हिमंता बिस्वा सरमा आता भाजपमध्ये योगी आदित्यनाथ आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबरीचे नेते बनले आहेत का?

भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांना वाटतं की हिमंता बिस्वा सरमा आता राष्ट्रीय स्तरावर योगी आदित्यनाथ (डावीकडे) आणि देवेंद्र फडणवीस (उजवीकडे) यांना आव्हान देत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांना वाटतं की हिमंता बिस्वा सरमा आता राष्ट्रीय स्तरावर योगी आदित्यनाथ (डावीकडे) आणि देवेंद्र फडणवीस (उजवीकडे) यांना आव्हान देत आहेत.
    • Author, प्रेरणा आणि अभिक देब
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 9 मिनिटे

आसामचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा सरमा यांनी 12 मे रोजी शपथ घेतली.

आसाम विधानसभेचे निकाल 4 मे ला जाहीर झाले आणि एनडीए आघाडी दोन-तृतियांश बहुमतानं सत्तेत परतली. त्यावेळेस गुवाहाटीमधील भारतीय जनता पार्टीच्या (भाजपा) कार्यालयात जोरदार विजय साजरा करण्यात आला. मात्र त्याचबरोबर हिमंता बिस्वा सरमा यांच्या वाढत्या राजकीय ताकदीच्या चर्चादेखील ऐकू आल्या.

तिथल्या भाजपाच्या गोटातील बहुतांश लोकांना वाटतं की, "या विजयामागचं सर्वात मोठं कारण हिमंता यांचं नेतृत्व आहे."

आसामच्या विधानसभेत 126 जागा आहेत. त्यातील 82 जागा एकट्या भाजपानं जिंकल्या आहेत. तर त्यांच्या सहकारी पक्षांसह एनडीए आघाडीला एकूण 102 जागा मिळाल्या आहेत. राज्यातील हा विजय एनडीए आघाडीसाठी ऐतिहासिक असल्याचं कार्यकर्त्यांना वाटत आहे. तसंच या विजयाचं श्रेय ते हिमंता बिस्वा सरमा यांना देत आहेत.

भाजपामधील नेत्यांना वाटतं की पक्षामधील हिमंता यांचं स्थान उंचावलं आहे

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, भाजपामधील नेत्यांना वाटतं की पक्षामधील हिमंता यांचं स्थान उंचावलं आहे

अनेक कार्यकर्त्यांना वाटतं की आसाममध्ये याप्रकारचा निर्णायक विजय मिळाल्यामुळे हिमंता बिस्वा सरमा यांचं राजकीय स्थान राष्ट्रीय स्तरावर उंचावलं आहे.

एक महिला कार्यकर्ती आम्हाला म्हणाली, "ते आणखी पुढे जातील, पंतप्रधानपदापर्यंत जातील, असं वाटतं."

तर आणखी एक महिला म्हणाली, "आम्हाला वाटतं की पंतप्रधान मोदींनंतर तेच देशाचे पुढील पंतप्रधान होतील. कारण त्यांच्यामध्ये उत्कृष्ट नेतृत्व कौशल्य आहे."

तसं तर, ही सर्व चर्चा आम्हाला भाजपाच्याच गोटात ऐकायला मिळाली...मात्र त्याला अतिशयोक्ती मानता येणार नाही. कारण आसामच्या राजकारणातील हिमंता बिस्वा सरमा यांच्या मध्यवर्ती भूमिका विरोधी पक्षदेखील मान्य करतो.

निवडणुकीच्या वेळेस विरोधी पक्षनेते अखिल गोगोई यांनी बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत असंही म्हटलं होतं की "लढाई भाजपाशी नाही तर हिमंता यांच्याशी आहे."

राष्ट्रीय राजकारण

हिमंता यांच्या नेतृत्वाखाली पक्षानं जो निर्णायक विजय मिळवला आहे, त्यामुळे हिमंता यांचं राष्ट्रीय राजकारणातील स्थान आणखी उंचावेल का?

