सौरमालेबाहेरील पृथ्वीसारख्या ग्रहावर पहिल्यांदाच वातावरण असल्याचे पुरावे

फोटो स्रोत, Melissa Weiss/Center for Astrophysics |Harvard & Smithsonian
- Author, पल्लव घोष
- Role, विज्ञान प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
शास्त्रज्ञांनी पहिल्यांदाच दूरच्या ताऱ्याभोवती फिरणाऱ्या पृथ्वीसारख्या खडकाळ ग्रहाभोवती वातावरण असल्याचे पुरावे शोधून काढले आहेत.
संशोधकांच्या मते, आपल्या सौरमालेबाहेरही पृथ्वीसारखी परिस्थिती असलेले ग्रह असू शकतात, याचा हा आतापर्यंतचा सर्वात भक्कम पुरावा आहे.
या ग्रहाच्या वातावरणात हेलियम हा वायू आढळून आला आहे. हेलियम हा जीवसृष्टीसाठी योग्य वायू मानला जात नाही. परंतु, या ग्रहावर इतरही वायू असू शकतात, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.
या संशोधनाचे प्रमुख लेखक आणि हार्वर्ड विद्यापीठाचे डॉ. कॉलिन चेरुबिम यांनी या शोधाला 'मोठे यश' असं म्हटलं आहे.
ते म्हणाले, "दुसऱ्या ताऱ्याभोवतीच्या जीवनासाठी अनुकूल भागात असलेल्या खडकाळ ग्रहावर वातावरण असल्याचे पहिल्यांदाच आढळून आले आहे."
एलएचएस 1140 बी (एलएचएस 1140 बी) हा ग्रह पृथ्वीपासून सुमारे 48 प्रकाशवर्षे दूर आहे.
हा ग्रह आपल्या सूर्यापेक्षा लहान आणि कमी उष्ण असलेल्या लाल ताऱ्याभोवती फिरतो.
आतापर्यंत शास्त्रज्ञांनी दूरच्या ताऱ्याभोवती प्रदक्षिणा घालणारे 6 हजारांहून अधिक ग्रह शोधले आहेत.
हा शोध खास मानला जात आहे. कारण तो विज्ञानाच्या सर्वात मोठ्या उद्दिष्टांपैकी एका उद्दिष्टाच्या दिशेने म्हणजेच दुसऱ्या एखाद्या ग्रहावरील जीवनाचा शोध घेण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
'सायन्स' या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या या संशोधनातील शास्त्रज्ञांनी स्पष्ट केलं आहे की, त्यांनी अद्याप कोणत्याही दुसऱ्या ग्रहावर जीवन असल्याचा शोध लावलेला नाही.
"मात्र, एखाद्या ग्रहावर जीवसृष्टीची शक्यता असण्यासाठी तिथे पाणी असणं गरजेचं आहे. आणि पाणी तेव्हाच अस्तित्वात असू शकतं, जेव्हा तो ग्रह आपल्या ताऱ्यापासून योग्य अंतरावर असेल."
"ग्रह ताऱ्याच्या खूप जवळ असेल तर तिथे प्रचंड उष्णता असेल. तो खूप दूर असेल तर तिथे खूप थंडी असेल. त्यामुळे ग्रह ताऱ्यापासून अशा अंतरावर असणे गरजेचं आहे, जिथे तापमान जीवसृष्टीसाठी योग्य असेल."
'गोल्डीलॉक्स झोन'
ग्रह विज्ञानातील तज्ज्ञ या भागाला 'गोल्डीलॉक्स झोन' म्हणतात. हे नाव एका लोककथेतील 'गोल्डीलॉक्स' या लोककथेतील मुलीच्या पात्रावरून ठेवण्यात आले आहे. तिला तिचा दलिया (लापशी) ना खूप गरम, ना खूप थंड म्हणजे अगदी योग्य तापमानाचा हवा असायचा. त्याचप्रमाणे या भागात ग्रहाचे तापमानही जीवनासाठी योग्य असते.
