पोट फुगतंय, गॅस होतो? तुमचं पोट वारंवार का बिघडतं? महत्त्वाची माहिती

    • Author, डॉ. हिमानी, रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट
    • Role, बीबीसीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

मानवी शरीरातील महत्त्वाच्या अवयवांबद्दल बोलताना आपण सहसा हृदय, मेंदू, फुफ्फुस आणि यकृत यांसारख्या अवयवांबद्दल जास्त बोलतो. पण शास्त्रज्ञ आता आपल्या शरीरातल्या अशा एका भागावर विशेष लक्ष देत आहेत ज्याकडे आधी इतकं गांभीर्याने पाहिलं गेलं नव्हतं तो भाग म्हणजे 'पोटाचे आरोग्य' (Gut Health) किंवा आतड्यांचं आरोग्य.

आतड्यांचं काम फक्त खाल्लेलं अन्न पचवणं एवढंच आहे, असं एकेकाळी मानलं जायचं. पण आपली रोगप्रतिकारक शक्ती, मानसिक आरोग्य, वजन, मधुमेह, हृदयविकार आणि कॅन्सर यांसारख्या अनेक महत्त्वाच्या गोष्टींवर आपल्या आतड्यांचा खूप मोठा प्रभाव असतो, असं आधुनिक संशोधनातून सिद्ध झालेलं आहे.

'गट हेल्थ' (Gut Health)- पोटाचे/आतड्यांचे आरोग्य

आपल्या पचनसंस्थेत अब्जावधी सूक्ष्मजीव राहत असतात. यामध्ये प्रामुख्याने बॅक्टेरिया, व्हायरस, बुरशी (फंगस) आणि इतर सूक्ष्मजीवांचा समावेश होतो. या सर्वांच्या समूहाला 'गट मायक्रोबायोम' (Gut Microbiome) असं म्हणतात.

हे सूक्ष्मजीव अन्न पचवण्यासाठी, जीवनसत्त्वांची निर्मिती करण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि हानिकारक सूक्ष्मजीवांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात.

जेव्हा आपल्या पोटातील चांगल्या बॅक्टेरियांची संख्या जास्त असते आणि हानिकारक बॅक्टेरिया नियंत्रणात असतात तेव्हा आतड्यांचं आरोग्य उत्तम आहे असं म्हटलं जातं.

शास्त्रज्ञ आतड्यांचे वर्णन 'दुसरा मेंदू' (Second Brain) असे करतात. याचं कारण असं की, आतडे आणि मेंदू यांच्यात सातत्याने माहितीची देवाणघेवाण होत असते ज्याला 'गट-ब्रेन अ‍ॅक्सिस' (Gut-Brain Axis) म्हटलं जातं.

आपल्या शरीरात आनंद निर्माण करणारे जे 'सेरोटोनिन' (Serotonin) संप्रेरक असतं त्याचा जवळपास 90% हिस्सा आतड्यांमध्येच तयार होतो. म्हणूनच आतड्यांचे आरोग्य बिघडल्यास चिंता, नैराश्य, ताणतणाव आणि निद्रानाश यांसारख्या समस्या उद्भवण्याची शक्यता वाढते.

पोटाचे/आतड्यांचे आरोग्य का महत्त्वाचे आहे?

  • रोगप्रतिकारक शक्तीचा भक्कम आधार- शरीराची रोगप्रतिकारक शक्ती जवळपास 70% आपल्या पोटावर किंवा आतड्यांवर अवलंबून असते. निरोगी आतडे शरीराला हानिकारक सूक्ष्मजीवांपासून वाचवण्यास मदत करतात.
  • पोषक घटकांचा शरीराला पुरवठा - आपण जे अन्न खातो त्यातील जीवनसत्वं, प्रथिनं, मेद आणि खनिजं शरीरात नीट शोषली जावीत यासाठी आतड्यांचं आरोग्य चांगलं असणं खूप गरजेचं आहे.
  • वजन आटोक्यात ठेवण्यासाठी - पोटातील चांगल्या आणि वाईट बॅक्टेरियांचे प्रमाण आपल्या वजनावर थेट परिणाम करते. काही संशोधनांनुसार, पोटात वाईट बॅक्टेरिया वाढल्यास लठ्ठपणाचा त्रास वाढू शकतो.
  • मधुमेहाचा धोका - अनेक संशोधनांतून असं समोर आलं आहे की, टाईप-2 मधुमेह आणि इन्सुलिन रेझिस्टन्स (इन्सुलिनचा अडथळा) यांसारख्या समस्यांचा थेट संबंध आतड्यांच्या आरोग्याशी असतो.
  • हृदयाचे आरोग्य - आतड्यांमधील बॅक्टेरिया कोलेस्ट्रॉलच्या चयापचय क्रियेवर परिणाम करतात. या प्रक्रियेत तयार होणारे काही हानिकारक घटक हृदयविकाराचा धोका वाढवू शकतात.

आतड्यांचे आरोग्य बिघडल्याची लक्षणे:

आतड्यांचे आरोग्य बिघडल्यास वारंवार पोट फुगणे, बद्धकोष्ठता किंवा जुलाब, गॅसची समस्या, अपचन, सतत थकवा जाणवणे, झोपेच्या समस्या, त्वचेचे विकार आणि वारंवार इन्फेक्शन होणे यांसारखी लक्षणे दिसतात.

ही लक्षणे इतर आजारांमुळेही असू शकतात. त्यामुळे हा त्रास बरेच दिवस जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.

पोटाचे/आतड्यांचे आरोग्य बिघडण्याची कारणे :

अतिप्रक्रिया केलेले अन्न- पाकीटबंद पदार्थ, जंक फूड आणि जास्त साखरेचे पदार्थ आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियांचे प्रमाण कमी करतात.

