आशा भोसले : भारतीय स्त्रीच्या इच्छेचा, बंडखोरीचा आणि महत्त्वाकांक्षेचा आवाज - ब्लॉग

आशा भोसले

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, अनघा पाठक
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

मादक संगीत, मादक वातावरण. सुरूवातीला एक पाय दिसतो, फिशनेट स्टॉकिंग्स घातलेला. फिशनेट स्टॉकिंग्स म्हणजे 'सेक्सी' असण्याचं प्रतीक. एका पायात सॅण्डल नाहीच, दुसरे सॅण्डल आळसवालेल्या पायाने काढून फेकले. पाय, पोटऱ्या, मांड्या यांचं संपूर्ण दर्शन घडवत कॅमेरा चेहऱ्यापर्यंत येतो.

ती थोडी दुःखी, थोडी तिला दारू चढलेली आणि कोणाची तरी वाट पाहातेय, समोर ग्लास. घड्याळात बारा वाजतात तरी ज्याची वाट पहातेय तो येत नाही. त्यामुळे अजूनच दुःखी. चालतानाही तोल जातोय तिचा.

'चांगल्या' मुलींनी जे जे करायचं नसतं, जे केल्याने संस्कृतीरक्षकांच्या भावना दुखवतात, ते सगळं ती करतेय आणि मग एक आकर्षक आवाज कानावर येतो, 'पिया तू, अब तो आजा, शोला सा मन दहके, आके बुझा जा, तन की ज्वाला ठंडी हो जाय, आके के गले लगा जा!'

फिमेल डिझायर (स्त्रीची कामेच्छा) खुलेपणाने साजरा करणारा आशाजींचा आवाज. यात त्यांनी फक्त गाणं म्हटलं नाही, म्हणजे त्यांचा आवाज दैवी आहेच. पण त्याही पुढे जाऊन प्रियकराकडे 'माझी इच्छा पूर्ण कर' ही मागणी करणारी प्रेयसी कशी वागेल, बोलेल, तिचा श्वास कसा असेल, तिचे हावभाव कसे असतील, तिचा आवाज कसा मादक असेल, हे सगळं त्यांनी तंतोतंत उतरवलं आहे.

त्यांचा आ…जा... ऐकलं आहे का या गाण्यात? थोडं थरथरतं, थोडं लांबलेलं. वाट पाहून अधिर झालेल्या प्रेयसीचं आजा असंच असेल. त्यांचे श्वास ऐकू येतात, या गाण्यात. खरंतर गाताना श्वास ऐकू आले तर गायकाला कच्चं समजतात, पण इथे आशाजींनी मुद्दाम ते श्वास ऐकवले आहेत. अधिर प्रेयसी शांतपणे प्रियकराला ये म्हणणार नाही.

या गाण्यातही प्रेयसी मी 'तुला काय देऊ शकते' ते सांगत नाहीये तर 'मला हे हवं' असं स्पष्ट सांगतेय.

आशा भोसले

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, आशा भोसले

याच्या आधीचंही गाणं होतं, हावडा ब्रिजमधलं. 'आईये मेहरबा'. त्यातही खोडकर आवाज. ती जरी नायकांना 'मेहरबा' म्हणत असली, तरी खरा कंट्रोल तिच्या हातात आहे हेही गाता गाता सांगून देतेय. ही किमया आवाजाने साधलीये आशाजींच्या.

ऐका ते पुन्हा गाणं एकदा, त्यात खोडकर हसू ऐकू येईल तुम्हाला. 'देखा मचलके जिधर, बिजली गिरा दी उधर, किसका जला आशिया, बिजली को ये क्या खबर'.

या वाक्यावर जो कंट्रोल, डॉमिनन्स, बेफिकिरी आणि तरीही झलकणारा हलकासा अल्लडपणा आशाजींनी आणलाय...आहा. तेवढ्या एका वाक्याने वाटतं, खड्ड्यात गेली दुनिया, मैं अपनी फेव्हरिट हू!

