मोशी डेपो दुर्घटना: 9 जणांचा मृत्यू, तर 9 जणांना वाचवण्यात यश; नातेवाईकांचे गंभीर आरोप

मोशी
  • Published
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मोशी कचरा डेपोच्या दुर्घटनेमधील बचावकार्य 11 जुलैच्या मध्यरात्री थांबवण्यात आलं आहे.

NDRF चे डेप्युटी कमांडंट दीपक तिवारी यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या माहितीनुसार, "NDRF, आर्मी, अग्नशमन दल, सिव्हिल डिफेन्स आणि स्थानिक प्रशासन यांनी एकत्र येऊन 9 जणांना सुखरूप बाहेर काढलं. तर इतर 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांनाही या बचाव कार्यातून बाहेर काढलं आहे. त्यानंतर शनिवारी, 11 जुलैच्या मध्यरात्री हे बचाव कार्य थांबवण्यात आलं आहे."

8 जुलैला मोशी येथील कचरा डेपो परिसरातील 'वेस्ट टू एनर्जी' प्रकल्पाच्या इमारतीवर कचऱ्याचा प्रचंड ढिगारा कोसळून भीषण दुर्घटना घडली होती.

यानंतर, मागील चार दिवसांपासून ढिगाऱ्याखाली अडकून पडलेल्यांचं बचावकार्य सुरू होतं. दरम्यान, जिथे घटना घडली तेथून कुठलीच माहिती मिळत नसल्याचा आणि प्रशासनानं या बचावकार्यात उशीर केल्याचा आरोप ढिगाऱ्याखाली अडकून पडलेल्या लोकांच्या नातेवाईकांनी केला होता.

प्रशासनाचा ढिसाळ कारभार याला जबाबदार असल्याचंही नातेवाईकांनी म्हटलं होतं.

मागील 5 दिवसांपासून हे लोक आपल्या प्रियजणांच्या परतण्याची वाट बघत होते. अखेर आज 9 जणांना बाहेर काढण्यात आलं असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे.

मोशी कचरा डेपो दुर्घटना
फोटो कॅप्शन, मोशी दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकून पडलेल्या अक्षय सावंतचे काका मागील 5 दिवसांपासून दुर्घटनास्थळी त्याची वाट पाहत होते. आज अक्षयचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

कुणाचा मृत्यू, कोण बचावलं?

घटनेतील मृतांची नावे

1. भावेश वाणी

2. अक्षय सावंत

3. सुनील कोरके

4. सन्नी माने

5. महेश कुंभार

6. नागेश गायकवाड

7. रणजीत पाटील

8. राहुल गायकवाड

9. वामन कसबे

स्वतः बाहेर पडलेले

  • अशोक गुप्ता
  • महेंद्र कुमार
  • चंद्रशेखर सिंग
  • दिनेश सुतार
  • श्रीबाला मानगेद

बचावकार्यातून बाहेर काढण्यात आलेले

  • सोमनाथ शेळके
  • सचिन दवाडगाव
  • दादासाहेब आराडे
  • सुजाता शिंदे
  • रामप्रताप चव्हाण
  • रणवीर सिंह
  • विजय सपकाळ
  • भूषण पाटील
  • महेश राऊत

मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील एकूण पीडित - 23

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून दुर्घटनास्थळाची पाहणी

मोशी येथील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पात घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन सुरू असलेल्या शोध व बचावकार्याची पाहणी केली.

यावेळी माध्यमांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, "कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून बाहेर पडणारा विषारी वायू, सततचा पाऊस आणि ढिगाऱ्याची गुंतागुंतीची रचना यामुळे बचावकार्यात काही अडथळे निर्माण झाले."

"मात्र, अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि प्रशिक्षित पथकांच्या मदतीने शोध व बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. दुर्घटनास्थळावरून बाहेर काढण्यात येणारे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांना सन्मानपूर्वक दाखवावेत", अशा स्पष्ट सूचना प्रशासनाला दिल्याचंही त्यांनी सांगितलं.

सुनेत्रा पवार

दुर्घटनेच्या कारणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असंही पवार म्हणाल्या.

त्या म्हणाल्या, "या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात येईल. चौकशी अहवालानुसार जे कोणी जबाबदार आढळतील त्यांच्यावर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल. तसेच बाधित कुटुंबांना तातडीचा दिलासा मिळावा यासाठी संबंधित कंपनी, महाराष्ट्र शासन आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका या तिन्ही स्तरांवरून आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जात आहे."

नेमकं काय घडलं?

मागील काही दिवसांमध्ये राज्यातील काही भागांत मुसळधार पाऊस बरसला. अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत झाले.