याला उत्तर देताना, सेंट्रल गुवाहाटीमधून निवडून आलेले आमदार आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते विजय गुप्ता म्हणाले की हिमंता यांचं राष्ट्रीय राजकरणातील स्थान आधीच उंचावलेलं आहे.

त्यांच्या मते, "हिमंता आता फक्त आसाम किंवा ईशान्य भागापुरतेच मर्यादित राहिलेले नाहीत. तर त्यांचा समावेश भाजपाच्या अशा चेहऱ्यांमध्ये झाला आहे, ज्यांच्या राजकारण आणि निवडणूक क्षमतेवर पक्ष नेतृत्व उघडपणे विश्वास ठेवतं."

तज्ज्ञांना वाटतं की राष्ट्रीय नेते होण्यासाठी हिमंता यांना अजून बराच पल्ला गाठायचा आहे

फोटो स्रोत, ANI

गेल्या काही वर्षांमध्ये, हिमंता भाजपाचे सर्वात सक्रिय स्टार कॅम्पेनर किंवा प्रचारक म्हणून समोर आले आहेत. त्यांनी फक्त आसामामध्येच नाही तर इतर राज्यांमध्ये देखील निवडणूक प्रचार केला.

विशेषकरून 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या काळात त्यांनी जवळपास दीड महिन्यात 8 राज्यांमध्ये 47 सभा घेतल्या.

तसंच अनेक रोड शो केले होते. त्यांची आक्रमक भूमिका आणि सांप्रदायिक भाषणांची तुलना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशीदेखील केली जाते.

भाजपाचे नेते विजय गुप्ता म्हणाले की पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि मंत्रिमंडळातील प्रमुख मंत्र्यांव्यतिरिक्त भाजपाचे राष्ट्रीय स्तरावर दोन असे चेहरे आहेत, ज्यांची स्वीकृती आणि लोकप्रियतेची चर्चा होते. ते म्हणजे "योगी आदित्यनाथ आणि हिमंता बिस्वा सरमा".

असाही प्रश्न उपस्थित होऊ शकतो की योगी आदित्यनाथ देशातील सर्वात मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि हिमंता आसामसारख्या छोट्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मग या दोघांचं राजकीय स्थान किंवा राजकीय उंची समान कशी मानली जाऊ शकते?

अजून बरीच मजल मारायची आहे

या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी हिमंता बिस्वा सरमा यांचा भाजपामधील प्रवास पाहावा लागेल.

अमित शाह यांच्या पुढाकारानं 11 वर्षांपूर्वी 2015 मध्ये हिमंता यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यावेळेस आसाममध्ये काँग्रेसचं वर्चस्व होतं आणि भाजपाचे फक्त 5 आमदार होते. तर त्रिपुरामध्ये डाव्या पक्षाचं सरकार भक्कमपणे सत्तेत होतं. तसंच मेघालय, मिझोरम आणि नागालँड सारख्या राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष आणि काँग्रेसचा अधिक प्रभाव होता.

पुढच्याच वर्षी म्हणजे 2016 मध्ये भाजपकडून हिमंता यांना नॉर्थ ईस्ट डेमोक्रॅटिक अलायन्सचा म्हणजे नेडा चा संयोजक बनवण्यात आलं. त्यांनी प्रादेशिक पक्षांना भाजपाशी जोडण्याच्या डावपेचावर काम केलं.

आसाममध्ये भाजपाचं सरकार पहिल्यांदा स्थापन करण्यापासून ते अरुणाचल प्रदेश, मणिपूर आणि त्रिपुरा सारख्या राज्यांमध्ये पक्ष किंवा त्यांच्या सहकाऱ्यांचं सरकार स्थापन करण्यामध्ये त्यांची मोठी भूमिका मानली गेली.

