जर अंतराळ युद्ध झालं तर चीन-अमेरिकेवर रशिया ठरू शकतो वरचढ; हे आहे कारण

कंसेप्ट इमेज

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कंसेप्ट इमेज
    • Author, रॉबर्ट ग्रीनॉल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 7 मिनिटे

अमेरिकेनं पृथ्वीच्या कक्षेत एक 'स्पेस वेपन' अर्थात अवकाशातील शस्त्र तैनात केलं असल्याची घोषणा केली आहे.

या घोषणेमुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. सध्या अवकाशात कोणत्या प्रकारची शस्त्रं उपलब्ध आहेत? तसेच, ही शस्त्रं जगातील प्रमुख शक्तींना अवकाशातील आपलं वर्चस्व वाढवण्यासाठी कशाप्रकारे मदत करू शकतील, असे काही प्रश्न निर्माण होतात.

अमेरिकेनं सध्या या शस्त्राबद्दल फारच कमी माहिती दिली आहे. अमेरिकेच्या हवाई दलाचे सचिव ट्रॉय मिंक म्हणाले की, शत्रूच्या कारवाईपासून अमेरिकी सैन्याचं संरक्षण करण्यासाठी पृथ्वीच्या कक्षेमध्ये हे स्पेस वेपन तैनात असणं अत्यावश्यक आहे.

पण हे शस्त्र काय करू शकतं आणि ते अंतराळात केव्हा तैनात करण्यात आलं, हे त्यांनी सांगितलेलं नाही.

तर मग हे कोणत्या प्रकारचं शस्त्र असू शकतं? अंतराळातील लष्करी घडामोडींची सद्यस्थिती नक्की काय आहे? आणि इतर कोणत्या देशांकडे अशी शस्त्रं असू शकतात, हे पाहूयात.

अंतराळातील लष्करी घडामोडी तीव्र

अंतराळ युगाच्या सुरुवातीपासूनच अवकाशामध्ये लष्करी हालचाली होत आल्या आहेत. सोव्हिएत संघानं 1960 च्या दशकाच्या उत्तरार्धात अंतराळात शस्त्रं तैनात केली होती.

सोव्हिएत संघानं इस्त्रेबिटेल स्पुटनिकोव्ह (IS) कार्यक्रम सुरू केला होता. त्याचा अर्थ 'उपग्रहांचा विनाश करणारा' असा होतो.

या कार्यक्रमाअंतर्गत, असे उपग्रह तयार करण्यात आले होते, जे दुसऱ्या उपग्रहाच्या कक्षेत जाऊन स्फोट करू शकत होते.

अनेक प्रकारच्या शस्त्रांमुळे अंतराळात प्रचंड प्रमाणात कचरा आणि विध्वंस निर्माण होण्याची शक्यता आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अनेक प्रकारच्या शस्त्रांमुळे अंतराळात प्रचंड प्रमाणात कचरा आणि विध्वंस निर्माण होण्याची शक्यता आहे.

सामान्यत:, अमेरिकन उपग्रहांना लक्ष्य करणं, हे त्यांचं ध्येय असायचं.

स्फोटानंतर बाहेर फेकल्या जाणाऱ्या धातूच्या तुकड्यांमधून ते इतर उपग्रहांना नुकसान पोहोचवू शकायचे.

आज, विविध देशांच्या आधुनिक सैन्यांकडून वेगवेगळ्या उद्देशांसाठी अवकाशात उपग्रह तैनात केले जातात.

यांचा उपयोग टेहळणी, दळणवळण सुरक्षित राखणं आणि क्षेपणास्त्राचं प्रक्षेपण शोधण्यासाठी केला जातो.

हे उपग्रह लक्ष्याचं नेमकं ठिकाण निश्चित करण्यासही मदत करतात, जेणेकरून त्यावर हल्ला करता येईल.

युद्धात तंत्रज्ञानाचा वापर वाढत असल्यामुळे, आता अंतराळात लष्करी उपकरणांचा वापरही वाढेल असा अंदाज तज्ज्ञांकडून केला जातो.

अमेरिकेनं कोणतं शस्त्र तैनात केलं आहे?

डॉ. ब्लेडिन बोवेन हे रॉयल युनायटेड सर्व्हिसेस इन्स्टिट्यूट (RUSI) मधील मिलिटरी सायन्स विभागात असोसिएट फेलो आहेत.

ते डरहॅम विद्यापीठात 'स्पेस पॉलिटीक्स' अर्थात 'अवकाशाशी संबधित राजकारण' या विषयाचे सहयोगी प्राध्यापकही आहेत.

त्यांनी सांगितलं की, अमेरिकेनं जाहीर केलेल्या शस्त्रास्त्रांविषयी ते केवळ अंदाजच लावू शकतात.