अँटीबायोटिक्सचा अतिवापर- अँटीबायोटिक्स औषधे वाईट जंतूंना मारता मारता पोटातील चांगल्या आणि गरजू बॅक्टेरियांनाही नष्ट करतात.

ताणतणाव- दीर्घकालीन मानसिक ताणतणावामुळे आतड्यांच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होतो.

अपुरी झोप- व्यवस्थित आणि पुरेशी झोप न मिळाल्यास पोटातील बॅक्टेरियांचे संतुलन बिघडते.

व्यायामाचा अभाव- शरीराची पुरेशी हालचाल किंवा व्यायाम न केल्यामुळेही पोटाचे आरोग्य बिघडते.

'गट हेल्थ' उत्तम ठेवण्यासाठी आहारात समाविष्ट करायचे पदार्थ:

फायबरयुक्त पदार्थ- फळे, भाज्या, तृणधान्ये, ओट्स, भरडधान्ये आणि डाळी यांसारख्या फायबरयुक्त पदार्थांमुळे पोटातील चांगल्या बॅक्टेरियांना पोषण मिळते.

दही- दह्यामध्ये असणारे 'प्रोबायोटिक बॅक्टेरिया' आतड्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात.

आंबवलेले पदार्थ- दही, ताक आणि घरी तयार केलेले इतर आंबवलेले पदार्थ पोटातील चांगल्या बॅक्टेरियांची संख्या वाढवण्यास मदत करतात.

पाणी- पुरेसे पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते, पोट साफ होते आणि आतडे निरोगी राहातं.

प्रिबायोटिक्स- कांदा, लसूण, केळी आणि तृणधान्ये यांमध्ये अशा प्रकारचे फायबर असते जे पोटातील चांगल्या बॅक्टेरियांच्या वाढीसाठी आवश्यक असते.

नवीन संशोधनानुसार, आतड्यांमधील सूक्ष्मजीव मेंदूच्या कार्यक्षमतेवर थेट परिणाम करू शकतात. चिंता, नैराश्य, ऑटिझम आणि अल्झायमर(स्मरणशक्ती कमी होणे) यांसारख्या आजारांवरही 'मायक्रोबायोम'चा प्रभाव असू शकतो असं अभ्यासातून समोर आलं आहे.

मुलांच्या आतड्यांचे आरोग्य त्यांच्या आयुष्यभराच्या आरोग्यावर परिणाम करते. म्हणूनच त्यांना आईचं दूध देणं अत्यंत आवश्यक आहे. हे दूध पोटातील चांगल्या सूक्ष्मजीवांच्या वाढीस मदत करते. त्यानंतर आपण मुलांना जे अन्न देतो त्यानुसार त्यांच्या पोटातील बॅक्टेरिया बदलत जातात. म्हणूनच मुलांच्या आहारात भरपूर फायबरयुक्त पदार्थ, फळं आणि हिरव्या भाज्या असायला हव्यात.

यासोबतच, मुलांना जास्त जंक फूड देऊ नका आणि गरज नसताना विनाकारण अँटीबायोटिक्स औषधं देणं पूर्णपणे टाळा.

वय वाढेल तसे पोटातील विविध प्रकारच्या बॅक्टेरियांचे प्रमाण कमी होऊ शकते ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होण्याची शक्यता असते. म्हणूनच वयस्कर लोकांनी भरपूर फायबर असलेले पदार्थ खाणे, व्यायाम करणे आणि पुरेशी झोप घेणे खूप गरजेचे आहे.

सध्या मोठ्या आतड्याच्या कॅन्सरमध्ये पोटातील या बॅक्टेरियांचा काय संबंध असतो यावर आता संशोधन सुरू आहे.

आहारात फायबरचे प्रमाण जास्त ठेवल्यास, रेड मीट(लाल मांस) खाणे कमी केल्यास आणि धूम्रपानाची सवय सोडल्यास मोठ्या आतड्याच्या कॅन्सरचा धोका बऱ्याच अंशी टाळता येऊ शकतो.

आतड्यांचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी 10 महत्त्वाच्या टिप्स-

  • रोज भरपूर भाज्या आणि फळे खावीत.
  • भरपूर फायबरयुक्त पदार्थ खावेत.
  • शरीराला आवश्यक तेवढं भरपूर पाणी प्या.
  • दररोज व्यायाम करावा.
  • मानसिक ताणतणाव कमी करावा.
  • रोज रात्री वेळेवर आणि पुरेशी झोप घ्या.
  • धूम्रपान करणे बंद करावे.
  • मद्यपान पूर्णपणे बंद करा.
  • अँटीबायोटिक्स औषधांचा वापर फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करावा.
  • प्रोसेस्ड फूड आणि जंक फूड खाणे कमी करावे.

पोटाचं किंवा आतड्यांचं आरोग्य फक्त अन्न पचवण्यासाठीच नाही तर आपल्या संपूर्ण शरीराला फिट ठेवण्यासाठी गरजेचं आहे. आपली रोगप्रतिकारशक्ती, मानसिक आरोग्य, वजन आणि हृदयाचे आरोग्य या सगळ्या गोष्टी थेट आपल्या पोटाशी जोडलेल्या आहेत. चांगला आहार, रोजचा व्यायाम, वेळेवर झोप आणि टेन्शन फ्री राहून आपण आपली 'गट हेल्थ' चांगली ठेवू शकतो. पोट साफ आणि निरोगी असेल, तर आयुष्यही निरोगी राहील.

(महत्त्वाची नोंद: हा लेख एका डॉक्टरांनी लिहिला असून वैद्यकीय गोष्टींबद्दल माहिती देणे हाच याचा मुख्य उद्देश आहे. आरोग्याशी संबंधित कोणताही निर्णय घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.)

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.