तज्ज्ञांना वाटतं की राष्ट्रीय नेते होण्यासाठी हिमंता यांना अजून बराच पल्ला गाठायचा आहे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, तज्ज्ञांना वाटतं की राष्ट्रीय नेते होण्यासाठी हिमंता यांना अजून बराच पल्ला गाठायचा आहे

राजकीय विश्लेषकांच्या मते, ईशान्य भारतातील काँग्रेसचं प्रदीर्घ वर्चस्व मोडून काढण्यामध्ये, प्रादेशिक नेत्यांना आपल्यासोबत घेण्यामध्ये आणि भाजपाला एक स्वीकारार्ह राजकीय शक्ती बनवण्यामध्ये हिमंता यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. याच कारणामुळे ते पक्षामध्ये आणि पक्षाबाहेर एक मजबूत चेहरा म्हणून पुढे आले.

या उदयाच्या पार्श्वभूमीवर, त्यांच्या केंद्रीय राजकारणातील प्रवेशाबद्दल अंदाज बांधले जात राहिले आहेत. इतकंच काय, जेव्हा पक्षात नेतृत्वबदल होतील, तेव्हा हिमंता यांच्याकडे देखील एक पर्याय म्हणून पाहिलं जाऊ शकतं, इथपर्यंत देखील अंदाज बांधले गेले आहेत.

मात्र विश्लेषकांना वाटतं की याला अजून वेळ आहे. संपूर्ण देशभरात एक मोठा राष्ट्रीय नेता म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी हिमंता यांना अजून मोठा पल्ला गाठायची आवश्यकता आहे.

राज्याच्या राजकारणातून पुढे जाण्याचे संकेत

याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात हिमंता पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते की पुढील पाच वर्षांसाठी त्यांना स्वत:ला राज्याच्या राजकारणापुरतंच मर्यादित ठेवायचं आहे.

त्यांच्या विधानात ते म्हणाले, "अनेकजण पंतप्रधानपद किंवा गृहमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. मात्र आसाममध्ये माझी आवश्यकता आहे. त्यामुळे मी पुढील पाच वर्षांसाठी राज्याच्या राजकारणातच राहू इच्छितो. त्यानंतरचं मला माहीत नाही. मी 60 वर्षांचा होईल...मग त्यावेळेस मी काय करेन हे त्याचवेळी पाहिलं जाईल."

मात्र गेल्या 30 वर्षांपासून आसामचं राजकारण कव्हर करत असलेले ज्येष्ठ पत्रकार रनेन गोस्वामी यांचा दावा आहे की हिमंता यांना केंद्रातील राजकारणात जाण्याची महत्त्वाकांक्षा आधीपासूनच आहे.

"हिमंता बिस्वा सरमा 2019 मध्ये लोकसभेची निवडणूक लढवण्याच्या तयारीत होते. त्यांनी पक्षाकडे तेजपूर मतदारसंघातून तिकिट देण्याची मागणी केली होती. सर्वकाही ठरलं होतं. मात्र नंतर पक्षाच्या संसदीय बोर्डानं ठरवलं की सध्या हिमंता यांनी राज्याच्या राजकारणातच राहावं," असं ते म्हणाले.

ग्राफिक्स

नाव न उघड करण्याच्या अटीवर राज्यातील भाजपाचे एक ज्येष्ठ नेते म्हणाले की जे 2019 मध्ये झालं नाही, ते पुढील काही वर्षात झालेलं तुम्हाला पाहायला मिळेल. हिमंता यांना राष्ट्रीय राजकारणात नेण्याची योजना आहे.

हिमंता बिस्वा सरमा, आसामच्या राजकारणातून केंद्राच्या राजकारणात जाण्याबाबत ज्येष्ठ पत्रकार नवा ठाकुरिया म्हणाले, "हिमंता यांच्यासाठी सध्या आसामचं राजकारण सोडणं शक्य नाही. त्यांनी आसाममध्ये असे अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत, ज्यांच्यावर त्यांना काम करावंच लागेल."

"उदाहरणार्थ, त्यांनी निष्कासन किंवा हद्दपारीची मोहीम चालवली आहे, राज्यावरील कर्जाचा मुद्दा आहे आणि आसामच्या स्थानिक जनतेची अस्मिता वाचवण्याचा मुद्दा आहे...या सर्व मुद्द्यांकडे पाहता, त्यांचं पुढील 2-3 वर्षे दिल्लीत जाणं शक्य दिसत नाही."

