वाय-फायचा वेग अचानक कमी झाला? घरातल्या फिशटँकसह या 4 गोष्टींकडे लक्ष द्या

फोटो स्रोत, Getty Images
- Author, थॉमस जर्मेन
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 6 मिनिटे
आज इंटरनेटची दुनिया पूर्णपणे वाय-फायवर चालते. डिजिटल विश्वावर आपण इतके अवलंबून आहोत की, असं म्हणू शकतो की अख्खं जग वाय-फायच्या भरवशावरच चाललंय.
पण तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल की, तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या काही गोष्टी वाय-फायच्या स्पीडमध्ये अडथळा आणू शकतात. अगदी तुमचं जेवणही याला कारणीभूत ठरू शकतं.
वाय-फाय कनेक्शनच्या समस्यांचा सामना करावा लागणाऱ्या जगातील पहिल्या व्यक्तींमध्ये अॅलेक्स हिल्स यांचा समावेश होता.
ते 1993 मध्ये अमेरिकेतील कार्नेगी मेलन युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापक होते. त्यांनी त्या टीमचे नेतृत्व केले होते. या टीमने जगातील सुरुवातीच्या सर्वात मोठ्या वाय-फाय नेटवर्कपैकी एक नेटवर्क तयार केलं होतं.
हिल्स यांनी त्यांच्या 'वाय-फाय अँड द बॅड बॉईज ऑफ रेडिओ' या पुस्तकात या गोष्टीचा उल्लेख केला आहे.
पण इथे 'बॅड बॉईज'चा अर्थ त्यांच्या टीममधले इंटरनेट हॅकर्स असा नाहीये.
हिल्स यांनी हे नाव वाय-फायच्या स्पीडमध्ये अडथळा आणणाऱ्या गोष्टींना दिलं होतं.
कदाचित तुमचं घरही अशा 'बॅड बॉईज'नी भरलेलं असेल आणि ते तुमचे आवडते मीम्स बघण्यात प्रत्येक वेळी अडथळे आणत आहेत.
वाय-फायच्या वेगावर परिणाम करणारे काही घटक अतिशय विचित्र वाटू शकतात.
या अडथळ्यांचा शोध घेतल्यास तुम्हाला तुमच्या वाय-फाय कनेक्शनमधील समस्या सोडवायला मदत होऊ शकते.
त्याचसोबत तुमच्या रोजच्या जगण्यातल्या एका अतिशय महत्त्वाच्या तंत्रज्ञानाकडे बघायचा तुमचा दृष्टिकोनही यामुळे बदलू शकतो.
मायक्रोवेव्ह
ऑस्ट्रेलियातले खगोलतज्ज्ञ 17 वर्षांपासून काही रहस्यमय रेडिओ सिग्नल्समुळे चक्रावून गेले होते.
काहींना वाटलं की हे सौर ज्वाळांमुळे होतंय. तर सर्वसामान्यांना वाटत होतं की यामागे एलियन्सचा हात असावा.
पण शेवटी त्यांना समजलं की मूळ कारण तर त्यांच्या अगदी जवळच होतं. त्यांचा टेलिस्कोप दुपारच्या जेवणाच्या वेळेला ऑफिसमधल्या मायक्रोवेव्ह ओव्हनमधून निघणाऱ्या ऊर्जा लहरींसुद्धा पकडत होता.
मायक्रोवेव्हच्या या लहरींमुळे फक्त टेलिस्कोपवरच फरक पडतो असं नाही. तर तुमच्या वाय-फायच्या स्पीडमध्येही यामुळे अडथळा येऊ शकतो.
इतर वायरलेस टेक्नॉलॉजीसारखं वाय-फायसुद्धा रेडिओ लहरींच्या मदतीनेच माहिती पुढे पाठवत असतं.
सरकार साधारणपणे रेडिओ फ्रिक्वेन्सी काही खास कामांसाठी राखीव ठेवते.
जसं की, पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा, हवाई वाहतूक नियंत्रण आणि एएम आणि एफएम रेडिओ स्टेशन्ससाठी.

