुंगात जावे लागले, तरी आपण त्यासाठी तयार असल्याचे दिपके म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images
10 ऑक्टोबरला सीजेपीने दिल्ली बंदची हाक दिल्यानंतर पोलिसांनी दिल्लीत बस आणि मेट्रो सेवा बंद केल्या होत्या. ठिकठिकाणी बॅरिकेडिंग केले होते तसेच इंटरनेट सेवाही बंद केली होती.
तर, 16 ऑक्टोबरला तिरंगा फडकवण्याची घोषणा केल्यानंतर सेंट्रल पार्क बंद करण्यात आल्याचंही दिपके यांनी सांगितलं.
"उद्या आम्ही 100 ठिकाणी तिरंगा फडकवणार असल्याचे सांगितलं, तर तुम्ही ती सर्व ठिकाणे बंद करणार का? आम्ही नरेंद्र मोदी यांच्या सभेला तिरंगा घेऊन गेलो, तर तुम्ही सभा रद्द करणार का? तुम्ही इतके घाबरलेले का आहात? भारतात तिरंगा फडकवणे हा गुन्हा झाला आहे का?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
पोलिसांनी काय सांगितलं?
सीजेपीने सोशल मीडिया आणि पत्रकार परिषदेत नागरिकांना 16 ऑक्टोबरला सायंकाळी 5 वाजता सेंट्रल पार्कमध्ये राष्ट्रध्वजासह एकत्र येण्याचे आवाहन केलं असल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या डीसीपी नेहा यादव यांनी दिली.
आम आदमी पार्टीनेही (आप) आपल्या कार्यकर्त्यांना, समर्थकांना आणि सर्वसामान्य नागरिकांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केलं असल्याचंही त्यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, ANI
नेहा यादव म्हणाल्या, "सध्याची सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्थेची स्थिती लक्षात घेता, कनॉट प्लेस आणि आसपासच्या परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (बीएनएसएस) कलम 163 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत."
"बीएनएसएसच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्या किंवा शांतता व सुव्यवस्था भंग होईल अशा कोणत्याही सभेत सहभागी होऊ नये, असे आमचे सर्वांना आवाहन आहे. या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल."
मात्र, काही निवडक आंदोलकांना इतर योग्य ठिकाणी तिरंगा मार्च काढण्याची परवानगी दिली जाऊ शकते, असेही नेहा यादव यांनी नमूद केले.
आशुतोष रांका आणि सौरव दास यांना 5 दिवसांची न्यायालयीन कोठडी

फोटो स्रोत, Getty Images
सीजेपीचे सहसंयोजक आशुतोष रांका आणि प्रवक्ते सौरव दास यांना 13 ऑक्टोबरला जंतर-मंतरवर तिरंगा फडकवून आंदोलन केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.
शांतता राखण्यासाठी देण्यात आलेल्या जामीनाच्या अटींचे उल्लंघन आणि जंतर-मंतर परिसरात अनधिकृतपणे प्रवेश, असे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले. त्यानंतर दोघांनाही 5 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यांना तिहार तुरुंगात ठेवण्यात आले आहे.
त्यानंतर अभिजीत दिपके यांनी 16 ऑक्टोबरला कनॉट प्लेस येथील सेंट्रल पार्कमध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी एकत्र येऊन तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले.
तिरंगा फडकवल्यामुळे सीजेपीच्या सदस्यांना तुरुंगात डांबण्यात आल्याचा आरोप दिपके यांनी केला.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)


























