दुष्काळी यवतमाळमध्ये एकेकाळी व्हायची भातशेती, उत्खननातून सापडले अनेक ऐतिहासिक पुरावे

फोटो स्रोत, Department of Ancient Indian History Culture and Archaeology Nagpur University
- Author, भाग्यश्री राऊत
- Role, बीबीसी मराठीसाठी
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
यवतमाळ जिल्हा म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो दुष्काळ. त्यामधून आलेली नापिकी आणि कर्जबाजारीपणा आणि त्यामुळे होणाऱ्या शेतकरी आत्महत्या.
यवतमाळ जिल्ह्यातील हे नेहमीचं दृश्य असलं तरी, याच यवतमाळमध्ये एकेकाळी भाताची शेती व्हायची हे सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही.
पण हे खरं आहे. यवतमाळमध्ये भरपूर पावसात केली जाणारी भताची शेती व्हायची. त्याचे पुरावे देखील शास्त्रज्ञांना सापडले आहेत.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील प्राचीन भारतीय इतिहास आणि पुरातत्व विभागाचे डॉ. प्रभास साहू यांच्यासह त्यांच्या टीमनं यवतमाळ जिल्ह्यातील पाचखेड इथं उत्खनन केलं.
2023-2024 आणि 2024-2025 अशा दोन सत्रात करण्यात आलेल्या या उत्खननात त्यांना तीन हजार वर्षांपूर्वीच्या जुन्या मानवी वस्तीचे अवशेष सापडले आहेत.
ही लोहयुगीन वस्ती असून संशोधकांना याठिकाणी घरांचे अवशेष, लोखंडी वस्तू आणि मातीची भांडी सापडली आहेत.
महत्वाचं म्हणजे इथं त्यांना तांदूळ सापडले. यामध्ये वाईल्ड (रानटी) व्हेरायटीसोबतच तांदळाची कल्टीवेटेड व्हेरायटी सुद्धा शास्त्रज्ञांना सापडली आहे.
या संशोधनाबद्दल डॉ. प्रभास साहू सांगतात, "लोहयुगात आम्हाला धान म्हणजेच भात हे महत्वाचं पीक मिळालं आहे.
यवतमाळमधील स्थिती पाहिली तर आता तिथं धान होत नाही. पण, तीन हजार वर्षांपूर्वी तिथं धान व्हायचे. त्याचे पुरावे आम्हाला मिळाले असून ते अत्यंत महत्वाचे आहेत. त्यांचं व्हेजिटेशन (Vegetation) C-3 होतं. जास्त ह्युमिडीटी असलेल्या ठिकाणी असं व्हेजिटेशन असतं."
(व्हेजिटेशनचा सोप्या भाषेत अर्थ सांगायचा झाल्यास, एखाद्या भागावर असलेले एकूण हिरव्या वनस्पतींचे आवरण म्हणजे वनस्पती आच्छादन असा होतो. )

फोटो स्रोत, Department of Ancient Indian History Culture and Archaeology Nagpur University
तसेच याठिकाणी फक्त तांदूळ नव्हे तर गहू, तूर, मूग, बेहडा आणि बोर याचेही पुरावे मिळाले आहेत.
म्हणजेच हा भाग आजच्या तुलनेत अधिक हिरवा आणि दमट होता. तसेच या उत्खननातून त्या काळातले लोक कसे जगत होते याचा अंदाजही या संशोधनातून बांधला जात आहे.
"लोहयुगीन संस्कृतीतील लोक फक्त शाकाहारी नव्हते तर मांसाहारीही होते. शेळ्या-बकऱ्यांची हाडंही याठिकाणी मिळाली आहेत.
तसंच जंगली प्राण्यांचे अवयवही सापडेल आहेत. कासवांचे सांगाडेही मिळाले आहेत. शेल आणि माशांची हाडंही मिळाली आहेत.
आम्हाला त्यांच्या खाणपान पद्धती, त्यांचं राहणीमान याचे पुरावे मिळाले आहेत. हे तीन हजार वर्षांपूर्वीचं समृद्ध गाव असल्याचं सिद्ध होतं," असं प्रभास साहू सांगतात.