आतापर्यंत शास्त्रज्ञांनी आपापल्या ताऱ्यांच्या 'गोल्डीलॉक्स झोन'मध्ये असलेले शेकडो ग्रह शोधून काढले आहेत.
परंतु, यापैकी केवळ काही डझन ग्रह पृथ्वीसारखे आकाराने लहान आणि खडकाळ आहेत. अशा ग्रहांवर जीवन किंवा जीवसृष्टी असण्याची शक्यता अधिक असल्याचे मानतात.
मात्र, आतापर्यंत यापैकी एकाही ग्रहावर वातावरण असल्याचे आढळून आले नव्हते.
पहिल्यांदाच असं झालं आहे.
आतापर्यंत या ग्रहाच्या वातावरणात केवळ हेलियम वायूच आढळून आला आहे.
हेलियम वायू ग्रहाच्या वातावरणाच्या वरच्या थरात असण्याची शक्यता आहे. पण, केवळ हेलियममुळे जीवन शक्य होत नाही.
पण, या ग्रहाच्या वातावरणाच्या खालच्या थरांमध्ये जीवनासाठी अधिक योग्य असे इतर वायूही असू शकतात, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.

फोटो स्रोत, Getty Images
हार्वर्ड विद्यापीठाचे डॉ. डेविड शार्बोनो म्हणाले की, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सौरमालेबाहेरील पृथ्वीसारख्या एका ग्रहावर प्रथमच वातावरण असल्याचे आढळून आले आहे.
ते म्हणाले, "लोकांच्या मनात नेहमी एक प्रश्न असतो. या विशाल विश्वात किंवा ब्रह्मांडात आपण एकटेच आहोत का?"
"पृथ्वी किंवा आपल्या सौरमालेबाहेरही जीवसृष्टी आहे का, हा मोठा प्रश्न आहे. त्या दिशेने हा अभ्यास एक महत्त्वाची कामगिरी आहे. कारण प्रथमच सौरमालेबाहेर राहण्यासाठी अनुकूल भागात असलेल्या खडकाळ ग्रहावर वातावरण असल्याचे आढळून आले आहे."
परंतु, जीवसृष्टीचा शोध घेताना शास्त्रज्ञांचे लक्ष केवळ एलएचएस 1140 बी या ग्रहावरच नाही.
के2-18बी नावाच्या 'सब-नेपच्यून' ग्रहातही शास्त्रज्ञांना विशेष रस आहे.
या ग्रहावर मोठ्या प्रमाणात पाणी असण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. या ग्रहाच्या वातावरणात 'डायमेथाइल सल्फाइड' या वायूचे संकेत आढळल्यानंतर तो चर्चेत आला होता.
पृथ्वीवर हा वायू प्रामुख्याने समुद्रातील सूक्ष्म जीवांशी संबंधित मानला जातो.
पण, 2025 मध्ये नासाच्या नेतृत्वाखाली पुन्हा केलेल्या तपासणीत त्या वायूचे पुरावे भक्कम नसल्याचे समोर आले. त्यामुळे त्याची खात्री करता आली नाही.
तसेच, हा वायू जीवसृष्टी नसतानाही नैसर्गिक प्रक्रियांमुळे तयार होऊ शकतो, हे देखील समोर आले.
त्याचप्रमाणे ट्रॅपिस्ट-1 या ताऱ्याभोवती फिरणारे सात खडकाळ ग्रहही अजूनही शास्त्रज्ञांसाठी एक कोडेच आहेत.
नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपच्या निरीक्षणानुसार, ट्रॅपिस्ट-1डी या ग्रहावर पृथ्वीसारखे वातावरण असण्याची शक्यता फेटाळण्यात आली आहे.
परंतु, ट्रॅपिस्ट-1ई या ग्रहाबाबत मिळालेली माहिती अद्याप स्पष्ट नसल्यामुळे शास्त्रज्ञ कोणताही ठोस निष्कर्ष काढू शकलेले नाहीत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)























