घराचा आणि संसाराचा 'मेंटल लोड' नेहमी महिलांच्याच डोक्यावर का? हा न दिसणारा ताण दोघांनी एकत्र कसा हलका करावा?

मेंटल लोड

फोटो स्रोत, Halfpoint Images

    • Author, ग्रेस डीन आणि मॅलरी मोएंच
  • Published
  • वाचन वेळ: 9 मिनिटे

"माझं डोकं 24 तास कसल्या ना कसल्या विचारांनी भरलेलंच असतं, अगदी रात्री झोपतानाही डोक्यात उद्याच्या कामांची भलीमोठी यादी सुरूच असते," असं तीन मुलांची आई असलेल्या स्टेसी मॅथियास सांगतात.

त्या ज्या विषयी बोलत आहेत, त्याला मानसशास्त्रात 'मेंटल लोड' असं म्हणतात. हे घर सुरळीत चालवण्यासाठी करावं लागणारं नियोजन, व्यवस्थापन, बारीकसारीक गोष्टी सतत लक्षात ठेवणं आणि पुढे काय करायचं याचा सततचा अदृश्य ताण असतो जो बाहेरून कोणाला दिसत नसला, तरी मनावर सतत एक न संपणारं ओझं बनून राहतो.

यात नेमकी कसली कामं येतात? तर मुलांच्या शाळेच्या सहलीची तारीख लक्षात ठेवणं, पालकांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर आलेल्या नवीन अपडेट्सवर नजर ठेवणं, घराचा कोणता कोपरा स्वच्छ करणे गरजेचे आहे हे पाहणे, मुलांना पुरेशी झोप मिळतेय की नाही यावर लक्ष ठेवणं, डॉक्टरांच्या अपॉइंटमेंट्स ठरवणं आणि मुलांचे शाळेचे गणवेश खरेदी करणं.

संशोधकांच्या मते, घरातील शारीरिक कष्टाच्या कामांशिवाय या न दिसणाऱ्या मानसिक कामांचा भारही प्रामुख्याने स्त्रियांवर विशेषतः आईवरच खूप जास्त प्रमाणात पडतो.

अर्थात प्रत्येक नातं आणि प्रत्येक घराची परिस्थिती वेगळी असते तरीही अभ्यासातून यातला एक ठळक आणि समान पॅटर्न स्पष्टपणे समोर येतो.

यूकेमध्ये उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपून मुलं नुकतीच पुन्हा शाळेत जाऊ लागली आहेत. अशा वेळी स्टॉकपोर्टची 37 वर्षीय स्टेसी सांगतात की, विशेषतः सप्टेंबर महिना सुरू झाला की तिच्या डोक्यात विचारांचा हा गलबला आणखीनच वाढतो.

"डोक्यात सतत काहीतरी आठवून ठेवायचं, प्रत्येक गोष्टीचं आधीच नियोजन करायचं आणि सतत कशाची तरी चिंता करत राहायची... ही जी भावना असते ना, त्यामुळेच वर्षाचे हे दिवस मनावर प्रचंड ताण आणतात," असं स्टेसी सांगतात.

जबाबदाऱ्यांच्या या सततच्या माऱ्यामुळे स्टेसीला स्वतःचं डोकं खरकट्या भांड्यांनी तुडुंब भरलेल्या त्या सिंकसारखं वाटतं, जिथे दिवसभर एक-एक भांडं जमा होतच राहतं.

"ती साचलेली भांडी कमी करायला जर कोणी हातभार लावला नाही, तर दिवस संपेपर्यंत पाणी पात्राबाहेर सांडू लागतं आणि अखेर माणसाच्या सहनशीलतेचा बांध फुटतो, असं त्या म्हणतात.

सतत काहीतरी "लक्षात ठेवणे, नियोजन करणे किंवा काळजी वाटणे" चालूच असते, असं स्टेसी सांगतात.

फोटो स्रोत, Stacie Matthias

फोटो कॅप्शन, सतत काहीतरी "लक्षात ठेवणे, नियोजन करणे किंवा काळजी वाटणे" चालूच असते, असं स्टेसी सांगतात.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

याच 'मेंटल लोड'वर अमेरिकेतल्या 3,000 पालकांचं एक सर्वेक्षण करण्यात आलं. युनिव्हर्सिटी ऑफ बाथ आणि युनिव्हर्सिटी ऑफ मेलबर्नच्या संशोधकांनी केलेल्या या पाहणीत एक धक्कादायक बाब समोर आली.. डोक्याला शीण आणणाऱ्या घरकामांपैकी तब्बल 71% कामांचा ताण एकट्या आईवरच असतो. उदाहरणार्थ, बेडशीट्स आणि टॉवेल्स कधी धुवायला काढायचे आहेत याकडे बारीक लक्ष ठेवणे किंवा फ्रीजमधले अन्न कधीपर्यंत खाऊन संपवायचे आहे हे आठवणीने सांभाळणे.