फोटो स्रोत, Getty Images
पण काही फ्रिक्वेन्सी सामान्य लोकही विनापरवाना वापरू शकतात.
उदाहरणार्थ 2.4 गीगाहर्ट्झ (GHz) ही वाय-फाय नेटवर्क आणि ब्लूटूथ गॅजेट्समध्ये वापरली जाणारी मुख्य फ्रिक्वेन्सी आहे.
विशेष म्हणजे, तुमचा मायक्रोवेव्ह ओव्हनसुद्धा उरलेलं जेवण गरम करण्यासाठी याच फ्रिक्वेन्सीचा वापर करतो.
अन्न गरम करणाऱ्या लहरी बाहेर पडू नयेत आणि त्या आतच राहाव्यात यासाठी मायक्रोवेव्ह ओव्हन पूर्णपणे एअरटाईट किंवा नीट सील केलेला असतो.
परंतु हिल्स सांगतात की, जर तुमचा मायक्रोवेव्ह ओव्हन जुना किंवा खराब असेल किंवा अन्न गरम होण्यापूर्वीच तुम्ही त्याचे दार उघडले तर ते तुमच्या वाय-फाय सिग्नलमध्ये अडथळा आणू शकते.
हिल्स म्हणतात, "या अडथळ्यावर लोक वारंवार बोलतात."
ट्यूबलाईट किंवा कारच्या इग्निशन सिस्टिममधून निघणाऱ्या फ्रिक्वेन्सी देखील अशाच प्रकारची समस्या निर्माण करू शकतात.
हिल्स सांगतात की, "आजच्या काळात मायक्रोवेव्हमुळे येणारी अडचण इतकी मोठी नाही."
कारण आता वाय-फाय टेक्नॉलॉजी आधीपेक्षा प्रगत झाली आहे. ती 2.4 गीगाहर्ट्झ ऐवजी 5 गीगाहर्ट्झ बँडवरही चालू शकते.
पण जर तुमची वाय-फाय सिस्टिम किंवा मायक्रोवेव्ह ओव्हन जुना असेल तर फ्रीजमधलं जेवण गरम किंवा डीफ्रॉस्ट करताना तुमचे आवडते मीम्स बघण्यात नक्कीच अडथळा येऊ शकतो.
माशांची टाकी (फिश टॅंक)
जर तुमच्या घरात मासे असतील म्हणजेच तुमच्याकडे फिशटँक असेल तर यामुळेसुद्धा वाय-फायच्या स्पीडमध्ये अडचण येऊ शकते.
हिल्स सांगतात की, "अंतर वाढलं की रेडिओ सिग्नल साहजिकच कमी होतोच. पण काही वेळा जेव्हा हा सिग्नल एखाद्या वस्तूच्या आरपार जातो तेव्हा ती वस्तू सिग्नलला आणखी डाऊन करते. यालाच आम्ही 'शॅडोइंग' म्हणतो."
थोडक्यात सांगायचं तर, वाय-फाय आणि पाण्याचं एकमेकांशी अजिबात जमत नाही.
बाकी कारणांसोबतच, पाण्याचे रेणू (मॉलिक्युल्स) लहान चुंबकांसारखे काम करतात आणि रेडिओ सिग्नलची ऊर्जा शोषून घेतात. जर तुमच्या आणि राउटरच्या मध्ये माशांची टाकी ठेवली असेल तर तिथे वाय-फाय सिग्नल पूर्णपणे गायब होऊ शकतो.
हिल्स सांगतात की, वाय-फाय वापरताना लोकांना येणारा सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे 'शॅडोइंग' हा आहे. आणि यासाठी फक्त माशांची टाकीच कारणीभूत असते असं नाही. रेडिओ लहरी लाकूड किंवा प्लास्टर बोर्डच्या भिंतींमधून मधून मात्र बऱ्यापैकी सहजपणे आरपार जाऊ शकतात.