दरम्यान, बुधवारी (8 जुलै) पिंपरी चिंचवड परिसरातील मोशी कचरा डेपो परिसरात ग्राउंड फ्लोअर प्लस 2 मजली (G+2) आरसीसी संरचनेतील कॅन्टीन व कार्यालयाची इमारत पाया खचून कोसळली.

ही घटना दुपारी दीडच्या सुमारास जेवणाच्या वेळेत घडल्याने अनेक कर्मचारी इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकून पडले.

मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये अंदाजे 23 नागरिक अडकले होते. घटना घडल्यानंतर सुरुवातीला 5 नागरिक सुखरुप बाहेर पडले. तर, 18 जण अडकून होते.

त्यांना बाहेर काढण्यासाठी तातडीने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एन डी आर एफ), भारतीय सेना दल, महापालिका अग्निशमन दल, पीएमआरडीए अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासन यांनी संयुक्तरित्या बचावकार्य सुरू केले.

मोशी कचरा डेपोतील 'वेस्ट टू एनर्जी' प्रकल्पाच्या इमारतीवर कचऱ्याचा डोंगर कोसळला.
फोटो कॅप्शन, मोशी कचरा डेपोतील 'वेस्ट टू एनर्जी' प्रकल्पाच्या इमारतीवर कचऱ्याचा डोंगर कोसळला.

रात्री 8 च्या सुमारास या पथकाने 6 नागरिकांना सुखरुप बाहेर काढले. त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले.

त्यानंतर रात्री दीड वाजेपर्यंत आणखी 3 नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आणि उपचारार्थ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, हे प्रयत्न पुरेसे नसल्याचं नातेवाईकांचं म्हणणं आहे.

सध्या घटनास्थळी दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या सभोवतालचा मलबा हटविण्याचे काम सुरू आहे. यासाठी जेसीबी मशीनचा वापर करण्यात येत आहे.

नातेवाईकांनी काय म्हटलं होतं?

शुक्रवारी (10 जुलै) या दुर्घटनेला 4 दिवस होत आले तरी अद्याप ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यात यश का आलेलं नाही, असा प्रश्न नातेवाईकांनी उपस्थित केलाय.

यंत्रणा अपुरी पडत असेल तर ती वाढवण्यात का येत नाही, असाही संतप्त प्रश्न नातेवाईकांनी उपस्थित केलाय.

आम्हाला आत जाऊ दिलं जात नाहीये, काम कुठपर्यंत आलं याबाबत कोणतीही माहिती दिली जात नाहीये, अशी नातेवाईकांची तक्रार आहे.

आतमध्ये फक्त आर्मी आणि पोलीस जात आहेत, पण आम्हाला जाऊ दिलं जात नाहीये. शासानाकडून आम्हाला प्रतिसाद किंवा कुठलंही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचं नातेवाईकांचं म्हणणं आहे.

मोशी कचरा डेपो दुर्घटनेत अडकलेल्यांचे नातेवाईक त्यांच्या परतण्याची वाट पाहत दुर्घटनास्थळाबाहेर 4 दिवसांपासून थांबून आहेत
फोटो कॅप्शन, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत अडकलेल्यांचे नातेवाईक त्यांच्या परतण्याची वाट पाहत दुर्घटनास्थळाबाहेर 4 दिवसांपासून थांबून आहेत

ज्या ठिकाणी लोक अडकून पडले तिथे वेळेवर काम का चालू करण्यात आलं नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय.

तसेच, बचावकार्यात वापरण्यात येत असलेल्या मशीनरी कमकुवत आणि अपुऱ्या असल्याचंही नातेवाईकांनी म्हटलंय.

आम्ही गेल्या 4 दिवसांपासून प्रतीक्षेत आहोत. पण अद्याप काहीच माहिती मिळालेली नाही. अडकलेल्यांना लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने आणखी प्रयत्न करावे, आवश्यक यंत्रणा, व्यवस्था वाढवावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.

कंपनीनं काय स्पष्टीकरण दिलं होतं?

मोशी दुर्घटनेवर अ‍ॅनाटॉमी वेस्ट हँडलिंग सेल लिमिटेड कंपनीकडून एक निवेदन जारी करण्यात आलं आहे.

या निवेदनानुसार, ही घटना सतत सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे घडली. प्रकल्पाच्या बाहेरील कचऱ्याचा ढिगारा मुसळधार पावसामुळे अस्थिर झाला आणि तो प्रशासनाच्या इमारतीवर कोसळल्याने ही दुर्घटना घडल्याचं दिसून येतं.

प्रकल्पात घटना घडली तेव्हा नियोजित देखभाल कामासाठी उत्पादन बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे त्यावेळी प्रकल्पात मर्यादित कर्मचारी उपस्थित होते.