टेलर स्विफ्टच्या गाण्यातलं एक वाक्य प्रचंड व्हायरल आहे, 'डार्लिंग आय ऐम ए नाईटमेअर, ड्रेस्ड लाईक डे ड्रीम!'. या वाक्याने जेवढी एजन्सी, स्वतःचा अभिमान, आणि स्वतःचं कौतुक करण्याची वृत्ती मिलेनियल मुलींना दिली नसेल, त्याहून जास्त एजन्सी मला आशाजींच्या 'किसका जला आशिया, बिजली को ये क्या खबर' वाक्यात वाटते.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त, 1

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

आशाजींचा आवाज जवळचा वाटतो कारण तो बंडखोरीचा आहे. त्यांना बंडखोर बनायचं नसावं कदाचित, पण त्यांच्या वाटेला जो संघर्ष आला, किंवा लतादीदींबरोबर नेहमीच तुलना झाली त्यामुळे परिस्थितीने त्यांना बंडखोर बनवलं असावं. लतादीदींचा आवाज म्हणजे खऱ्या अर्थाने त्या काळातल्या आदर्श नायिकेला शोभण्यासारखा.

आदर्श नायिकेला इच्छा, आकांक्षा, कामेच्छा असं काही नाही. त्याकाळात बायकाच दोन सरधोपट भागात विभागलेल्या. चांगली आणि वाईट.

जानकी बखळे कॅलिफोर्नियातील बर्कले विद्यापिठात प्राध्यापक आहेत. त्यांच्या 'व्हॉईस ऑफ इंडिया : लता मंगेशकर अँड द कन्स्ट्रक्शन ऑफ नॅशनल कल्चर' या पुस्तकात त्या लिहितात, "नायिकेचा आवाज सहसा लता मंगेशकर असायच्या. आदर्श स्त्रीत्वाचं प्रतीक म्हणून. त्याकाळात आदर्श स्त्रीची प्रतिमा बनवण्यासाठी पार्श्वगायन फार महत्त्वाचं साधन ठरलं."

नीपा मुजुमदार त्यांच्या 'वॉन्टेड कल्चर्ड लेडिज ओन्ली!' या पुस्तकात लिहितात, "स्त्रीचं शरीर (पडद्यावर दिसणारी व्यक्तिरेखा) आणि आवाज (पार्श्वगायिका) यांना वेगवेगळं केल्यामुळे अशा भावना दाखवणं शक्य झालं ज्या पडद्यावरची व्यक्तिरेखा प्रत्यक्षात सादर करत नव्हती."

आशा भोसले आणि लता मंगेशकर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, आशा भोसले आणि लता मंगेशकर

याचं उदाहरण द्यायचं झालं तर 'आजा आजा मैं हू प्यार तेरा' या गाण्यात आशाजींनी 'आहा आजा.. आ..आ आजा' आवाजातून ज्या प्रकारे श्वास आणि भावना व्यक्त केल्या आहेत, त्या सेक्शुअल क्रिसेंडोशी मिळत्या जुळत्या आहेत. पडद्यावर आशा पारेख पूर्ण कपड्यात नाचतेय. दोघींना वेगवेगळं केल्याने भावनांची एक मोठी रेंज मिळाली आहे.

सुरूवातीला नायिकेला आवाज देण्यासाठी आपली निवड होत नाही म्हटल्यावर आशाजींनी दुसऱ्या, तितक्याच ताकदीच्या स्त्री व्यक्तिरेखेला आवाज द्यायला सुरूवात केली. ही स्त्री व्यक्तिरेखा म्हणजे 'व्हॅम्प'. कॅबरेत नाचणारी हेलन, किंवा अरूणा इराणी किंवा तेव्हाच्या आणखी कुठल्या 'पीनअप गर्ल्स' (असा शब्दच होता त्या काळात).

आशा भोसले

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, आशा भोसले

ही स्त्री व्यक्तिरेखा नायिकेच्या अगदी उलट होती. आज ज्याला अँटगोनिस्ट म्हणता येईल अशी. ही स्त्री तिच्या मर्जीची मालक होती, बऱ्याचदा सिगरेट पिताना, दारू पिताना दिसायची, तिने छोटे कपडे घातलेले असायचे, एका मर्त्य मानवासारख्या तिला भावभावना असायच्या, तिला गोष्टी हव्या असायच्या (कधी कधी हिरो पण), तिच्या नाकावर राग असायचा, तिला जेलसी व्हायची आणि पिक्चरच्या शेवट येत नाही तोवर ती काही त्यागबिग करायची नाही.

शेवट आला की ती मरायची, (कारण स्वतःच्या इच्छा आकांक्षाना महत्त्व देणारी बाई मरायलाच हवी ना), आणि तेव्हा मरताना हिरोसाठी काही त्याग करायची. (म्हणजे तिला स्वर्गप्राप्ती होईल बुवा). आणि मग त्याग करणारी, माणूस म्हणून लाथा खाणारी, पण देवी म्हटलं की खुश होणारी हिरोईन हिरोच्यासोबत गाणं म्हणत पिक्चर संपायचा.

