You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महाराष्ट्रात मे महिन्यातही हीटवेव्हचा फटका? मान्सूनबाबत हवामान खात्याने काय सांगितलं?
- Author, गणेश पोळ
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- वाचन वेळ: 4 मिनिटे
मे महिन्यात महाराष्ट्राला उष्णतेचा तीव्र फटका बसण्याची शक्यता असून, मान्सूनबाबतही काही महत्त्वाचे संकेत भारतीय हवामान खात्याने (IMD) दिले आहेत.
1 मे 2026 रोजी भारतीय हवामान खात्याने पत्रकार परिषद घेत मे महिन्यासाठी हवामानाचा मासिक अंदाज जाहीर केला आहे.
त्यानुसार, महाराष्ट्रातील काही भागांना आणखी हीटवेव्हचा सामना करावा लागू शकतो. तर देशाच्या अनेक भागांत कमाल तापमान सामान्य किंवा त्यापेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात नेमक्या कोणत्या जिल्ह्यांना किती दिवस हीटवेव्हचा फटका बसेल, याची ठोस आकडेवारी देणं शक्य नसल्याचं हवामान विभागानं (IMD) स्पष्ट केलं आहे.
पण, सरासरीपेक्षा तीन ते चार दिवस जास्त हीटवेव्हचा सामना राज्याला करावा लागू शकतो, असंही IMD चे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
या शिवाय राज्यातील काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपीटीची शक्यताही वर्तवण्यात आलीय. तर मध्य महाराष्ट्र आणि कोकणात कमाल तापमान वाढण्याची शक्यता आहे.
रात्रीचं वाढतंय तापमान
सध्या दिवसा कडक उन्हामुळे त्रास वाढलाच आहे, पण त्यापेक्षा मोठी चिंता म्हणजे रात्रीचं वाढणारं तापमान.
मे महिन्यात महाष्ट्रासहित देशातल्या इतर भागात रात्रीचं किमान तापमान चढं राहणार आहे. त्यामुळे लोकांना झोप लागत नाही.
रात्री पुरेशी विश्रांती न मिळाल्याने दुसऱ्या दिवशी लोकांना थकवा जाणवत आहे.
डॉ. महापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, हवामान बदलामुळे गेल्या काही वर्षांत रात्रीचं तापमान वाढतंय.
त्यातच अवकाळी पावसामुळे हवेत वाढलेला दमटपणाही रात्री किमान तापमान जास्त राहण्यास कारणीभूत ठरत आहे. आता मे महिन्यातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यात अकोला, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, धुळे, सोलापूर आणि जळगाव हे उष्णतेचे हॉटस्पॉट ठरत असून, देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद यातील काही भागांत झाली आहे.
या वाढत्या उष्णतेचा परिणाम फक्त माणसांवरच नाही, तर शेतीवरही मोठ्या प्रमाणात होत आहे. आंबा, केळी, टोमॅटो आणि मिरची यांसारख्या पिकांची फळगळ होण्याची शक्यता वाढली आहे.
मान्सून कधी येणार?
मान्सूनबाबत बोलताना महापात्रा यांनी सांगितलं की, यंदा मान्सूनवर 'एल निनो'चा प्रभाव दिसू शकतो.
प्रशांत महासागरातील स्थिती हळूहळू एल निनोकडे झुकत आहे. नैऋत्य मान्सूनच्या काळातच तो विकसित होण्याचे संकेत आहेत.
त्यामुळे सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. 'एल निनो'चा प्रभाव संपूर्ण पावसाळ्यात राहू शकतो.
दरम्यान, मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून पूर्वमोसमी पावसाला सुरुवात होऊ शकते. त्याच काळात नैऋत्य मोसमी वारे अंदमान बेटांवर पोहोचतील आणि पुढे केरळकडे सरकतील.
मात्र, केरळमध्ये मान्सून नेमका कधी दाखल होईल, याबाबत अद्याप स्पष्ट तारीख देण्यात आलेली नाही.
दरम्यान, इंडियन ओशन डायपोल (IOD) सध्या तटस्थ अवस्थेत असून, मान्सूनच्या उत्तरार्धात तो सकारात्मक होण्याची शक्यता आहे.
या सर्व हवामान घटकांचा एकत्रित परिणाम पुढील काही महिन्यांतील पावसाचे स्वरूप आणि तापमानावर दिसू शकतो, असंही यावेळी सांगण्यात आलं आहे.
शेतीवर होणारा संभाव्य परिणाम
मे महिन्यातील या संभाव्य हवामानाचा भविष्यात कृषी क्षेत्रावरही परिणाम होऊ शकतो.
उत्तर आणि वायव्य भारतात रब्बी हंगामाच्या अखेरच्या पिकांची काढणी आणि मळणीसाठी मध्यम अनुकूल परिस्थिती तयार झाली आहे.
देशाच्या बहुतांश भागांमध्ये सामान्य ते सामान्यपेक्षा कमी कमाल तापमान राहिल्यास उष्णतेचा ताण कमी होण्यास आणि दाणे भरण्याची व काढणीची कामे अधिक चांगल्या प्रकारे होण्यास मदत होऊ शकते.
दक्षिण द्वीपकल्पीय, ईशान्य आणि वायव्य भारतातील काही भागांमध्ये स्थानिक पातळीवर सामान्यपेक्षा जास्त तापमान असल्यामुळे भात, मका, कडधान्ये (हिरवे मूग, काळे मूग) आणि भाजीपाला यांच्या पुनरुत्पादनाच्या टप्प्यांमध्ये (दाणे भरणे) उष्णतेमुळे ताण निर्माण होऊ शकतो. त्यामुळे दाणे कमी भरतात आणि फुले गळून पडतात.
देशाच्या बहुतांश भागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त किमान तापमानामुळे भात, मका आणि कडधान्यांमध्ये होणारे नुकसान वाढू शकते आणि दाणे भरण्याची कार्यक्षमता कमी होऊ शकते.
गंगा खोऱ्यातील मैदानी प्रदेश, किनारपट्टी आणि पश्चिम भारतातील काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटेचे दिवस वाढल्यामुळे, जास्त बाष्पीभवन होऊन पिकांवर पाण्याचा तीव्र ताण येऊ शकतो. त्यामुळे आंबा, केळी, टोमॅटो आणि मिरची यांसारख्या पिकांमधील फुले व फळे गळून पडू शकतात आणि फळे व भाज्या उन्हामुळे करपू शकतात.
उष्णतेच्या लाटेचा धोका असलेल्या प्रदेशांमध्ये जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत असून, त्याचा परिणाम उन्हाळी पिकांवर होत आहे आणि सिंचनाची मागणी वाढत आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)