नाशिक : लैंगिक शोषणप्रकरणी बहुराष्ट्रीय कंपनीकडून आरोपी कर्मचाऱ्यांवर कारवाई; निवेदनात काय म्हटलं?

- Author, प्रवीण ठाकरे
- Role, बीबीसी मराठीसाठी
- वाचन वेळ: 3 मिनिटे
नाशिकमधील एका बहुराष्ट्रीय कंपनीत महिला कर्मचाऱ्यांना धमकावून त्यांचा विनयभंग, लैंगिक शोषण आणि मानसिक छळ केल्याचे आरोप याच कंपनीतील आठ महिलांनी केले आहेत.
या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात 8 गुन्हे, तर देवळाली पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये दोन महिला आणि सहा पुरुषांचा समावेश आहे.
या आरोपींपैकी सात जणांना अटक करण्यात आली असून, एक महिला आरोपी फरार आहे.
ज्या कर्मचाऱ्यांना आरोपी म्हणून पोलिसांनी चौकशीसाठी अटक केलीय, त्याचं संबंधित बहुराष्ट्रीय कंपनीनं निलंबन केलं आहे. शिवाय, कंपनीची बाजू स्पष्ट करणारं पत्रकही जारी केलं आहे.
पीडित महिलांवर धर्मांतरासाठी दबाव आणल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे पोलिसांचा तपास त्या दिशेनेही सुरू आहे.
आरोपी हे त्याच कंपनीत मोठ्या पदावर आहेत. यातील काही संगणक अभियंता तर काही जण टीम लीडर्स आहेत.
प्रकरणाशी संबंधित बहुराष्ट्रीय कंपनीचे निवेदन
या प्रकरणाशी संबंधित बहुराष्ट्रीय कंपनीने निवेदन जारी केलं आहे.
या निवेदनात संबंधित कंपनीच्या प्रवक्त्यांनी म्हटलंय की, "आमच्या कंपनीत कोणत्याही प्रकारच्या छळवणूक आणि जुलूमाविरुद्ध दीर्घकालीन शून्य-सहनशीलता धोरण आहे. आम्ही नेहमीच आमच्या कर्मचाऱ्यांच्या कार्यस्थळी सुरक्षितता, सन्मान आणि कल्याणाच्या सर्वोच्च मानकांची खात्री केली आहे."
"नाशिकमधील या प्रकरणाची माहिती मिळताच आम्ही तात्काळ कारवाई केली असून अंतर्गत चौकशी प्रक्रिया सुरू केली आहे. तपासाअंतर्गत असलेल्या कर्मचाऱ्यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित करण्यात आले आहे."
तसंच, "आम्ही स्थानिक कायदा अंमलबजावणी प्राधिकरणांसोबत पूर्ण सहकार्य करत आहोत. पुढील कोणतीही कारवाई या तपासाच्या निष्कर्षांवर आधारित असेल", असंही कंपनीच्या प्रवक्त्यांनी नमूद केलं आहे.
HR विरोधातही गुन्हा दाखल
पीडित महिलांनी संबंधित कंपनीच्या एचआर विभागाकडेही याबाबत तक्रार केली होती. परंतु, एचआर विभागाने याप्रकरणी काहीच कार्यवाही केली नाही, असं महिलांनी तक्रारीत म्हटलंय.
त्यामुळं संबंधित बहुराष्ट्रीय कंपनीच्या पुणे येथील एचआर विभागातील महिला कर्मचाऱ्याविरोधातही गुन्हा दाखल झाला आहे.

"कामाच्या ठिकाणी आरोपी पीडित महिलांना शारीरिक स्पर्श करणे, त्यांच्या शारीरिक स्थितीवर आणि पेहरावावर भाष्य करणे, त्यांच्या धर्माविषयी शेरेबाजी करणे यासह धार्मिक भावना दुखावण्याचे प्रकार करत होते," असे आरोप महिलांनी तक्रारीतून केले आहेत.
त्याचबरोबर, "आरोपी जबरदस्तीने मासांहार करायला सांगत होते, धर्मांतर करण्यासाठी त्यांची मानसिकता तयार करण्याचा प्रयत्न करत होते," असंही तक्रारीत म्हटलं आहे.
2022 पासून हा प्रकार सुरू होता, असं तक्रारदार महिलांनी पोलिसांना सांगितलं आहे.
पोलीस या सर्व आरोपांचा तांत्रिक आणि प्रत्यक्ष पुराव्यांच्या आधारे तपास करत आहेत.
विशेष तपास पथकाची नेमणूक
या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या नेतृत्त्वाखाली विशेष तपास पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. यात 12 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
याबाबत सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी 10 एप्रिल रोजी प्रतिक्रिया दिली. त्यांनी खासगी कंपन्यांना महिलांच्या सुरक्षितेसंदर्भात आवश्यक ती खबरदारी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहन केले.

सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके 10 एप्रिलच्या या प्रतिक्रियेत म्हणाले की, "या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये महिलांचा विनयभंग, लैंगिक व मानसिक अत्याचार तसेच धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी 9 गुन्हे दाखल करण्यात आले असून 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे."
"या प्रकरणाचं गांभीर्य आणि संवेदनशीलता पाहून या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशाने गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त यांच्या नेतृत्त्वाखाली एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे."
तसंच, त्यांनी आवाहन केलं की, "कोणत्याही महिलेला विनयभंग किंवा अत्याचाराची तक्रार करायची असेल तर त्यांनी सीपी व्हॉट्सअप क्रमांक 9923323311 यावर संदेश पाठवावा किंवा नियंत्रण कक्ष क्रमांक 112 वर संपर्क साधावा."
आरोपींचे वकील काय म्हणाले?

याबाबत आरोपींचे वकील बाबा सय्यद यांनी 10 एप्रिलला त्यांची भूमिका मांडली.
ते म्हणाले की, "सर्वजण एका बहुराष्ट्रीय कंपनीत एकत्र काम करत होते. ओपन केबिन ऑफिस स्पेस कल्चर असल्यामुळे सर्वांमध्ये चांगली मैत्री होती. त्यामुळे तक्रारदार महिला आणि आरोपींमध्ये गैरसमज झाला आहे."
"हे प्रकरण अतिशय संवेदनशील आहे. संपूर्ण एफआयआरची प्रत अद्याप मिळालेली नाही. भारतीय न्यायसंहितेनुसार (बीएनएस) जी कलमे लावण्यात आली आहेत. त्यासाठी कमाल 3 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. एफआयआर पाहिल्यानंतर धर्मांतराच्या मुद्द्यावर स्पष्टता येईल."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)



