भाजपाचे एक वरिष्ठ नेतेदेखील याच्याशी सहमत आहे.

पुढील पंतप्रधान कोण होणार यासाठीची स्पर्धा

केंद्रीय नेतृत्व बदलातील हिमंता यांच्या दावेदारीबद्दल बोलायचं तर, राजकीय लेखक नीलांजन मुखोपाध्याय यांना वाटतं की भाजपामध्ये नेतृत्व बदलाचा प्रश्न अजून दूर आहे.

त्यांच्या मते, "पुढील लोकसभा निवडणूकदेखील भाजपा नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावरच लढेल. त्यांना वाटतं की भलेही 2034 पर्यंत नाही, मात्र मोदी किमान 2031 पर्यंत पंतप्रधानपदावर राहू शकतात. असं झाल्यास ते देशातील सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवणारे व्यक्ती ठरतील आणि जवाहर लाल नेहरूंचा विक्रमदेखील मागे टाकतील."

नीलांजन मुखोपाध्याय यांना असंही वाटतं की मोदींनंतर पंतप्रधानपदाचे सर्वात प्रबळ उमेदवार गृहमंत्री अमित शाह मानले जातात. त्यांच्या मते, "नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाच्या प्रचाराचा सर्वात मोठा चेहरा अमित शाह होते. ही बाब याच गोष्टीचा संकेत देते."

अर्थात ते असंही म्हणतात की उत्तराधिकारी कोण असेल, हा प्रश्न पक्षाचं नेतृत्व आणि संभाव्य उमेदवार, या दोघांच्याही मनात कुठेतरी राहील.

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा

नीलांजन मुखोपाध्याय यांच्या मते, "भविष्यातील नेतृत्वाबाबतचा निर्णय मुख्यत: तीन गोष्टींवर अवलंबून आहे.

पहिली - हिंदुत्वाचं राजकारण पुढे नेण्याची क्षमता, विशेषकरून राम मंदिर आणि कलम 370 हटवण्यासारखे मोठे मुद्दे पूर्णत्वास गेलेले असताना आणि समान नागरी संहितेवर देखील काम सुरू आहे.

दुसरी - संघटना मजबूत ठेवणं आणि दक्षिण भारतापर्यंत भाजपाचा विस्तार करण्याची क्षमता.

तिसरी - आरएसएसबरोबरचे चांगले संबंध आणि त्यांचा पाठिंबा."

तज्ज्ञांचं म्हणणं आहे की भविष्यात नरेंद्र मोदी यांचा उत्तराधिकारी निवडताना वयाचा मुद्दादेखील महत्त्वाचा ठरेल.

हिमंता बिस्वा सरमा, योगी आदित्यनाथ आणि देवेंद्र फडणवीस...या तिघांचं वय सध्या पन्नासच्या जवळपास आहे. जर नेतृत्व बदल 2034 च्या आसपास झाला, तर त्यावेळेस तिघांचं वयदेखील तितकंच असेल, ज्या वयात मोदी पंतप्रधान झाले होते.

आरएसएसचा पाठिंबा कोणत्या नेत्याला आहे?

हे तिघे नेते भाजपासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या राज्यांचे मुख्यमंत्री आहेत. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रासारख्या आर्थिकदृष्ट्या सर्वात मजबूत राज्याचे मुख्यमंत्री आहेत, तर योगी आदित्यनाथ देशातील सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशचे नेतृत्व करतात, तर हिमंता बिस्वा सरमा अशा राज्याचे आहेत, ज्या राज्यानं हिंदी प्रदेशाबाहेर ईशान्येकडील राज्यांमध्ये भाजपाचा विस्तार करण्याचा मार्ग मोकळा केला.

मात्र या तिन्ही नेत्यांपैकी सर्वाधिक निर्णायक आघाडी कोणाकडे असू शकते?

महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र साठे यांना वाटतं की आरएसएसचा पाठिंबा हा सर्वात मोठा घटक असेल. या बाबतीत देवेंद्र फडणवीस सर्वात पुढे दिसतात. त्यांच्या मते, "फडणवीस प्रदीर्घ काळापासून संघाच्या प्रत्यक्षातील राजकारणाशी जोडलेले आहेत. तसंच महाराष्ट्रात असल्यामुळे ते नागपूरमध्ये असलेल्या आरएसएसच्या मुख्यालयाच्यादेखील सर्वात जवळचे आहेत."

हिमंता बिस्वा सरमा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, हिमंता बिस्वा सरमा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी

साठे यांच्या मते, हिमंता बिस्वा सरमा काँग्रेसमधून भाजपामध्ये आले आहेत. हा त्यांच्या राजकीय प्रवासातील एक कच्चा दुवा मानला जातो. तर योगी आदित्यनाथ यांच्याबाबत संघामध्ये अशी चिंता असू शकते की त्यांची वैयक्तिक प्रतिमा पक्षापेक्षाही मोठी होऊ नये.

अर्थात पत्रकार विजय त्रिवेदी याच्याशी सहमत नाहीत. ते म्हणतात की आरएसएस खूपच व्यवहारी संघटना आहे. हिंदू मतं कोण सर्वात मजबूतीनं आणू शकतं, हा त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो. त्यांच्या मते, योगी आदित्यनाथ यांच्यामध्ये ही क्षमता स्पष्टपणे दिसून येते.

आरएसएस आणि वरिष्ठ नेतृत्वाबरोबरचे संबंध

तर नवा ठाकुरिया यांचा दावा आहे की, "आरएसएससाठी हिमंता एक संपत्ती आहेत. संघ हिंदूंच्या एकजुटीचा मुद्दा मांडतो. ज्यावर हिमंता यांनी काम केलं आहे. असं दिसतं की सध्या हिमंता यांना आरएसएसचा पाठिंबा आहे."

वरिष्ठ नेतृत्वाबरोबरच्या चांगल्या संबंधाबाबतच्या प्रश्नावर दोन्ही वरिष्ठ पत्रकारांना वाटतं की हिमंता यांचे गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर चांगले संबंध आहेत. तर पंतप्रधान मोदींबरोबर औपचारिक स्वरुपाचे संबंध आहेत.

नवा ठाकुरिया यांनी एक उदाहरण देत हा मुद्दा समजावला. अलीकडेच चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आले. त्यावेळेस पंतप्रधान मोदी यांनी आसाममधील भाजपाच्या मोठ्या विजयाचं श्रेय सार्वजनिक व्यासपीठावरून कुठेही हिमंता यांना दिलं नाही.

तज्ज्ञांच्या मते विजय मिळवलेला असूनही हिमंता यांच्यासमोर अजूनही आव्हानं आहेत

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, तज्ज्ञांच्या मते विजय मिळवलेला असूनही हिमंता यांच्यासमोर अजूनही आव्हानं आहेत

ज्येष्ठ पत्रकार नवा ठाकुरिया यांनी हिमंता यांच्या समोरच्या आव्हानांबद्दल सांगितलं. ते म्हणाले, "हिमंता सध्या पंतप्रधानपदाचे दावेदार होण्यास पात्र नाहीत. ते हिंदीमध्ये प्रभावीपणे भाषण करू शकत नाहीत. अशा हिंदीसह जर तुम्ही दिल्लीत काम करू इच्छिता तर आव्हानं येतीलच. ते स्वत:देखील मान्य करतात की ते एका छोट्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. दिल्ली त्यांच्यासाठी दूर आहे."

"मात्र तिथे पोहोचण्याची महत्त्वाकांक्षा त्यांच्यामध्ये नक्की आहे. त्याच्या आधी त्यांना केंद्रीय राजकारणात भाग घ्यावा लागेल. प्रत्येक नेता नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणे मुख्यमंत्रीपदावरून थेट पंतप्रधान होऊ शकत नाही."