या अभ्यासात आणखी एक गोष्ट समोर आली, ती म्हणजे वडिलांच्या वाट्याला बहुतांश वेळा अशी कामं येतात जी कधीतरीच घडतात, ज्याला संशोधकांनी 'एपिसोडिक' म्हणजेच कधीमधी होणारी कामं म्हटलं आहे. उदाहरणार्थ, गाडीची सर्व्हिसिंग कधी करायची हे आठवून ठेवणं.

मेलबर्न युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापिका लीह रुपॅनर यांच्या मते, हा मेंटल लोड असा आहे जो डोळ्यांना दिसत नाही, कधी संपत नाही आणि ज्याला वेळेच्या किंवा जागेच्या काही सीमाच नसतात. त्याचं नेमकं वर्णन करताना त्या म्हणतात, "तुम्ही कामावर जाताना घरची खरकटी भांडी सोबत घेऊन जात नाही. पण डोक्यातलं हे अदृश्य ओझं मात्र तुम्ही जिथे जाल तिथे सोबतच असतं."

रेडिट (Reddit) आणि मम्सनेट (Mumsnet) सारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर सध्या 'मेंटल लोड' हा चांगलाच चर्चेचा विषय ठरतोय. इतक्या सगळ्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळताना होणाऱ्या प्रचंड दमछाकीबद्दल आपल्या जोडीदाराशी कसं बोलावं, हे न समजल्यामुळे अनेक स्त्रिया अशा प्लॅटफॉर्म्सवर येऊन मनमोकळेपणाने एकमेकींचा सल्ला आणि आधार शोधताना दिसतात.

शाळेच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्सवर जिथे रंगीबेरंगी कपडे घालण्याचे दिवस, सहली, वाढदिवस आणि हरवलेल्या वस्तू यांसारख्या विषयांवर चर्चा होते तिथे मुलांची 'मुख्य पालक' म्हणून नेहमी त्यांनाच अ‍ॅड केलं जातं. तर त्यांचे पती अशा ग्रुप्समध्ये कधीच नसतात, असं काही महिलांनी बीबीसी न्यूजला सांगितलं.

पोर्ट्समाउथची 35 वर्षांची आणि 3 मुलांची आई सोफिया सांगतात की, त्या स्वतःच्या फोनवरील शाळेच्या अ‍ॅपवरून मुलांच्या ट्रिप्सचे पैसे भरतात आणि दुपारच्या जेवणाची ऑर्डरही देतात. पण त्यांच्या नवऱ्याने तर आजवर ते अ‍ॅप साध्या फोनमध्ये डाऊनलोडसुद्धा करून पाहिलेलं नाही.

सोफिया सांगतात की त्यांनी नवऱ्याला या 'मेंटल लोड'बद्दल समजावून सांगायचे अनेकदा प्रयत्न केले. पण त्याला ते कधी समजलंच नाही आणि ही तर "एवढीशी किरकोळ, चुटकीसरशी होणारी कामे आहेत," असं म्हणून त्यांनी सोफिया यांचा ताण नेहमीच उडवून लावला.

"जर फक्त तेवढ्यापुरतेच काम करायचे असेल, तर ती नक्कीच पटकन होणारी कामं वाटतील पण मला त्या एका कामाचं नियोजन आधीच करावं लागतं. पुढे काय वाढून ठेवलं आहे याचा अंदाज मला बांधावा लागतो आणि डोक्यात सतत 10 पावलं पुढचा विचार करूनच चालावं लागतं."

मेंटल लोड

फोटो स्रोत, Getty Images

लंडनमध्ये राहणारे उपमुख्याध्यापक, कन्टेन्ट क्रिएटर आणि 2 मुलांचे वडील असलेले सॅम बेरी सांगतात की, जेव्हा पहिल्या मुलाच्या जन्मानंतर त्यांच्या पत्नीने पहिल्यांदा या 'मेंटल लोड'चा विषय काढला तेव्हा त्यांना तो काही नीट समजलाच नाही. उलट ते थोड्या बचावात्मक पवित्र्यात आले. कारण नॅपी बदलणं, बाळाला भरवणं अशी बरीच कामं आपण स्वतःहून करतो असंच त्यांना वाटत होतं.

