नसरापूर बलात्कार-हत्या प्रकरणाच्या निकालावर सर्वांचे लक्ष, जाणून घ्या आतापर्यंतचा घटनाक्रम

घटनेनंतर नसरापूर गावातील सुपर मार्केट चौकात समस्त ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन करत निषेध नोंदवला होता

फोटो स्रोत, UGC

फोटो कॅप्शन, घटनेनंतर नसरापूर गावातील सुपर मार्केट चौकात समस्त ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन करत निषेध नोंदवला होता
    • Author, प्राची कुलकर्णी
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

पुणे जिल्ह्यात नसरापूर गावामध्ये एका साडेतीन वर्षांच्या चिमुकल्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती.

या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून याचा निकाल आज (25 जून) रोजी लागण्याची शक्यता आहे. पुण्यातील विशेष न्यायालयात या प्रकरणाचा निकाल लागणार आहे.

राज्यात जलदगतीने सुनावणी होऊन लागलेल्या निकालांपैकी हा एक ठरणार आहे.

प्रकरण काय?

नसरापूर मध्ये 1 मे 2026 ला साडेतीन वर्षांच्या एका मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. आजोळी राहायला आलेल्या या मुलीला या व्यक्तीने जवळच्या गोठ्यात नेलं होतं. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करून तिचा खून केला होता.

ही मुलगी सापडत नाही म्हणून तिच्या नातेवाईकांनी तिचा शोध घेतला. तेव्हा जवळच्या एका गोठ्यात तिचा मृत देह आढळला होता.

या घटनेनंतर संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली होती. ग्रामस्थांनी आंदोलन करत रस्ता रोको देखील केला होता. त्या पाठोपाठ पुण्यात देखील नवले पुलाच्या परिसरामध्ये आंदोलन करण्यात आलं होतं.

या आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा सुनावण्यात यावी अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येत होती.

नसरापूर प्रकरण

फोटो स्रोत, UGC

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने हालचाली सुरू केल्या होत्या. परिसरातील एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी या मुलीला घेऊन जात असल्याचं दिसलं. त्यानंतर त्याचा शोध घेत पोलिसांनी दीड तासांच्या आत आरोपीला अटक केली होती.

या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यासह गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणाचा तपास करतानाच यापूर्वी देखील या आरोपीवर अशा प्रकारचे गुन्हे दाखल झाले होते मात्र त्यातून त्याची सुटका झाली होती असं निष्पन्न झालं होतं.

आरोपीच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया माध्यमांमध्ये आली होती. आम्हाला त्याचे तोंड देखील पाहायचे नाही अशी प्रतिक्रिया आरोपीच्या कुटुंबीयांनी दिली होती.

वेगाने तपास

या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी विशेष पथक स्थापन केले होते. यात तपास अधिकारी विजयमाला पवार यांच्यासह सहा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

सीसीटीव्ही चित्रीकरण, वैद्यकीय पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि न्यायवैद्यकीय अहवालांच्या आधारे पोलिसांनी तपास केला.

या दरम्यान आरोपीला घटनास्थळावर घेऊन जात तपासणी केली. तसंच आरोपीच्या हालचालींचा मागोवा घेतला. डीएनए नमुने, तसंच घटनास्थळावरील पुरावे आणि सीसीटीव्ही फुटज याची तपासणी करण्यात आली.

16 दिवसात चार्जशीट

झालेली आंदोलने आणि लोकांचा रोष या पार्श्वभूमीवर तपास तर वेगाने झालाच. शिवाय या प्रकरणात कोर्टात सुनावणीची प्रक्रिया देखील जलदगतीने झाली. पोलिसांनी 16 दिवसात सुमारे 1200 पानी दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले.

यानंतर एस आर साळुंके या विशेष न्यायधीशांकडून विशेष न्यायालयात या प्रकरणाची दैनंदिन सुनावणी सुरू झाली. इन कॅमेरा पद्धतीने ही सुनावणी सुरू होती.

