वैभव सूर्यवंशी टीम इंडियात स्थान मिळवण्याच्या स्पर्धेत शुभमन गिलवर वरचढ ठरत असल्याच्या चर्चा

वैभव सूर्यवंशी

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, वैभव सूर्यवंशीनं वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षीच त्याच्या जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी मजबूत दावा ठोकला आहे
    • Author, विमल कुमार
    • Role, क्रीडा पत्रकार
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

शुक्रवारी (29 मे) रात्री न्यू चंदीगडमध्ये आयपीएल क्लालिफायर टूमध्ये गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांमध्ये सामना खेळला गेला.

तो फक्त या दोन संघांमधील सामना नव्हता. टीम इंडियाचा सध्याचा 'प्रिन्स' (शुभमन गिल) आणि भविष्यातील उत्तराधिकारी (वैभव सूर्यवंशी) या दोन खेळाडूंमधील ती स्पर्धादेखील होती.

या दोन्ही फलंदाजांची शैली पूर्णपणे वेगळी आहे. मात्र त्या दोघांमध्ये एक गोष्ट समान आहे. ती म्हणजे शांतपणे विजयासाठी खेळण्याची जिद्द.

वैभवनं त्याच्या परिचित शैलीत चौकार-षटकारांनी त्याच्या डावाची सुरुवात केली नाही. खेळपट्टीचं वेगळं स्वरुप हे त्यामागचं कारण होतं आणि राजस्थान रॉयल्सनं सामन्याच्या सुरुवातीलाच दोन विकेटदेखील गमावले होते.

कठीण परिस्थितीत वैभव परिपक्वपणे खेळला. त्यानं संयमीपणे खेळताना 31 चेंडूंमध्ये त्याचं अर्धशतक पूर्ण केलं. एरवी 31 चेंडूंमध्ये अर्धशतक करणं ही कोणत्याही फलंदाजासाठी एक चांगली धावसंख्या मानली जाऊ शकते. मात्र वैभवचं हे आयपीएलमधील सर्वात संथ अर्धशतक होतं.

अर्धशतक पूर्ण केल्यानंतर लगेचच वैभवनं तो ज्याच्यासाठी ओळखला जातो त्या शैलीत फलंदाजी केली.

त्यानं पुढील 16 चेंडूंमध्ये 46 धावा केल्या. मात्र पुन्हा त्याचं शतक पूर्ण व्हायचं राहून गेलं.

वैभवनं 47 चेंडूंमध्ये 97 धावा केल्या. या डावात त्यानं 7 षटकार लगावले. या डावात वैभवचा स्ट्राइक रेट (धावगती) 200 हून अधिकचा होता.

षटकार ठोकण्यात वैभव सर्वांवर वरचढ

कठीण परिस्थितीत वैभवनं ज्याप्रकारे 97 धावांची खेळी केली, त्यामुळे निवड समितीवर संघात त्याची निवड करण्यासंदर्भातील दबाव वाढणार, ही गोष्ट मात्र स्पष्ट आहे.

या सीझनमध्ये वैभव आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्यानं 237.3 च्या स्ट्राईक रेटनं 776 धावा केल्या आहेत.

आयपीएल 2026 मध्ये वैभवनं ज्याप्रकारची कामगिरी केली आहे, त्यामुळे आयर्लंडच्या दौऱ्यासाठी टीम इंडियात त्याची निवड होण्याची शक्यता खूप वाढली आहे.

तर दुसऱ्या बाजूला एक विचित्र स्थिती आहे. कर्णधारपदाची खेळी करून आणि शतक झळकावूनही शुभमन गिलचं सलामीवीर म्हणून टी20 संघात पुन्हा स्थान मिळवणं ही सोपी गोष्ट दिसत नाही.

कारण आता निवड समितीकडे वैभव सूर्यवंशीसारखे पर्याय उपलब्ध आहेत.