ते नेहमी पत्नीला विचारायचे की, "मी काय मदत करू?" पण त्यांच्या आता लक्षात आलं आहे की, असा प्रश्न विचारल्यानेही नेमकं काय करायचं याचा विचार करण्याचं आणि डोकं चालवण्याचं ओझं अखेर समोरच्या व्यक्तीवरच पडतं.

स्टेसी यावर अगदी नेमकं बोट ठेवत सांगतात की, "मी माझ्या नवऱ्याला नेहमी सांगते, 'जर मला तुला सांगून सांगून एखादं काम करून घ्यावं लागत असेल तर त्यामुळे माझं डोक्याचं ओझं कमी होण्याऐवजी उलट आणखी वाढतंय'."

सॅमला ही गोष्ट नीट समजायला काही महिन्यांचे वाद, संवाद आणि एकमेकांचं ऐकून घ्यावं लागलं. त्यांच्या लक्षात आलं की, मुद्दा केवळ प्रत्यक्ष काम उरकण्याचा नाही, तर त्या कामामागचा संपूर्ण विचार सांभाळण्याचा आहे. म्हणजे फक्त रात्रीचा स्वयंपाक करणं एवढंच नाही, तर घरात सामान काय शिल्लक आहे हे पाहणं, आज काय बनवायचं याचं नियोजन करणं आणि लागणारा भाजीपाला-किराणा भरून आणणं, या सगळ्याचा ताण पेलणं आहे.

घर सांभाळण्याच्या आणि प्रत्येक गोष्टीच्या नियोजनाच्या सततच्या दबावामुळे अनेक महिला प्रचंड मानसिक तणावाखाली त्यांच्याकडे येतात, असं क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट नताशा वॉलेस सांगतात.

"अशा महिलांसाठी हा ताण म्हणजे एखादी भलीमोठी समस्या नसते, तर आपल्याकडून एकाच वेळी शेकडो बारीकसारीक अपेक्षा ठेवल्या जात आहेत आणि या चक्रात आपलं शरीर आणि मन एका क्षणासाठीही शांत बसू शकत नाही याची जेव्हा त्यांना जाणीव होते तेव्हा खरी कोंडी होते," असं ते सांगतात.

त्या पुढे सांगतात की, अनेक महिला जणू 'ऑटोपायलट मोड'वरच दिवस काढत असतात. त्यामुळे डोक्यावर नक्की किती विचारांचा डोंगर साचला आहे याची बऱ्याचदा त्यांना स्वतःलाही जाणीव नसते. हा आतल्या आत घुसमटवणारा रोजचा बारीक ताण थेट त्यांच्या नर्व्हस सिस्टीम परिणाम करू लागतो.

परिणामी निद्रानाश, सततची चिडचिड आणि साध्यातला साधा निर्णय घेतानाही प्रचंड मानसिक थकवा जाणवणं अशा त्रासांना त्यांना सामोरं जावं लागतं.

सतत तणावाखाली राहिल्याने मानसिक आरोग्य आणि विश्रांतीवर गंभीर परिणाम होऊ शकतो, असं वॉलेस सांगतात.

फोटो स्रोत, Natasha Wallace

फोटो कॅप्शन, सतत तणावाखाली राहिल्याने मानसिक आरोग्य आणि विश्रांतीवर गंभीर परिणाम होऊ शकतो, असं वॉलेस सांगतात.

'द वर्क/पॅरेंट स्विच'च्या लेखिका आणि पॅरेंटिंग तज्ज्ञ अनिता क्लिअर सांगतात की, डोक्यावरचा हा सततचा अदृश्य भार शेवटी आपल्या ऑफिसच्या किंवा व्यावसायिक कामावरही परिणाम करू लागतो आणि त्यामुळे सहन न होणारा अतिताण निर्माण होतो.

एका रिसर्चमधील निष्कर्ष असा सांगतो की, जास्त कमाई करणारे पुरुष घरातील कामे आणि त्यासंबंधीचा मानसिक ताण या दोन्हीतून स्वतःला सहज बाजूला करतात. पण महिलांच्या बाबतीत मात्र उलटे घडते. महिलांची कमाई वाढली तरी त्या शारीरिक श्रमांची कामे कदाचित कमी करू शकतात. पण घराचं नियोजन आणि व्यवस्थापन सांभाळण्याचा मानसिक ताण मात्र त्यांच्या डोक्यावरून तसूभरही कमी होत नाही. तो तितकाच कायम राहतो.

