मान्सूनची गती मंदच, या आठवड्यात कोकणात पाऊस कसा असेल? नवा अंदाज

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

मान्सून सध्या अगदी संथगतीनं वाटचाल करत असून मुंबईसह कोकणात पुढच्या आठवड्यातही पावसात चढउतार पाहायला मिळण्याची शक्यता आहे, असं ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी म्हटलं आहे.

गेल्या 24 तासात महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस फारसा पडलेला नाही.

पुढच्या तीन चार दिवसांत मान्सून महाराष्ट्रात आणखी आगेकूच करू शकतो, असं हवामान विभागानं म्हटलं आहे. एरव्ही दहा जून पर्यंत मान्सून मुंबईत दाखल होतो, पण यावेळेस त्याला पुढे सरकायला थोडा वेळ लागतो आहे.

कृष्णानंद होसाळीकर यांनी आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये, पुढच्या आठवड्यापर्यंत राज्यातील अंतर्गत भागात मात्र या काळात थंडरस्टॉर्म्स येतील, म्हणजेच वीजा, गडगडाटासह सोसाट्याचा वारा आणि काही ठिकाणी पाऊस कोसळण्याची शक्यता आहे, असंही म्हटलं आहे.

10 जून रोजी दुपारी भारताच्या इन्स्टॅट सॅटेलाईटनं टिपलेल्या दृश्यांमध्ये महाराष्ट्रावर ठिकठिकाणी ढगांचं विरळ आवरण दिसतंय. आज सकाळच्या नोंदींनुसार दक्षिण कोकणात गुहागरमध्ये 79 तर संगमेश्वरमध्ये 71 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अहिल्यानगरला राहुरीमध्ये 42 मिलीमीटर पाऊस पडलाय.

हवामान विभागाच्या भारत फोरकास्टिंग मॉडेलनुसारही सध्या या परिसरात पावसाची शक्यता आहे. इथे तुरळक ठिकाणी वीजा आणि गडगडाटासह सोसाट्याचा वारा आणि जोरदार पाऊस पडू शकतो. तर मुंबई आणि राज्यातील इतर भागांत 13-14 जूनच्या आसपास चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. पुढच्या चोवीस तासांत इथे तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आता कमाल तापमानाची घट झाली आहे, पण उत्तर कोकणात उष्ण आणि दमट हवामान जाणवतंय. तर विदर्भात तापमान 40 ते 42 अंशांच्या आसपास राहील.

रात्रीच्या किमान तापमानात मात्र अजून घट होत नाहीये, आणि ही चिंतेची बाब आहे. विदर्भात काही ठिकाणी किमान तापमान 32 अंशा सेल्सियसवर राहतंय तर मुंबईसह किनारी भागांतही 28 अंश सेल्सियसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.

त्यामुळेच 10 आणि 11 जून रोजी पालघर जिल्ह्यांत उष्ण आणि दमट हवामानासाठी यलो अलर्ट आहे. 10 जून रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशीव, लातूर, बीड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांत थंडरस्टॉर्म म्हणजे सोसाट्याचा वारा, विजा आणि हलक्या ते मध्यम पावसासाठी यलो अलर्ट आहे.

11 जून रोजी रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, धाराशीव, बीड, या जिल्ह्यांत तसंच विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये सोसाट्याचा वारा, वीजा आणि गडगडाटासह तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसासाठी यलो अलर्ट आहे.

12 आणि 13 जूनला विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी थंडरस्टॉर्म आणि पावसासाठी ऑरेंज अलर्ट आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)