त्या काळात जन्माला आले नसेन म्हणून असेल किंवा बाईला दुय्यम समजणाऱ्या समाजात काहीतरी घोर चुकलं आहे असं सतत वाटल्याने असेल, पण मला जुन्या काळातली नायिका अगदीच भंगार वाटायची आणि 'व्हॅम्प' जवळची वाटते.

हो, आता तीही कशी पेट्रिआर्कीची बळी आहे यावर नंतर कधीतरी, पण निदान तिला जे हवं आहे, पैसा, चांगलं राहाणं, कौतुक आणि हिरो, ते तोंड उघडून ती सांगायची तरी. ती सांगायची म्हणजे आशाजी त्यांच्या आवाजातून सांगायच्या.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त, 2

हळूहळू काळ पुढे सरकला तसं व्हॅम्पच्या तोंडी असलेली गाणी हिरोईनच्या तोंडी यायला लागली. म्हणजे हिरोईन म्हणायला लागली की, 'अरे मला पण आहेच की माझं अस्तित्व.'

'ओ मेरे सोना रे गाण्यात', आशा पारेख म्हणते, 'तूम छुडाओ लाख दामन, छोडते कब है अरमाँ'

अरमाँ सुटत नाही याची प्रांजळ कबुली देणारी हिरोईन, भले गाण्यातल्या एखाद्या वाक्यासाठी का असेना.

भारतीय चित्रपटाच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच हिरोईनने पडद्यावर जाहीरपणे आपली महत्त्वाकांक्षा मांडली असेल, त्यालाही आशाजींचाच आवाज आहे.

तुम्हाला रंगीलामधली उर्मिला चुलबुली म्हणून आठवत असेल, पण मला ती अँबिशिएस म्हणून आठवते. जेव्हा म्हणते ना, 'इतने चेहरो में अपने चेहरे की पहचान तो हो, बडे बडे नामों में अपना भी नामोनिशान तो हो.'

काय कन्विक्शन आहे आवाजात! तेवढ्या एका सेकंदासाठी उर्मिला पण चुलबुली या इमेजमधून बाहेर येते.

लग्न सोडून काहीतरी करण्याची इच्छा असलेली ही हिरोईन, का आमची आयडियल बनणार नाही?

आशा भोसले

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, आशा भोसले

आशाजींनी नंतर गझल, शास्त्रीय संगीत, रिमिक्स, भावगीतं अशी अनंत प्रकारची गाणी गायली. ती सगळीच गाणी सुंदर आहेत. पण त्यांच्या फिमेल डिझायर व्यक्त करणाऱ्या गाण्यांनी भारतातल्या पॉप्युलर कल्चरवर एक मोठा ठसा निर्माण केला आहे. ही गाणी ज्यांनी लिहिली, संगीतबद्ध केली त्या गीतकार-संगीतकारांचं क्रेडिटही तेवढंच आहे, पण लोकांच्या, विशेषतः बायकांच्या लक्षात राहिला तो त्यांचा आवाज.

आशाजी म्हणाल्या होत्या की, 'मला ती गाणी मिळत राहिली जी दुसरं कोणी गात नव्हतं.' पण त्या गाण्यांनी इतिहास घडवला.

2026 मध्ये जाऊन बघा एखाद्या क्लबमध्ये, पबमध्ये, कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये किंवा अगदी गर्ल्स होस्टेलच्या रूममध्ये. आशाजींचं गाणं वाजत असतं, आणि मुली सगळ्या चिंता, त्यांच्यावर लादल्या गेलेल्या आशा अपेक्षा, बंधनं झुगारून त्या गाण्यावर मनमुराद नाचत असतात.

'दुसऱ्या बाई'च्या तोंडी असलेली गाणी प्रत्येकीची आपली झालेली असतात.

आशाजी गेल्यानंतर हेलन यांनी प्रतिक्रिया दिली, "आशाजी माझा आवाज होत्या, त्यांच्यामुळे मी आज इथे आहे."

तसंच काहीसं म्हणावंसं वाटतं, आशाजींच्या गाण्यांनी मला व्हॅम्प बनण्याचं धाडसं दिलं. स्वतःला काय हवं हे ठासून सांगणारी, आणि कोणत्याही तथाकथित आदर्श साच्यात फिट न होणारी व्हॅम्प."

(या लेखातील मतं लेखिकेची वैयक्तिक मतं आहेत.)

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.