कुटुंबाच्या जबाबदाऱ्या झटकून मोकळे होण्याचा पर्याय आपल्याकडे आहे असा विचार महिलांच्या मनात सहसा येतच नाही. त्यामुळे अखेर करिअरचा वेग कमी करायचा, पार्ट-टाइम जॉब करायचा की काम पूर्ण थांबवून घरीच बसायचे यापैकीच एकाची निवड करणे त्यांच्या हातात उरते. आणि आजकाल अधिकाधिक महिला नाईलाजाने हाच निर्णय घेताना दिसतात, असं क्लिअर सांगतात.

त्या पुढे म्हणतात, "घरातल्या कामांचा आणि डोक्यावरचा हा मानसिक ताण जर थोडा हलका झाला, तर ऑफिसमध्ये अधिक मन लावून आणि उत्तम कामगिरी करण्यासाठी लागणारी ताकद, नवी उमेद आणि वेळ महिलांना नक्कीच मिळू शकेल."

ही तफावत नेमकी कशामुळे निर्माण होते?

बीबीसीने मुलाखत घेतलेल्या अनेक महिलांचं असं म्हणणं आहे की, ही दरी बाळंतपणाच्या रजेपासूनच पडायला सुरुवात होते.

नताशा वॉलेस सांगतात की, पुरुषांच्या पॅटर्निटी लीव्हच्या तुलनेत आईची मॅटर्निटी लीव्ह बरीच मोठी असते. त्यामुळे बाळाच्या जन्मानंतर अगदी सुरुवातीच्या दिवसांपासूनच आईच नकळतपणे घराची 'मुख्य पालक' बनून जाते.

"जर तुम्ही अशी व्यक्ती बनलात जिला बाळाच्या प्रत्येक गोष्टीची माहिती आहे, घरातली कोणती वस्तू कुठे ठेवली हे अचूक ठाऊक आहे आणि आजवर सगळं काही जिने केलं आहे तर मग घरातील प्रत्येक जण छोट्या-मोठ्या गोष्टींसाठी थेट तुमच्याकडेच धाव घेऊ लागतो. त्यामुळे पुढे जाऊन तुम्ही पुन्हा नोकरीवर रुजू झालात तरीही घराचा हा सगळा डोलारा तुमच्याच खांद्याभोवती फिरत राहतो."

यूकेमधील नियमांनुसार, महिलांना तब्बल 52 आठवड्यांची कायदेशीर मॅटर्निटी लीव्ह घेता येते, ज्यापैकी 39 आठवड्यांसाठी पगार मिळतो. दुसरीकडे, वडिलांना मात्र पगारी पॅटर्निटी लीव्ह म्हणजे पितृत्व रजा म्हणून जास्तीत जास्त 2 आठवडेच रजा मिळते. अर्थात आई आणि वडील दोघांना मिळून 'शेअर्ड पॅरेंटल लीव्ह' चा पर्यायही निवडू शकतात.

काही कंपन्या कर्मचाऱ्यांना याव्यतिरिक्त वाढीव पॅरेंटल लीव्हची सुविधा देतात खरी, पण वस्तुस्थिती अशी आहे की मॅटर्निटी किंवा पॅटर्निटी लीव्हच्या काळात बहुतेकांच्या पगारामध्ये मोठी कपात होते. नेमका याच आर्थिक गणितामुळे घरातले पुरुष फार मोठी सुट्टी घेणे टाळतात.

जोडीदाराने कामांची संपूर्ण जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेणे अत्यंत गरजेचे आहे, असं महिलांचं म्हणणं आहे.

फोटो स्रोत, Maskot/Getty Images

फोटो कॅप्शन, जोडीदाराने कामांची संपूर्ण जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेणे अत्यंत गरजेचे आहे, असं महिलांचं म्हणणं आहे.

क्लिअर सांगतात की, कंपन्यांनी फक्त कागदावर पॅटर्निटी लीव्हची सोय न ठेवता स्वतःहून अशी सुट्टी घेणाऱ्या वडिलांचं कौतुक करून इतरांसमोर त्यांचे आदर्श ठेवले पाहिजेत. यासोबतच ऑफिसच्या वेळेनंतर कर्मचाऱ्यांना कामासाठी फोन किंवा मेसेज न करण्याचे संकेत पाळणे आणि महिलांच्या करिअरमधील प्रगतीसाठी मोकळेपणाने चर्चा करणे याद्वारेही मोठा बदल घडवून आणता येईल.