"मला वाटतं की ती एक इलेक्ट्रॉनिक युद्धप्रणाली किंवा रेडिओ सिग्नल जॅम करणारं उपकरण असू शकतं," असं त्यांनी बीबीसी रेडिओ 4 च्या 'टुडे' कार्यक्रमाला सांगितलं.

"हे एक 'अँटीसॅटेलाईट' अर्थात उपग्रहविरोधी शस्त्र देखील असू शकतं, जे एखाद्या उपग्रहाला पूर्णपणे नष्ट न करता त्याला निष्क्रिय करू शकेल."

त्यांनी स्पष्ट केलं की, अशी शस्त्रं पृथ्वीवर आधीपासूनच अस्तित्वात आहेत आणि ती उपग्रहांचा संचार आणि त्यांच्या संपर्कव्यवस्थेत व्यत्यय आणू शकतात.

तज्ज्ञांच्या मते, अंतराळ शस्त्रांमुळेही मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होऊ शकतो.
फोटो कॅप्शन, तज्ज्ञांच्या मते, अंतराळ शस्त्रांमुळेही मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होऊ शकतो.

"जर रेडिओ संपर्क तुटला, तर तुमचा उपग्रह जवळजवळ निरुपयोगी ठरतो," असं बोवेन म्हणाले.

मात्र, अमेरिकनं तैनात केलेलं शस्त्र त्याहून अधिक धोकादायक आणि कदाचित विनाशकारी शस्त्रही असू शकतं, ही शक्यता देखील बोवेन यांनी नाकारली नाही.

अशा शस्त्रामुळे अवकाशात मोठ्या प्रमाणात विध्वंस आणि त्याअनुषंगानं कचराही तयार होऊ शकतो.

पुढे ते म्हणाले की, "हे शस्त्र म्हणजे दुसऱ्या उपग्रहाला धडक मारून त्याला नष्ट करू शकेल, असं एखादं वाहन असण्याची शक्यता फारच कमी आहे."

"स्वत:मधून काहीतरी प्रक्षेपित करून दुसऱ्या एखाद्या उपग्रहाला नष्ट करू शकेल, अशा प्रकारचंही हे वाहन असू शकतं."

"दुसरी शक्यता अशी आहे की, तो एक असा उपग्रह असू शकतो जो दुसऱ्या उपग्रहाजवळ जाऊन, त्याची तपासणी करून, त्याला पकडू शकेल."

रशिया आणि चीनकडेही अशी शस्त्रं आहेत का?

रशिया आणि चीनसारख्या अमेरिकेच्या प्रतिस्पर्धी देशांनीही अंतराळात अशी शस्त्रं तैनात केली आहेत की नाही, हे सांगणं कठीण आहे.

ज्युलियाना झुसे या पूर्वी RUSI इथं संशोधन फेलो होत्या. आता त्या जर्मन इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल अँड सिक्युरिटी अफेअर्स इथं संशोधक आहेत.

"चीन आणि रशिया या दोन्ही देशांनी अशा घडामोडी केल्या आहेत," असं त्यांनी बीबीसीला सांगितलं.

"रशियाच्या बाबतीत, आम्हाला अशी हालचाल दिसून आली आहे जी त्याच कक्षेत उपग्रहविरोधी शस्त्राच्या परिक्षणासारखी असू शकते," असं ते म्हणाले.

"याचा अर्थ असा की, रशियाने चाचणीसाठी एखादं शस्त्र किंवा क्षेपणास्त्र कक्षेत प्रक्षेपित केलं असावं."

"यासारख्या इतरही कारवाया झाल्या आहेत. पण अमेरिकन शस्त्रास्त्रांविषयी कोणतीही माहिती उपलब्ध नाही, त्यामुळे त्यांची तुलना करणं अवघड आहे."

रशियाकडे कमी अंतराळ शस्त्रे आणि उपग्रह आहेत, परंतु त्यांची क्षेपणास्त्र क्षमता ही कमतरता भरून काढते.
फोटो कॅप्शन, रशियाकडे कमी अंतराळ शस्त्रे आणि उपग्रह आहेत, परंतु त्यांची क्षेपणास्त्र क्षमता ही कमतरता भरून काढते.

अमेरिकेनं अंतराळात तैनात केलेली शस्त्रं सामान्य शस्त्रांपेक्षा वेगळी असू शकतात.

परंतु, अमेरिका, रशिया आणि चीन यांच्याकडे पृथ्वीवरून अंतराळातील लक्ष्यांवर डागता येणारी शस्त्रं फार पूर्वीपासून आहेत.

चीननं अमेरिकेच्या घोषणेला विरोध केला आहे आणि अंतराळातील शस्त्रास्त्र स्पर्धा थांबवली पाहिजे, असंही म्हटलं आहे.