मोदी यांच्यानंतर भाजपामधील सर्वाधिक लोकप्रिय नेता कोण?

नीलांजन मुखोपाध्यायदेखील मान्य करतात की मोदी यांच्या उत्तराधिकाऱ्यामध्ये देखील जनमानसातील तशीच लोकप्रियता आणि करिष्मा असणं आवश्यक असेल.

याबाबतीत पत्रकार विजय त्रिवेदी यांना वाटतं की योगी आदित्यनाथ यामध्ये सर्वात मजबूत स्थितीत आहेत. त्यांच्या मते, भाजपाच्या समर्थकांमध्ये मोदीनंतर योगी हेच सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत. इतकंच काय, आक्रमक हिंदुत्वाच्या समर्थकांमधील एका गटात त्यांची लोकप्रियता मोदी यांच्याहून अधिक असल्याचं मानलं जातं.

भाजप

फोटो स्रोत, BBC/Prabhat Kumar

अर्थात, त्रिवेदी असंही म्हणतात की हिमंतादेखील हिंदुत्वाच्या राजकारणात वेगानं पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र राष्ट्रीय स्तरावर त्याप्रकारे स्वत:ला सिद्ध करण्यासाठी त्यांना आणखी वेळ लागेल.

तज्ज्ञांना वाटतं की शेवटी, ज्यावेळेस मोदी आणि अमित शाह यांच्यानंतर नेतृत्व बदलाचा प्रश्न पुढे येईल, त्यावेळच्या राजकीय परिस्थितींवर हे सर्व अवलंबून असेल.

अर्थात आगामी वर्षांमध्ये जर भाजपा कमकुवत झाली आणि त्यांना आघाडीच्या राजकारणावर अवलंबून राहावं लागलं, तर परिस्थिती बदलूदेखील शकते.

वादांशी असलेलं हिमंता बिस्वा सरमांचं नातं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्याप्रकारे गुजरात मॉडेल आणि आक्रमक हिंदुत्वाच्या राजकारणाच्या आधारे त्यांची राष्ट्रीय ओळख निर्माण केली, हिमंता देखील त्याच मार्गानं वाटचाल करण्याचा प्रयत्न करत आहेत, असं राजकीय विश्लेषकांना वाटतं.

ज्येष्ठ पत्रकार संगीता बरुआ म्हणतात, "हिमंता, मोदींसारखे नाहीत. सध्या ते प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना सामोरं जातात. मात्र जर त्यांना एखादा प्रश्न आवडला नाही, तर ते समोरच्या व्यक्तीच्या धर्माबद्दल विचारू शकतात, किंवा एकप्रकारे त्याला धमकावू शकतात की मी तुझ्या मालकाला ओळखतो आणि तुला नोकरी गमवावी लागेल."

हिमंता बिस्वा सरमा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, ANI

राजकीय विश्लेषक असंही म्हणतात की आरएसएसच्या पार्श्वभूमीतून आलेल्या भाजपाच्या नेत्यांच्या तुलनेत हिमंता अधिक आक्रमक आणि ध्रुवीकरण करणारं राजकारण करतात.

त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात अल्पसंख्यांक समुदायाला लक्ष्य केल्याचे आरोप देखील झाले आहेत. ते उघडपणे म्हणतात की ते हिंदुत्वाचं राजकारण करतात.

राज्यात मोठ्या संख्येनं मदरसे बंद करणं असो की मग निष्कासन मोहीमेअंतर्गत जमिनी मोकळ्या करून घेण्याचं प्रकरण असो, या सर्व मुद्द्यांवरून त्यांच्या सरकारवर टीका होत राहिली आहे. तर हिमंता याला त्यांच्या सरकारचं यश म्हणत आले आहेत.

इतकंच नाही तर, बांगलादेशी मुस्लिमांबद्दलच्या त्यांच्या वक्तव्यांमुळे देखील ते अनेकदा चर्चेत असतात.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.