सरतेशेवटी हा सगळा प्रश्न समाजाने वर्षानुवर्षे ठरवून दिलेल्या पारंपरिक भूमिकांशीही जोडलेला आहे.

अमेरिकेत राहणारे, 3 मुलांचे बाबा आणि 'मेंटल लोड वाटून घेणे' यावर लोकांना समजावणारे कोच झॅक वॉटसन एक वास्तव मांडतात. ते म्हणतात की, त्यांच्या आजोबांनी आपल्या संपूर्ण संसारात कदाचित कधी स्वयंपाकघराची पायरीही चढून पाहिली नसेल, तर त्यांच्या वडिलांनी स्वयंपाकात फक्त नावापुरतीच थोडीफार मदत केली होती.

लग्नानंतरच्या पहिल्या 5 वर्षांत बहुतांश वेळा त्यांची पत्नीच स्वयंपाक सांभाळायची. कधीमधी त्यांनी स्वतःहून मी आज जेवण बनवू का? असे विचारले, तरी सोबत तुला आज काय खायचंय? असा प्रश्न ते टाकायचे. ताण पाहिलं तर साधा वाटणारा हा प्रश्न खरं तर तिच्या डोक्यावरचा मेंटल लोड आणखी वाढवणाराच ठरायचा.

पण हळूहळू त्यांना ही चूक उमगली. त्यांनी शिकून घेतले की, बायकोला विचारण्याआधी स्वतःच फ्रीज उघडून काय भाज्या किंवा सामान शिल्लक आहे ते पाहायचे आणि मग तिच्यासमोर रात्रीच्या जेवणाचे 2-3 पर्याय ठेवायचे किंवा जर तिचा निर्णय घेण्याचा मूडच नसेल तर स्वतःच एका मेन्यूवर शिक्कामोर्तब करायचे. एवढेच नाही, तर काही हवे असल्यास नुसते "अगं, सॉसची बाटली कुठे आहे ?" अशी हाक मारण्याऐवजी, 'मी अमुक कपाटात शोधले पण तिथे ती नाही,' असे सांगून मगच मदत मागणे किती गरजेचे आहे, हे त्यांना चांगलेच समजले.

सॅम बेरी स्पष्ट करतात की, काही पुरुष याकडे पूर्ण दुर्लक्ष करत असले, तरी अशा पुरुषांची संख्याही खूप मोठी आहे. विशेषतः त्यांचे ऑनलाइन फॉलोअर्स जे "खरोखरच खूप चांगले नवरे आणि प्रेमळ बाबा आहेत. ते आपल्या बाजूने पुरेपूर प्रयत्न करत आहेत आणि घरासाठी चांगलं काही करू पाहतात. पण अडचण अशी आहे की त्यांनी लहानपणापासून असे वातावरण पाहिलेलेच नसते किंवा नेमके काय आणि कसे बोलावे, याचे शब्दच त्यांच्याकडे नसतात."

दरवर्षी सप्टेंबर महिना आला की आपल्या डोक्यात विचारांची आणि कामांची गर्दी उसळते, असं अफुआ विल्यम्स सांगतात.

फोटो स्रोत, Afua Williams

फोटो कॅप्शन, दरवर्षी सप्टेंबर महिना आला की आपल्या डोक्यात विचारांची आणि कामांची गर्दी उसळते, असं अफुआ विल्यम्स सांगतात.

बीबीसीशी बोलताना अनेक महिलांनी हीच भावना बोलून दाखवली की, जोडीदाराने घरातील काही ठरावीक जबाबदाऱ्यांची सूत्रे पूर्णपणे स्वतःच्या हातात घ्यावीत.

सॅम याला 'कामाचा अख्खा विभागच स्वतःच्या अंगावर घेणे' असे म्हणतात.. म्हणजेच बाबांनी शाळेचे ॲप, फी आणि सर्व ॲडमिनिस्ट्रेशनचे काम स्वतःकडे घ्यायचे. तर आईने स्वयंपाक आणि खाण्यापिण्याचे व्यवस्थापन पाहायचे.

तरीही ते एक महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित करतात तो म्हणजे, समानतेचा अर्थ प्रत्येक गोष्टीची मोजून 50/50 वाटणी करणे असा कधीच नसतो. शेवटी एका जोडीदाराच्या कामाचे तास जास्त असू शकतात किंवा दुसऱ्या जोडीदाराला हौस म्हणून स्वयंपाक करायला मनापासून आवडत असेल. त्यामुळे दोघांनाही जे सर्वात जास्त अनुकूल ठरेल, असा सुवर्णमध्य काढणे गरजेचे आहे.

