कॉक्रोच जनता पार्टी आज 'या' शहरात करणार आंदोलन, देशभरातल्या आंदोलनाचे वेळापत्रक केले जाहीर

कॉक्रोच जनता पार्टी

फोटो स्रोत, BBC/NITIN NAGARKAR

Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात कॉक्रोच जनता पार्टीने शिक्षणातील प्रश्नांवर काल 11 जून रोजी आंदोलन केले. त्यानंतर आज लखनौमध्ये पक्षाचं आंदोलन होत असून त्यासाठी अभिजीत दिपके लखनौमध्ये दाखल झाले आहेत.

दरम्यान गुरुवारी पुण्यात सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या उपस्थितीत या आंदोलनादरम्यान 'शिक्षणाचा जाहीरनामा' प्रसिद्ध करण्यात आला.

देशभरात वाढलेल्या पेपरफुटीच्या घटना, परीक्षांमधील गोंधळ आणि निकालातील विलंब यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचा आरोप करत आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनातून देशभरातील विद्यार्थ्यांना एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले असून, पुण्यातून सुरू झालेल्या या आंदोलनाला देशव्यापी रूप देण्याची तयारी दिसून येते.

कॉक्रोच जनता पार्टीच्या एक्स पोस्टमध्ये पुढील काही दिवसांतील लखनौ, अमृतसर, हैदराबाद आणि जयपूर येथील आंदोलनांची रूपरेषाही सांगण्यात आली.

तसेच देशभरातील युवकांनी मोठ्या आंदोलनासाठी दिल्लीत एकत्र यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

कॉक्रोच जनता पार्टीच्या पुण्यातल्या आंदोलनात काय झालं? आज पुढचं आंदोलन कुठं आहे?

फोटो स्रोत, @Cockroachisback

पुण्यात आंदोलनाच्या जागी बोलताना दिपके म्हणाले, "कॉक्रोच हा एक संदेश आहे. या देशातला तरुण तुमच्या राजकारणाला थकला आहे. जिथं काही सडलेलं असतं तिथं कॉक्रोच असतात. सडलेल्या व्यवस्थेला कॉक्रोच नीट करणार."

कॉक्रोच जनता पार्टी

फोटो स्रोत, BBC/NITIN NAGARKAR

"मी स्वतःच्या पैशानंच प्रवास करत आहे. लोकही स्वतःचे पैसे वापरुन काम करत आहेत", असा दावा अभिजीत दिपके यांनी केला.

बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, "काही महिला समोर यायला तयार आहेत. बाकी पडद्यामागे महिलाच काम करत आहेत. मला ज्याप्रकारे शिव्या, धमक्या दिल्या जातात तसंच आपल्याबरोबर होईल असं त्यांना वाटतं. महिला आमच्याबरोबर आहेत. पुढच्या काळात महिला प्रवक्त्याही येतील. काही मुलींंना आताच नोकऱ्या लागल्या आहेत. काही शिक्षण घेत आहेत. त्यामुळे त्यांनाही तो ट्रॉमा व्हावा असं त्यांना वाटत नाही."

कॉक्रोच जनता पार्टी

फोटो स्रोत, BBC/NITIN NAGARKAR

आता पुढचे आंदोलन उत्तर प्रदेशात लखनौ येथे होत असून त्यासाठी अभिजीत दिपके लखनौत आले आहेत.

पुणे आणि दिल्ली येथे शांततेत आंदोलन झालं इथंही ते शांततेत होईल असं ते म्हणाले. आंदोलनाला परवानगी मिळाली नसेल तर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यासाठी विनंती करू असं त्यांनी सांगितलं.

जाहीरनाम्यात विद्यार्थ्यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. पेपर लीक झाल्यास प्रत्येक विद्यार्थ्याला 10 हजार रुपये, तसेच निकाल उशिरा लागल्यास दरमहा 10 हजार रुपये देण्याची मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय 72 तासांत बॅक परीक्षेचा पर्याय, परीक्षेपूर्वी कॉप्युटर ऑडिट, आणि हस्तलिखित उत्तरपत्रिका ऑनलाइन न तपासण्याच्या मागण्या मांडण्यात आल्या.

कॉक्रोच जनता पार्टी

फोटो स्रोत, @CJPComms

आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांनी घोषणा देत सरकारविरोधात संताप व्यक्त केला. संविधानाच्या प्रती हातात घेऊन आणि झुरळाच्या चित्रांचे मास्क घालून आंदोलन करण्यात आले.