नंतर, बीबीसीशी बोलताना बोवेन यांनी चीनच्या वक्तव्यावर टीका केली.

त्यांनी या गोष्टीचं वर्णन 'एका चोरानं दुसऱ्या चोराला चोर म्हणणं' अशा शब्दात केलं.

"जर तुम्ही या क्षेत्रातील घडामोडींशी आधीपासूनच परिचित असाल, तर रशियन आणि चिनी सरकारांचे हे दावे किती पोकळ आहेत हे तुम्हाला माहीत असेलच," असंही बोवेन म्हणाले.

ते म्हणाले की, "अमेरिका, रशिया, चीन आणि भारताने वेगवेगळ्या प्रकारची उपग्रहविरोधी किंवा अंतराळविरोधी शस्त्रं विकसित केली आहेत."

रशिया आणि चीनने अंतराळात अशा अनेक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे, ज्यांचा वापर शस्त्र म्हणून करता येण्याची क्षमता आहे.

उपग्रहांचा पाठलाग करणारं तंत्रज्ञान

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

गेल्या 10 वर्षांत, रशिया आणि चीनने अंतराळात मोठ्या संख्येनं 'रेंडेव्हू अँड प्रॉक्झिमिटी ऑपरेशन्स' (RPO) राबवल्या आहेत.

यामध्ये एक उपग्रह दुसऱ्या उपग्रहाजवळ जातो आणि त्याच्या आसपास काम करतो.

रशियन आणि चीनी उपग्रह देखील पाश्चात्य उपग्रहांच्या जवळ जाताना आणि त्यांचा 'पाठलाग' करताना दिसून आले आहेत.

डॉ. रॉड थॉर्नटन हे किंग्ज कॉलेज लंडनमध्ये रशियन सुरक्षा आणि संरक्षण विषयाचे लेक्चरर आहेत.

"सैद्धांतिकदृष्ट्या, आरपीओ उपग्रहांना इतर उपग्रहांचा शोध घेऊन त्यांना नष्ट करणाऱ्या उपग्रहांमध्ये रूपांतरित केलं जाऊ शकतं," असं त्यांनी बीबीसीला सांगितलं.

ते दुसऱ्या उपग्रहाशी थेट टक्कर देऊ शकतात किंवा त्याला कक्षेतून बाहेर काढू शकतात.

बोवेन यांच्या मते, चीनने 'स्पेस टग'ची, म्हणजेच अवकाशातील उपग्रहाला खेचून दुसऱ्या ठिकाणी हलवण्याची क्षमता देखील दाखवून दिली आहे.

"एखादं वाहन उपग्रहापर्यंत जाऊन त्याला पकडू शकतं आणि दुसऱ्या कक्षेत हलवू शकतं," असंही ते म्हणाले.

बोवेन म्हणाले की हे तंत्रज्ञान फायदेशीर देखील ठरू शकतं.

त्याचा उपयोग अंतराळातील कचरा काढण्यासाठी आणि कार्यरत उपग्रह बाहेर काढण्यासाठी केला जाऊ शकतो.

पण अवकाशातील काही शस्त्रं मोठ्या प्रमाणात कचरा देखील निर्माण करू शकतात.

किंग्ज कॉलेजमधील अवकाश सुरक्षा आणि शस्त्रास्त्र तज्ञ डॉ. मार्क हिलबॉर्न यांनी सांगितलं की, 2007 मध्ये चीनने पृथ्वीवरून थेट अवकाशातील एका उपग्रहाला लक्ष्य करून क्षेपणास्त्राची चाचणी केली होती.

अशा चाचण्यांमुळे निर्माण झालेला बराचसा कचरा दीर्घकाळापर्यंत पृथ्वीभोवती फिरत राहतो.

झू म्हणाले की, त्या चिनी चाचणीतील अवशेष अजूनही कक्षेत असून ते धोकादायक आहेत.

"नुकसान करण्यासाठी धातूचा तुकडा खूप मोठा असण्याची गरज नाही," असंही ते म्हणाले.

"पृथ्वीच्या कक्षेत वस्तू ज्या वेगानं फिरतात, ते पाहता प्लास्टिकचा एक लहान तुकडासुद्धा नुकसान करण्यासाठी पुरेसा आहे."

अण्वस्त्रांचा धोका

थॉर्नटन म्हणतात की रशियाकडे अंतराळातील शस्त्रं आणि उपग्रह कमी आहेत. परंतु, त्यांची क्षेपणास्त्र क्षमता ही कमतरता भरून काढते.

ते म्हणाले की, "रशियाकडे जमिनीवरून प्रक्षेपित होणारी क्षेपणास्त्रं आहेत. ही क्षेपणास्त्रं पृथ्वीच्या निम्न कक्षेत असलेल्या उपग्रहांना लक्ष्य करू शकतात."

