आजारपणाची सुट्टी घेताना अपराधी वाटतं? जाणून घ्या हे तुमच्या ऑफिसबद्दल काय स्पष्ट करतं

प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र
    • Author, निक ट्रिगल
    • Role, आरोग्य प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

सकाळी डोळे उघडताच तब्येत बरी नसल्याचं जाणवतंय, पण ऑफिसमध्ये आज खूप महत्त्वाचा दिवस आहे.

मग अशा वेळी तुम्ही काय करता? जर तुमचं उत्तर ऑफिसला जाणं (किंवा लॅपटॉप उघडून लॉगिन करणं) हे असेल तर काळजी करू नका, तर असं करणारे तुम्ही एकटेच नाही आहात.

एका संशोधनानुसार, ब्रिटनमधील अर्ध्याहून अधिक लोक तब्येत बरी नसतानाही सुट्टी न घेता काम करतात. तज्ज्ञ या मानसिकतेला 'प्रेझेंटीइझम' म्हणतात.

विशेष म्हणजे आजारी असताना काम करण्याचा तुमचा हा निर्णय एक व्यक्ती म्हणून तुमच्याबद्दल आणि तुम्ही काम करत असलेल्या संस्थेबद्दल बरेच काही सांगून जातो.

तरुण कामगारांची आजारी पडण्याची शक्यता कमी असते

"आजकालच्या तरुण पिढीला सहज 'स्नोफ्लेक' (म्हणजे फार नाजूक किंवा लगेच खचून जाणारी) ठरवून मोकळं केलं जातं, पण प्रत्यक्षात तसं मुळीच नाही," असं मँचेस्टर युनिव्हर्सिटीचे मानसशास्त्रज्ञ प्रोफेसर सर कॅरी कूपर सांगतात.

कामाच्या ठिकाणच्या आरोग्याशी संबंधित विषयावर ते जगातील आघाडीच्या तज्ज्ञांपैकी एक आहेत.

या मुद्द्यावर रोजगारविषयक धोरणांसाठी ब्रिटन सरकारला मार्गदर्शन करणारे सर कॅरी सांगतात की, या परिस्थितीमागे बरीच कारणं आहेत.

एकतर तरुण मुलं सहसा अशा नोकऱ्यांमध्ये असतात जिथे कामाची कोणतीही सुरक्षितता नसते, जसं की 'झिरो-अवर्स कॉन्ट्रॅक्ट्स'सारख्या तात्पुरत्या पद्धती.

दुसरं म्हणजे या वयात दीर्घकालीन आजार किंवा सांधेदुखीचा त्रास असण्याची शक्यता खूप कमी असते. मुळात अशा आजारांमुळेच ज्येष्ठ कर्मचाऱ्यांना जास्त सुट्ट्या घ्याव्या लागतात.

पण सर कॅरी पुढे सांगतात, "मला असं वाटतं की, कंपनीने आपल्याला कशी वागणूक द्यावी आणि आपल्या तब्येतीची आणि आरोग्याची कशी काळजी घ्यावी, याबद्दल आजच्या तरुण पिढीच्या अपेक्षा नक्कीच खूप जास्त आहेत."

"आधीच्या पिढीतील लोकांनी बऱ्याच गोष्टी निमूटपणे सहन केल्या असतील, पण याचा अर्थ त्यांची ती पद्धत निरोगी होती असा होत नाही."

"आजारपणाच्या सुट्टीचा विचार केला तर, मानसिक त्रासाकडे दुर्लक्ष करून काम रेटून नेण्यापेक्षा मानसिक स्वास्थ्याला तब्येतीचाच महत्त्वाचा भाग मानण्याकडे तरुण पिढीचा अधिक कल दिसतो."

तुमचा दृष्टिकोन तुमच्याबद्दल काय सांगतो?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

आजारी असताना सुट्टी घ्यायची की नाही, हे ठरवण्यामागे प्रत्येकाची वेगवेगळी कारणं असतात.