"आणि वर्षानुवर्षे जर घरातला मेंटल लोड तुमच्याच डोक्यावर राहिला असेल, तर पार्टनर तेच काम हाताळताना त्याच्या स्वतःच्या वेगळ्या पद्धतीने करेल आणि सुरुवातीला कदाचित थोडेफार गडबड-गोंधळही होतील, हे मनापासून स्वीकारण्याची तयारी तुमचीही हवी," असा समंजस सल्ला लंडन येथील दोन मुलांची 40 वर्षीय आई अफुआ विल्यम्स देतात.

मानसिक भार कसा हलका करावा?

बीबीसी न्यूजशी संवाद साधणाऱ्या पालकांनी हा न दिसणारा भार संसारात समसमान कसा वाटून घ्यायचा, याविषयीच्या काही अतिशय उपयुक्त टिप्स दिल्या आहेत:

  • तुमच्या मनात काय चालले आहे आणि डोक्यावरच्या या मेंटल लोडचा तुमच्यावर किती ताण येतोय, हे पार्टनरला शांतपणे समजावून सांगा. झॅक या प्रक्रियेला "लेबलिंग" म्हणतात. म्हणजेच घरासाठी आपण जे न दिसणारे मानसिक आणि भावनिक कष्ट उपसतो, ते समोरच्या व्यक्तीला शब्दांतून स्पष्टपणे दाखवून देणे. पण वॉलेस एक महत्त्वाचा सल्ला देतात की, जेव्हा तुम्ही स्वतः खूप चिडलेले असाल किंवा डोक्यावर प्रचंड ताण असेल तेव्हा ही चर्चा अजिबात करू नका. नाहीतर आपण समोरच्याला "दोष देतो किंवा त्याच्यावर ताशेरे ओढतो" असा चुकीचा अर्थ निघू शकतो.
  • "कोणती कामे डोक्यातून किंवा यादीतून कायमची काढून टाकता येतील ते आधी बघा." असं 'मेंटल लोडचा कामावर होणारा परिणाम' या अभ्यासाच्या सह-लेखिका ॲना कॅटालानो वीक्स सांगतात. मुलांच्या मित्रांच्या वाढदिवसाला प्रत्येकी स्वतः ग्रीटिंग कार्ड्स देणे खरोखरच इतके गरजेचे आहे का? पालकांच्या त्या सततच्या व्हॉट्सॲप ग्रुप्सना 'म्यूट' करून फक्त शाळेच्या महत्त्वाच्या अधिकृत ईमेल्सवर लक्ष ठेवणे जमू शकेल का?
  • जोडीदाराशी नियमित संवाद ठेवा: हा संवाद मग तो रोजचे 5 मिनिटांचं बोलणं असो, आठवड्यातून एकदा घेतलेला आढावा असो किंवा महिन्याभराचे नियोजन असो.
  • मोबाईलमध्ये 'शेअर्ड कॅलेंडर' वापरा.. जेणेकरून वाढदिवस, शाळेच्या पॅरेंट्स मीटिंग्स आणि इतर सर्व इव्हेंट्सची माहिती दोघांनाही एकाच वेळी दिसेल आणि कोणालाही वेगळे आठवण करून द्यावी लागणार नाही.

घरात कोणीतरी आठवण करून देईल याची वाट न पाहता एखादे काम हातात घेतल्यावर ते सुरुवातीपासून पार शेवटपर्यंत स्वतःहून पूर्ण करा, असं वॉलेस सुचवतात.

आणखी शिस्तबद्ध आणि व्ययस्थित राहणे हाच यावरचा जालीम उपाय आहे. या "परफेक्शनच्या सापळ्यात" अडकू नका, असा समंजस सल्ला क्लिअर देतात. शेवटी आई-बाबा म्हणून मुलांसोबत आनंदाने घालवलेले चार क्षण हे सर्वात जास्त मोलाचे असतात. त्यांनी आज अमुक एक भाजी खाल्ली की नाही यापेक्षाही ते क्षण जास्त महत्त्वाचे आहे. ही गोष्ट लक्षात ठेवली, तर स्वतःवर नको असलेला ताण न घेता अपेक्षांचा फेरविचार करणे सोपे जाईल.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)