मोशी कचरा डेपो दुर्घटनेत अडकलेल्यांचे नातेवाईक त्यांच्या परतण्याची वाट पाहत दुर्घटनास्थळाबाहेर चार दिवसांपासून थांबून आहेत

दुर्घटनेनंतर अग्निशमन दल, एनडीआरएफ, भारतीय लष्कर, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि इतर आपत्कालीन यंत्रणांसह बचावकार्य तातडीने सुरू करण्यात आल्याचं कंपनीने म्हटलं आहे.

जखमींना वैद्यकीय मदत, बचावकार्यात सहकार्य आणि प्रभावित कुटुंबांना आवश्यक ती मदत देण्यास कंपनी कटिबद्ध असल्याचंही निवेदनात नमूद करण्यात आलं आहे.

प्रशासनाकडून काय सांगण्यात आलं होतं?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शुक्रवारी (10 जुलै) सुरू असलेल्या बचावकार्याची माहिती दिली होती.

ते म्हणाले होते, "ज्या मजल्यावरती हे 8 लोक अडकल्याची माहिती आहे, त्याठिकाणी कचरा काढण्याचं काम सुरू आहे. घटनास्थळी सुरू असलेल्या बचावकार्याच्या प्रत्येक घडामोडीवर आम्ही बारकाईने लक्ष ठेऊन आहोत. बचावकार्यासाठी आवश्यक असलेली सर्व साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. सद्यस्थितीत 12 मशीनरी काम करत असून आम्ही अजून मशीन मागवत आहोत."

"इमारत एका बाजूने झुकली असल्याने आणि इमारतीचे बांधकाम एका बाजूने ढासळले असल्याने अडचणी येत आहेत. एका बाजूचा मलबा हटविल्यानंतर इमारतीचा जो अस्थिर भाग आहे तो स्थिर झाल्यानंतर आतमध्ये जवानांना प्रवेश करण्यासाठी पुरेसा सुरक्षित मार्ग तयार करून आत अडकलेल्या नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्याची कार्यवाही केली जाईल."

"या बचावकार्यात सहभागी असलेले राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), भारतीय सेना, महापालिका आणि पीएमआरडीए अग्निशमन दल, पोलीस प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग यांनी घटनास्थळाची सद्यस्थिती, भौगोलिक परिस्थिती आणि तांत्रिक बाबींचा विचार करून बचावकार्याची योजना बनवली असून अडकलेले नागरिक सुखरुप बाहेर काढले जातील असा विश्वास आहे," असंही त्यांनी नमूद केलं होतं.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी
फोटो कॅप्शन, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

या दुर्घटनेला कारणीभूत असणाऱ्यांवर काय कारवाई केली जाईल या प्रश्नाला उत्तर देताना आयुक्त म्हणाले होते, "हे बचावकार्य संपल्यानंतर याबाबत चौकशी केली जाईल आणि जे कुणी जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल."

या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर करण्याबाबत आयुक्त म्हणाले होते, "सध्या बचावकार्य सुरू आहे. कंपनीच्या मॅनेजरशी चर्चा झाली असून नुकसानभरपाई दिली जाईल. तसेच, कर्मचाऱ्यांचा विमाही काढण्यात आलेला आहे. त्यासह महापालिकेमार्फत त्यांना मदत देण्याबाबतही आम्ही महापौर आणि इतर पदाधिकाऱ्यांशी चर्चेनंतर निर्णय घेऊ."

मोशी कचरा डेपो दुर्घटनेत अडकलेल्यांचे नातेवाईक त्यांच्या परतण्याची वाट पाहत दुर्घटनास्थळाबाहेर चार दिवसांपासून थांबून आहेत

तर, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) सेकंड कमांड दीपक तिवारी यांनी बचावकार्यातील पुढील मोहिमेबद्दल माहिती दिली होती.

ते म्हणाले होते, "दुर्घटनाग्रस्त इमारतीमध्ये बचावकार्यातील जवानांना सुरक्षित व सहजतेने प्रवेश करणे कठीण जात आहे. त्यामुळे इमारतीच्या आजुबाजूला असलेला मलबा हटविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे."

"याशिवाय, बचावकार्य करताना इमारतीचा धोकादायक भाग अडथळा ठरू नये यासाठी तो हटविण्याचे काम सुरू आहे. इमारतीमध्ये बचावकार्यातील जवानांना सुरक्षितपणे आत प्रवेश करून अडकलेल्या व्यक्तींना सुखरूपपणे बाहेर काढण्यासाठी मोहीम सुरू करण्याचे नियोजन आहे. यातून निश्चितपणे आत अडकलेल्या व्यक्तींपर्यंत पोहोचून त्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्याचा आमचा उद्देश आहे," असंही ते म्हणाले होते.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)