काही लोकांसाठी त्यांचं काम हीच त्यांची खरी ओळख असते. कामाच्या मानसशास्त्रात याला 'वर्क सेंट्रॅलिटी' म्हटलं जातं.

अभ्यासातून असं दिसून आलं आहे की, अशा लोकांचा कामातील अधिक सक्रिय सहभाग, बांधिलकी आणि नेहमीपेक्षा एक पाऊल पुढे जाऊन काम करण्याची तयारी असते.

जर कामावरच तुमची खरी ओळख आधारलेली असेल, तर सुट्टी घेणं म्हणजे स्वतःचाच एक भाग तात्पुरता गमावल्यासारखं वाटू शकतं.

कामाच्या ठिकाणच्या आरोग्यावर लिहिणाऱ्या मानसशास्त्रज्ञ डॉ. ऑड्रे टँग सांगतात, "अशा लोकांना आजारी असतानाही कामावर हजर राहण्याची प्रचंड ओढ असते."

त्यांच्या मते, डॉक्टर, नर्स आणि शिक्षक यांसारख्या लोकांची काळजी घेणाऱ्या क्षेत्रांत काम करणाऱ्यांमध्ये ही मानसिकता प्रामुख्याने दिसते.

"बऱ्याचदा हे लोक असं म्हणतात की, आजारपणाची सुट्टी घेण्यापेक्षा एखादा अपघात होऊन कामावर न जाण्याचं कारण मिळालं, तर जास्त बरं होईल."

तर दुसरीकडे, सुट्टी घेतली तर लोक आपल्याला कमजोर किंवा आळशी समजतील, अशीही काहींना भीती वाटते. तरुण मुलांमध्ये ही भीती जास्त असते, असं टँग सांगतात.

"कारण त्यांनी आत्ता कुठे कामाला सुरुवात केलेली असते आणि वरिष्ठांवर आपला कोणताही नकारात्मक प्रभाव पडू नये, असा त्यांचा प्रयत्न असतो."

तुमच्या ऑफिसच्या वातावरणाबद्दल हे काय स्पष्ट करतं?

मानसशास्त्रज्ञ डॉ. तारा क्विन-सिरिलो यांच्या मते, आजारी असताना सुट्टी घ्यायची की नाही यात तुमच्या कामाच्या ठिकाणची संस्कृती आणि तिथले वातावरण खूप महत्त्वाची भूमिका बजावतं.

जेव्हा टीमवर आधीच कामाचा प्रचंड लोड असतो आणि सुट्टी घेतल्यास काम सांभाळायला दुसरी कोणतीही व्यवस्था नसते, तेव्हा आपण दांडी मारल्यास त्याचा ताण आपल्याच सहकाऱ्यांवर येईल हे कर्मचाऱ्यांना चांगलंच ठाऊक असतं.

क्विन-सिरिलो म्हणतात, "आरोग्यापेक्षा फक्त कामाच्या उत्पादकतेला महत्त्व देणाऱ्या 'टॉक्सिक' अपराधीपणात आणि शरमेची भावना निर्माण करण्यात कंपन्यांची भूमिका मोठी असते."

"काही कामाच्या ठिकाणी 'काहीही झालं तरी काम रेटून न्यायचंच', अशी एक कार्यसंस्कृती असते. त्यामुळे आराम करायच्या वेळीही कर्मचाऱ्यांवर काम करत राहण्याचा दबाव येतो."

कामाच्या ठिकाणी अशा वातावरणामुळे 'प्रेझेंटीइझम'ला म्हणजे आजारी असतानाही काम करण्याच्या प्रवृत्तीला आणखी प्रोत्साहन मिळते.

तब्येत कशीही असो, तुम्ही फक्त लॉगिन केले किंवा ऑफिसला हजर राहिलात तरी कंपनीला तुमची किंमत वाटते, असा कर्मचाऱ्यांचा समज होतो.