राजस्थान रॉयल्सच्या संघाचा पराभव होऊनदेखील या सामन्यात वैभव सूर्यवंशीनं एक वेगळी छाप सोडली

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, राजस्थान रॉयल्सच्या संघाचा पराभव होऊनदेखील या सामन्यात वैभव सूर्यवंशीनं एक वेगळी छाप सोडली
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

आयपीएलच्या या सीझनमध्ये शुभमन गिल त्याच्या कामगिरीत कमी पडला आहे असं नाही. शुभमननं या सीझनमध्ये 722 धावा केल्या आहेत. वैभवप्रमाणेच त्याची सरासरी जवळपास 48 ची राहिली आहे.

मात्र संपूर्ण स्पर्धेत 15 वर्षांचा वैभव एकहातीच राजस्थान रॉयल्सचा संघाला पुढे नेत असल्याचं दिसलं.

तर शुभमन गिलला मात्र सुदर्शनची साथ मिळाली. सुदर्शन हा या सीझनमध्ये 700 हून अधिक धावा करणारा तिसरा फलंदाजदेखील आहे.

या व्यतिरिक्त गिल आणि वैभव यांच्या फलंदाजीत दोन आणखी फरक स्पष्ट दिसले आहेत. ते म्हणजे षटकार लगावण्याची आणि वेगानं धावा करण्याची क्षमता.

वैभवनं या सीझनमध्ये जवळपास 237 च्या स्ट्राईक रेटनं (धावगती) धावा केल्या. यात त्यानं 72 षटकार लगावले. तर शुभमन गिलनं जवळपास 163 च्या स्ट्राईक रेटनं धावा केल्या आहेत. यात त्यानं 33 षटकार लगावले आहेत.

जबरदस्त दबाव असणाऱ्या या सामन्यात गिल आणि साई यांच्या जोडीनं ज्याप्रकारे शतकी भागिदारी केली, त्यावरून असं वाटलं नाही, की हा नॉक आऊट सामना आहे.

सामन्यात 13 षटकांच्या आधीच 167 धावांची ही भागीदारी झाल्यामुळे सामना एकतर्फी झाला. त्यामुळे 7 गडी राखून सामना जिंकणं ही फक्त एक औपचारिकता वाटत होती.

शुभमन गिलसमोर आता अंतिम सामन्याचं आव्हान

प्ले ऑफमध्ये कोणत्याही संघानं आयपीएलमध्ये इतक्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग केला नव्हता.

यात निश्चितपणे सर्वात मोठं योगदान कर्णधार शुभमन गिलच्या खेळीचं होतं. कारण कोणत्याही कर्णधारानं आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये शतक झळकावलं नव्हतं.

सामना संपल्यानंतर गिलचे आई वडीलदेखील स्टँडमध्ये खूश दिसत होते. तर वैभव सूर्यवंशी एकटाच त्याचे अश्रू रोखण्याचा प्रयत्न करत होता.

शुभमन गिलसमोर आता अंतिम सामन्यात आरसीबीचं आव्हान आहे

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, शुभमन गिलसमोर आता अंतिम सामन्यात आरसीबीचं आव्हान आहे

गिल आणि वैभव यांच्या संभाषणात काय घडलं, हे कदाचित कोणालाच माहित नाही.

मात्र म्हणता येईल की कदाचित गिलच्या मनात असा विचार आला असेल की मलादेखील इतक्याच मुक्त आक्रमकपणे टी20 क्रिकेट खेळता आलं तर किती बरं झालं असतं, तर वैभवच्या मनात देखील असा विचार येऊ शकतो की शांत स्वभावानं सामना जिंकणारी खेळी खेळण्याची शैली त्याला गिलकडून कशी शिकता येईल.

फक्त शुभमन गिलच नाही तर त्याच्या टीम गुजरातमध्ये देखील कामगिरीतील सातत्य दिसून येतं. शेवटी कोणता संघ 5 वर्षांमध्ये 3 अंतिम सामने खेळला आहे?

शुभमन गिलनं कर्णधार म्हणून आणि फलंदाजीतील कामगिरीतून दाखवून दिलं आहे की भविष्यातील आव्हानं सध्यातरी त्यानं थोपवून धरली आहेत.

मात्र त्याचा आदर्श असलेल्या 'किंग' कोहलीविरुद्ध खेळताना त्याला त्याच्या संघाची विजयी घौडदोड सुरू ठेवता येईल का? याचं उत्तर सर्वांना रविवारी (31 मे) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये मिळेल.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)