पक्षप्रमुख अभिजित दिपके यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिला असून, देशभरात अशाच प्रकारची आंदोलने करण्यात येणार असल्याचे सांगितले.

शिक्षणाचा जाहीरनामा काय आहे?

  • पेपर लीक झाल्यावर विद्यार्थ्यांना नुकसान भरपाई म्हणून दर विद्यार्थ्यांना 10,000 रुपये सरकारने द्यावेत. जर परीक्षेचा निकाल उशिरा लागला तर निकाल लागेपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याला 10,000 प्रति महिना द्यावे.
  • 72 तासांच्या आत बॅकचा पर्याय उपलब्ध असला पाहिजे
  • हाताने लिहिलेले पेपर हातानेच चेक करावेत. पेपर ऑनलाईन चेक करू नयेत.
  • परीक्षेच्या सहा दिवस आधी कम्प्युटर ॲाडिट झालं पाहिजे
  • एनसीईआरटी ने जो नकाशा काढलाय पुस्तकात तो परत घेतला पाहिजे
कॉक्रोच जनता पार्टी

फोटो स्रोत, BBC/NITIN NAGARKAR

विश्वंभर चौधरी आणि असीम सरोदे काय म्हणाले?

पुण्याच्या आंदोलनात दिपके यांच्याबरोबर त्यांच्याबरोबर सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, अ‍ॅड. असीम सरोदे हे देखील उपस्थित होते.

विश्वंभर चौधरी बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "चळवळीतून येणारे पक्ष वाईट ही मानसिकता बरोबर नाही, आज महात्मा गांधी आले तरी लोक शंका घेतील. मला असं वाटत नाही की अभिजीत आणि त्याची मित्रमंडळी पक्ष काढतील असं वाटत नाही.

पहिल्यांदा अभिजीत दिपकेशी बोलणं झालं तेव्हाच आम्हाला राजकीय पक्ष काढायचा नसून ही एक चळवळ आहे असं त्यानं सांगितलं होतं. "

कॉक्रोच जनता पार्टी

फोटो स्रोत, BBC/NITIN NAGARKAR

तर असीम सरोदे म्हणाले, "लोकांची चळवळ झाली पाहिजे. आम्हाला बदल आणि परिवर्तन पाहिजे यासाठी लोक रस्त्यावर उतरणार नाहीत त्याशिवाय लोकशाहीची तब्येत सुधारणार नाही."

"न्यायालयात जाण्याचा मार्ग हा शेवटचा आहे. जे सरकार प्रतिसाद देत नाही ते बथ्थड असतं. दगडाला हलवणं त्यामुळेच आवश्यक आहे. ते जागेच होत नाहीत असा जा आरडाओरडा होता त्याला अभिजितनं उत्तर दिलं आहे. सगळे युवकच जागृत झाले आहेत. असा जागृत युवकच लोकशाहीला सक्रीय करू शकतो," असं असीम सरोदे यांनी सांगितलं.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याला महत्त्व- सोनम वांगचूक

कॉक्रोच जनता पार्टीच्या पुण्यातील आंदोलनात सहभागी होताना सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी देशाचं उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी शिक्षण आणि पर्यावरण या क्षेत्रांना प्राधान्य देण्याची गरज अधोरेखित केली.

अभिजीत आणि तिथं उपस्थित असलेल्या युवकांचं अभिनंदन केलं. पुण्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या, सावित्रीबाई फुलेंच्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि राजर्षी शाहू महाराजांच्या भूमीवर येऊन आनंद झाला असंही ते म्हणाले.

त्यांनी विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना जबाबदारीची जाणीव करून देत, सत्य आणि अहिंसा या तत्त्वांवर चालत न्याय मिळवण्याचा संदेश दिला.

कॉक्रोच जनता पार्टी

फोटो स्रोत, BBC/NITIN NAGARKAR

माध्यमांनी सत्याच्या मार्गावर चालावे. तेव्हाच सत्यमेव जयते आपण म्हणू शकतो. देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य असावं, देशातल्या माध्यमांच्या स्वातंत्र्यावर प्रश्न उपस्थित होतात. ती स्थिती पंतप्रधानांनी सुधारावी.

पंतप्रधानांनी 'मन की बात'मध्ये माध्यम स्वातंत्र्यावर बोलावं. जोपर्यंत माध्यमं स्वतंत्र नसतील तोपर्यंत असत्य माहिती लोकांमध्ये पसरत राहील.

आपल्या देशाला खरंच विश्वगुरू व्हायचे असेल तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य, माध्यमांचं स्वातंत्र्य असलं पाहिजे, असं वांगचूक म्हणाले.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.