मॅनेजर जेव्हा आजारी असूनही काम करणाऱ्या लोकांचं कौतुक करतो, तेव्हा बाकीचे कर्मचारीही तसंच वागायला सुरुवात करतात.

आजारी असताना रजा घ्यायची की नाही, यावर ऑफिसच्या वातावरणाचा मोठा परिणाम होतो

फोटो स्रोत, Getty Images/Jacob Wackerhausen

फोटो कॅप्शन, आजारी असताना रजा घ्यायची की नाही, यावर ऑफिसच्या वातावरणाचा मोठा परिणाम होतो

क्विन-सिरिलो म्हणतात, "एका निरोगी आणि चांगल्या कार्यालयीन वातावरणात कर्मचाऱ्यांना आपले आरोग्य, मानसिक स्वास्थ्य आणि आजारपणाच्या सुट्ट्यांविषयी मोकळेपणाने आणि प्रामाणिकपणे चर्चा करता आली पाहिजे."

यात परस्पर विश्वासही फार महत्त्वाचा ठरतो. जर ऑफिसमध्ये सुट्टी घेण्यावर सारखा संशय घेतला जात असेल किंवा त्याकडे वाईट नजरेने पाहिले जात असेल, तर 'आपल्याला कोणी आळशी किंवा खोटारडं समजेल' या भीतीने लोक खरोखर तब्येत बरी नसतानाही हक्काची सुट्टी घेणे टाळतात.

क्विन-सिरिलो यांच्या मते, हे स्पष्टपणे 'धोक्याचे लक्षण' आहे.

कामावर न जाण्याइतके तुम्ही आजारी आहात, हे कसं ओळखायचं?

आजारी असताना ऑफिसला जाण्याइतपत तब्येत ठीक आहे की नाही, याचा निर्णय घेणे प्रत्येक वेळी सोपे नसते.

शारीरिक आजाराच्या बाबतीत टँग सांगतात की, हा निर्णय घेण्यासाठी काही साधे आणि सर्वमान्य नियम पाळता येऊ शकतात.

"जर तुम्हाला उलटी आणि जुलाबाचा त्रास असेल, तर लक्षणे थांबल्यानंतर पुढील 48 तास आणि ताप आला असल्यास ताप उतरल्यानंतर पुढील 24 तास घरीच थांबले पाहिजे. मुळात अशा अवस्थेत तुम्ही नीट किंवा प्रभावीपणे काम करूच शकणार नाही."

टँग सांगतात की, याव्यतिरिक्त इतर लक्षणांच्या बाबतीत निर्णय घेणे थोडे गुंतागुंतीचे असते.

"सर्दी आणि खोकल्याच्या बाबतीत नेमका काय निर्णय घ्यावा, याबद्दल लोकांच्या मनात बराच संभ्रम असतो. पण कोविडनंतर ऑफिसच्या शिष्टाचारात बराच बदल झाला आहे. अशा वेळी ऑफिसला न जाता घरून काम करणे हेच अधिक योग्य मानले जाते."

पण त्या सांगतात की, मानसिक आरोग्याकडेही शारीरिक आरोग्याइतकेच गांभीर्याने पाहिले गेले पाहिजे.

"जर तुमची तब्येत बरी नसेल आणि तुम्हाला काम करणे शक्य नसेल, तर सरळ अर्थ असा की तुम्ही आजारी आहात आणि काम करू शकत नाही."

क्विन-सिरिलो सांगतात, "शेवटी मुद्दा तुमच्या काम करण्याच्या क्षमतेचा आहे. मग कारण शारीरिक आजारपण असो वा मानसिक ताणतणाव."

जेव्हा कामाचा ताण तुमच्या 'सेल्फ-केअर'वर म्हणजे स्वतःची काळजी घेण्यावरच परिणाम करू लागतो, तेव्हा तो एक धोक्याचा इशारा असतो, असंही त्या नमूद करतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)