मुलीचे कुटुंबीय, प्रत्यक्षदर्शी, पंच, तपास अधिकारी, न्यायवैद्यकीय तज्ज्ञ तसेच डीएनए विश्लेषक, प्रत्यक्षदर्शी मुलं अशी एकूण 55 साक्षीदारांची साक्ष या प्रकरणात नोंदवण्यात आली.

तसेच न्यायालयासमोर सीसीटीव्ही फुटेज, डीएनए रिपोर्ट या सारखे तांत्रिक आणि वैद्यकीय पुरावे देखील सादर करण्यात आले.

नसरापूर प्रकरण

फोटो स्रोत, ANI

बचाव पक्षाने काय सांगितले?

आरोपीने सुरुवातीला आपल्याला या प्रकरणात गोवण्यात आल्याचा दावा केला होता. बचाव पक्षाकडून पुराव्यांबाबत आक्षेप नोंदवत आरोपीला दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

मात्र वैद्यकीय अहवाल आणि डीएनए प्रोफाईलिंगच्या पुराव्यांच्या आधारे आरोपीचा गुन्ह्यातील सहभाग सिद्ध करण्यात आला.

तसेच या घटनेनंतर आरोपीचे संशयास्पद वर्तन आणि त्याला यापूर्वीच्या खटल्यांमुळे असलेल्या कायद्याचा ज्ञानाचा वापर करुन त्याने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला ही बाब ही सरकारी वकिलांनी अधोरेखित केली.

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

1 मे रोजी ही घटना घडल्यानंतर त्याच दिवशी आरोपीला ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर 7 मे ला पोलिसांनी आरोपीला घटनास्थळी नेले. 14 मे रोजी आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. पाठोपाठ 16 मे रोजी पोलिसांनी चार्जशीट दाखल केले.

28 मे रोजी विशेष न्यायालयाने आरोप निश्चित केले. त्यानंतर साक्षी पुराव्यांना सुरात झाली. 3 जून रोजी आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती न्यायालयात सादर करण्यात आली.

17 जून ला पुरावे सादर करण्यात आले. तर 20 जून ला या प्रकरणातील अंतिम युक्तिवाद पूर्ण झाला.

सरकारी पक्षाच्या वतीने अ‍ॅड. अजय मिसर यांनी युक्तिवाद केला. तर आरोपीच्या वतीने अ‍ॅड हिंमतराव सूर्यवंशी यांनी बाजू मांडली.

20 दिवसांमध्ये या संपूर्ण प्रकरणाचा अंतिम युक्तिवाद पूर्ण झाला.

जलदगतीने निकाल

जलदगतीने सुनावणी होऊन निकाल लागलेल्या देशातील प्रकरणांपैकी हे एक ठरणार आहे. यापूर्वी बिहार मधील 2021 च्या एका प्रकरणात एकाच दिवसात कोर्टाने सुनावणीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करत निकाल दिला होता.

जुलै 2021 मध्ये एका आठ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करण्यात आला होता. घटनेनंतरच्या दुसर्‍या दिवशी या प्रकरणात गुन्हा नोंद करण्यात आला होता.

नसरापूर घटनेनंतर लोकांमध्ये संताप निर्माण झाला आणि नागरिक रस्त्यावर उतरले होते.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, नसरापूर घटनेनंतर लोकांमध्ये संताप निर्माण झाला आणि नागरिक रस्त्यावर उतरले होते.

ऑक्टोबर महिन्यात कोर्टाने एकाच दिवसात सुनावणी पूर्ण करत आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र गुन्हा नोंद होण्यापासून ते निकालापर्यंत साधारण 3 महिन्याचा कालावधी लागला.

त्याचबरोबर वाशी मधील पॉक्सोच्या प्रकरणात 45 दिवसात सुनावणी पूर्ण होऊन फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.

नसरापूर प्रकरणात साधारण 50 दिवसांमध्ये सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.