फोटो स्रोत, Department of Ancient Indian History Culture and Archaeology Nagpur University
सध्याच्या परिस्थितीत यवतमाळ जिल्ह्यातलं वातावरण पाहता हा भाग एकेकाळी एवढा समृद्ध परिसर असेल असं कोणालाही वाटणार नाही.
इथं आता भातशेती होत नाही. पण, तीन हजार वर्षांपूर्वी इथं भातशेती होईल इतका पाऊस पडत होता हे या उत्खननातून समोर येत असल्याचंही साहू सांगतात.
यवतमाळमध्ये दुष्काळ कधीपासून पडला?
मग यवतमाळमध्ये दुष्काळ का पडला? याचं उत्तर देखील याच संशोधनात दडललेलं आहे. इथल्या उत्खननात चार वेगवेगळ्या कालखंडाचे पुरावे सापडले आहेत.
प्रारंभिक लोहयुग, लोहयुग, सातवाहन काळ आणि त्यानंतरचे मध्युगीन निजामकालीन अवेशष, असे हे कालखंड आहेत.

फोटो स्रोत, Department of Ancient Indian History Culture and Archaeology Nagpur University
या काळात क्लायमेटीक फ्लक्चुएशन (हवामानातील चढ-उतार) व्हायचे. सातवाहन काळापर्यंत इथलं हवामान अधिक दमट होतं. त्यामुळे तांदूळ आणि गव्हासारखी पिकं घेतली जात होती.
पण, त्यानंतर पाऊस कमी होत गेला आणि जमीन कोरडी पडत गेली.

फोटो स्रोत, Department of Ancient Indian History Culture and Archaeology Nagpur University
सातवाहन काळानंतर या भागातील लोकांनी गावं सोडली. त्यानंतर काही काळानं पुन्हा इथं वस्ती स्थिरावली. इथल्या लोकांनीही नव्या वातावरणाशी जुळवून घेत शेतीपद्धती बदलली.
लोकांनी आपलं व्हेजिटेशन बदललं. यानंतर इथं सी-4 व्हेजिटेशन सुरू झाल्याचं या संशोधनातून समोर आलंय.
उत्खननात आणखी काय सापडलं?
या उत्खननाचा आणखी एक महत्त्वाचा शोध म्हणजे चुनाभट्टी. नदीतल्या शंख-शिंपल्यांपासून चुना तयार केला जात होता, याचे पुरावे इथे सापडले आहेत.
म्हणजेच, तीन हजार वर्षांपूर्वी इथे केवळ शेतीच नव्हती, तर संसाधनांचा नियोजित वापर करणारी एक विकसित वस्ती होती.

फोटो स्रोत, Department of Ancient Indian History Culture and Archaeology Nagpur University
डॉ. साहू सांगतात की, "आतापर्यंत चुनाभट्टी कुठेच सापडली नाही. हा चुनाभट्टीचा पहिला पुरावा आहे. लाईमला उष्णता देऊन त्यापासून लाईम बनवला जायचा आणि शंखापासून सुद्धा लाईम बनवत होते. आम्हाला जी चुनाभट्टी मिळाली त्यात शंखाचा वापर करून चुना बनवला जायचा."
तसेच लोहयुगातील लोकांची घरं कशी होती? ते कोणत्या गोष्टी वापरत होते? याचे देखील अत्यंत महत्त्वाचे असे अनेक पुरावे मिळाले आहेत.
लोखंडी वस्तू, बीड्स, हाडं, फिशिंगसाठी नेट्सला वापरण्यात येणारे रिंग्स अशा गोष्टी याठिकाणी सापडल्या आहेत.
त्यामुळं हजारो वर्षांपूर्वी याभागामध्ये जनजीवन कशा पद्धातीनं पूर्णपणे वेगळं होतं हे आता समोर आलं आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
