रशियाकडे एएसएटी (ASAT) म्हणजेच उपग्रहविरोधी क्षेपणास्त्रं देखील आहेत. ती विमानांमधून खूप उंचीवरून डागली जाऊ शकतात.

ते म्हणाले की, "रशियाला असं वाटतं की, त्याच्या उपग्रहांपेक्षा नाटोकडे अधिक आणि उत्तम उपग्रह आहेत."

थॉर्नटन म्हणतात की रशियाकडे अंतराळातील शस्त्रं आणि उपग्रह कमी आहेत. परंतु, त्यांची क्षेपणास्त्र क्षमता ही कमतरता भरून काढते.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, थॉर्नटन म्हणतात की रशियाकडे अंतराळातील शस्त्रं आणि उपग्रह कमी आहेत. परंतु, त्यांची क्षेपणास्त्र क्षमता ही कमतरता भरून काढते.

त्यामुळेच युद्धभूमीवर काही प्रमाणात समतलता साधण्यासाठी रशियानं उपग्रहविरोधी शस्त्रांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे.

थॉर्नटन यांनी आणखी एक चिंता व्यक्त केली.

ते म्हणाले की, "अंतिम उपाय म्हणून रशिया अंतराळात अण्वस्त्रं देखील डागू शकतो."

"परिणामी होणारा EMP (अणुविद्युतचुंबकीय स्फोट) मोठ्या परिसरातील उपग्रहांना जाळून टाकू शकतो, अगदी संरक्षित नसलेल्या उपग्रहांनासुद्धा."

तर मग अवकाशात अणुबॉम्बची टक्कर होण्याची शक्यता किती आहे?

हे कदाचित तेव्हाच घडेल, जेव्हा पृथ्वीवरही युद्ध सुरू असेल.

"अवकाशात जे काही घडेल ती स्वत:हून घडलेली अशी काही वेगळी घटना नसेल," असं बोवेन म्हणाले.

ते म्हणाले की, "काहीच होणार नाही, अशीही शक्यता आहे. तसेच काहीतरी घडू शकेल, अशीही शक्यता आहे."

अमेरिकेनं आताच ही घोषणा का केली?

अंतराळातील शस्त्रं खूप काळापासून अस्तित्वात आहेत. मग अमेरिकेनं आताच या शस्त्राची घोषणा का केली?

तज्ञांच्या मते, हा काही एखादा मोठा तांत्रिक शोध नसून, हा एक राजकीय संदेश आहे.

बोवेन यांच्या मते, चीनच्या वाढत्या अंतराळ क्षमतेला हे प्रत्युत्तर असू शकतं.

ते म्हणाले की, "चीनने गेल्या 30 वर्षांत आपल्या सैन्याचं आधुनिकीकरण केलं आहे."

चीननं अवकाशात मोठ्या संख्येनं लष्करी उपग्रह तैनात केले आहेत. यामुळे अमेरिकन लष्कराला हल्ला करून नष्ट करता येणाऱ्या लक्ष्यांची संख्या वाढली आहे.

ते म्हणाले की, "आता अमेरिकेकडे अंतराळातील शस्त्रं विकसित करून तैनात करण्यासाठी एक मोठं कारणही आहे."

अमेरिकेप्रमाणेच चीनदेखील अवकाशावर अवलंबून आहे. त्यामुळे, अवकाशात लक्ष्य साधून चीनलाही हानी पोहोचवता येऊ शकते.

अंतराळ युद्धात रशियाला फायदा का मिळू शकेल?

तज्ज्ञांच्या मते, या परिस्थितीमुळे एक विचित्र असं असंतुलन निर्माण झालं आहे.

चीन आणि अमेरिकेच्या तुलनेत रशियाकडे खूप कमी उपग्रह आहेत.

याच कारणामुळे, थॉर्नटन यांना वाटतं की जर अंतराळ युद्ध झालं, तर रशिया हा सर्वात मोठा विजेता ठरू शकतो.

रशियाकडे गमावण्यासाठी कमी उपग्रह असतील, पण तरीही तो इतर देशांच्या उपग्रहांना देखील लक्ष्य करू शकेल.

थॉर्नटन म्हणाले की, यामध्ये अवकाशात डागलेल्या क्षेपणास्त्रांचा समावेश असू शकतो.

याव्यतिरिक्त, असे उपग्रह देखील वापरले जाऊ शकतात जे इतर उपग्रहांच्या जवळ जाऊन त्यांना त्यांच्या जागेवरून हटवू शकतात किंवा नष्ट करू शकतात.

जमिनीवरून मारा करणारी लेझर शस्त्रं देखील याचा भाग असू शकतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)