फोटो स्रोत, Getty Images
पण जर तुमच्या घराच्या भिंती विटा किंवा काँक्रीटसारख्या मजबूत गोष्टींनी बनलेल्या असतील, तर हा प्रॉब्लेम अधिक वाढू शकतो.
हिल्स सांगतात की, "तुमचा राउटर आणि तुम्ही वापरत असलेलं गॅजेट यांच्यामध्ये एका सरळ रेषेचा विचार करा."
सिग्नल रूममधल्या वस्तूंना धडकून दुसरा रस्ता शोधू शकतो. पण रस्त्यात जितके जास्त अडथळे असतील तितकंच त्याला पुढे जाणं कठीण होतं.
अंतर जितकं कमी, तितकं वाय-फाय चांगलं चालतं. म्हणूनच राउटर घराच्या अगदी मध्यभागी आणि शक्य होईल तितक्या उंचावर ठेवणं कधीही चांगलं.
एवढं करुनही काम झालं नाही तर तुम्ही वाय-फाय एक्सटेंडर वापरू शकता. यामुळे सिग्नलची रेंज वाढेल. तुम्ही राउटर बदलून मेश नेटवर्कसुद्धा लावू शकता.
मेश नेटवर्क अनेक लहान उपकरणांच्या साहाय्याने संपूर्ण घरात वाय-फाय पोहोचवते.
यामुळे तुम्हाला माशांना तिथून हटवण्याची अजिबात गरज पडणार नाही.
आरसा
रेडिओ लहरी म्हणजेच सिग्नल्स देखील प्रकाशाचेच एक रूप आहेत.
ज्याप्रमाणे प्रकाश आरशासारख्या चमकदार पृष्ठभागावर आदळून परावर्तित होतो किंवा विखुरतो. त्याचप्रमाणे तुमचा वाय-फाय सिग्नल देखील मागे फिरू शकतो म्हणजेच परावर्तित होऊ शकतो.
दूरदर्शन (टेलिव्हिजन) सारखा कोणताही सपाट आणि चकचकीत वस्तू अशी समस्या निर्माण करू शकतो. जर तुमच्या भिंतींमध्ये धातूच्या पत्र्यांचा वापर केला असेल तरीही हा त्रास होऊ शकतो.
जर तुमच्या घराच्या एखाद्या भागात वाय-फाय सिग्नल कमी येत असेल तर स्वतःमध्ये आणि राउटरमध्ये एका सरळ रेषेची कल्पना करा.

फोटो स्रोत, Getty Images
त्या मार्गात सिग्नलची दिशा बदलणारा एखादा आरसा किंवा मोठा टीव्ही तर नाही ना याची खात्री करा.
तुम्ही अशा गोष्टींची जागा बदलून बघू शकता.
जर तुम्हाला तुमच्या घरातल्या वस्तूंची जागा बदलायची नसेल तर वाय-फाय एक्सटेंडर ही समस्या सोडवण्यास मदत करू शकतो.
थंडी
जर तुम्ही खुल्या मैदानापलीकडील दुसऱ्या एखाद्या बिल्डिंगचं नेटवर्क वापरत नसाल तर पाऊस तुमच्या वाय-फायमध्ये अडथळा आणणार नाही.
पण हवामान खूपच जास्त खराब असेल तर मात्र खेळ बिघडू शकतो.
बर्फवृष्टीमुळे एखादे घर, परिसर किंवा संपूर्ण शहराला इंटरनेट सेवा पुरवणारी पायाभूत सुविधा ठप्प होऊ शकते.
कडक थंडीमुळे केबलच्या आतल्या धातूच्या वायर्स खराब होऊ शकतात किंवा साठलेला बर्फ सॅटेलाइटचे सिग्नल्स रोखू शकतो.
कडक उन्हाळा किंवा उष्णता देखील अशाच प्रकारच्या समस्या निर्माण करू शकते.

फोटो स्रोत, Getty Images
तसं पाहिलं तर फक्त हवामानच याला जबाबदार नसतं. जेव्हा घरातले सगळे जण एकत्र बसून एकाचवेळी युट्यूब बघायला लागतात तेव्हाही इंटरनेटचा स्पीड कमी होतो.
याचा अर्थ असा की, मीम्स पाहण्यात येणारा अडथळा हा म्हणजे हवामान बदलाचाच आणखी एक फटका असू शकतो.
उपाय काय?
याबरोबरच तुम्ही टेलिकॉम कंपन्या आणि स्थानिक अधिकाऱ्यांकडे आधीच आवश्यक पावले उचलण्याची मागणी करू शकता. राहिली गोष्ट अॅलेक्स हिल्स यांची, तर ते आता अलास्कामध्ये राहतात. त्यांनी आपल्या नोकरी-व्यवसायाचा एक मोठा काळ दुर्गम भागातील लहान शहरे आणि गावांपर्यंत इंटरनेट पोहोचवण्याच्या कामात घालवला आहे.
सॅटेलाइट इंटरनेटमुळे हे काम आता खूपच सोपं झालं आहे. पण याचेसुद्धा स्वतःचे असे वाय-फाय 'बॅड बॉईज' आहेतच.
अनेकदा बर्फाच्या वादळात तुमची सॅटेलाइट डिश पूर्णपणे बर्फानं झाकून जाते. अशा वेळी तुम्हाला स्वतः हातात फावडे घेऊन ती साफ करावी लागू शकते.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

























